तीगाते तेव्हा तिचं सारं शरीर गातं. ती म्हणते, ‘हिप्स् डोंट लाय..’ आणि सारं प्रेक्षागृह तरुण होतं. तिचे हात आलापी मांडतात. तिचे चपळ पाय ताना घेतात. बेली डान्सिंगचा हलका छाप उमटवीत तिच्या शरीराचे स्नायू न् स्नायू तालाचं आवर्तन दाखवीत असतात. अनवाणी नाचताना ती थकत नाही. नाचता नाचता गाते तेव्हाही सूर हलत नाही. अप्सरेची मस्तीभरली जादू ती अबीर-बुक्क्यासारखी श्रोत्यांवर उधळत जाते तेव्हा सारा आसमंत जणू स्वर्गीय होतो. या पृथ्वीतलावरच्या जाणिवांचं खुजं जग मग मागे राहतं. ‘शकिरा, शकिरा’ असा तिच्या नावाचा घोष श्रोते करीत राहतात; तेव्हा आठवत असेल का तिला तिचं कोलंबियन गाव? बारांकिएजा नावाचं? तिथे अनेक तऱ्हांचे सूर एकवटलेले होते. स्पॅनिश गायकी तिथे कॅरेबियन बेटावरच्या संगीताला भिडत होती. खेरीज त्या गावात नांदत होते अरबी सूर. अस्थिर, चंचल, थिरकणारे आणि मादक! शकिराला वडिलांकडून अरबी जगाचा वारसा होता. वडिलांकडून ती लेबनीज होती. आईकडून ती स्पॅनिश-इटालियन होती. दोन भिन्न संस्कृतींमधले सूर तिच्या रक्तात सुखेनैव नांदत होते. पण आजचं शकिराचं गाणं हे काही तेवढंच नाही, तितकंच नाही. तिचं आजचं गाणं हे इंग्रजी आहे, स्पॅनिश आहे, पोर्तुगीज वळणाचंही आहे. तिच्या गाण्यातले उडते अरबी सूर हे भारतीय सतारीसोबत पोहत असतात. बेली डान्सिंगची नशा जशी तिच्या पदन्यासात असते, तशीच कधी भारतीय वळणाची नृत्यमुद्रा, कधी अमेरिकन ढंगाची पॉपशैलीही. आफ्रिकन ढोलांवर ‘जंबोऽ’ असं म्हणत ती लांब ढांगा टाकत ‘वाका वाका’ गाण्यावर नाचते तेव्हा असं वाटतं, की साऱ्या जगातलं चांगल्या संगीताच्या अभिव्यक्तीचं संचित या देखण्या मुलीपाशी असणार. बी.बी.सी.चा फ्रेझर मॅकअल्पाइन तिच्याविषयी म्हणतो तसं, ‘‘It’s like a trip around the musical world… .’’ (शकिराचं गाणं म्हणजे जगाची संगीत-प्रदक्षिणाच!)
लॅटिन पॉपची लाट रिकी मार्टिन, जे. लो. प्रभृतींनी उंचावत नेली आणि मग ती आस्ते आस्ते ओसरली. कदाचित त्या लॅटिन पॉपमधलं ‘लॅटिनो’पण हरवलं. राहिलं ते कचकडय़ाचं पॉप. पण शकिरानं स्थलांतराचं हे गाणं पुन्हा एकहाती उंचावलं. ते अस्सल बनवलं. महत्त्वाचं म्हणजे तिचं गाणं केवळ ‘लॅटिन पॉप’ राहिलं नाही, ते वैश्विक बनलं. अर्थात तिच्या गाण्यातला मूळ ठेका हा बहुतांश वेळेला लॅटिन अमेरिकन संगीतालाच घट्ट धरून राहिला आहे हेही खरं; आणि ते खास लॅटिन अमेरिकेचं सळसळतं, बिनधास्त तारुण्याचं संवेदन! तेही होतंच की तिच्या शब्दांत :
‘‘Whenever wherever, we are meant to be together…
Lucky that my lips not mumble
They spell kisses like a fountain…’’
(‘‘कधीतरी, कुठेतरी आपण भेटणार होतोच..
नशीब माझे ओठ नाहीत मुळीच लाजरे
चुंबनांचा वर्षांव करतील- जसे उन्मुक्त झरे’’)
ऐकलं आहे का हे गाणं? नसलं तर लगेच यू-टय़ूबवर जा. त्या गाण्यात स्पॅनिश मादकता आहे, अँडीज पर्वताचं संगीत आहे आणि लेबनॉनचं वाळवंटही आहे! पण हा रस्ता काही सुकर नव्हता. शकिराआधीचे सारे लॅटिन पॉप गायक हे पहिल्यापासून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक होते. शकिराचा इंग्रजी अल्बम काढण्याचा घाट घातला जात होता, तेव्हा तिला इंग्रजी येत नव्हतं. तिनं मेहनतीनं ती भाषा अवगत केली. एवढंच नव्हे, तर अमेरिकेत ‘सेलेब्रिटी’ असतानाही तिनं ‘इसाबेल मेबारक’ ही तिची मधली नावं लावून युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून पाश्चात्त्य इतिहासाचा अभ्यासक्रम पुरा केला. लॅटिन पॉपच्या स्थलांतरित गाण्याची ‘शकिरा झालिसे कळस’ असं म्हणायला हरकत नाही.
गेले काही आठवडे मी या स्थलांतराच्या संगीतावर लेख लिहितो आहे आणि तुम्ही वाचक मला भरभरून प्रतिसाद देत आहात. एक वाचक विचारतो आहे, ‘‘पण ही स्पॅनिश गाणी ऐकायची कशी? तुम्हाला येते का स्पॅनिश?’’ मला ती सुंदर भाषा अवगत नाही. पण परभाषिक गाण्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. नव्हे, चांगल्या रसिकतेचं ते एक लक्षण आहे. सरळ ऐकत जावं परभाषिक गाणं. शब्दांचा अर्थ कळणार नसतोच; पण म्हणूनच सुरांकडे जास्त लक्ष जातं. त्या सुरांची सांस्कृतिक पाश्र्वभूमी उमगते. आणि खेरीज त्या भाषेच्या शब्दांचा जो नाद असतो, तोही किती देखणा असतो. स्पॅनिश भाषेतले सारे रफार कसे त्या गाण्यांमध्ये जिवंत होतात. दुसरी एक वाचक अपर्णा घारपुरे हे लेख वाचून फेसबुकवर मला म्हणते आहे तसं- ‘‘संगीत ही जगातली एकमेव भाषा आहे; ज्याला अनुवाद लागत नाही. खरं तर जे साध्या नेहमीच्या भाषेत आपण बोलू शकत नाही, ते संगीताच्या भाषेतून सहजपणे बोललं जातं. एमिलिओ एस्तेफानचं गाणं इंग्रजीत आलं नसतं तरी ते कधीतरी पोचलं असतंच.’’ आणि मग मी सजगपणे ऐकतो आहे मोनिका गजेंद्रगडकर काय म्हणत आहेत त्याकडे. समर्थ लेखिका, संपादिका आणि सतारिया असलेल्या मोनिका गजेंद्रगडकर म्हणताहेत, ‘‘स्थलांतराच्या अनुभवामुळे हे लॅटिन पॉप संगीत उत्कट बनलेलं असावं. नाही तरी संगीताचं असोसिएशन आपल्या एखाद्या घटनेशी, आठवणीशी, काळाशी असतेच. सुंदर पहाट असली की मला आमच्या घराशेजारी होणाऱ्या सवाई गंधर्वमध्ये पहाटे गाणारे भीमसेनजी आणि त्यांचं गाणंच स्मरतं. आम्ही काही वर्षांपूर्वी युरोपला गेलेलो. एक महिन्याचा दौरा असावा तो. तिथे एका भारतीय स्नेह्य़ांकडे जसराज आणि माणिक वर्मा यांच्या रेकॉर्ड्स त्यांनी लावल्या आणि त्या ऐकताना मला एकदम रडूच फुटलं. कदाचित मी होमसिक झाले असेन. खरं तर परतीचे वेध लागले होतेच. चार-सहा दिवसांत मी भारतात परतणार होते. जर माझं असं होऊ शकतं, तर कायमसाठी माणसं घरं-देश सोडून स्थलांतर करतात तेव्हा त्यांचं काय होत असेल? त्यांचं संगीत अर्थगर्भ असेलच.’’
जशी लॅटिन अस्मिता त्यांच्या गाण्यातून झळकून उठली, तसं भारतीय संगीत अमेरिकन मेनस्ट्रीम संगीतामध्ये प्रभाव पाडत आहे का? मी रविशंकरांसारख्या एकांडय़ा शिलेदाराविषयी बोलत नाहीये. इंग्रजी पॉप गाण्याला जसं लॅटिन अमेरिकन संगीतानं निराळं वळण लावलं, तसं आपल्या संगीतानं लावलं आहे का? एमिलिओनं त्याच्या बेटावरचं संचित इंग्रजीत रूपांतरित करून जगभर पोचवलं; आपण ‘गीतरामायण’ इंग्रजीमध्ये नेणार आहोत का? न्यायचं आहे का? परकियांना भारतीय संगीत रुचतं, हे निर्विवाद. आपण तिथवर पोचणार आहोत का? मला कर्ष काळेचा इलेक्ट्रिक तबला आठवतो आहे. पण ते सारं सविस्तर आणि नंतर.
स्थलांतराची गाणी आपण या लेखात मागे सोडणार आहोत आणि बंडखोर, आक्रमक हिप-हॉपकडे दोन आठवडय़ांनंतर वळणार आहोत. पण त्याआधी रिकादरे आखरेनोचं (Ricaldo Arjono) ‘मोखादो’ (Mojado) हे गाणं ऐका. लांबच लांब पसरलेली ती अमेरिका आणि मेक्सिकोमधली सरहद्द. नदीतून पोहून बेकायदा अमेरिकेत प्रवेशणारा तो तरुण. त्याचं गच्च भिजलेलं शरीर. आणि मग क्षणात पोलिसांच्या गोळ्यांनी त्या शरीराच्या झालेल्या चिंधडय़ा! त्या पिचलेल्या जगण्याला काही अर्थ नव्हताच. पण ते मरणही किती भकास, उजाड दिसतं आहे! आखरेनो म्हणतो, ‘‘Wet back… Wet from so much weeping. .’’ नदीच्या पाण्यामुळे नव्हे, तर अश्रूंनी भिजलेलं ते जगणं!
अशी ही स्थलांतराची गाणी मला फार आवडतात. त्यामध्ये माणसांच्या आदिम प्रेरणांना जागवेल असं काहीतरी आहे. आणि मग मला स्मरते सावरकरांची कविता. त्याचा संदर्भ वेगळा असला तरी इथेही ती कविता जिवंत होते. त्या बेटांवर राहणाऱ्या माणसांचं आणि समुद्राचं नातं मला दृग्गोचर होतं. स्पॅनिश भाषेतले ते सारे रफार माझ्या मानगुटीवर बसतात. आणि मग दिवसाचं रेकॉर्डिग मायामी, नाही तर न्यूयॉर्कच्या स्टुडिओत संपवून घरी परतलेली शकिरा, नाहीतर रिकी मार्टिन ‘सागरा प्राण तळमळला..’ हे गाणं लॅटिन कोंगाच्या ठेक्यावर अबोलपणे गुणगुणताना आणि मग व्याकूळ होताना मला इथूनही स्पष्ट दिसतात!                                                                        

Story img Loader