आमच्या अखिल अधोविश्वातील अधोनायक जे की डीगँगपती दा. इ. पारकर (सध्या राहणार व्हाइट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन, कराची) यांची भारतमुक्कामी येण्याची खूप खूप सदिच्छा होती. परंतु आमचे लाडके नेते व जाणते राजे मा. शरदश्चंद्रजी पवार साहेब यांनी त्यांस नकार दिला व ते कारणे सारेच फिस्कटले व पारकर यांस अखेरीस तेथेच निर्वासिताची फरफट सहन करीत राहावे लागले. हे वृत्त ऐकल्यापासून आमच्या मनी जी कालवाकालव सुरू झाली ती- थंड दूध म्हणू नका, इनो म्हणू नका की जिलोसिल, काय काय घेतले, पण अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही!
राहून राहून मनी एकच सवालिया निशान उभे राहत आहे, की मा. साहेब यांनी यासंबंधाने असा निर्णय घेण्याचा निकाल का बरे घेतला असेल? दाइभाईंना भारतमुक्कामी प्रसंगी फरफटत आणावे असे केवढे मोठे स्वप्न आमचे नेते मा. गोपीनाथ मुंडे यांनी पाहिले होते. सध्या ‘आम्ही चालवू पुढे हा वारसा’ असे म्हणत आमचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहजी त्याच स्वप्नाचा रीपिट टेलिकास्ट पाहत आहेत. (कधी कधी वाटते, आपण असे कित्येक नरकेसरींचे ड्रीमबॉय आहोत हे समजले ना, तर दाइभाईंना स्वत:विषयीच्या गैरसमजाने ढसाढसा रडूच कोसळेल. शंकाच नाही. कोणत्याही पुरुषाचे असेच होईल!)
पण मा. साहेबांनी दाइभाईंना व्हाया रामभाऊ जेठमलानीनी स्वच्छच सांगून टाकले, की बाबा रे, तुम्हारी अट्ट मान्य करने का निकाल हम नहीं ले सकते. झाले! सारे स्वप्नमहाल चूरचूर झाले. आता पुढच्या प्रचारसभांमध्ये पुन्हा हीच फरफटत परत आणण्याची टेप लावावी लागणार!!
खुद्द दाइभाईंनाही त्याचे कित्ती कित्ती वाईट वाटले माहिताय? मुंबैवर त्यांचा किती जीव! तेथे आपलीही एखादी एंटिलिया मंझिल आहे, तेथे छोटय़ा शकिलचा छोटा, अनीसचा धाकटा अशी भाचरे खेळत आहेत. बॅकग्राऊंडला ‘गोविंदा गोविंदा’ अशी सरकारधून वाजत आहे आणि त्या रम्य वातावरणात आपण डोळ्यांना काळा गॉगल, हातात चिरूट आणि निम्मा चेहरा अंधारात असे आरामात बसलो आहोत, हे स्वप्न तर दाइभाईंनी कित्ती वेळा पाहिले असेल. मुंबई आहेच त्यांची दिलरूबा! म्हणून तर त्यांनी तेथे बॉम्बस्फोट केले. ‘तू अगर मेरी ना हो सकी, तो किसी और की भी नहीं हो सकती,’ असे म्हणत एखादा प्रेमभंगी प्रेयसीच्या मुखचंद्रम्यावर आम्लवर्षांव करतो त्यातलाच तो प्रकार!!
तर मा. साहेबांनी तोही स्वप्नभंग केला. त्यांच्या खुलाशावरून आमच्यासारख्या तैलबुद्धीच्या पत्रकारूंना एक मात्र समजले, की दाइभाईंनी परत येण्यासाठी काहीतरी अट्टल अट्टी घातल्या होत्या. त्या बिचाऱ्यास एवढे कुठले कळायला, की साहेबांना कोणी कधी अटी घालायच्या नसतात. घातल्या ना तर च्यानेलांपुढे येऊन मफलरीने डोळे पुसत बसावे लागते!
पण तेव्हापासून आमच्या मनी एकच उत्सुकता दाटून राहिली आहे. काय असतील बरे त्या अटी? राज्यसभेची उमेदवारी तर नसेल ना मागितली दाइभाईंनी? आता त्याबद्दल एकतर खुद्द साहेब किंवा दाइभाईच सांगू शकतात. पण साहेब मराठी पत्रकारूंकडे निवडणुकीशिवाय पाहतही नाहीत. तेव्हा तो माहितीचा महामार्ग बंद. उरले दाइभाईच. त्यासाठी इंटरनॅशनल कोल रेट द्यावा लागणार होता. परंतु नाइलाज होता. आमुच्या कचेरीतील ज्येष्ठ गुन्हे वार्ताहरीच्या मध्यस्थीने दूरध्वनी लावला. (तुम्हांस काय वाटले, आमची भाईशी थेट ओळख आहे? काय तरीच तुमचं! आम्ही काय त्यातले वाटलो तुम्हाला?)
दुसऱ्याच रिंगला कोणीतरी फोन उचलला.
‘‘हॅलो. सलाम आलेकुम! ये व्हाइट हाऊस, कराचीकाच नंबर है ना?’’
पलीकडचा आवाज भलताच सभ्य होता, ‘‘वालेकुम सलाम! कौन साब बोल रहे है?’’
‘‘हां ये देखो, मेरा नाम अप्पा है. वो भाईसाहेबसे बोलनेका था.’’
‘‘बोला. भाईच बोलतोय.’’
फोनवर खुद्द भाई? फारच फरफट सुरू आहे वाटतं!
‘‘ते पवार साहेब म्हणाले..’’
‘‘ते शरतीबद्दल ना?’’
भाई काय टॅलेंटेड आहे!
‘‘हां भाई. जेलमध्ये जाणार नाही. घरीच राहणार अशी अट तुम्ही घातली होती म्हणून त्यांनी..’’
‘‘खोटा. एकदम खोटा. म्हंजे आम्ही तसा बोल्लो. पन ती काय शरत नव्हती. ती फॅक्ट होती! आमची शरत वेगळीच होती. ती त्याला पसंत नाय परली.’’
अहाहा! याला म्हणतात भाई! एवढा पैसा, इज्जत, शोहरत कमावली, पण आपल्या भाषेला नाही विसरले भाई! खरे तर केवळ एवढय़ासाठी ‘कोमसाप’तर्फे भाईंचा सत्कार केला पाहिजे रत्नांग्रीत!
‘‘हां भाई. कोणती शरत.. आपलं ते.. अट होती भाई?’’
‘‘आम्ही एवरंच बोल्लो होतो, का आपुन इंडियात यायला एकदम कबुल हाय. पन आल्यावर आपल्याला कोनी फरफटत न्यायचं नाय. साला आपल्याला एक वेल टायरमधी घाला. बरफवर निजवा. पन ते फरफटत चालनार नाय! ब्बास! आपन एवरीच कंडिशन घातली.’’
बरोबरच होते की मग साहेबांचे. ही एवढी अशक्य अट कोण मंजूर करणार? दाइभाई पारकरला फरफटत नाही आणले, तर देशाची इज्जत ती काय राहणार?
अप्पा बळवंत – balwantappa@gmail.com
फरफट!
आमच्या अखिल अधोविश्वातील अधोनायक जे की डीगँगपती दा. इ. पारकर (सध्या राहणार व्हाइट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन, कराची) यांची भारतमुक्कामी येण्याची खूप खूप सदिच्छा होती. परंतु आमचे...
First published on: 12-07-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar