विजय केंकरे – vijaykenkre@yahoo.com
रत्नाकर मतकरी हे नाव मी कधीपासून ऐकायला लागलो? तर अगदी माझ्या बालपणापासून. सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी ही नावं आपल्या बालपणी ऐकली नाहीत असं म्हणणारा माणूस आमच्या पिढीत तरी सापडणं कठीणच. बालनाटय़ांच्या सादरीकरणातून आमच्या पिढीची मनं घडवण्याचं काम या मंडळींनी आमच्यातलेच एक होऊन केलं. त्या कामाचं मोल आजही कमी झालेलं नाही. रत्नाकर मतकरींची ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्माशिम्मा राक्षस’ ही अजरामर बालनाटय़ं आजच्या पिढीतला बालप्रेक्षकही तेवढय़ाच उत्साहाने पाहतो आहे. रत्नाकर मतकरींनी आम्हाला नाटय़प्रयोगात घडणाऱ्या गोष्टींवर बिनशर्त विश्वास ठेवायला शिकवलं. १९६२ साली मतकरींनी ‘बालनाटय़’ नावाची संस्था सुरू केली आणि प्रतिभाताईंच्या सहकार्याने उत्तमोत्तम बालनाटय़ं करायला सुरुवात केली. लहानपणीच मुलांच्या मनावर कलेचे संस्कार केल्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि त्यातून सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. विविधता हा मतकरींच्या लेखनाचा स्थायीभाव होता. त्यांच्या बालनाटय़ांमधूनही हे अधोरेखित होतं. ‘मधुमंजिरी’, ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘इंद्राचं आसन आणि नारदाची शेंडी’, ‘निम्माशिम्मा राक्षस’सारख्या नाटकांपासून ते ‘चमत्कार झालाच पाहिजे’, ‘दोन बच्चे, दोन लुच्चे’पर्यंत.
रत्नाकर मतकरींच्या बालनाटय़ांनी आमच्या पिढीच्या नकळत आमच्यातला प्रेक्षक घडवला. ‘निम्माशिम्मा राक्षस’ नाटकात या स्टेजच्या एका भागातून दुसऱ्या भागात एक दोरी जायची आणि तिला नदी म्हणायचे आणि प्रेक्षक म्हणून आम्ही त्यावर विश्वास ठेवायचो. ‘निम्माशिम्मा राक्षस’चं दिग्दर्शन विजया मेहतांनी केलं होतं. तसंच ‘इंद्राचं आसन..’मध्ये चहा पीत प्रवेश करणारा इंद्र होता. त्याला पाहून ‘अरे, इंद्र कसा काय चहा पितो?’ असा प्रश्नही आम्हा प्रेक्षकांना पडला नाही. तेव्हा अशा प्रकारे रंगमंचावर घडणाऱ्या गोष्टींवर बिनशर्त विश्वास ठेवण्याची सवय या बालनाटय़ांनी त्यावेळी लावली. हे सगळं घडत असतानाही माझा त्यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता. माझ्या लहानपणी त्यांनी मला पाहिलं असेल, तेवढंच. तरीही कुठेतरी हा माणूस माझ्या आसपास अदृश्यपणे वावरत होता.
त्यानंतरही प्रत्यक्ष नाटक करत नसलो तरी बघणं सुरूच होतं. माझ्या तरुणपणीचा काळ हा प्रायोगिक आणि स्पर्धात्मक रंगभूमीच्या बहराचा काळ होता. रत्नाकर मतकरींची ‘सूत्रधार’ नावाची संस्था तेव्हा कार्यरत होती. त्यामुळे लेखक-दिग्दर्शक मतकरींशी संबंध येतच राहिला. ‘प्रेमकहाणी’, ‘आरण्यक’, ‘चुटकीचं नाटक’, ‘गणेश गिरणीचा दहिकाला’, ‘रामशरणची गोष्ट’ आणि ‘लोककथा ७८’!
लिटिल थिएटरच्या ‘अल्लादिन आणि जादूचा दिवा’ या आमच्या नाटकाचा प्रयोग एकदा मराठवाडय़ात औरद शहजानी या गावात होता. आम्ही बालनाटय़ाचे प्रयोग तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत करायचो. प्रयोग रात्री होता. आम्ही नट मंडळी संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. आमच्यापासून काही अंतरावर मुलांचा एक घोळका ‘डोंगरमाथ्याला आमचा गाव’ हे गाणं म्हणत चालला होता. मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी त्यांना जाऊन विचारलं, ‘हे गाणं तुम्हाला कसं माहीत?’ तर ती मुलं म्हणाली, ‘मागच्याच महिन्यात इथं शाळेच्या मैदानात ‘लोककथा ७८’ या नाटकाचा प्रयोग झाला. भारी नाटक. त्यातलं हे गाणं.’ अर्थात मला ते माहीत होतं, म्हणूनच मी विचारायला गेलो होतो. असा आणि इतका परिणाम झाला होता ‘लोककथा ७८’चा. ‘लोककथा’मधलं सामाजिक भान आणि ‘आरण्यक’मधलं महाभारताचं विश्लेषण या त्या काळातील रंगभूमीवरील महत्त्वाच्या आणि त्यामुळेच चर्चिल्या गेलेल्या घटना होत्या.
लहानपणी माझ्यावर संस्कार करणारा हा नाटककार-दिग्दर्शक माझ्या तरुणपणीसुद्धा माझ्याबरोबर होता. मला मतकरी हा माणूस अचंबित करीत होता. गूढकथा, बालनाटय़ं आणि मोठय़ांची नाटकं.. एकाच वेळेस इतक्या प्रकारचं लेखन करणं सोपं नाही. सातत्य आणि दर्जा या दोन्ही गोष्टी त्यांनी टिकवून ठेवल्या होत्या. माझं या माणसाबद्दलचं कुतूहल वाढत चाललं होतं. आता माझा आणि त्यांचा परिचय झाला होता, पण तो तोंडओळखीपर्यंतच मर्यादित होता. मीसुद्धा नाटय़क्षेत्रात धडपड करायला लागलो होतो. आणि रत्नाकर मतकरी तर तोवर बालनाटय़, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरचे यशस्वी नाटककार झाले होते. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील वेगळा विचार करणाऱ्या नाटककारांपैकी एक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘अश्वमेध’, ‘खोल खोल पाणी’, ‘माझं काय चुकलं?’, ‘दुभंग’ अशी त्यांची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर गाजत होती. या व्यावसायिक नाटकांमध्येही विषयांचं वैविध्य दिसत होतं. मी मतकरींची व्यावसायिक नाटकं आवर्जून बघायला लागलो होतो. केवळ मनोरंजन करण्यापलीकडे जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणारी ती नाटकं होती हे जाणवत होतं आणि प्रेक्षकही ही नाटकं स्वीकारत होते. तेव्हा रत्नाकर मतकरी लेखक आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शक ही जोडी तयार झाली होती. व्यावसायिक रंगभूमीवर या दोघांनी मिळून खूप महत्त्वाची नाटकं केली.
१९८३-८४ च्या सुमारास आमच्या कलानगरमध्ये बापूराव नाईकांच्या घरी ‘विठो रखुमाय’ नाटकाचं वाचन ठरलं होतं. लेखक रत्नाकर मतकरी स्वत:च ते वाचून दाखवणार होते. मी नाटय़वाचन ऐकायला गेलो होतो. अगदी जवळच्या काही लोकांना वाचनाला बोलावलं होतं. वाचन झालं, नाटकावर चर्चाही झाली. मला नाटक आवडलं, पण मी चर्चेत भाग घेतला नाही. तेव्हा माझे वडील दामू केंकरे ते नाटक दिग्दर्शित करणार आणि उदय धुरत त्याची निर्मिती करणार असं जवळजवळ ठरलं होतं. पण १९८६ पर्यंत ते नाटक झालंच नाही. आणि १९८६ साली संगीत नाटक अकादमीची ‘यंग डायरेक्टर स्कीम’ घोषित झाली. त्यात मी ‘विठो रखुमाय’ करायचं ठरवलं. मतकरी ‘कर..’ म्हणाले. मला अर्थातच आनंद झाला. उदय धुरतांनीही परवानगी दिली. संगीत नाटक अकादमीनेही आमच्या नाटकाची निवड केली आणि शफाअत खान यांच्या ‘थिएटर’ संस्थेतर्फे प्रयोग करायचं ठरलं. तेव्हापासून ज्या लेखकाला लहानपणापासून अनुभवत होतो त्याच्याबरोबरचा माझा सहप्रवास सुरू झाला.. जो पुढची ३४ र्वष अखंड टिकला. मी त्यांनी लिहिलेल्या दहा तरी नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. ते स्वत: स्वत:ची नाटकं दिग्दर्शित करीत असत. त्याखालोखाल मी असा दिग्दर्शक आहे, ज्याने त्यांची इतकी नाटकं दिग्दर्शित केली. मतकरी लेखक, मी दिग्दर्शक आणि ‘सुयोग’चे सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी निर्माते असं समीकरणच होतं.
‘विठो रखुमाय’ या नाटकाला दुर्गा भागवतांच्या ‘पैस’ या पुस्तकाचा आधार होता. ‘विठो रखुमाय’मध्ये धनगर माळावर जमतात आणि आपल्या राजा-राणीच्या गोष्टीचं सुंबरान मांडतात. पद्मावतीची रखुमाय कशी झाली आणि रखुमायने स्वत:चं वेगळं मंदिर कसं मागितलं, याची कथा सांगणारं हे नाटक. संगीत, नृत्य आणि नाटय़ यांचा समन्वय संहितेत समर्थपणे साधला गेला होता. नाटकातील सर्व- म्हणजे १५-१६ गाणी स्वत: मतकरींनी लिहिली होती. ती गाणी नाटकात योग्य ठिकाणी योजली होती. ‘विठो रखुमाय’ दिग्दर्शित करीत असताना मतकरींची नाटय़तंत्रावरची पकड ठायी ठायी लक्षात येत होती. त्यांची पुढची नाटकं दिग्दर्शित करतानाही तंत्रावरची ही पकड जाणवत राहिली. ‘विठो’च्या तालमींच्या दरम्यान मतकरींशी बोलणं होत असे. ते तालमींना फार कमी वेळा आले, पण एकूण प्रयोग कसा दिसावा याविषयी ते माझ्याशी चर्चा करायचे. ते स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे प्रत्येक नाटक लिहिताना त्यांच्या मनात त्याचा एक ‘प्रयोग’ उभा राहत असावा. ‘विठो’नंतर मी त्यांची वेगवेगळ्या पद्धतींची नाटकं दिग्दर्शित केली तेव्हाही हाच अनुभव आला.
पुढे ‘एकदा पहावं करून’, ‘कार्टी प्रेमात पडली’ ही मतकरींची फार्सच्या जवळ जाणारी नाटकं मी दिग्दर्शित केली. ‘एकदा पहावं करून’ हे आधी ‘लफडं सोवळ्यातलं’ या नावाने ‘माऊली-भगवती’ या संस्थेसाठी मी दिग्दर्शित केलं होतं. पण ते काही अपरिहार्य कारणांमुळे लवकर थांबलं. नंतर ‘सुयोग’ या सुधीर भटांच्या संस्थेने त्याची पुनर्निर्मिती केली. धमाल नाटक, मस्त प्लॉट, वैचित्र्यपूर्ण व्यक्तिरेखा, मराठी-कानडी भाषेची गंमत. पापभीरू मध्यमवर्गीय आणि प्रेमात पडावं असा गुंड यांच्यातल्या संघर्षांवरचं हे विनोदी नाटक. मतकरींच्या तोपर्यंतच्या नाटकांपेक्षा पूर्णत: वेगळं. खूप पात्रं आणि सतत घडणाऱ्या घटना हे या नाटकाचं वैशिष्टय़. या नाटकाच्या तालमीही रंगतदार व्हायच्या. तालमींची प्रक्रिया खूपच मस्त होती. ‘सुयोग’साठी हे नाटक करायचं ठरलं. ‘सुयोग’च्या गोपाळ अलगेरींनी माझा आधीचा प्रयोग पाहिला होता. त्यामुळे तो मागे लागला.. ‘हे नाटक करू या.. जोरात चालेल.’ मतकरींच्या घरी मीटिंग झाली. सुधीर भटच्या नेहमीच्या पद्धतीनुसार पहिल्याच मीटिंगमध्ये प्रयोगाची तारीखही ठरली.. म्हणजे त्याची त्याने ठरवली. नाटकाचं कास्टिंग करायला सुरुवात झाली. त्यातली दोन प्रमुख पात्रं बबनराव बाक्रे आणि बाप्पाजी धरसोड. पैकी बाप्पाजी मोहन जोशी हे ठरलेलं होतं, कारण आधीच्या नाटकात तेच होते. त्यांना वगळायचं नाही यावर सगळे ठाम होते. चर्चा सुरूच होती आणि मतकरी मला म्हणाले, ‘‘बबनराव बाक्रेच्या कामाला कुणीतरी प्रसिद्ध अभिनेता घ्या.. म्हणजे स्टार! काही काही व्यक्तिरेखा स्टार्सनी कराव्यात म्हणूनच लिहिलेल्या असतात. आणि त्यांनी केल्या तरच त्या यशस्वी होतात. मागच्या वेळी तू माझं ऐकलं नाहीस. पण आता ऐक..’’ असा मला एक शालजोडीतला हाणला. सुधीर जोशीचं नाव फायनल झालं आणि मतकरींचं म्हणणं खरं ठरलं. नाटकाला पहिल्या प्रयोगापासून उदंड प्रतिसाद मिळायला लागला. तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की, प्रेक्षकाला व्यावसायिक नाटकातून काय हवं असतं याचीही जाण या माणसाला आहे.
मला हा अनुभव याआधीही एकदा आला होता. मी माऊली प्रॉडक्शन्ससाठी त्यांचं ‘कार्टी प्रेमात पडली’ बसवलं होतं. त्याच्या कास्टिंगच्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘हे नाटक गाजलेलं आहे. अनुरूप कास्टिंग कर. प्रयोग चांगला बसव. नाटक यशस्वी होईल.’’ तेव्हा खरंच तसं झालं. अगदी पहिल्या प्रयोगापासून नाटक हाऊसफुल्ल जायला लागलं. मतकरींमधल्या या खुबीचं मला आश्चर्यच वाटायचं. या दोन्ही नाटकांच्या तालमींना मतकरी अगदी शेवटी शेवटी आले.. म्हणजे रंगीत तालमींनाच. अतिशय काटेकोरपणे नाटक पाहून आपल्या नोंदी लिखित स्वरूपात त्यांनी माझ्याकडे दिल्या. सगळ्या अॅक्टर्सना समोर बोलावून आपल्याला काय वाटलं ते त्यांना सांगून मग ते गेले. त्यांच्या सूचना अतिशय मार्मिक होत्या. एक कॉमन सूचना : ‘नाटकातल्या स्त्री-व्यक्तिरेखांना फुलं माळायला सांग’ त्यांना स्त्रियांनी फुलं माळणं खूपच आवडायचं. ही दोन्ही नाटकं त्यांना तालमीत आवडल्यामुळे काम सोपं झालं. त्यांच्या सूचनाही सहज अमलात आणता येतील अशा होत्या. प्रयोगात त्या मी अमलातही आणल्या. पण या दोन-तीन नाटकांमुळे एक गोष्ट झाली.. माझी आणि रत्नाकर मतकरी या माझ्यापेक्षा वयाने आणि वकुबाने मोठय़ा असलेल्या माणसाशी माझी मैत्री झाली. आमच्या नाटकाव्यतिरिक्तही गाठीभेटी व्हायला लागल्या. गप्पा मारायला आणि प्रतिभाताईंच्या हातचं उत्तम जेवण जेवायला जाणं-येणं वाढायला लागलं आणि त्यातून समाजात घडणाऱ्या गोष्टींवर तळमळीने भाष्य करणाऱ्या आणि नाटक या गोष्टीचा सर्वागाने विचार करणाऱ्या मतकरींची जवळून ओळख झाली. काही वर्षांपूर्वी- म्हणजे २०१२ साली ‘रंगरूप’ नावाचं त्यांच्या लेखांचं एक पुस्तक निघालंय. ते वाचलं तर आपल्या लक्षात येईल की ते नाटकाचा किती समग्र विचार करायचे. रत्नाकर मतकरी हा माणूस आयुष्यभर नाटक जगला असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.
काही र्वष अशीच गेली.. आणि अचानक एके दिवशी मतकरींचा फोन आला- ‘‘नवीन नाटक लिहिलंय, ऐकायला ये. सुधीर भटला बोलावलं आहे.’’ आम्ही गेलो. नाटक वाचायला सुरुवात केली. मतकरी आणि आम्ही सगळेच त्यात गुंतत गेलो. पहिल्या अंकाचं वाचन कधी संपलं, कळलंच नाही. नाटक होतं- ‘जावई माझा भला’! अतिशय तरल, भावनिक आणि नर्मविनोदी. सुधीर भटने दुसऱ्या अंकाचं वाचन सुरू व्हायच्या आधीच कास्टिंग सुरू केलं. मतकरी म्हणाले, ‘‘जरा थांब. दुसरा अंक वाचून होऊ दे.’’ दुसरा अंक वाचून संपला. आमची प्रतिक्रिया तीच! ‘जावई..’च्या निमित्ताने माझ्या आयुष्यात दिलीप प्रभावळकर आले.. दुवा अर्थात मतकरी. ‘जावई..’च्या तालमी सुरू होण्याआधी मतकरींनी मला बोलावलं आणि सांगितलं, ‘‘विजय, हे नाटक आत्ता.. आपल्या समोर घडतंय इतक्या सहजपणे व्हायला हवं.’’ मी नाटक सतत वाचत होतो. त्याचं दृश्यस्वरूप कसं असावं याचा विचार करत होतो. नाटकाच्या प्रयोगप्रक्रियेत नेपथ्यकाराचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. माझा नेपथ्यकार होता प्रदीप मुळ्ये. आम्ही नाटकावर चर्चा करत असताना प्रदीप म्हणाला, ‘‘हे वाक्य वाच.’’ वाक्य होतं अविनाश घाटपांडे या प्रमुख पात्राचं. दुसरं एक पात्र त्याला खिजवण्यासाठी म्हणतं, ‘तुमच्याकडे फार तर फियाट असेल.’ त्यावर घाटपांडे म्हणतात, ‘हो. पण मी दहा र्वष ती मेन्टेन केली आहे.’ ज्या अर्थी नाटककाराने असं लिहिलंय त्या अर्थी त्यांच्या डोळ्यासमोर घाटपांडे हा एखाद्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीत तिसऱ्या किंवा चवथ्या मजल्यावर राहत असावा. आपण नेपथ्यात लिफ्ट वापरू आणि त्याला जोडून घाटपांडेच्या घराचा दरवाजा.’’ नाटक ही प्रयोगक्षम कला आहे असं मानणारा नाटककार असेल तर तो संवादांमधून प्रयोगाच्या दृश्य स्वरूपाचं सूचन करीत असतो. ‘जावई..’ अशा प्रकारचं नाटक होतं की त्यात मला लेखकाशी संवाद ठेवणं गरजेचं वाटलं. आणि माझी व मतकरींची एकवाक्यता असल्यामुळे ‘जावई..’ सहजपणे घडत गेलं. समर्थ लेखक रत्नाकर मतकरींच्या महत्त्वाच्या नाटकांपैकी ते एक आहे. आमचा सुसंवाद असाच सुरू राहिला.
एकदा मला मतकरींचा फोन आला. अचानकपणे. आणि म्हणाले, ‘‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही.’’ म्हटलं, ‘‘काय झालं?’’ तर हसले आणि म्हणाले, ‘‘आपल्या नवीन नाटकाचं नाव.’’ म्हटलं, ‘‘मस्त आहे.’’ आणि सुरू झालं असं नाटक- ज्याचा विषय होता ‘स्त्री-पुरुष संबंधांतील नैतिकता’! वरवर ‘चावट’ वाटेल असा विषय मतकरींनी कुठेही त्यातला ‘इनोसन्स’ न सोडता लिहिला होता. हे नाटक लिहिणं आणि त्याचा प्रयोग तोल सांभाळून करणं खूप अवघड होतं. परंतु प्रयोगात हा तोल वंदना गुप्ते, प्रशांत दामले, कविता लाड आणि अरुण नलावडे यांनी उत्तम सांभाळला. मला या नाटकादरम्यान मतकरींची एक खासियत लक्षात आली; ते नाटकाचं पहिलं वाक्य जाणीवपूर्वक विषयाच्या जवळ नेणारं लिहितात आणि थेट नाटकाच्या विषयालाच हात घालतात. ‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही!’मध्ये पहिलं वाक्य असं आहे.. देवदत्त (ज्यूलीकडे पाहून) : ‘‘परमेश्वरा, या मुलीला अंगभर कपडे घालण्याची बुद्धी का देत नाहीस? किती वाईट परिणाम होतो माणसाच्या मनावर तिच्या असले कपडे घालण्याचा.. आय मीन न घालण्याचा.’’ ‘एकदा पहावं करून’चं पहिलं वाक्य- ‘‘बाक्रे,माय गॉड.. टेरिबल. रात्रीचे अडीच वाजले तरीही तरुण मुलगी घरी परत आलेली नाही.’’ अशीच ‘विठो रखुमाय’, ‘प्रियतमा’, ‘जावई माझा भला’ या नाटकांतली पहिली वाक्यं आहेत. म्हणजे नाटकाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांचं कु तूहल जागं करायचं आणि त्याला आपल्याबरोबर नाटकाच्या शेवटापर्यंत न्यायचं.. त्यांचा हात सोडायचा नाही. मतकरींच्या नाटय़लेखनाचा हा स्थायीभाव होता, हे नंतर माझ्या लक्षात आलं.
‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही!’ आणि त्यानंतरचं ‘प्रियतमा’ या दोन नाटकांच्या वेळी माझी आणि मतकरींची खूप चर्चा झाली. थोडेसे मतभेदही झाले. एकदा मला ते म्हणाले, ‘‘अरे, होऊ दे मतभेद.. ते जिवंत असण्याचं लक्षण आहे.’’ आम्ही चर्चा करून मार्ग काढला. मला अजून आठवतं, ‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही!’चा शेवट मला पटत नव्हता, तसंच ‘प्रियतमा’मध्ये एक जास्तीचा प्रवेश लिहून हवा होता मला. ‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही!’च्या शेवटासाठी मतकरींनी एक गाणं लिहून दिलं- ज्याची तीन कडवी मी प्रवेशांच्या मधे आणि शेवटी वापरली. अशोक पत्कींनी उत्तम चाल बांधली आणि ती समस्या सुटली. मतकरींना मस्त मार्ग सुचला. मात्र ‘प्रियतमा’च्या वेळी त्यांनी मला हवा असलेला प्रवेश कसा अनावश्यक आहे हे पटवून दिलं आणि मी पटलो. ‘प्रियतमा’च्या बाबतीतसुद्धा लेखक म्हणून त्यांनी गंमत केली. ‘प्रियतमा’ ही प्रेमकथा आहे. मला त्यांनी ‘प्रियतमा’ वाचायला दिलं, पण त्यात मजा येईना. मी त्यांना तसा फोनही केला. मला म्हणाले, ‘‘जरा थांब.’’ आणि मग ‘प्रियतमा’चं म्युझिकल करून त्यांनी मला घरी वाचायला बोलावलं. वाचन झालं. मला नाटक आवडलं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘प्रेमकथेला गाण्याशिवाय मजा नाही.’’ ‘प्रियतमा’च्या वेळी खरं तर आमचे सर्वात जास्त मतभेद झाले असले तरी ‘प्रियतमा’ची अर्पणपत्रिका ‘माझा तरुण दिग्दर्शक मित्र विजय केंकरे यास..’ अशी आहे.
रत्नाकर मतकरींची कथा, कादंबरी, ललित लेख, नाटक या सर्व माध्यमांवर हुकुमत होती. त्यामुळे त्या- त्या माध्यमातील बलस्थानं आणि त्रुटी त्यांना चांगल्याच ठाऊक होत्या. पु. ल. देशपांडेंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या अजरामर पुस्तकाचं नाटय़रूपांतर त्यांनी समर्थपणे केलं होतं. चंद्रकांत कुलकर्णीचं उत्तम दिग्दर्शन, सर्व अभिनेत्यांचा समर्थ अभिनय आणि ‘सुयोग’ची उत्तम निर्मिती. हे सर्व पाठीशी असल्यामुळे सुधीर भटांनी पुलंकडे ‘बटाटय़ाची चाळ’वर नाटक करण्याची परवानगी मागितली तेव्हा मी होतो सुधीरबरोबर. पु. ल. म्हणाले, ‘‘त्यापेक्षा ‘असा मी असा मी’वर नाटक करा. रत्नाकर नाटय़रूपांतर करणार असेल तर परवानगी देतो.’’ मतकरी तयार झाले. नाटक दिग्दर्शनाला माझ्याकडे आलं. ‘असा मी असा मी’ला सलग नाटय़रूप देणं खूप अवघड होतं. माध्यमांतर करण्यासाठी एक सूत्र सापडणं आवश्यक होतं. मतकरींमधल्या नाटककाराने हे सूत्र बरोबर हेरलं आणि ‘असा मी असा मी’ या पुस्तकाचं नाटय़रूपांतर केलं. आप्पा, धोडोपंत जोशी आणि त्यांची मुलं- शंकऱ्या, शरी वगैरे.. अशा तीन पिढय़ांचं नाटक त्यांनी केलं. त्यात प्रवेश जोडण्यासाठी धोंडोपंत जोश्यांचे वडील प्रकट होतात. आणि नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात ‘काळ बदलला तरी माणूस तोच राहतो हो..’ हा नाटकाचा विषय ठरवून त्याप्रमाणे संरचना केली. अतिशय कठीण काम मतकरींनी असं सोपं केलं. ‘असा मी..’ला दृश्यरूप देणं तरीही खूप अवघडच होतं, पण ही प्रक्रिया खूपच इंटरेस्टिंग होती. मी मतकरींकडून माध्यमांतराच्या बाबतीत खूप गोष्टी शिकलो. नाटकातील उच्चारीत शब्दांचं महत्त्व आणि नेमकेपण मतकरींनी उत्तम पद्धतीने वापरलं. ‘असा मी’ची तालीम पाहून पुलं म्हणाले होते, ‘‘रत्नाकरने लिहिलेले संवाद कुठले आणि माझे कुठले, हे सांगता येणं कठीण आहे.’’
रत्नाकर मतकरी हे अजब रसायन आहे. कथा, पटकथा, कादंबरी, कविता, ललित लेख, नाटकं, रसग्रहणात्मक लेखन अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली. विनोदी, गंभीर सर्व प्रकारचे लेखन केले. काही परदेशी नाटकं जाणीवपूर्वक मराठीत आणली. ज्या महाभारताकडे ‘आरण्यक’ लिहिताना त्यांनी गांभीर्याने पाहिले, त्याच महाभारताचा आधार घेऊन ‘पाच पांडवांचा बाप’मध्ये विनोदनिर्मिती करून एक सामाजिक विषय त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. ते चित्रकारही होते. त्यामुळे शब्दांच्या आत दडलेला दृश्यबंधही त्यांना दिसायचा. त्यांना तीव्र सामाजिक भान होते. नर्मदा आंदोलनामधला त्यांचा सक्रिय सहभाग सर्वश्रुत आहे. ‘इंदिरा’ किंवा ‘गांधी : अंतिम पर्व’सारखी नाटकं लिहूनही ते काँग्रेसी झाले नाहीत. आपल्या मतांबाबत ते आग्रही असायचे. त्यांना न पटलेला विषय कशाचीही तमा न बाळगता ते मांडत राहिले. अगदी शेवटपर्यंत नाटक जगत राहिले. ‘गांधी : अंतिम पर्व’च्या अभिवाचनाचे प्रयोग, लोकांना सत्य काय आहे ते कळावे, हा दृष्टिकोन ठेवून ते करत राहिले. त्यांच्या काही नाटकांचं दिग्दर्शन स्वत:च करण्याबाबत ते आग्रही असायचे. नाटक लिहीत असताना त्याचा प्रयोग त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहत असावा. त्यांनी लिहिलेल्या काही नाटकांचे प्रयोग अजून व्हायचे आहेत. ते आम्ही करत राहूच. ते आता ‘अदृश्य माणूस’ नावाचं त्यांचं बालनाटय़ संजय नार्वेकरला घेऊन ऋ षिकेश घोसाळकरच्या संस्थेसाठी करणार होते. दर्जा, सातत्य आणि चिकाटी अशा तिन्ही गोष्टी एकत्र असणारा असा माणूस विरळाच. प्रतिभाताई, गणेश, सुप्रिया, पल्लवी, मिलिंद हे त्याचं कुटुंब. नाटक जगायला या सगळ्यांची साथ मतकरींना लाभली. गणेश आणि सुप्रिया दोघेही लिहितात. मतकरी या सर्जनशील माणसाला उत्तम संप्रेषण करण्याची कला अवगत होती. आणि हे संप्रेषण ते कलेच्या माध्यमातून आबालवृद्धांसाठी अथकपणे करत राहिले.. आणि त्यांच्या अजरामर नाटकांच्या माध्यमातून करत राहणार आहेत. सलाम!