दादरच्या पोतुगीज चर्चजवळच्या इराण्याच्या हॉटेलात बसून मी विक्रमची वाट पाहत होतो. विक्रम माझा शाळेपासूनचा दोस्त. अभ्यासात तर तो स्मार्ट होताच, शिवाय दिसायलाही स्मार्ट. नोकरी न करता कोणत्या तरी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतातील संशोधनकार्यात तो गुंतला होता. अनेक वर्षे त्याचा पत्ताच नव्हता. आणि आता अनेक वर्षांनंतर मला त्याने आमच्या जुन्या अड्डय़ावर बोलावले होते. अध्र्या तासानंतर विकी आला तोच धापा टाकत. त्याचा अवतार पाहण्यासारखा होता. मळलेला व घामेजलेला शर्ट, केस विस्कटलेले. आणि चेहऱ्यावर एक अनामिक भीती. आल्याआल्या तो म्हणाला,
‘‘येथे नको. कोपऱ्यातल्या टेबलावर बसू या.’’
मी म्हणालो, ‘‘ठीक आहे.’’
आम्ही दोघे कोपऱ्यातल्या टेबलावर बसलो. मी ब्रुनपाव व मस्का विथ स्पेशल चायची ऑर्डर दिली आणि विकीला विचारले, ‘‘काय रे, होतास कुठे इतके दिवस? आणि हा काय अवतार केला आहेस?’’
‘‘अरे, दिल्लीला होतो. कामाच्या व्यापात वेळच मिळाला नाही.’’
तो आजूबाजूला घाबरून पाहत म्हणाला. ‘‘पण ऐक, मी इथे तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आलो आहे. हे बघ, तुला माहिती आहेच, मी एलियन रिसर्च करणाऱ्या मुफॉन संस्थेत काम करतो. आमची संस्था अंतराळातून येणाऱ्या परग्रहसवासी व त्यांच्या उडत्या तबकडय़ांवर रिसर्च करते. मला एक अशी महत्त्वाची गोष्ट कळली आहे, जी कोणालाही सांगितली तरी त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.’’
‘‘हे बघ, तुझा रिसर्च वगैरे ठीक आहे. पण मी खरं सांगू, माझा या ‘एलियन’ वगैरे गोष्टींवर विश्वास नाही. बघ, अजून एकही ठोस पुरावा कोणाला मिळालेला नाही. तुला जर तसा पुरावा मिळाला असेल तर धम्मालच होईल.’’
‘‘समीर, हे बघ, यात धम्माल वगैरे काही नाही. ते येथेच आहेत. समजलं? आणि ते इथेपण येतील. कधीही! त्यांना वाटेल तेव्हा!’’ त्याच्या स्वरात भीती होती.
‘‘ते येथेच आहेत म्हणजे? ते कोण??’’
‘‘अरे! आतापर्यंत मी काय सांगत होतो, रामाची सीता. अरे एलियन्स-परग्रहवासी.’’
‘‘अच्छा? मग आपण त्यांचं स्वागतच करायला हवं! आणि त्यांच्या उडत्या तबकडय़ा त्यांनी कुठे पार्क केल्या आहेत?’’ मला सगळी गंमतच वाटत होती.
‘‘अरे, हॉलीवूडच्या सायफाय मूव्हीजमध्ये दाखवतात तसे हे एलियन्स नाहीत. ते फार प्रगत आहेत. ते अनेक वर्षे येथेच राहताहेत. आपल्यामध्ये. आपल्या नकळत, आपलेच रूप घेऊन. आणि मला हे काही दिवसांपूर्वीच कळलं आहे.’’
‘‘काय.. काय? याला पुरावा काय?’’ मीपण चिडीला आलो होतो.
‘‘पुरावा मी स्वत:च आहे,’’ विकी गंभीरपणे म्हणाला.
‘‘म.. म्हणजे काय?’’ मी जरा चाचरतच विचारले. विकीच्या डोळ्यात वेडेपणाची झलक दिसते का, ते मी पाहत होतो.
‘‘माझा अवतार पाहतोयस. मला असं कधी पाहिलं आहेस? अरे, एलियन्सची ही माहिती मला मिळाल्यापासून ते माझ्या जिवावर उठले आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मी दरदर भटकतोय. त्यांच्याबाबत जवळजवळ सर्व माहिती मी गोळा केली आहे, जी मी तुला आता सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐक! हे बघ, अगदी प्राचीन काळापासून एक परग्रहवासीयांची जात आपल्या पृथ्वीवर आहे. छत्तीसगढमधल्या चरामा गुहांत त्यांची आदिमानवांनी काढलेली चित्रे मी स्वत: पाहिली आहेत. हजारो वर्षे आधीच त्यांनी आपली वस्ती येथे वसवली आहे. ते आपले रूप बदलू शकतात. ते कोणाचेही रूप घेऊ शकतात. आता त्यांची संख्या एवढी वाढली आहे, की आपण- जे या ग्रहाचे मूळ रहिवासी आहोत त्यांनाच नष्ट करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.’’
विकीने एका दमात मला सर्व सांगून टाकले. पण मी जरासा गोंधळलेला होतो.
‘‘एलियन्स जर आपल्यासारखेच दिसतात, तर त्यांना ओळखणार कसं?’’ मी विकीला प्रश्न केला.
‘‘त्यांची एक खूण आहे. ती म्हणजे त्यांच्या डोळ्यांचा रंग. त्यांचे डोळे अगदी हिरवेगार आहेत- आणि आपल्यासारखा स्वत:च्या डोळ्यांचा रंग बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना जमले नाही, म्हणून ते सदैव काळा चष्मा घालून वावरतात.’’
विकीने त्याचेही स्पष्टीकरण दिले. त्याला एवढी माहिती कुठून मिळाली- जी इतर कुणालाच मिळवता आली नाही, असाही प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालत होता. पण विकीने माझ्या मनातील भाव ओळखले असावेत. तो स्वत:च सांगू लागला..
‘‘हे बघ, मुफॉनमध्ये संशोधन करताना मला बरीच प्राचीन मॅन्युस्क्रिप्ट वाचायला मिळायची. ती वाचताना एक अनोखा ग्रंथ माझ्या वाचनात आला. तो जगातील कोणत्याच ज्ञात भाषा व बोलीतील नव्हता. पण अनेक वर्षे संशोधन केल्यावर तो सांकेतिक भाषेतील ग्रंथ मी डीकोड केला. मला एलियन्सचे रहस्य कळले आहे हे समजल्यावर ते माझ्या मागे लागले. मला ठार केल्यावाचून आता पर्याय नाही हे त्यांना माहीत आहे. मला माहिती आहे की, कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण तू ठेवशील, म्हणून मी तुला हे सर्व सांगतोय. हा पेन-ड्राइव्ह घे, यात माझ्या संशोधनाची सर्व माहिती आहे. जपून ठेव. आणि समजा, माझं काही बरं-वाईट झालं तर तू हे सर्व जगाला ओरडून सांग.’’ विकीच्या चेहऱ्यावर खिन्नता होती. त्याला माहीत होतं की, तो आता फार दिवसांचा सोबती नाही.
‘‘डोन्ट वरी.’’ मी त्याच्याकडून ते पेनड्राइव्ह घेत म्हणालो. तेवढय़ात ब््राुन मस्कापाव व चहा आला.
‘‘अरे बनसोडे, किती वेळ लावलास?’’ मी माझ्या ओळखीच्या वेटरला उगाच दम देत म्हणालो. शरद माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून तेथे वेटरचे काम करत होता.
‘‘हे बघ, विकी, आता मस्तपैकी फ्रेश हो आणि गरमागरम चहा घे.’’मी विकीला म्हणालो.
‘‘ठीक आहे, अनेक दिवसांनंतर दादुकडचा चहा प्यायला मिळतोय,’’ असे बोलून तो तोंड धुवायला गेला. मी माझ्या खिशातले पेन काढले. विकी जेथे बसला होता,
त्या खुर्चीसमोरच्या कपावर त्या पेनचे टोक धरले. त्यातून एक बिनरंगाच्या द्रवाचे दोनच थेंब त्याच्या चहात टाकले. आता तो चहा पिऊन झाल्यावर अध्र्या तासाच्या आत विकीला हृदयविकाराचा जोरदार झटका येणार होता आणि तेव्हा त्याच्याबरोबर मी असणार नव्हतो. माझ्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याचे बटण मी दाबले आणि माझ्या डोळ्यावरचा गॉगल काढला. माझे हिरवेगार डोळे चमकत होते. चष्म्याशिवाय स्वत:चा सेल्फी मी अनेक दिवसांनंतर काढत होतो.
अभिजीत जाधव
ते येथेच आहेत!
दादरच्या पोतुगीज चर्चजवळच्या इराण्याच्या हॉटेलात बसून मी विक्रमची वाट पाहत होतो. विक्रम माझा शाळेपासूनचा दोस्त.
First published on: 01-03-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science story