|| निलेश अडसूळ, चिन्मय पाटणकर, शफी पठाण, सुहास सरदेशमुख 

करोनातील लॉकडाऊनमध्ये असंख्यांची आयुष्यं बेचिराख झाली… अस्ताव्यस्त झाली. त्यातून सावरायचा प्रयत्न प्रत्येक जण करतो आहे. लॉकडाऊन वर्षपूर्तीनिमित्ताने या वेदनांचे पुन:स्मरण…

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न

‘कोविड-१९’ हे नावही नव्हतं त्या विषाणूला तेव्हा चीनपासून इटली, स्पेन, अमेरिकेपर्यंत हा विषाणू हाहाकार माजवत होता. माणसं मारत होता. गजबजलेली शहरं ओस पाडत होता. आपल्याकडे मात्र परदेशी पाहुण्यांचं आगमन, मध्य प्रदेशचा सत्तापालट वगैरे सुविहित पार पडल्यावरच हा विषाणू पोहोचला. जगानं या विषाणूचा कहर दिसू लागल्यानंतर जो जालीम उपाय केला होता, तो आपण आधीच करून टाकला- लॉकडाउन… जनजीवनाची टाळेबंदी! तिची वर्षपूर्ती येत्या बुधवारी होईल तेव्हा अनेकांच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या होतील. ज्यांचं कुणीही ‘गेलं’ नाही, ज्यांना स्थलांतर वगैरे करावं लागलं नाही, ज्यांना घरून काम- आणि घरकामही- करण्यात आनंदच वाटला, ज्यांच्या नोकऱ्याच काय, पगारही कायम राहिला, त्यांनाही एखादी आठवण असेलच- सकाळी चहासोबत खारी वा टोस्ट हवे म्हणून आदल्या दिवशी पाऊण तास रांगेत उभं राहिल्याची, वायफाय नीट सुरू नसल्याची किंवा ऑनलाइन खरेदी केलेला कपडा परत करावा लागल्याची…

…यापेक्षा निराळ्या आठवणी अनेकांकडे आहेत. उदाहरणार्थ, वर्षभरापूर्वी पुण्यात राहणारी मनीषा सानप. तिच्याचसारखे अभ्यासासाठी पुण्यात आलेले दत्ता आडे, महेश बढे आदी तरुण, किंवा नागपूरचा रुजल अड्याळकर, औरंगाबादच्या नूरजहाँ, धारावीतला सनी गद्रे… प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हजारो विद्यार्थी पुण्यात तयारीसाठी येतात, त्यापैकी ती एक. गेल्या वर्षी राज्यसेवा पूर्वपरीक्षा एप्रिलमध्ये होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्यात मग्न होते. मात्र मार्चच्या अखेरीस लागू केलेल्या टाळेबंदीमुळे विद्यार्थी पुण्यात अडकले. काही विद्यार्थी टाळेबंदीआधीच गावी गेले. पण पुण्यातील विद्यार्थ्यांच्या खाणावळी बंद असल्यानं जेवणाची समस्या, गावी जाण्यासाठी वाहतूक नाही, घरमालकांनी घराबाहेर काढले, पैसे नसल्याने भाडंही थकलेलं… अशी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची कोंडी झाली.

नेवासाजवळचं कुकाणा पाथरवाला हे मनीषा सानपचं गाव. राज्यसेवेची तयारी करत होती ती. तिनं भावाबरोबर दोन खोल्यांचं घर भाड्यानं घेतलं होतं. टाळेबंदी लागू झाली तेव्हा भाऊ गावीच होता. त्यामुळे ती एकटीच. अभ्यासिका बंद झाल्या. खाणावळी बंद, हॉटेल बंद झाल्यानं मनीषाच्या अनेक मित्र-मैत्रिणींची गैरसोय झाली होती. ‘‘सुदैवानं माझ्याकडे थोडेबहुत जिन्नस असल्यानं महिनाभर काढणं शक्य होतं. त्यामुळे कधी दिवसभर पोहे, कधी फक्त भात, कधी पोळी असं पुरवून खावं लागलं. अनेक मुलांना गावी जायचं होतं, पण बस किंवा दुसरं वाहन उपलब्ध नव्हतं. बाहेर पडलं तर करोनाग्रस्त होण्याचं दडपण होतं. माझ्याकडे असलेले जिन्नस महिन्याभरात संपल्यानंतर बाहेर पडून रांगेत उभे राहून खरेदी करावी लागत होती. कधी तासभर रांगेत उभं राहिल्यावर वेळ संपली म्हणून दुकान बंद व्हायचं. कधी भाजी संपायची. कधी भाजीवाल्याला पोलीस येऊन उठवायचे. त्यामुळे जे मिळेल ते घेऊन दिवस काढावे लागले. त्या दरम्यान एक मैत्रीण माझ्याकडे येऊन महिनाभर राहिली होती. टाळेबंदीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. करोना प्रकरण कधी संपणार, परीक्षा कधी होणार, या विचारानं दडपण यायचं. महिना-दीड महिना प्रशासन बस उपलब्ध करून देत नसल्यानं अनेक मुलांनी कसेबसे दिवस काढले. पण काही मुले जास्त पैसे देऊन गाडी करून, ई-पास काढून गावी निघून गेले. मी अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर गावी गेले…’’ असं मनीषा सांगते.

मूळ यवतमाळजवळच्या पुसदचा दत्ता आडे राज्यसेवेच्या तयारीसाठी पुण्यात सदाशिव पेठेत राहत होता. ‘‘आम्ही काही विद्यार्थी पुण्यात होतो आणि गावी जाणार होतो. पण टाळेबंदी लागू झाल्यामुळे पुण्यातच अडकलो. खाणावळी बंद. हॉटेल बंद. जेवणाची मोठी समस्या होती. काही वेळा तर वेफर्स खाऊन राहावे लागले. अन्न- वाटप उपक्रमातून अन्नपाकिटं  मिळू लागल्यानंतरच जेवणाची सोय झाली. मे महिन्यात बस उपलब्ध झाल्यावर गावी जायला मिळालं,’’ असं दत्तानं सांगितलं.

याच वेळी चित्रवाणी वाहिन्यांवर ‘तबलिगी जमात’ वगैरेच्या बातम्या गाजत होत्या. औरंगाबादच्या मध्यवर्ती भागातल्या सिल्लेखाना चौकात गेल्या वर्षीच्या २८ मार्चला करोना रुग्ण आढळला. तेव्हा शहरभर विषाणूची दहशत होती. केवळ मुस्लीम भागातच करोना विषाणू आला आहे आणि म्हणून एकाच भागातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत, काहीतरी ‘सरकारी गडबड’आहे असा गैरसमज पसरला आणि नूरजहाँच्या तोंडचे पाणी पळाले.

गेली २० वर्षे त्या या भागात आशा कार्यकर्ती म्हणून काम करतात. महिला गरोदर राहिली की तिच्या तपासण्या सरकारी रुग्णालयात नीट होतात की नाही यावर लक्ष ठेवायचे आणि मूल झाल्यानंतर त्याचे दोन वर्षांपर्यंतचे लसीकरण करून घ्यायचे, हे मुख्य काम. करोना आला तेव्हा कोणाला कोरडा खोकला आहे का, याची विचारणा करायला नूरजहाँ जायच्या तेव्हा त्यांना मोहल्ल्यातून फारसा प्रतिसाद मिळायचा नाही. अनेक वर्षांच्या संबंधांमुळे हळूृहळू माहिती काढायची आणि वरिष्ठांना पोहोचवायची असे काम नूरजहॉं करू लागल्या. पण मनात भीती होती… आपल्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींना तर हा रोग लागणार नाही ना? पण इलाज नव्हता. एका मुलाचे लग्न झालेले. तो वेगळा राहतो. एक मुलगा नूरजहाँ यांच्याबरोबर. नवऱ्याला दमा आहे, काम होत नाही.

‘‘करोना चाचण्या करून घ्या, हे समजून सांगायलाच चार महिने गेले. घरातून रुग्ण म्हणून नेलेला माणूस परत घरी येईल की नाही याची खात्री नव्हती. तेव्हा प्रत्येक घरात सांगावं लागलं, ‘मी घेते तुमच्या मुलांची खात्री. अगदी बेरात्री फोन करा.’ त्यानंतर काही जण चाचणी करून घ्यायला तयार झाले.’’ काहींनी त्रास असूनही हट्ट सोडला नाही. पण संसर्ग वाढत गेला तसतशा अडचणी वाढत गेल्या. तशात मध्ये पाय फ्रॅक्चर झाला. पण सांगण्यात आलं- काम थांबवून चालणार नाही. मग मुलाच्या गाडीवर जायच्या नूरजहाँ मोहल्ल्यात. याच काळात २० महिलांची प्रसुती झाली. त्यांच्या अनेक प्रकारच्या नोंदी केल्या. त्यांना रुग्णालयापर्यंत पाठवणं हे अवघड काम होतं. पण नंतर सांगण्यात आलं, ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीने काम करायचं नाही. पण घरात दुसरं कोणी कमावणारं नसल्यानं त्या काम करीत राहिल्या.

सरकारला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा त्या भागात पाय रोवून उभा असणारा एक माणूस लागतो. ती ‘आशा’ अनेक वार्डात, गावांत कार्यरत होती. नूरजहाँ, शरीन, फुरकाना या औरंगाबादच्या महिला त्यांपैकीच. पण ज्या भागात सरकार विषाणू संसर्गाच्या नावाने डांबून ठेवतं आहे असा समज होता त्या भागात नूरजहाँ कार्यरत राहिल्या.

मुंबईतला असाच ‘निबिड’ भाग म्हणजे धारावी. इथल्या ज्या चाळीत एकाच आठवड्यात सात जणांचा मृत्यू झाला, तिथला सनी गद्रे. आई त्याच आठवड्यात गेली सनीची.

‘‘घराचा उदरनिर्वाह आई आणि माझ्यावरच अवलंबून होता. त्यामुळे साथ वाढत असतानाही आम्ही कामाला जात होतो. आई रुग्णांची देखभाल करण्याचे काम करायची. एक दिवस अचानक अन्नातून किरकोळ विषबाधा झाल्याचं निमित्त झालं आणि ती घाबरली. करोना वयस्कर माणसांना, मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांना घातक ठरतो हे तिच्या मनात इतकं घर करून बसलं होतं की त्या भीतीने रक्तदाब कमी झाला, तिची हालचाल बंद झाली. आईला तातडीने शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात घेऊन गेलो. तेथील अतिदक्षता विभाग रुग्णांनी खचाखच भरला होता. बहुतांशी सगळे घाबरलेले. त्यावेळी करोनापेक्षा घाबरून जीव सोडलेली माणसं मी पाहिलीयेत.

प्रत्येकाला आपल्या रुग्णासाठी खाट हवी होती. लोक तेथील डॉक्टर, कर्मचारी यांना खूप आशेने प्रश्न विचारायचे. पण वैतागलेल्या कर्मचाऱ्यांकडून सनीसारख्या काहीजणांना ‘जेव्हा कुणी मरेल तेव्हाच खाट रिकामी होईल,’ अशी उत्तरंही मिळाली. ‘‘नाइलाज म्हणून आईला तिथं दाखल केले. खाट नव्हती म्हणून जमिनीवरच. दुसऱ्या दिवशी क्ष-किरण चाचणीनंतर न्यूमोनिया असल्याचं समजलं. न्यूमोनिया म्हणजेच करोना असं गृहीत धरून आईला कोविड कक्षात हलवलं. तिथली परिस्थिती अधिकच बिकट. रुग्णांच्या आसपासही फिरकायला कुणी तयार नव्हतं. त्यामुळे प्रत्येक रुग्णासोबत त्याचा एक नातेवाईक होताच. बाधित रुग्णासोबत कुणाची आई, बाप, पती, पत्नी जीव धोक्यात घालून तेथे राहायचे…’’ असं सनी सांगतो.

चाचणीनंतर सनीची आईही करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं. ‘‘तिला जेवण भरवण्यापासून ते डायपर बदलण्यापर्यंत सर्व मीच करत होतो. अशातच पालिका कर्मचाऱ्यांचे फोन यायचे- ‘तुम्ही बाधित असू शकता, म्हणून स्वत:हून आमच्या ताब्यात या. अन्यथा तुमच्या मोबाइलच्या ठावठिकाण्यावरून पोलिसांना तुमच्या मागावर पाठवण्यात येईल.’ एकदा वैतागून त्यांना थेट घरीच यायला सांगितलं. मात्र, त्या दिवशी एकही कर्मचारी घरी आला नाही. मी घरात अडकलेलो असतानाच रुग्णालयातून फोन येऊ लागले, ‘तुमच्या आईनं अंथरूण खराब केलंय, ते साफ करायला तातडीने या.’ तसाच पळत रुग्णालयात गेलो.’’

‘‘दरम्यान मलाही ताप येऊ लागला होता. पण आईची शुश्रुषा त्यावेळी सर्वात महत्त्वाची होती. आठवडाभराच्या उपचारातच आई गेली. त्याच दिवशी शेजारच्या घरातील सुनंदा जाधवही करोनाने गेल्या. पुढे त्यांचे पतीही. जाधव यांची एकुलती एक मुलगी पोरकी झाली. माझ्या आईचे अंतिम संस्कार पार पाडून मीही रुग्णालयात दाखल व्हायचं ठरवलं. पण शीव रुग्णालयातली अवस्था पाहून मी कस्तुरबा रुग्णालयात गेलो. त्यांनी जागा नाही म्हणून मला ‘नायर’मध्ये पाठवलं. नायरमध्ये ‘आम्ही केवळ गंभीर रुग्णांनाच घेतो,’ असे उत्तर देऊन मला केईएम रुग्णालयात पाठवलं. तिथेही निभाव लागला नाही. शेवटी ओळख वापरून मुंबई सेंट्रलच्या जगजीवनराम रुग्णालयात सोय झाली. आठ-दहा दिवसांत माझी प्रकृती सुधारली. घरी आलो. माझी नोकरी गेल्याचं नंतर कळालं.’’- सनी सांगतो.

सनीप्रमाणेच नितीन अड्याळकरांनाही शुश्रूषा करताना करोनानं गाठलं. पण चाळिशीतले नितीन तरुण सनीसारखे बरे झाले नाहीत. नितीन यांचे वडील हरीश अड्याळकर हे नागपुरातील समाजवादी चळवळीचे खंदे कार्यकर्ते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस, कुमार सप्तर्षी, बाबा आढाव अशांच्या मुशीत अड्याळकर घडले. गांधी आणि लोहियांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या सामाजिक चळवळीसाठी त्यांनी वयाची ८२ वर्षे खर्ची घातली. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘अनलॉक’चा बोलबाला सुरू झाल्यावर ‘लोहिया अध्ययन केंद्रा’च्या एका कोपऱ्यात बसून हरीश अड्याळकर नव्या परिसंवादाच्या विषयाला कागदावर अंतिम रूप देताना नजरेस पडायचे. पण एका बेसावध वळणावर अड्याळकरांना करोनानं गाठलं. ‘माझी नका काळजी करू’ या स्वभावानुसार आधी जरा दुर्लक्षच झालं. परंतु करोना अखेर २ सप्टेंबर २०२० रोजी त्यांना ‘शांत’ करूनच थांबला. या अड्याळकरांचा मुलगा नितीन. अनेक राजकीय नेत्यांशी सख्य असतानाही मुलाच्या नोकरीसाठी त्यांना गळ घालावी असं कधी अड्याळकरांना वाटलं नाही. कारण ते त्यांच्या तत्त्वात बसत नव्हतं. परिणामी नितीन गांधीबागेत किरकोळ वेतनावर नोकरी करीत होता. करोना आजारात वडिलांची शुश्रूषा करत असताना तोही बाधित झाला. हरीश अड्याळकर शासकीय रुग्णालयात शेवटचे श्वास घेत असताना नितीन विलगीकरणात होता. वडिलांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. वडील गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीनचेही श्वास थांबले. अड्याळकरांची सून- म्हणजे नितीनची पत्नी मंदा, मुलगी रियंका आणि मुलगा रुजलसाठी हा आघात कल्पनेच्या पलीकडचा होता. एकाच दिवसाच्या अंतराने घरातील दोन कर्ते जीव गेले… करोनामुळे!  हरीश आणि नितीन अड्याळकर जिवंत असेपर्यंत घरातील उर्वरित तिघांनी घराबाहेरचा ‘व्यवहार’ कधीच केला नव्हता. हरीश अड्याळकर महिन्याचे निवृत्तीवेतन चर्चा-परिसंवाद आदी कार्यक्रमांसाठी खर्ची घालायचे. वयाच्या पंचाहत्तरीनिमित्त झालेल्या सत्कारात मिळालेले तब्बल अडीच लाख रुपये त्यांनी गुलाल-बुक्क्यासारखे समाजासाठी उधळून दिले. नितीनचा तर पगारच तोकडा. आता तोही नव्हता. मंदा, रियंका आणि रुजलच्या भाकरीचा प्रश्न होता त्यापेक्षा आणखी गहिरा झाला. आता जगायचं कसं, हा विक्राळ प्रश्न. ज्या समाजासाठी अड्याळकरांनी उभी हयात खर्ची घातली त्या समाजानं जुजबी चौकशीच्या पलीकडे फारसं काही केलं नाही. नाही म्हणायला एखाद् दोन मदतीचे हात समोर आले. नितीन जिथे काम करीत होते तिथल्या मालकांनी नितीनच्या पश्चातही दोन वर्षे वेतन देण्याची ग्वाही दिली. ते वेतन अद्याप तरी येतंय. पण वाढत्या खर्चापुढे मदतीचा हा ओघ म्हणजे ग्लासभर पाणीच. हे ओळखून आता मंदा स्वत: घरी शिवणकाम करताहेत. रियंकाचं हे पदवीचं दुसरं वर्ष… तरी ती नोकरी शोधतेय. दहावीतला रुजल मात्र अद्याप सावरलेला नाही. बाबा, आजोबा त्याला सारखे आठवताहेत. भावनांचा हा कढ दूर सारून आई-ताईला मदत करावी यासाठी त्याचीही धडपड सुरू आहे. तिघेही आज एकमेकांचे आधार झाले आहेत.

तिकडे औरंगाबादमध्ये अनेकींना आधार देणाऱ्या नूरजहाँपुढे आता निराळाच प्रश्न आहे. आता पुन्हा दुसरी लाट आलीय आणि गेल्या वर्षीच्या सूचना पुन्हा सरकारकडून दिल्या जात आहेत. पण आता करोनाला घाबरेनासे झालेत लोक सगळेच. त्यामुळे ‘‘काम करू तर कसं?’’ हा प्रश्न नूरजहाँ यांच्यापुढे, त्यांच्यासारख्या अनेक ‘आशाताईं’पुढे आजही आहेच.

परगावांमधले अर्धेअधिक विद्यार्थी आता पुण्यात परतलेत. त्यांना परीक्षेची प्रतीक्षा आहे. परीक्षा नाही म्हणून आंदोलनही झालं मध्यंतरी. पण ‘एमपीएससी स्टुडंट्स राइट्स’च्या महेश बढे यांना आजही वर्षभरापूर्वीची स्थिती आठवते. महेश यांनी ३० सहकाऱ्यांच्या मदतीनं स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. ‘‘टाळेबंदी लागू केल्यावर काही संस्था, गणपती मंडळांनी मदत, अन्नवाटप सुरू केलं होतं. पण ३१ मार्चला काहींचं वाटप बंद झालं. मग आम्हाला पेठांसह कोथरूड, वारजे, सेनापती बापट रस्ता, धनकवडी अशा भागांतून जेवणाचे हाल होतायत असे फोन यायला लागले. विद्यार्थी भयानक अवस्थेत राहत होते. काही विद्यार्थी पाच-सहा दिवस बिस्किटं, कच्ची मॅगी खाऊन राहत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भोजन देण्याचं ठरवलं. सुरुवातीला काही सामाजिक संस्थांनी आम्हाला खाद्यपदार्थांची पाकिटं द्यायला सुरुवात केली. त्याखेरीज कोणी निधी दिला, कुणी शिधा दिला. मग एका मित्राच्या हॉटेलमध्ये पोळी-भाजी आणि रात्री खिचडी अशा पद्धतीनं जेवण शिजवून, त्याची पाकिटं भरून वाटायला सुरुवात केली. १०० पाकिटांपासून सुरुवात होऊन रोज २४०० पाकिटांपर्यंत वाटप होत होतं. ७५ दिवस हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांचं मनोबल टिकवण्यासाठी समुपदेशन, मान्यवरांची ऑनलाइन व्याख्यानंही घेतली. त्याच दरम्यान राजस्थानच्या कोटा शहरातून विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था सरकारनं केल्याच्या बातम्या आल्या. मग आपल्याच विद्यार्थ्यांची अडवणूक का, म्हणून प्रशासनाकडे मागणी केली. पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांसाठी पोलीस आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं म्हणून बस मिळाल्या, काही विद्यार्थ्यांना ई-पास दिले गेले. एकंदर अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवलं…’’- महेश सांगतात.

वर्षभरात परिस्थिती पालटते खरी, पण काही स्थिरस्थावर होत नाही. पुण्यात परतलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव असाच आहे. ‘‘मी बरा झालो, पण कुटुंबाचा आधार असलेली माझी आई गेली. या गदारोळात माझीही नोकरी गेली. सगळं काही शून्यावर आलं…’’ असं सांगणारा सनी गद्रे आजही सावरण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याहून जास्त प्रयत्न करतोय ‘ते’ दिवस विसरण्याचा.

…त्या दिवसांची आठवणही नको असंच मनीषा, दत्ता किंवा महेश यांनाही वाटत असेल. पण ओरखडे आहेतच. ते बुजेपर्यंत वाट पाहावी लागेल.

      संकलन : अभिजीत ताम्हणे