‘ऐका..!! एक सॉलिड न्यूज आहे. तुमचा सगळ्यांचा आवडता हीरो जतीन- येस्स तोच- जतीन कीर्तिकरचा कार अॅक्सिडेंट का झाला माहितीये? ३१ डिसेंबरला गाडी चालवताना म्हणे तो फोनवर बायकोशी भांडत होता आणि गाडीत त्याची ‘दुसरी’ मैत्रीण होती. ती पण त्याच्याशी हॅ हॅ हॅ हॅ!! म्हणून झाडावर आदळली गाडी.’ भिशीच्या ग्रुपमध्ये आल्या आल्या रेणुका म्हणाली. दुसरी म्हणाली, ‘मी तर ऐकलं की, ती दुसरी म्हणजे मीना कपूरची मुलगी होती. जतीन आता हिंदी फिल्म करत होता ना!! ते तिच्यामुळेच झालं असणार. बरं, जाऊ दे. ऑर्डर द्या. तीन पनीर बटर मसाला.. दोन अमुक.. तीन तमुक..
* * *
‘मेंदूवरची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आहे. रक्ताची मोठी गाठ होती, ती आता निघाली आहे. पुढच्या तीन दिवसांत शुद्ध येऊन ते व्यवस्थित ओळखायला लागतील सगळ्यांना अशी आशा करू या.’ डॉक्टर जतीनचे आई-वडील आणि बायकोशी बोलत होते.
‘काळजी नको ना करू मी?’’ जतीनच्या आईनं डॉक्टरांना विचारलं. ‘मावशी, तो आमचा लाडका नट तर आहेच; पण इतक्या लाखो लोकांचे आशीर्वाद असलेला चांगला माणूस आहे. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्याच्याबरोबर. तो नक्की बरा होईल..’ डॉक्टर म्हणाले.
* * *
‘तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन कुठे झालं हो?’ पाटील आजींनी देशपांडे आजोबांना विचारलं.
‘जीवन हॉस्पिटलमध्ये.. का हो?’
‘अहो, आपल्या आवडत्या सीरिअलचा हीरो तिथे अॅडमिट आहे ना! म्हटलं, कोणी ओळखीचं असेल तुमच्या तर विचारा- नक्की कशामुळे धडकला तो झाडावर? शुद्धीत होता की ‘घेऊन’ गाडी चालवत होता?’
‘तो दारू पिणारा नाहीये अगं. आणि त्याच्याबरोबर दुसरी बाई होती म्हणतात, तर ती गेली कुठे? तिला नाही का लागलं?’ – पाटील आजोबा.
‘तुम्ही उगीच सांगू नका हो काही. त्याचे वडील तुमच्या ऑफिसमध्ये होते म्हणून लगेच त्याची बाजू घेऊ नका. ही नट मंडळी ‘तसलीच’ असतात. कालच सूनबाई सांगत होती, की तिच्या भिशीच्या ग्रुपमध्ये तिला न्यूज कळली- मीना कपूरच होती म्हणे गाडीत. त्याच्यापेक्षा पंधरा वर्षे मोठी बाई. परमेश्वरा.. अमेरिका बरी म्हणायची!’
रात्री अमेरिकेहून आलेल्या फोनवर देशपांडे आजोबा- ‘अगं प्रिया, तो जतीन कीर्तिकर तुझ्या वर्गातला ना? त्याला मोठा अपघात झालाय.’ ‘हो बाबा, वाचलं मी नेटवर. पण अपघाताच्या न्यूजपेक्षा गॉसिप्स जास्त ऐकू आली काल आमच्या मंडळाच्या संक्रांतीच्या कार्यक्रमात. आणि दादाचा सिंगापूरहून फोन आला, तोपण सांगत होता. त्याला पुण्यातून मित्रांनी सांगितलं, की मीना कपूरने मुद्दाम धडकवली गाडी. असो. बाबा, मला एक पैठणी हवी होती गुढी पाडव्याच्या कार्यक्रमात नेसायला. कशी पाठवाल?
* * *
‘मीना कपूरने गाडी धडकवताना स्वत: बाहेर उडी मारली म्हणे.’ बँकेतील लंचटाइम.
‘जतीनची आणि मीनाची झटापट झाली गाडीत आणि गाडी धडकली.’ शिक्षकांची खोली. माध्यमिक शाळा.
‘मीना कपूर नव्हतीच गाडीत.. मला विचार ना! त्याच्याबरोबर मालिकेत काम करणारी रोमा होती. तिला यांनी पटकन दुसरीकडे अॅडमिट केलं. मीडियाने न्यूज दाबली. पेपर पण मॅनेज केले सगळे.’ अप्सरा परमीट रूममध्ये एक ‘बे’ दुसऱ्या ‘बे’ला.
‘तो छान मुलगा आहे. भांडण नाही आणि दारू नाही. सरळ सरळ अपघात झाला. त्याच्या तब्येतीची चौकशी करा. किती फालतू बोलताय तुम्ही!’ जतीनचा मित्र पोटतिडकीने दुसऱ्या फिल्मच्या सेटवर सांगत होता.
‘रोमा काय.. मीना कपूर काय.. मज्जा आहे बुवा जतीनची.’ एक अपयशी नट दुसऱ्या अपयशी नटाला.
‘लकी आहे रे जतीन. बेशुद्ध आहे तिकडे, तरी सगळीकडे किती चर्चा आहे त्याची. आणि मीना कपूरचं गॉसिप तर हिंदी मॅगझिनमध्ये पण आलंय.’ जतीनचा स्पर्धक नट आपल्या गर्लफ्रेंडला.
* * *
‘पल्स आणि ब्लड प्रेशर नॉर्मल आहे त्यांचं. आणि दोन्ही हातापायांची बारीक बारीक हालचाल आहे म्हणजे पॅरॅलिसिस नक्कीच नाही..’ डॉक्टरांनी सांगितलं.
‘शुद्धीवर कधी येतील?’ जतीनच्या बायकोने डोळ्यांत पाणी आणून विचारलं.
‘कदाचित येत्या २४ तासांत..’ – डॉक्टर.
‘त्यांच्या घरी पोळ्या करणाऱ्या बाईंनी सांगितलं की, ती रोमा त्यांच्याकडेच राहते आता.’ जतीनच्या सोसायटीत राहणाऱ्या मोनेकाकू.
‘मोनेकाकू स्वत: सांगत होत्या की, त्यांनी पाहिलंय मीना कपूरला त्यांच्याकडे रोज येताना.. रात्री यायची म्हणे!’ शाळेबाहेर मुलांना घ्यायला जमलेल्या पालकांपैकी एक.
‘मीना कपूर, रोमा.. अजून कितीतरी असतील.. ही स्टार मंडळी म्हणजे खलाशी प्रवृत्तीचे. प्रत्येक बेटावर एक प्रेयसी.’ अनेक ‘ज्येष्ठ’ नटांचा ‘विरंगुळा’ ठरलेली एक जुनी साइड हीरोइन आपल्या नवऱ्याला पाणी देता देता म्हणाली.
‘रक्तदान शिबिराला त्या जतीनला पाहुणा म्हणून बोलावणार होतो मी. पण असला माणूस आणि असलं रक्त नकोच आपल्याला.’ आपला खादीचा कुर्ता सावरत एक समाजसुधारक होऊ घातलेले गृहस्थ म्हणाले. ‘पण बाबा, आपल्याला नक्की माहितीये का, की काय झालंय? आणि तुमचे सगळे मित्र आणि देणगीदार खूप स्वच्छ चारित्र्याचे आहेत का?,’ त्यांचा मुलगा म्हणाला. ‘तू गप्प बस. मी जग पाहिलंय!!’ समाजसुधारक बाबा म्हणाले.
* * *
‘काका, लोक वाट्टेल ते बोलतायत. पुण्यात, मुंबईत, नागपूरमध्ये तर मीना कपूर, रोमा सोडून एक तिसरंच नाव जोडलं जातंय. अमेरिकेहून फोन येताहेत. पत्रकार मित्र विचारताहेत. आपण पेपर, न्यूज चॅनेल, फेसबुक कुठेतरी स्पष्टीकरण द्यायला हवं.’ जतीनचा चुलतभाऊ अजय जतीनच्या वडिलांना सांगत होता.
‘आज थोडे डोळे किलकिले करून बघत होता जतीन. उद्यापर्यंत नीट शुद्धीवर येईल.’ पुन्हा त्यांनी हातातलं ‘मनाचे श्लोक’ हे पुस्तक वाचायला सुरुवात केली.
‘मना श्रेष्ठ धारिष्टय़ जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे’
* * *
‘अगं, सगळे विचारताहेत, की नक्की काय होतं जतीनचं?’ जतीनच्या सासूबाई आपल्या लाडक्या मुलीला.
‘सेलेब्रिटी म्हटल्यावर गॉसिप्स होणारच आई. माझा त्याच्यावर विश्वास आहे.’ जतीनच्या बायकोने नजर चुकवत विषय संपवला.
दोन दिवसांतच जतीन शुद्धीवर येऊन घरच्यांना ओळखल्याची बातमी पेपरात, न्यूज चॅनेलवर झळकली.
भिशीचे ग्रुप, बँका, शिक्षकखोली, ज्येष्ठ नागरिक संघ, परमीट रूम, फोन, मेसेज सगळीकडे पुन्हा एकदा चर्चा रंगली..
‘एवढं सगळं होऊन मीना नाही आणि रोमा नाही; हॉस्पिटलमध्ये बायकोबरोबरचे फोटो पेपरात आले. कमाल असते या लोकांची!’ हे नवीन वाक्य आता सर्वत्र फिरत होतं.
महिनाभराच्या विश्रांतीनंतर जतीन पुन्हा
शूटिंगला गेला. स्वागत झालं! ‘रसिकांच्या शुभेच्छांमुळे मी पुन्हा दिसतोय तुम्हाला..’ अशी मुलाखत आली.
* * *
पेपर वाचता वाचता पिंगळेकाकू मुळ्येआजींना म्हणाल्या, ‘बरं झालं, आपली आवडती मालिका ‘मी जावयाचा भाऊ’ पुन्हा सुरू होणार.. जतीन कीर्तिकर पुन्हा आला.’
तेवढय़ात आठवलेकाकू म्हणाल्या, ‘अहो, आता राणी सांगत होती- ती हीरोइन आहे ना, पिंकी वाकणकर- तिचं म्हणे आमदारसाहेबांशी लग्न होणार..’
पुन्हा एकदा कानगोष्टींचा खेळ सुरू झाला..
‘तिसरं लग्न आहे म्हणे त्यांचं!,’ अ म्हणाला.
‘पिंकी नुसतं नावापुरतं लग्न करतीये, तिचा बॉयफ्रेंड आहे.’ – ब.
‘आमदारसाहेबांनी म्हणे एक कोटीचा नेकलेस दिला तिला.’’ – क.
‘सारं खोटं आहे. ती खूप गोड मुलगी आहे.’ -ड.
‘बापरे! रक्तदान शिबिराला आता आमदारसाहेब आणि पिंकीताई दोघांनाही नाही बोलावता येणार का?’ – होऊ घातलेले समाजसुधारक.
सलील कुलकर्णी