|| सुभाष अवचट

वाड्यातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला उतार लागतो. काळ्या शनीच्या तेलकट छोट्या देवळापाशी लिंबाच्या झाडाच्या सावलीत लोहाराचा भाता, हातोड्याचे घणघण आवाज आणि मोडलेल्या बैलगाड्यांची चाकं पडलेली असतात. उजवीकडच्या मैदानात जाजमावर ओल्या भुईमुगाची चादर उन्हात वाळत असते. मग लागते जुनी वेस. तिच्या दोन्ही बाजूला ढासळलेली भुऱ्या मातीची वृद्ध तटबंदी. वेशीबाहेर पडलं की डाव्या बाजूला उतरत गेलेला, स्वत:वरती उखडलेला, नदीकडे उतरलेला दगडी रस्ता. पलीकडच्या खोल नदीच्या पात्रावरून ओला वारा अंगाला बिलगतो. तो रस्ता आजूबाजूच्या तुकड्या-तुकड्यांच्या शेतामधून वर चढत जातो. त्याच्या जोडीला एक मळकी पायवाटही खाली उतरत जाते. त्या पायवाटेकडे जायची भीती वाटायची. कुणी सांगायचं, ती पायवाट स्मशानाकडे जाते. चढण चढून गेल्यानंतर जीव मोकळा व्हायचा. समोर सह्याद्रीच्या कणखर रांगा. त्यावर तोललेलं, डोळ्यांत न मावणारं आकाश. त्याच्याही वर तरंगणाऱ्या कापसाचे विरळ ढग. एखाद्या निसर्गचित्रात दिसावा तसा तो रस्ता मला फार आवडायचा. त्याच रस्त्यावर डावीकडे उभा शंभर फूट उंच पिंपळ. त्याच्या पानांची सळसळ. माझा मित्र सुऱ्या तेली त्याला डोकं लावून उभा राही. त्याचे म्हणणं असे की, पिंपळाच्या खोडातून थरथर आणि कोठलातरी आवाज येतो. त्यामुळे मेंदू शुद्ध होतो. आम्ही छोटे मित्र त्या पिंपळाला डोकं टेकवून उभे राहायचो. हा एक शिरस्ताच झाला होता. त्याला लागून संत तुकारामांचं देऊळ आहे. त्याला वळसा घालून, नमस्कार करून मग पुढच्या उताराला चालत जाणं. उतारावरून चालत निघालं की खाली मांडवी नदीचं पात्र, त्यावर तरंगणारी साबळेची छोटी होडी आणि त्याच्या कडेला वाढलेली बेवारशी शिंदीची उंच झाडं. त्यावर चढत गेलेली सुटुंबा टेकडी. या पार्श्वभूमीवर कपर्दिकेश्वराचं काळ्या अनुभवी दगडातलं, थाटात उभं असलेलं देऊळ. त्याच्या पुढ्यात मंदिराकडे पाहत ऐटीत बसलेला नंदीबा. आसपास मोडकळीस आलेली उद्ध्वस्त धर्मशाळा. वर चैतन्य महाराजांचं पांढरं, बुटकं देऊळ. आणि जवळच टेकडी कोरून तयार केलेला कुस्तीचा आखाडा.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी

श्रावणात तेथे यात्रा भरायची. शेतकऱ्यांच्या पागोट्यांनी, बायकांच्या इरकली साड्यांनी, पताकांनी तो परिसर रंगीबेरंगी दिसायचा. त्यावर श्रावणातल्या हलक्या पावसाचा शिडकावा झालेला असायचा. कुस्तीचा आखाडा दूरदूरच्या गावांतून आलेल्या निरनिराळ्या शरीरयष्टीच्या पैलवानांनी भरायचा. पहिले पहिले माझ्या दिगंबर काकाच्या खांद्यावर बसून मी तिथं जायचो. आखाड्यात पहिल्यांदा छोट्या पोरांच्या कुस्त्या व्हायच्या. काका मला आखाड्यात उतरवायचा. मी कुस्तीत अनेकदा जिंकलो. मग आम्हाला रेवड्या मिळायच्या. कधी फेटे बांधले जायचे. मी परत काकाच्या खांद्यावर विजयी वीरासारखा आईला दाखवायला घरी यायचो. मला कुस्ती अजूनही आवडते. या यात्रेच्या दरम्यान देवळात तांदळाच्या पिंडी करीत असत. सारे भाविक आश्चर्याने त्या पाहायला, दर्शनाला येत असत. चार सोमवारांची ही यात्रा संपली की शुकशुकाट होई. पण ते देऊळ, नंदी तसेच तटस्थ तिथं उभे राहत आले आहेत.

कधी आईबरोबर मी त्या देवळाकडे सायंकाळी जात असे. तिला हे देऊळ फार आवडे. चालताना ती मनमोकळी असे. पलीकडचे डोंगर, झाडांबद्दल ती मला जे सांगत असे ते आता माझ्या लक्षात नाही. त्यामुळे तो रस्ता माझ्या पायाखालचा झाला होता. फक्त भरदुपारी धर्मशाळेच्या पायरीवर बसलेल्या दाढीवाल्या संन्याशाची मला भीती वाटे. पण तोही कधीतरी नाहीसा व्हायचा. मधू भोई माझा मित्र होता. तो मला मासे पकडायला शिकवायचा. आम्हाला दोघांनाही शाळा आवडायची नाही. आम्ही दोघं फसवून दुपारीच शाळेतून पळून त्या देवळाकडे जायचो. कधी मी एकटाच असे. लपून बसायची माझी ती जागा होती. त्या थंड गाभाऱ्यात मी स्वत:शीच खेळत असे. खेळता खेळता कधी कधी त्या गारव्यात मी निजूनही जात असे. ती दगडी पिंड मला खूपच गमतशीर वाटे. देवळाला जोडलेलं एक छोटं देऊळ होतं. त्यात कोणतीही मूर्ती नव्हती. फक्त एक छोटा दरवाजा आणि नदीच्या पात्राकडे पाहणारी अगदी चिमुकली, मूठभर आकाराची खिडकी! त्या खिडकीला तोंड लावलं की खूप गार वारा यायचा. सारा गारेगार व्हायचा चेहरा. मी संध्याकाळपर्यंत तिथं असायचो. साऱ्या देवळाचा कानाकोपरा मला माहिती झाला होता. आणि त्यांना मीही माहिती झालो होतो! मी एकटा असताना घंटा कधीच वाजवायचो नाही. घंटेचा आवाज दूरवर जात असे. तो ऐकून मला कोणी शोधीत येईल याची भीती वाटायची. कधी मधू, कोणी आणखी मित्र असलो की नंदीवर बसून खाली उड्या मारण्याचे खेळ खेळत असू. हा नंदी कुणाकडे पाहतोय असा प्रश्न पडे. तो अजूनही सुटलेला नाही. पण या खेळात लपून बसायची माझी जागा कुणीतरी चुगली केल्याने घरात कळली. आमचा घरगडी मारुती मला शोधीत यायचा. मला काहीतरी थापा मारून घरी आणायचा.

पण या देवळावर अचानक आक्रित आलं. गावकऱ्यांनी त्याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. म्हणजे ते देऊळ ऑइल पेंटनी रंगवायचं असा एक अभद्र ठराव केला गेला होता. वर्गणी गोळा करत माणसं आमच्या वाड्यावर आली. आई रागावली होती. तिचं म्हणणं- थोडी डागडुजी करा, सारा परिसर स्वच्छ करून झाडं लावा. पहिल्यांदा स्त्रियांसाठी संडास बांधा. रस्ते करा. गावात वीज आणा. अर्थातच तिचा हा विरोध टिकला नाही. एकदा आई म्हणाली, ‘माझ्याबरोबर चल, आपण देवळाला जाऊ.’ आम्ही गेलो. आई देवळाभोवती फिरत होती. मान उंच करून कळसाकडे पाहत होती. नंतर गाभाऱ्याच्या उंबऱ्यात ती बसून राहिली. मी तिला इतकी अस्वस्थ झालेली कधी पाहिलं नव्हतं. जाताना चढावर ती थांबली. वळून देवळाकडे पाहत मला म्हणाली, ‘आत्ताच देऊळ पाहून घे. परत असं ते दिसणार नाही.’

मोगलांचा देवळावर हल्ला व्हावा तशी गावात एक गाडी थांबली. त्यातून विचित्र भाषेत बोलणारी, काळी, लुकडी, धोतर-लुंगीतली माणसं उतरली. येताना त्यांनी मोठमोठे रंगांचे ड्रम्स आणले होते. त्या सामानात तंबू, राहुट्या, कंदील, बत्त्या, ढेरपोटे आचारी, मोठ्या ट्रंका होत्या. देवळाभोवती त्यांनी छावण्या घातल्या. देऊळ मोठ्या बांबूंनी पहाड बांधून जेरबंद केलं. भोवती राहुट्या उभ्या केल्या. एवढंच नाही तर वेशीच्या पलीकडे तरटांची भिंत उभी केली. गावातून देवळाकडे जाण्याची बंदी झाली. देवळाचं काय होणार याची भीती गावात नव्हती, तर सारे आनंदात होते. युद्धातली ही परिस्थिती आपल्या इतिहासात सतत घडलेली आपण पाहत आलो आहोत. त्यांना ‘घरभेदी’ म्हणतात.

मला करमायचं नाही. त्या आपल्या देवळात काय चाललंय याची मला उत्सुकता होती. गावात अशी घटना पूर्वी घडली नव्हती. मी एक-दोनदा वेशीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण मला हाकलून लावलं गेलं. स्मशानभूमीच्या रस्त्याने गेलो, नदी पार केली की साबळे शेतकऱ्याच्या टेकडीवरून प्रवेश करता येईल. पण नदीत मी अख्खा बुडेन एवढं पाणी होतं. इतिहासापासून फितूर सर्वत्र असतात याचे दाखले आहेतच. तसा मला सरपंचाचा मुलगा मिळाला. त्याच्याबरोबर मी एकदा देवळापर्यंत पोचलो. पण देवळात जायला प्रवेश मिळाला नाही. देवळाला बांधलेल्या बांबूच्या पहाडावर लोक चढलेले होते. उंच कळसापासून ते देऊळ खरवडत होते. एके दिवशी त्या विचित्र लोकांमधला कुणी एक आजारी पडला. त्याला घेऊन माझ्या वडलांच्या दवाखान्यात काही लोक आले. वडलांनी त्याची ट्रीटमेंट केली. त्यावेळी मी तिथं होतो. तो माणूस बराही झाला. मी डॉक्टरांचा मुलगा आहे अशी जुजबी ओळख झाली. त्या ओळखीवर मी देवळाकडे जाऊ लागलो. त्यांच्या मुखियाने मला एकदा देवळात नेलं. मंडपात अनेक रंगांचे ड्रम्स ठेवले होते. भिंतींना वर पिवळा आणि खाली भडक निळा रंग लावला होता. दोन्ही रंगांच्या मधल्या पट्टीमध्ये तांबडा रंग होता. एकाकडे एक स्टेन्सिल होती. ती धरून तो त्याच्यावर काळा रंग मारे, की भिंतीवर ‘ओम नम:शिवाय’ अशी अक्षरं उमटत असत. ते पाहून मला आश्चर्य वाटे. दुसऱ्या भिंतीवर असाच कुणी स्टेन्सिलवर रंग फासे- तर त्यावर निळ्या शंकराचं चित्र उमटे. देवळात सर्वत्र ऑइल पेंटचा वास भरलेला असे. देवळातल्या घंटा कापडात गुंडाळून ठेवलेल्या होत्या. चौकात सर्वत्र तरट पसरलेलं असे. त्यावर अनेक प्रकारचे ब्रशेस ठेवलेले होते. मी एक मोठा ब्रश उचलला, तसा मुखियाने तो काढून घेतला व त्याच्या भाषेत काहीतरी म्हणाला. त्याच्या आविर्भावातून मला समजलं, की याला हात लावायचा नाही. परतताना का कुणास ठाऊक, माझ्या मनात तो मोठा ब्रशच होता. ड्रममधले रंग होते. ते मनातून जातच नव्हते.

एका पहाटे मी उठलो. बाहेर अंधारात देवळापाशी गेलो. सारे चिडीचूप झोपले होते. राहुट्यांवर मिणमिणते कंदील होते. मी गुपचूप आत गेलो. तोच मोठा ब्रश घेतला. ती स्टेन्सिल घेऊन भिंतीवर ठेवून तिच्यावर भलताच रंग मारला, तसं ‘ओम नम:’ एवढंच अक्षर उमटलं. मला त्यावेळी झालेला तो आनंद आजपर्यंत माझ्याकडे आहे. नंतर मी तोच ब्रश दुसऱ्या रंगाच्या ड्रममध्ये बुडवला. तो बहुतेक पांढरा रंग होता. त्याने मी त्या निळ्या रंगातल्या शंकराच्या चेहऱ्यावर मारत सुटलो. कोणाला तरी जाग आली. मी घरी पळत आलो. सकाळी सकाळी देवळात बोंबाबोंब झाली. ड्रममधले सगळे रंग मिसळल्यामुळे- विशेषत: पांढरा रंग तर राखाडी झाला होता- देवळाचं काम थांबलं. काही दिवस माझ्या हातावरचे रंगांचे डाग गेले नव्हते. ते डाग मी हात खिशात घालून लपवून हिंडत असे. दोन गोष्टी होत्या : मला मोठ्ठ्या ब्रशने रंगवायचं होतं. ती हौस फिटली. दुसरी म्हणजे गनिमांच्या घरात घुसून मी ते काम थोडा वेळ का होईना, थांबवलं. शेवटी ते देऊळ पूर्ण झालं. कार्यक्रम झाला. निसर्गात सामावून जाणाऱ्या त्या रंगीबेरंगी कपर्दिकेश्वराचं देऊळ फुफ्फुसावर येणाऱ्या रोगट डागासारखं दिसू लागलं. आई परत त्या देवळाकडे फिरकली नाही. मीही ओतूर सोडलं. पुढे कुणी गावकरी मला हौसेनं तिथले फोटो पाठवी. त्यात ते देऊळ साऊथच्या सिनेमातल्या भडक सेटसारखं दिसे.

का कुणास ठाऊक, तो मोठा ब्रश माझ्या हातातून सुटला नाही; अथवा ते हेमाडपंती जुनं देऊळही. मला पेंटिंग करताना मोठे ब्रशेस, मोठ्या साइजचे कॅनव्हासेस लागतात. १९९३ साली मी अहमदाबादमध्ये एक मोठा डोम पेंट केला. एकोणीस फुटांच्या अनेक फिगर्स मी उंच स्कॅफोल्डिंगवर चढून पेंट करीत असताना त्याच दगडी देवळाची जुनी आठवण उंचावर तरळत असायची. ही असंख्य सुबक देवळं कुणी बांधली? त्यांना घडवणारे कोणते हात होते? कुठल्याशा गावाबाहेरच्या विराण जागा शोधण्यामागे कोणतं कारण असेल? त्याभोवतालच्या कातळात अजूनही फुलणारं चाफ्याचं झाड कुणी लावले असेल, की हवेतून हजारो बिया पडून त्यातली एक बी तिथं रुजली? त्याला पाणी कुणी दिलं? आणि इतका डोंगर चढत येऊन कोण इथं प्रार्थना करतो? दिवा पेटवतो? आणि का? अशी परंपरागत असलेली सुंदर देवळं जतन करण्याऐवजी माणसं त्यांना असतील तेवढे रंग चोपडून विद्रुप का करतात?

मला जगातील अनेक संस्कृती, त्या संस्कृतींप्रमाणे उभारलेली देवळं, चर्चेस, मशिदी, गुहा पाहण्याचा योग आला. आपापली कलात्मकता, शैली, भाव त्यात उतरलेले आहेत. एकदा बँकॉकमधल्या शांत झोपलेल्या बुद्धाच्या देवळात मी होतो. आपल्याकडे देवाला फुलं, हार, नारळ घेऊन जातात. ते भाविक बुद्धासाठी सोन्याचा वर्ख म्हणजे गोल्ड लीफ घेऊन जातात. ते तिथल्या खांबांना, भिंतींना, पायऱ्यांना, चिटकवूनच दर्शन घेतात. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर ते सभागृह सोनेरी रंगानं मढलेलं आहे. बुद्धाची एका हातावर लवंडलेली भव्य मूर्तीही सोनेरी आहे. माझ्या मनात आलं, की वैराग्याची शिकवण देणाऱ्या या बुद्धाच्या देवळात हा सोनेरी थाट का आहे? मी तिथं बसलो. डोळे मिटले आणि मी एकाएकी शांत झालो. सोनेरी फक्त फसाड आहे. आत गेलो की शांतता आहे. तिथं हे सूत्र जेव्हा मला कळलं; आणि मी ‘गोल्ड : द इनर लाइट’ ही सीरिज केली. हीच शांतता मला इस्तंबूलच्या ब्ल्यू मास्कमध्ये, अनेक भव्य चर्चेसमध्ये मिळाली. या सर्वांची एवढी भव्यता आहे की माणसाला आपण या अफाट जगात किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते. यातलंच एक अंगोरवाटमधील देऊळ आहे. या देवळाचा सखोल अभ्यास झाला आहे. त्याची रचना, त्यातलं इंजिनीअरिंग, त्यातली कलात्मकता, फिलॉसॉफी, त्यांचं वय, काळ याच्या बारीक तपशिलांमध्ये गेलं की स्तब्ध व्हायला होतं. ही मानवजात हजारो वर्षं या दगडधोंड्यांत काय शोधते आहे. प्रत्येक संस्कृती सुंदर आहे. पण तितकीच त्यांची वृत्ती विध्वंसक दिसते. आपली संस्कृती तेवढी खरी असं म्हणून जगभर फिरत राहिलेल्या आक्रमकांनी या सुंदर ऐतिहासिक कलाकृतींचा केलेला विध्वंस हा याची साक्ष आहे. श्रद्धेवर जग चालतं. भीतीने ग्रासलेल्या, त्रासलेल्या लोकांना, एकाकी झालेल्यांना मानसिक आधार देणारी ही स्थळं निर्माण झाली. हा आधार त्यांना पंचतारांकित हॉटेलं, वेश्यागृहं, गुत्ते, क्रीडांगणे, थिएटर्स देऊ शकत नाही. इथे गरीब-श्रीमंत, जातपात गळून पडते. असहाय झालेले लोक रात्रभर चालत सिद्धीविनायकाला जातात. त्यांच्यात एक अमिताभ बच्चनही असतो. त्यात खेळाडू, नट-नट्या, गुंड ते राजकारणी, आजारी सामान्य माणसंही असतात. अशाच देवळाच्या पायऱ्यांशी हारतुरे विकून ते प्रसाद वाटणाऱ्या पुजाऱ्याच्या व्यापारावर जगणारी कुटुंबंही असतात. त्या ठिकाणी प्रार्थना होतात. दिवे पेटवले जातात. घंटानाद होतात. आणि एकाकी माणसांना थोडा वेळ दिलासा मिळतो. मला स्वत:ला, देवळं ही शरीरासारखी वाटतात. स्वत:च्या आत गेलात की गाभारा असतो तशी त्यांची रचना असते. इजिप्तमधील देवळं ही तर क्लासरूम्स होती. त्यांच्या पुस्तकातले धडे भव्य मंदिरावर कोरलेले आहेत. अशा या पवित्र मंदिरांना रंग लावून विद्रुप करणारे हे तिथल्या विकृत समाजाचंच प्रतिबिंब म्हणावं लागेल. हा आपला मोलाचा ठेवा आहे. तो पुन्हा होणार नाही. माझी आई म्हणायची तसं या देवळांभोवती आपल्या साऱ्या कला नांदतात. आसपास हिरवळ लावा, झाडे लावा, पाण्याची, स्वच्छतेची सोय करा. संसाराला थकून, दमूनभागून आलेल्यांना कमीत कमी झाडाच्या सावलीत क्षणभर विश्रांती घेता येईल.

मला ते देऊळ लहानपणीची खेळण्याची जागा होती. त्या बालवयात गाभारा ही माझी लपायची जागा होती. कदाचित ती कोणत्याही वयात सर्वांसाठीच असते.

Subhash.awchat @ gmail.com