4बने, बने, चल लवकर- तुला मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं पाहायची आहेत ना? पाहिलीच पाहिजेत ती. त्यानं आपला इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र पक्कं होतं. त्यामुळे कोणालाही कुठलाही पत्ता सांगताना अडचण येत नाही. आता हेच पाहा- ही एअर इंडियाची इमारत. हिचा पत्ता काय सांगशील? एक्स्प्रेस टॉवरजवळ. आणि एक्स्प्रेस टॉवर कुठं आहे, म्हणून सांगशील? एअर इंडियाजवळ!
इथून थोडं पुढं गेलं ना, की ती इमारत दिसते बघ. गोल गोल घुमटाची! ओळखलीस? वेडी गं वेडी. अगं, गोलघुमट नाहीये तो. किती गं तुझा भूगोल कच्चा! तावडेसरांनी ऐकलं ना, तर इथल्या इथं नवं शैक्षणिक धोरण आखतील! का म्हणजे? छंदच आहे त्यांचा तो! अगं वेडे, ही इमारत म्हणजे महाराष्ट्राची आन, बान आणि शान आहे. विधानभवन म्हणतात हिला.
या इमारतीसमोर केवढा मोठा मंडप टाकलाय बघ. होय, गॅदरिंगच आहे तिथं. शाळेत एकदाच होतं. इथं वर्षांतून दोनदा सगळे आमदार जमतात. कशाला जमतात म्हणजे? कामच आहे त्यांचं ते. राज्याचा कारभार हाकायचा असतो. कायदे करायचे असतात. त्यासाठी किती कष्ट करावे लागतात माहिताय? सभात्याग करावा लागतो. घोषणा द्याव्या लागतात. रात्र रात्र जागून पोश्टरं रंगवावी लागतात. आणि सर्वात कठीण म्हणजे तीच ती कंटाळवाणी भाषणं ऐकावी लागतात. नाही गं, मोदींची नव्हे! देशात भाषणं काय एकटे मोदीच करतात का? इथं सगळे ‘जी’ बोलतात. फार कशाला, मुनगंटीवारसुद्धा बोलतात. तुझा चेहरा असा अत्युच्य प्रश्नांकित का बरं झाला बने? समजलं. तुला जी- जी म्हणजे कोण, ते नाही ना कळलं? नाहीच कळणार. त्यासाठी शाखेत जावं लागतं बने. सेवादलाच्या नाही गं! आता राहिल्यात का त्यांच्या शाखा? त्यांनी केव्हाच बोर्ड लावून टाकलेत- आमची कोठेही शाखा नाही, म्हणून!
बने बने, किती गं तू वेंधळी? तिकडं कुठं निघालीस त्या च्यानेलवाल्यांकडं? मंत्रीण आहेस का तू? आधी या पायरीवर डोकं टेकव. अगं, पंढरपूरला विठ्ठल मंदिरात नामयाची पायरी आहे ना, तशीच ही विरोधकांची पायरी. छे छे! मतदारांनी दाखवलेली नाही काही! ती वेगळी, ही वेगळी. अगं, खरं संसदीय कामकाज चालतं ते याच पायऱ्यांवर. आत काय नुसतीच बिलं पास होतात! खिनभर इथंच थांब. आत्ता होईलच एखादा सभात्याग. मग तुला इथंच सगळी गंमत पाहायला मिळेल.
ते बघ, तिकडं त्या च्यानेलच्या पत्रकारांची कशी धावपळ चाललीय. याचा अर्थ आतून काहीतरी निरोप आलेला दिसतोय. बघ. आलेच सगळे. कसे जोरजोराने घोषणा देत येत आहेत. हे सगळे विरोधक बरं का! नाही गं, शिवसेनावाले नाहीत. शिवसैनिकांसारखे दिसत असले ना, तरी हे शिवसेनावाले नाहीत. हे सगळे घडय़ाळवाले. त्यांच्या चेहऱ्यावर किती वाजलेत त्यावर जाऊ  नकोस. त्यांचं घडय़ाळ बरोब्बर काळासोबत चालतं! म्हणून तर ते हल्ली पंजावाल्यांना सतत हात दाखवत असतात!
बने अगं, लक्ष कुठंय तुझं? ते काका बघ कशी छान छान पोएम म्हणताहेत. जॉनी जॉनी येस पप्पावाली.. त्यांची डिव्हिजन कोणती म्हणजे? तुला काय वाटलं, ते तुझ्याप्रमाणे सेमी-इंग्लिशमध्ये शिकताहेत? अगं, ते खूप खूप शिकलेले आहेत. त्यांच्याकडं पदवीसुद्धा आहे. आगाऊपणा करू नकोस. तुला काय करायचंय त्यांचं विद्यापीठ कोणतं आहे ते माहीत करून? त्यांना त्यांच्या विद्यापीठाचा आणि तेथील शिक्षणाचा अभिमान आहे एवढी प्रतिज्ञा पुरेशी नाही का बने?
त्या काकांच्या हातात काय आहे ते पाहिलंस का? तोंडाला पाणी सुटलं ना बने? माझ्यापण! का म्हणजे? हा काय प्रश्न झाला? मोठय़ा माणसांना चिक्की आवडत नाही असं कोणी सांगितलं तुला? अगं हो हो, तुला पण मिळेल चिक्की. बाबांचा आशीर्वाद आणि जनसामान्यांची साथ असेल ना तर तुला पण मिळेल चिक्की. सध्या तू तिकडची गंमत तेवढी पाहा. ते ते काका बघ, ते जाड मिशीवाले. ते कसे दुसऱ्याच्या हातातली चिक्की वचावचा खात आहेत बघ. किती गंमत येते ना हे पाहून? खंडाळ्याच्या टायगर पॉइंटलापण अशी मौज येत नाही बघ! बने, चहाटळपणा नको हं. ते काका ठाण्याचे आहेत, याचा त्यांच्या या आंदोलनाशी काय संबंध? असं काहीही वेडंवाकडं बोलशील ना बने, तर पाठीत हक्कभंगाचा धम्मकलाडू खावा लागेल!
त्यापेक्षा चलच तू आता इथून. उगाच फट् म्हणता हक्कहत्या व्हायची! हवं तर उद्या येऊ  आपण इथं. उद्या नं इथं संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ते बघ ते ते उंचशे, शिडशिडीत, गणिताच्या मास्तरप्रमाणे दिसतात ना, ते काका वारकरी आहेत. कोणी त्यांना पवारकरीपण म्हणतात. ते उद्या इथं बसून टाळ वाजवणार आहेत. काही गोष्टी टाळण्यासाठी असे टाळ वाजवावेच लागतात कधी कधी.. काय म्हणालीस? तुला हे सगळं तुझ्या शाळेतल्या स्नेहसंमेलनासारखं वाटतंय? वाटू दे, वाटू दे. तुझ्या वाटण्याला इथं विचारतो कोण?
appa