मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा नेता, ज्याचा करिश्मा महाराष्ट्रातील मोठय़ा जनसमूहावर होता, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा जयदेव आणि जिवलग सहकारी पंढरीनाथ सावंत यांनी त्यांच्या राजकारणबाह्य़ गुणांना, आठवणींना दिलेला उजाळा…
बाळासाहेब गेले, त्याआधी सहा-आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट. बाळासाहेब माझ्या घरी आले. मी जमवलेला जगभरातील वेगवेगळ्या पाइपांचा संग्रह त्यांना बघायचा होता. दरवाजातून आत येताच डाव्या बाजूने फिरत त्यांनी पाइप पाहायला सुरुवात केली. सुरुवातीलाच तंबाखू ओढण्याच्या पाइपांच्या शेजारी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सिगारेट ओढतानाचे छायाचित्र होते. त्याकडे पाहात ‘फार चालू माणूस होता’, अशी टिप्पणी बाळासाहेबांनी केली. नेमके त्याच्यापुढेच बाळासाहेबांचे पाइप ओढतानाचे चित्र होते. स्वत:च्या चित्राकडे पाहात त्यांनी मला विचारले, ‘मीही चालू दिसतो ना?’ मी उद्गारलो, ‘नाही. महाराष्ट्रातील हजारो घरांमध्ये ‘चूल’ पेटविणारे तुम्ही आहात.’ चालू आणि चूल या मी साधलेल्या यमकावर खूश होत त्यांनी माझ्या पाठीवर थोपटून दाद दिली – ‘खरा ठाकरे शोभतोस.’ त्या खोलीतील आठ कपाटांमध्ये वेगवेगळ्या आकारांचे पाइप होते. त्यामध्ये प्राण्यांचे चेहरे असलेले, मत्स्यक न्येच्या आकाराचा, चर्चिल आणि अब्राहम लिंकन यांचा हुबेहूब चेहरा असलेला, आकाराने अत्यंत छोटे तसेच मोठे असे हजाराहून अधिक पाइप पाहून बाळासाहेब हरखून गेले. त्यांच्यातील कलावंताने एकेका कलाकृतीला दाद द्यायला सुरुवात केली. म्हणाले, ‘अरे जयदेवा, आज मी २० वर्षांनी तरुण असायला हवा होतो, या साऱ्यांचा मनमुराद आस्वाद घेतला असता!’
बाळासाहेब हे परमेश्वराने निर्माण केलेले अजब रसायन होते. खरे तर बाळासाहेब कोण नव्हते, असा प्रश्न उपस्थित होतो. मोठी तपश्चर्या केल्यानंतर काहींना एका जन्मात एखाद्या विषयात गती मिळते. बाळासाहेबांचे सारेच अद्भुत होते. त्यांना अनेक विषयांमध्ये उत्तम गती होती. राजकारण, समाजकारण, संगीत, चित्रपट, नाटय़, कार्टून, नकलाकार, संपादक-लेखक एवढेच काय बाग-बगीच्यासारख्या विषयातही त्यांना चांगली गती होती. आमच्या लहानपणी बागकामाचा छंद त्यांनी जोपासला होता. त्यातून आम्हाला घरातल्या घरात भाजीपालाही मिळायचा. पक्षी-प्राण्यांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. आमच्या लहानपणी त्यांनी वेगवेगळे पक्षी व कबुतरे पाळली होती. निसर्गाचा आस्वाद घेणे असो की गडकिल्ले फिरणे असो, बाळासाहेबांनी जे काही केले ते मनस्वीपणे केले. प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण आणि एकाग्रता हा त्यांचा विशेष गुण होता. त्यामुळेच व्यंगचित्रकार म्हणून ते यशस्वी होऊ शकले. अर्थात बाळासाहेबांनी केलेले परिश्रम व त्यासाठी उपसलेले कष्ट याची कल्पना फार थोडय़ांना असेल.
शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी ते मराठी माणसाच्या प्रश्नासाठी जागोजागी भटकले, अनेक सभा घेतल्या. या काळात घरात पैशाचा ठणठणाट असायचा. अनेकदा आम्हांला टोमॅटो, गाजर आणि भुईमुगाच्या शेंगांवर दिवस काढावे लागले आहेत. तेव्हा बाळासाहेब लालबुंद चेहऱ्याच्या माणसाचे चित्र दाखवायचे आणि तुम्हाला जर असे लालबुंद व्हायचे असेल तर टोमॅटो व गाजर खायला पाहिजे, असे सांगायचे. बाळासाहेबांनी असे सांगितले की, आजोबा लगेचच ‘मला भूक नाही,’ असे सांगून पाणी पिऊन झोपायचे. अनेकदा बाळासाहेबांनी केवळ कांजी पिऊन दिवसच्या दिवस काम केले आहे. ‘मार्मिक’च्या सुरुवातीच्या काळात काका श्रीकांतजी यांच्यासह साऱ्यांनीच अफाट कष्ट उपसले. खाण्यापिण्याची कधी तमा बाळगली नाही. माँनेही खळ बनविण्यापासून सर्व प्रकारची कामे केली. हे जरी खरे असले तरी व्यंगचित्रे हे बाळासाहेबांचे मर्मस्थान होते. दौरे व भाषणे करूनही वेळेत व्यंगचित्रे देणे, अंकातील मजकुराबाबत जागरूक असणे हे सारे अद्भुत होते. एखादे व्यंगचित्र सुचणे आणि ते कागदावर उतरणे हे व्यंगचित्रकारासाठी एखाद्या बाळाला जन्म देण्यासारखेच असते. आपली कलाकृती सर्वोत्तमच झाली पाहिजे, याकडे बाळासाहेबांचा कटाक्ष असायचा.
व्यंगचित्र काढताना बरेचदा मॉडेल म्हणून मला उभे केले जायचे. कुऱ्हाड घेतलेला हात दाखवायचा असेल तर मी कुऱ्हाड हातात घेऊन उभा राहायचो. कधी एखादा नेता हनुवटीवर हात ठेवून गंभीर आहे, असे चित्र काढायचे असेल तर मला तासन्तास तसे बसावे लागे.  
कधी स्वयंपाकघरात माँ पोळ्या करत असली की बाळासाहेबही तेथे येऊन गप्पा मारत बसायचे. गप्पा मारत असतानाच कणकेचा एखादा गोळा घेऊन त्यातून हत्ती, घोडे असे प्राणी इतके सुंदर बनवायचे की पाहातच रहावे. त्यावेळी कॅमेरा असता तर या आठवणींचे जतन करता आले असते. शिल्पकृतीमध्येही साहेबांना जबरदस्त गती होती. शिवाजी महाराजांचा पुतळा हे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. लाकूड तासून त्यापासून वेगवेगळ्या कलाकृती करणे हा माझा पहिल्यापासूनचा छंद. लहानपणी मी एखादी वस्तू तयार केली की, बाळासाहेबांना दाखवायचो. त्यात ते सुधारणा सुचवायचे. खरे तर त्यांना गती नव्हती, असा विषयच नाही. ते राजकारणात व्यग्र झाले.. अन्यथा कलेच्या कुठल्याही प्रांतात त्यांचे जगभरात नाव झाले असते.
अगदी लहानपणापासून प्रबोधनकार व बाळासाहेबांचा सततचा सहवास मला लाभला. त्यांच्या सुरुवातीच्या प्रत्येक दौऱ्यात मी असे. त्यांचे कपडे धुणे, इस्त्री करणे, त्यांना काय हवे नको ते बघणे ही माझी जबाबदारी असायची. त्यामुळे राजकारणी ते कलावंत अशा त्यांच्या विविधअंगी प्रवासाचे मला बारकाईने निरीक्षण करता आले. आर्थिक ओढाताणीमुळे सुरुवातीच्या काळात चित्रपट स्टुडिओत बोर्ड रंगविण्यापासून सर्व प्रकारची कामे बाळासाहेबांनी केली आहेत. स्टुडिओतील या रंगारीपणाच्या काळात त्यांना अनेक चित्रपट अभिनेत्यांचे शूटिंगही बघण्याची संधी मिळायची. अनेक कलाकारांशी त्यांची ओळख झाली. पुढे राजकारणामुळे विविध क्षेत्रांतील कलावंतांशी त्यांची वीण घट्ट जुळली. यात दिलीपकुमार, धर्मेद्र, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्यापासून थेट काशीनाथ घाणेकर यांच्यापर्यंत. ही मंडळी घरी आली की, गप्पांचा जो काही फड रंगायचा त्याला तोड नाही. अनेकदा रात्री काशीनाथ घाणेकर यायचे आणि ‘रायगडाला जेव्हा जाग आली’ या नाटकातील सर्वच्या सर्व संवाद म्हणून दाखवायचे. गांधी हत्येतीतील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाळ गोडसे हेही अनेकदा आमच्याकडे येत. ते आले की, मातोश्रीवरील गच्चीत रात्रीच्या रात्री कशा जायच्या ते कळायचेच नाही. एकदा मी जॉनी लिव्हरची बाळासाहेबांशी ओळख करून दिली. एक हरहुन्नरी नकलाकार म्हणून त्याने आपली कला साहेबांसमोर पेश केली आणि त्यांनीही त्याच्या कलेला मनमुराद दाद दिली.
बाळासाहेब स्वत: उत्तम नकलाकार होते. दुसऱ्यांचे आवाज ते हुबेहूब काढत असत. त्यांच्या जाहीर सभांमध्ये अनेकदा ते पाहायलाही मिळे. संगीताची व चित्रपटाची त्यांना विशेष आवड होती. त्यातही जुन्या गाण्यावर प्रचंड प्रेम. सैगल, मुकेश, तलत, लता मंगेशकर यांच्या गाण्यांच्या असंख्य कॅसेटस् त्यांच्या संग्रहात होत्या. गझलच्या प्रांतात ते कधी फारसे रमले नाहीत. तो प्रांत आमच्या काकांचा होता. संगीताला चाली देण्याच्या फंदात बाळासाहेब जरी कधी पडले नसले तरी त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यामुळेच अनेकदा एखाद्या गाण्याच्या चालीचे ते सहज विडंबन करायचे. आमच्या लहानपणी आम्हाला इंग्रजी चित्रपट दाखवायला बाळासाहेब अनेकदा इरॉसला घेऊन गेले. त्यांच्यासोबत आम्ही कार्टून फिल्म्सही अनेकदा पाहिल्या. ‘मातोश्री’त ज्यावेळी मी पहिल्यांदा व्हिडीओ आणला, तेव्हा त्यांनी अमिताभच्या चित्रपटांच्या सर्व कॅसेटस् मागवून घेतल्या. त्या व्हिडीओ कॅसेटस्  एकदा ते चित्रपट पाहायला बसले की, त्यांना डिस्टर्ब करण्याची कोणाची छाती होत नसे. अनेक नाटकांच्या, त्यातही पु.ल. देशपांडे यांच्या व्हिडीओ कॅसेटस्ही ते वेळोवेळी पाहात. ‘सिंहासन’ चित्रपटही असाच त्यांनी व्हिडीओ कॅसेट मागवून अनेकदा बघितला होता.
त्यावेळी कॅसिओ ऑर्गन नवीन आला होता. मी तो आणला आणि साहेबांना दाखवला. आश्चर्य वाटेल, बाळासाहेब तो आपल्या खोलीत घेऊन गेले. काही वेळानंतर त्यांनी सर्वाना बोलावून त्यावर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे वाजवून दाखवले. त्यापूर्वी त्यांनी कधीही, कोणत्या वाद्याला हात लावल्याचे मी पाहिले नव्हते. त्याखेरीज ‘मेरे देश की धरती’, ‘सारे जहाँ से अच्छा’ ही गाणीही ते सफाईने वाजवू लागले. त्यांनी इतके सुंदर गाणे वाजवले की, माँही आश्चर्यचकित झाल्या होत्या. पुढेही अनेकदा ते ही गाणी वाजवायचे.
बाळासाहेब उत्तम बुद्धिबळ खेळायचे. आमच्या लहानपणी दादरच्या घराजवळ राहणारा गुप्ते नावाचा एक तरुण बुद्धिबळात हुशार होता. बाळासाहेब त्याला खेळण्यासाठी बोलावत. सुरुवातीला तो साहेबांना हरवत असे. पुढे त्याच्या चालींचा साहेबांनी अभ्यास केला. त्याच्याकडे तो चाली खेळताना कसा विचार करतो याची चौकशी केली. त्यानंतर एक दिवस साहेबांनी त्याला हरवले. बुद्धिबळाचा डाव मांडून अनेकदा ते हत्ती-घोडय़ांकडे पाहात विचार करत बसायचे. बाळासाहेब कॅरमही उत्तम खेळायचे. सुट्टी अथवा सणांच्या दिवसांत आमच्या घरी अनेक नातेवाईक जमायचे. मग पत्त्यांचे डाव रंगायचे. बाळासाहेबही रमी खेळण्यासाठी आमच्यात बसायचे. त्या दिवसांच्या आठवणी आजही मनात घर करून आहेत.
त्यांची लेखणी धारधार होती. लिहायचे ते हाणण्यासाठीच! प्रेमदृश्ये वगैरे ते लिहू शकले असते की नाही, मला शंका आहे. पण कलावंतांवर मात्र ते मनस्वी प्रेम करायचे. अनेक कलाकारांना, सहित्यिकांना तसेच क्रीडापटूंच्या अडीअडचणीला त्यांनी न बोलता भरभरून मदत केली आहे. राजकारणात संपूर्णपणे झोकून दिल्यामुळे कलेच्या प्रांतात त्यांना अधिराज्य गाजवता आले नसले तरी त्यांनी त्याचा भरपूर आनंद घेतला. राजकारणातला कलावंत आणि कलावंतामधील माणूस पाहायचा असेल तर बाळासाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व अभावानेच आढळेल.
शब्दांकन : संदीप आचार्य
चित्रकार भारत सिंग यांच्या कुंचल्यातून साकारलेले शिवसेनाप्रमुख.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!