‘आपलं’ आणि ‘परकं’ याच्या व्याख्या तशा जगभर सारख्याच असतात. आपला ‘बाळ्या’ असतो, परकं ‘करट’ असतं. संगीतही तसंच वाटतं लोकांना. ‘आपलं’ संगीत नुसतंच चांगलं नसतं, तर ‘जास्त चांगलं’ असतं. मालिनीबाईंचा मालकंस आणि मोझार्तची मायनर एफ् सिंफनी यांत पहिली गोष्ट (दोन्ही न ऐकताही) जास्त चांगली आहे असं अनेकजण म्हणतात. त्यांनी आवड अस्मितेशी जोडलेली असते. आणि मग तसं झालं की केवळ हट्ट उरतो. पण आपण भारतीय या प्रांतात अगदीच ठेंगू वाटू इतकं पाश्चात्त्य जग ‘आपलं’-‘परकं’ करणारं आहे. निदान आत्ता-आत्तापर्यंत तरी होतं. ‘वर्ल्ड म्युझिक’च्या निमित्तामुळे जगामधल्या अनेक संगीत-संस्कृतींमधले सूर पाश्चात्त्यांच्या कानावर पडत आहेत आणि मग एकाएकी त्यांना जाणवतं आहे : ‘हेही चांगलं आहे की’! विश्वसंगीतामध्ये हे ‘एक्झॉटिक’ सूर आल्यामुळे पाश्चात्त्य रसिकांना एकाच वेळी ‘परका’ आनंद मिळतो आणि त्याचवेळी ‘आपलं’ संगीतच कसं जास्त सधन आहे असं सांगायचा मोहही होत राहतो.
कार्ल रॅनकोनेमनं विश्वसंगीताची व्याख्या करताना ते काय आहे, हे सांगण्यापेक्षा ते काय नाही, हे सांगितलेलं आहे. ‘‘विश्वसंगीत हे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत नक्की नाही. ते पाश्चात्त्य पॉप्युलर किंवा लोकसंगीतही शंभर टक्के नाही. ते कदाचित लोकसंगीत, ‘आर्ट’-संगीत किंवा जनसंगीतही असू शकतं. पण त्यामध्ये ‘एथनिक’ किंवा ‘परके’ असे घटक असायलाच हवेत.’’ आणि मग हा भोंगळपणा संपवून त्यानं एकदम लिहूनच टाकलं आहे- ‘It is simply not our music; it is their music.’ ‘अवर’ आणि ‘देअर’ या शब्दांची अधोरेखिते ही त्याचीच आहेत; माझी नव्हेत. त्या एका वाक्यामधूनही पाश्चात्त्य जगाची विश्वसंगीताकडे बघायची नजर कळून येते. इंग्रजीमधे एम. ए. करताना आमच्यासमोर सारखा ‘अदरनेस’ (otherness) हा शब्द समीक्षेत यायचा; तोच मला या क्षणी संगीताच्या संदर्भात स्मरतो आहे.
पण संगीत हे अशा द्वंद्वांना डरत नाही. संगीताची दूरवर पोहोचण्याची, रुजण्याची शक्ती ही काळाच्या ओघात पुन:पुन्हा दिसून आलेली आहे. जसा पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव गेले काही दशके जगभर पडला; तसाच पौर्वात्य, आफ्रिकन, बेटांवरच्या संगीताचा प्रभाव आज पश्चिमेवर पडताना दिसतो आहे. अशा नाना सुरांचं मिश्रण एकवटणारं संगीत म्हणजे विश्वसंगीत. त्याला मान्यता देऊन आपण जणू उपकृत केलेलं आहे असा आवेशही पुष्कळ संगीत समीक्षकांचा अमेरिकेत व युरोपात आढळतो. ‘विश्वसंगीत’ या लेबलामध्ये जगातल्या संगीताला कोंडून पाश्चात्त्य संगीत पुढे सरसावत असल्याची टीकाही अधेमधे होत असते. एकदा का ‘वर्ल्ड म्युझिक’ ही एक वेगळी पोस्टाची पेटी तयार केली, की त्यामध्ये बरी-वाईट सारीच कला-पत्रं गोळा होत राहतात आणि रॉक, पॉप, जॅझच्या पेटय़ांची जागा उगाच अडत नाही. आणि म्हणूनच ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या संपादकीयात डेव्हीड बायर्ने यानं जेव्हा ‘आय हेट वर्ल्ड म्युझिक’ या शीर्षकाचा लेख लिहिला तेव्हा एकच खळबळ माजली. त्या लेखामध्ये त्या त्याच्या अजोड औपहासिक शैलीत विश्वसंगीत या मोटीत जगातलं सगळं उत्तम संगीत कोंबण्याच्या वृत्तीचा निषेध केलेला आहे. ”World music is something exotic and therefore cute, weird but Safe, because exotica is beautiful but irrelevent… It ghettoizes most of the world’s music. A bold and audacious move, white Man!”
ती शेवटची ओळ वाचताना तर मी चिमटा काढून अमेरिकन लेखकाचंच हे वाक्य आहे का, हे तपासलं. ‘एक्झॉटिक’ म्हणून विश्वसंगीताचं कितीही कौतुक झालं तरी ते irrelevent- अप्रस्तुत असतं, हे डेव्हीड महाशयांचं म्हणणं योग्यच आहे. खेरीज युरोपात महायुद्धाआधी जशी ज्यू मंडळी ‘घेटो’मध्ये- वेगळ्या वसाहतींमध्ये निवास करायची; तसं या ‘विश्वसंगीत’ संज्ञेनं केल्याचं त्यांचं प्रतिपादन विचार करायला लावणारं आहे.
पण जगभरचे कलाकार या सैद्धान्तिक समीक्षेकडे बघतही नाहीत. आणि आपल्या ऊर्मीनिशी गाणं विस्तारत राहतात. हा बघा- कर्ष काळे. हिरवा गॉगल डोळ्यांवर अडकवून तो इलेक्ट्रिक तबला वाजवतो आहे. त्याने परिधान केलेला वेश भारतीय असला, तरी त्यानं फसू नका. अमेरिकनच आहे तो. त्याची देहबोलीही ते स्पष्ट करते. ज्यावेळी ‘उत्कर्ष काळे’ नावामधून आद्याक्षर उडालं आणि ‘कर्ष’ असं नामाभिधान झालं तेव्हाच तिथे असलेलं भारतीयपण बदललं. ‘ते नाहीसं झालं, उणावलं’ असं म्हणत नाहीये मी- ‘ते बदललं.’ आणि मग तसंच भारतीय संगीतही बदलवलं कर्षनं. तबला हा ‘इलेक्ट्रिक’ झाला. कधी सुलतान खान यांच्या सारंगीसह कर्षची बोटं डी. जे. टर्नटेबलवर स्क्रॅचिंग करू लागली. (काय अफलातून मिश्रण!) ‘बिलबोर्ड’ मासिकानं कर्षला ‘Visionary composer and producer’ म्हणून गौरवलं ते उगा नव्हे. ‘रोलिंग स्टोन’सारख्या संगीताला वाहिलेल्या मासिकानं तर त्याला ‘हाय प्रिस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिका’- (‘इलेक्ट्रॉनिक संगीताचा धर्मगुरू’) ही पदवी बहाल केली. बाकी ही पदवी- दाढी वाढवून कलंदर थाटात तबला आणि डी. जे. टर्नटेबल हाताळणाऱ्या शिडशिडीत बांध्याच्या कर्षला शोभून दिसते खरी! त्याचं संगीत केवळ भारतीय-अमेरिकन संगीतमिश्रणाचं नाही; ते फार सजगपणे नव्या आणि जुन्या संगीताला जोडणारंही आहे. आणि जेव्हा अनुष्का शंकरसारख्या प्रतिभावान सतारीयासोबत कर्षचे इलेक्ट्रॉनिक ताल घुमू लागले तेव्हा जगभर खळबळ उडाली. ‘ट्रेसेस ऑफ यू’मध्ये तर तीन स्थलांतरित, अध्र्यामुध्र्या भारतीयांचे सूर एकवटले.. कर्ष, अनुष्का शंकर आणि नोराह जोन्स. त्या दोघी बहिणीच; पण सावत्र. अनुष्काला वडिलांचा सहवासच नव्हे, तर शिष्यपदही प्राप्त झालेलं. नोराहकडे तिच्या अमेरिकन आईचा चर्च-संगीताचा वारसा चालत आलेला. पण दिसतात दोघी सारख्याच.. थेट पं. रविशंकरांसारख्याच. तितक्याच देखण्या, मनस्वी, हट्टी आणि असाधारण प्रतिभेच्या धनी. ‘ट्रेसेस ऑफ यू’मध्ये नोराह जे गाते ते अमेरिकन जॅझला जवळचं गाणं आहे. मागे अनुष्काची सतार काय तयारीने, चापल्याने फिरते! कुठेही एकमेकांशी स्पर्धा नाही, चढाओढ नाही. ती दोन निरनिराळी संगीत-जगं जणू तात्पुरती भेद विसरून एकवटली आहेत. ‘ब्रीदिंग अंडर वॉटर’ या अल्बममध्ये ‘स्टींग’ या नावाचा प्रख्यात रॉकगायक सतारीच्या सुरांसोबत गातो. एका टप्प्याला तो रॉक गायकीचं वळण सोडून लीलया भारतीय गायनशैलीमध्ये गाऊ लागतो. किती सहज स्थलांतरित होतात या कलाकारांचे सूर! आणि ते काव्यही केवढं वैश्विक आहे :
”I try and listen to music when ocean breathes
wish that I could build a bridge across the sea…”
(‘समुद्राच्या श्वासाचं मी ऐकू पाहे गाणं
ओलांडेल हा सागर असा जमेल सेतू बांधणं?’)
अशी तरल कविता रचनांना पॉपपेक्षा उंचावर नेते. आणि मग आपल्याला ग्वाही पटते, की एक नवं, सुंदर मिश्रण जन्माला येतं आहे. वर्षभर आपण पाश्चात्त्य संगीताचे नाना बाज पाहतो आहोत. आता हे विश्वसंगीत पुढे येऊ बघतं आहे. आणि आपली ही सदर-भेट अजून एका लेखानंतर समाप्त होणार आहे. तो शेवटचा लेख दोन आठवडय़ांनंतर येईल. तो तर वाचाच; पण आज मला एवढंच सांगू द्या : संगीतामध्ये, साहित्यामध्ये जे विशुद्ध असतं, सोनं असतं त्यात आपलं-परकं हा भेद उरत नाही. ते थेट हृदयापर्यंत पोचतं आणि जगण्याला ताकद देतं. कवी केशवसुतांनी शंभरेक वर्षांपूर्वीच ‘दिडदा दिडदा’ वाजणारी सतार मराठी साहित्यविश्वात आणली आणि बा. भ. बोरकरांनी गोव्याच्या मातीची नस टिपणारा ‘गितार’ आपल्या काव्यातून मराठीत आणला. पण प्रत्यक्ष संगीतात मात्र त्या सतारीची आणि गिटारीची भेट घडायला अंमळ उशीरच झाला! अर्थात, उशीर झाला तरी ते सूर अखेरीस एकमेकांना भेटले आहेत, भेटत आहेत आणि संगीताचे नवे अन्वयार्थही ते एकमेकांपर्यंत पोहोचवत आहेत! त्यांच्या तारा जुळल्या आहेत म्हणा ना!
सतार आणि गितार
‘आपलं’ आणि ‘परकं’ याच्या व्याख्या तशा जगभर सारख्याच असतात. आपला ‘बाळ्या’ असतो, परकं ‘करट’ असतं.
आणखी वाचा
First published on: 14-12-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व लयपश्चिमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitar and guitar