डॉ. जब्बार पटेल

टायमिंग सेन्स ही सोपी गोष्ट नाही. हे कसब दादा कोंडके यांच्याकडे होतं. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषींकडे होतं. परंतु श्रीकांतकडे हा सेन्स वेगळ्या पद्धतीचा होता. त्यात संगीताची जाण हा भाग होता. त्याला लयीचे ज्ञान होते. ज्ञान असणे वेगळे आणि भान असणे वेगळे. ते भान श्रीकांतकडे होते. त्यामुळे त्याच्या बोलण्यात, वागण्यामध्ये एक प्रकारची नजाकत होती.

Image of Baba Abhay Singh or a related graphic
महाकुंभमेळ्यात अस्खलित इंग्रजी बोलणारे IIT Baba नेमके कोण आहेत? आयआयटी मुंबईत शिकलेले अभय सिंग आध्यात्माकडे कसे वळाले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”

माझ्या महाविद्यालयीन जीवनापासूनचा श्रीकांत मोघे मला आठवतो आहे. मला १२-१५ वर्षांनी तो सीनियर. मी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असताना आर्ट सर्कलमध्ये पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये मी पहिल्यांदा श्रीकांतला बघितले. त्यात दोन-तीन वेगवेगळ्या भूमिका श्रीकांत करायचा. स्वत: भाईही त्यात होतेच. ती एक धमाल होती. ‘रेवू’ नावाचा प्रकार पहिल्यांदाच पाहत होतो. म्हणजे सलग एक गोष्ट नाही; तुकडय़ा-तुकडय़ांमधून एक कथानक उभे राहते. खेडय़ात गेल्यावर मध्यमवर्गीय विचारांची जी कुचंबणा होते त्याचे सुंदर चित्रण भाईंनी यात उभे केले आहे. खेडय़ातल्या पोराला जी आधुनिकता दिसते- तीही पुलंच्या नजरेला जाणवलेली! खेडय़ांनी जाणलेले शहरीपण असा त्यात विषय आहे. हिंदी चित्रपटांचा, लोकनाटय़ांचा परिणाम त्यातून दिसतो. तो संदर्भ शहरातील लोकनाटय़ाच्या परिप्रेक्ष्यातून येतो. यात गावातील तरुण पोराच्या भूमिकेत श्रीकांतने जी देहबोली वापरली आहे ती अफलातून आहे. त्याची ती भूमिका कमालीची मनात ठसली आहे. त्याचे भाषेवर प्रभुत्व होते. मुळातला किलरेस्करवाडीचा असल्याने ग्रामीण बाज श्रीकांतला ओढूनताणून आणावा लागला नाही. अनेकांना ग्रामीण बाजाचा आवेश आणावा लागतो. शब्दांचे वजन आणि त्यांची सुंदर मांडणी यातून भाषेचा लहेजा श्रीकांतने व्यवस्थित सांभाळला होता. नंतरच्या भागात वेश पालटून तो मास्तरची भूमिका करायचा. ‘वाऱ्यावरची वरात’मुळे श्रीकांत पहिल्यांदा लक्षात राहिला तो त्याच्या देहबोलीमुळे!

गोविंद घाणेकर यांच्या ‘प्रपंच’ चित्रपटात श्रीकांत होता. त्यामध्ये शाहीर अमर शेख यांनी कुंभाराची भूमिका केली होती. सुलोचनाबाईंचीही अप्रतिम भूमिका होती. हा एक कोवळा आणि छान तरुण या चित्रपटातून पुढे आला. त्याने व्यायामाने शरीरयष्टी कमावलेली होती. फेटा बांधल्यानंतर त्याच्या कुरळ्या केसांची एक बट फेटय़ाच्या बाहेर कपाळावर यायची. ज्या पद्धतीने तो बैलगाडीमध्ये बसून जायचा ते सहज वाटायचं. सूर्यकांत-चंद्रकांत यांच्या बरोबरीने चित्रपट गाजवणारा श्रीकांत हा ग्रामीण भागातून आलेला तिसरा नट मराठीला मिळालाय असे तेव्हा मला वाटले. त्याने चित्रपटांत मोजक्याच भूमिका केल्या. राम गबाले यांचा ‘जिव्हाळा’ चित्रपट त्याने केला. त्यातले बाबुजींचे संगीत गाजले. ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ हे गीत तर अतिशय गाजले. भाईंच्या तालमीत श्रीकांत तयार झाला. घरी कीर्तनाची परंपरा असल्याने पारंपरिक संगीताचा परिणाम त्याच्यावर होताच. त्याचा गळाही चांगला होता. अगदी वरच्या पट्टीत तो गायचा. भाईंच्या तालमीत तयार होणं याचा अर्थ ‘टायमिंगचा सेन्स’ असणं. नटाकडे हा दुर्मीळ असतो. टायमिंग सेन्स ही सोपी गोष्ट नाही. हे कसब दादा कोंडके यांच्याकडे होतं. गद्य नटांमध्ये डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी यांच्याकडे टायमिंग सेन्स होता. परंतु श्रीकांतकडे हा सेन्स वेगळ्या पद्धतीचा होता. त्यामध्ये संगीताची जाण हा भाग होता. त्याला लयीचे ज्ञान होते. ज्ञान असणे वेगळे आणि भान असणे वेगळे. गायकांकडे लयीचे ज्ञान असते, पण सादरीकरणामध्ये ज्ञानाबरोबरच भान असणे गरजेचे असते. ते भान श्रीकांतकडे होते. त्यामुळे त्याच्या बोलण्यात, वागण्यामध्ये एक प्रकारची नजाकत होती. सुरुवातीची काही वर्षे तो दिल्लीत होता. दिल्लीमध्ये हिंदी आणि उर्दूभाषकांबरोबर त्याचा वावर असावा. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याकडे उर्दूचा लहेजा होता. त्यांचे उच्चार तसे होते. मला स्वच्छ उच्चारांच्या बाबतीत वसंतरावांबरोबरच श्रीकांत आठवतो. त्याच्या भाषेमध्ये ‘नजाकती’चा भाग होता. कमी पिचच्या बोलण्यामध्ये ती नजाकत वेगळ्या पद्धतीने येते. जेव्हा तुम्ही नाटय़मय होता तेव्हा लयीचे भान असेल तर उच्चारण स्वच्छ होते. मग ते संवाद वसंत कानेटकरांचे असोत, पु. ल. देशपांडे यांचे असोत की बाळ कोल्हटकर यांचे!

ताल आणि लयीचे भान असल्यानेच श्रीकांत ‘लेकुरें उदंड जालीं’मध्ये उत्तम भूमिका करू शकला. ‘माय फेअर लेडी’वरून कानेटकर यांना मराठीमध्ये ऑपेरा आणावा असे वाटले. हे नाटक मुळातच ‘लिरिकल’.. काव्यमय होते. कल्पना देशपांडे आणि श्रीकांत यांच्या मुख्य भूमिका होत्या. विषय नाजूक होता. घरात मूल नसलेल्या दाम्पत्याची कथा आणि व्यथा. या गद्य-पद्यमय नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत होते तेही पाश्चात्त्य वळणाचे. पाश्चात्त्य वाद्यांचा वापर करून श्रीकांत आणि कल्पनाताईंना वेगळ्या पद्धतीची गाणी दिली होती. क्षणात गद्य आणि क्षणात पद्य म्हणताना लयीचे आणि तालाचे जे भान असावे लागते ते श्रीकांतने अनन्यसाधारण रीतीने सांभाळले. ‘लेकुरें’मधील श्रीकांतची भूमिका ही मराठी रंगभूमीवरील ‘माइलस्टोन’ भूमिका आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला २५ वर्षे झाली तेव्हा वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र ज्यांनी मोठा केला त्यांचे ‘अर्कायव्हल’ करून देण्याचे काम मला सांगितले होते. बाबा आमटे, लता मंगेशकर, सुनील गावसकर, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, किशोरीताई आमोणकर हे यात आहेत. नाटकाच्या प्रवासामध्ये ‘सौभद्र’, ‘तो मी नव्हेच’ आणि ‘नटसम्राट’ आहे. यात मी मुद्दाम ‘लेकुरें उदंड जालीं’चा समावेश केला होता. त्यावेळी हे नाटक बंद पडले होते. माझ्या प्रेमाखातर श्रीकांतने पुन्हा तो प्रवेश केला. तो ३५ एमएमवर आजही उपलब्ध आहे. नाटक आणि अभिनय क्षेत्रात ज्यांना काही करायचे आहे, त्यांनी श्रीकांतचा तो ‘परफॉर्मन्स’ जरूर पाहावा. नाटय़मयतेत खोटा आनंद दाखवता दाखवता मनातील खंत श्रीकांतने त्यात ज्या पद्धतीने व्यक्त केली आहे, त्याला तोड नाही.

बाळ कोल्हटकर यांच्या ‘सीमेवरून परत जा’ नाटकामध्ये त्याने चक्क अ‍ॅलेक्झांडर सिंकदरची भूमिका केली होती. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर सोहराब मोदी यांनी केलेला ‘सिंकदर’ सिनेमा असावा असे मला वाटते. त्यात पृथ्वीराज कपूर यांनी सिंकदरची भूमिका केली होती. वनमालाताई त्यात होत्या. पृथ्वीराज कपूर त्यावेळी जेमतेम २५-३० वर्षांचे असतील. त्यांचे कमावलेले शरीर, ग्रीक पोशाख. त्या पेहेरावात त्यांच्या मांडय़ा उघडय़ा असायच्या. ढब म्हणून काही वाक्यांवर मांडीवर हात थोपटण्याची पद्धत त्यांनी अंगीकारली होती. ते श्रीकांतला प्रचंड आवडले. मराठी रंगभूमीवर काम करताना त्या ऐतिहासिक वेशभूषेमध्ये श्रीकांत जे गद्य संवाद बोलला आहे ते पाहता त्याने ‘लार्जर दॅन लाइफ’ अशीच भूमिका साकारली होती असे मला वाटते.

श्रीकांतने तशी कामं कमीच केलीत. तो वास्तुविशारद आणि इंटिरिअर डेकोरेटर होता. तो पूर्णपणे व्यावसायिक रंगभूमीवर अवलंबून नव्हता. त्याला जगण्याचा आधार होता. त्यामुळे तो ‘सिलेक्टिव्ह’ भूमिका करत राहिला. सुरेश खरे यांचे ‘संकेत मीलनाचा’ हे हळवं नाटक श्रीकांतने केलं. तो आणि दया डोंगरे. त्यात काही ‘ट्रॅजिक मोमेंट्स’ आहेत. या दोघांनी रम्य आणि चटका लावून जाणारे हे प्रसंग प्रभावीपणे सादर केले. असेच एक नाटक म्हणजे पुलंचे ‘तुझे आहे तुजपाशी’! यात श्रीकांत ‘डॉ. सतीश’ ही व्यक्तिरेखा साकारायचा. ‘केळीचे सुकले बाग, असूनियां पाणी, कोमेजलि कवळी पानं, असुनि निगराणी’ ही कवी अनिल यांची कविता या नाटकात होती. सुरुवातीला ही भूमिका पुलं स्वत: करायचे. नंतर या नाटकाच्या पुनरुज्जीवनामध्ये त्याने ‘काकाजी’ची भूमिका साकारली. हे विशेष होतं त्याचं. ती भूमिका साकारताना त्याला उर्दूवरचे प्रभुत्व उपयोगी पडले. काकाजीच्या भूमिकेमध्ये तत्पूर्वी दाजी भाटवडेकर यांनी रंग भरले होते. ‘मजा हैं यार, केलं पाहिजे बेटा..’ हा इंदुरी थाट त्यांनी मस्तपणे साकारला होता. श्रीकांतने आणखी वेगळ्या पद्धतीने तो मांडला. त्याने काकाजीची भूमिका उत्तम पेलली. त्यांच्या घरात होणाऱ्या मैफिलीचे वर्णन करताना काकासाहेब शिकारीचे वर्णन करतात.. हे स्वगत तेवढय़ाच ताकदीने श्रीकांतने पेलल्याचे मला आठवते.

नंतरच्या टप्प्यावर सई परांजपे यांचे ‘बिकट वाट वहिवाट’ हे नाटक त्याने केले. ‘फिडलर ऑन द रूफ’ या नाटकाचा अनुवाद असलेले हे नाटक म्युझिकल होते. त्यात त्याची मुख्य भूमिका होती. खूप नाटय़मय बारकावे आणि वेगवेगळ्या छटा त्याने यात साकारल्या. वास्तववादी संवादामध्येसुद्धा एक पॉज असतो. स्तब्धता असते. ही स्तब्धता भरण्याचे काम नटाने देहबोलीने आणि चेहऱ्याने करायचे असते. इतर पात्रं असताना पॉज भरण्याचे काम ज्याला लय आणि तालाचे भान आहे तो उत्तमपणे करू शकतो. या गुणांमुळे तो ‘लव्हेबल’ होता.

मी ‘सिंहासन’ करत होतो त्यावेळी त्यात श्रीकांतला शोभेल अशी एक भूमिका होती. मुख्यमंत्र्यांचा तो त्यात मेहुणा आहे. भेटायला आल्यावर त्याला दिसते की मुख्यमंत्री खूप ताणात आहेत. ‘या पात्राबद्दल थोडी काळजी घे. थोडंसं ‘मॉडेल’ केलं आहे,’ असं विजय तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं. विनायकराव पाटील यांना डोळ्यासमोर ठेवून ते पात्र लिहिले गेले होते. राजकारणात अशी थोडी माणसं असतात, की ज्यांनी मर्ढेकर वाचलेला असतो, त्याच श्वासात त्यांनी विंदा करंदीकरही वाचलेले असतात. त्यांना महानोर माहीत असतात. अमीर खुस्रोवर ते प्रेम करत असतात. त्यांना मेहंदी हसन आवडत असतो. आणि मुख्य म्हणजे बेगम अख्तरही आवडत असतात. राजकारणात असले तरी ते साहित्य आणि कलेत रमणारे असतात. या अर्थाने हे पात्र ‘मॉडेल’ केलं होतं. ‘हे पात्र तू श्रीकांतला करायला सांग,’ असं तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं. त्यातील एक प्रवेश असा आहे : श्रीकांत मुख्यमंत्री असलेल्या अरुण सरनाईक यांना भेटायला येतो. ‘काय दाजी, काय चाललंय काय राजकारणात? बेगम अख्तरची गज़्‍ाल ऐकवतो. ऐका. सगळा तुमचा ताण निघून जाईल..’ असे तो त्यांना म्हणतो. श्रीकांतचा प्रसन्नपणा आणि पुलंकडून आलेला मिश्कीलपणा त्याला या भूमिकेत उपयोगी पडला. विनोदाचा इतका सुंदर स्तर त्याला कळायचा. विनोदात राजकीय, सामाजिक भाष्य असतं. बोलता बोलता जगण्यातील छटा असतात. दुसऱ्याला न लागेल असा आपल्याच वैगुण्यावर प्रहार करायचा असतो. अशी विनोदबुद्धी श्रीकांमध्ये होती. ती बोलण्यातून यायची त्याच्या. त्याने एखादे पुस्तक वाचले असेल किंवा नाटक पाहिले असेल तर बोलताना त्यातली उदाहरणं द्यायचा. ‘मजा है यार!’ असे म्हणत काकाजीचे तत्त्वज्ञान श्रीकांत जगला. आयुष्य आनंददायी, सकारात्मक आणि त्या अर्थाने ‘रोमँटिक’ आहे.. अशी वागणारी माणसं कमी असतात. डॉ. श्रीराम लागू कधी गायले नसतील, पण त्यांना कुमार गंधर्व कळतात, हे त्यांची ‘नटसम्राट’मधली स्वगतं ऐकल्यावर समजते. हे संवाद आहेत की गाणं, असा मला प्रश्न पडे. त्या स्वगतांत आवाजाचे भिन्न प्रकार असायचे. स्वरयंत्रावर नियंत्रण ठेवून डॉ. लागू ते पेश करायचे. तसंच श्रीकांतचंही होतं. त्याने भूमिका कमी केल्या, पण ज्या केल्या त्यांत त्याने आपला ठसा उमटवला.

‘उंबरठा’मध्ये श्रीकांत नायकाचा भाऊ आहे. त्याच्या नजरेतून आपल्या भावाच्या बायकोची व्यथा दिसते. तिला बाहेर जाऊन काम करायचे आहे. स्मितासारखी (स्मिता पाटील) कसलेली नटी त्यात आहे. त्याने आणि त्याच्या (चित्रपटातील) बायकोने डोळ्यांतून व्यक्त व्हायचे होते. श्रीकांत आणि त्याच्या बायकोला मूल नाही. स्मिताची मुलगी ते सांभाळणार आहेत. श्रीकांतच्या या भूमिकेला वेगवेगळे कंगोरे आहेत. ‘फार मोठी भूमिका नाही श्रीकांत, पण तुझे अस्तित्व असणे खूप महत्त्वाचे आहे,’ असे मी त्याला सांगितले. ‘जब्बार, तू करतो आहेस ना! मला विषयच अतिशय आवडला आहे. यात मी असणे महत्त्वाचे आहे,’ असे श्रीकांत तेव्हा म्हणाला होता. आईची सिन्सिरिअ‍ॅटी त्याला समजते, पण आपल्या सुनेला ती काम करायला बाहेर का जाऊ देत नाही, ही ट्रॅजिडी घरातील बाकीच्या पात्रांनी बघायची आहे. हे बघणारे पात्र त्याने साकारले होते.

मी अभिनय करत असताना मला उत्स्फूर्तपणे दाद देणारे दोनच कलाकार होते. त्यापैकी एक श्रीकांत आणि दुसरा म्हणजे काशीनाथ (काशिनाथ घाणेकर). माझ्या संवादाला ‘वा, जब्बार!’ असा प्रेक्षागृहातून काशीनाथचा आवाज यायचा. खुल्या मनानं दाद देणं ही त्यांची वृत्ती होती. प्रत्येकामध्ये एक काकाजी दडलेला असतो. जगण्याचे सकारात्मक तत्त्वज्ञान श्रीकांत जगला. संगीत गायलाच पाहिजे असे नाही, पण संगीताची जाण असेल तर गद्य सुंदर होतं.. जगणं सुंदर होतं.. आणि अभिनयही! असे फार कमी नट दिसतात. त्यातला एक श्रीकांत होता. कुणाचं कौतुक करताना बारीक बोचकारे घेणारी टीकाही असायची; पण ती न झोंबणारी. ‘घाशीराम कोतवाल’ पाहिल्यानंतर त्याने उत्स्फूर्त दाद दिली होती.

रूप, रंग, आकारातून सजावट करणं ज्याला कळतं त्याचं जगणं सुंदरच होणार. असा रसिक मित्र लाभणं हे आमच्या पिढीचं भाग्य होतं.

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

Story img Loader