सकाळी जाग आली आणि काहीतरी एकदम जाणवल्यासारखे झाले आणि कळवळलोच. नैसर्गिक अलार्म वाजला नव्हता. लगबग नाही, किलबिल नाही, भांडणे नाहीत. भकास शांतता. मनाशी म्हटले की, झाडाच्या दोन-चारच फांद्या तोडल्यात, अजून खूप फांद्या आणि सावली आहे ना! पण या समजावणीला आणि समर्थनाला काही अर्थ नव्हता. आता एकच शक्य होते- हात जोडून केविलवाण्या स्वरात विनवणी.. ‘चिमणे चिमणे, दार उघडे आहे. ये.. ये.. क्षमा कर. शिक्षा कर. पण सोडून जाऊ नकोस.. चिऊताई, ये..’
‘चिमणी’ नावाचा पक्षी चिमुकला, दिसायला साधाभोळा वगैरे आहे, हे ठीक आहे. पण तो त्रासदायक, मन:स्ताप देणारा आणि सभ्यपणा व संस्कृती नसलेला, आणि ते काय एटिकेट्स आणि मॅनर्स का काय म्हणतात ते नसलेला आहे असे माझ्या अलीकडे लक्षात आले. खरे तर माणूसप्राणी असल्याचा आम्हाला केवढा अहंकार! त्या अहंकाराचा वारा या कानातून आत घुसून सूं-सूं करत त्या कानातून बाहेर पडत असतानाही आम्ही या बोटभर पक्ष्याला ‘चिऊताई’ असे म्हणतो, यावरून तरी आमच्या मनाचा मोठेपणा या चिमणीने लक्षात घ्यावा की नाही? त्यात आम्ही चिमणी आणि चिमणा असा भेद न करता सरसकट सगळ्यांनाच ‘चिमण्या’ असे म्हणतो. (फरक कळत नाही, असेही काही खवचट लोक म्हणू शकतात.) यावरून आमची लिंगभेद न करणारी, नि:पक्षपाती आणि समाजवादी दृष्टी लक्षात घ्यावी की नाही? पण नाही. सगळा वात्रटपणा आणि उर्मटपणा भरलाय यांच्या अंगी.
मी हे सांगतो आहे कारण- अनुभव! (जो कवी, लेखक यांच्यासाठी फारच महत्त्वाचा आणि आवश्यक असतो असे म्हणतात.) मी घराभोवती दोन-तीन झाडे लावली, ती कशासाठी? एक व्यावहारिक विचार, की अकोल्यातील निर्घृण उन्हामुळे सिमेंटचे घर भट्टीसारखे तापते, तर ऊन आणि घर यामध्ये हिरवा अडथळा असावा. (लक्षात घ्या- मी काही लोभी नाही, बरं का! व्यापारी विचार असता तर फळझाडे नसती का लावली? आणि फळांसाठी टपलेल्या पक्ष्यांना आणि टारगट पोरांना गोटे मारत आणि खेकसत नसतो का बसलो?) तर या चिमण्यांना वाटले की, आपल्यासाठीच ही झाडांची छोटी कॉलनी बांधली आहे. केली घुसखोरी. केला कब्जा. मुन्शिपाल्टीच्या भाषेत- अतिक्रमण. बरं, आल्या तर आल्या; मुकाटय़ानं गपगुमान राहावं ना? तर नाही. इतक्या तोंडाळ आणि वाचाळ पक्षिणी जगात नसतील दुसऱ्या! सक्काळी साडेपाच वाजता कूलरच्या हवेत किंवा गच्चीवर गार वाऱ्यात गाढ झोपलेल्या माणसाला झोपू द्या ना गं बयांनो! (आम्ही मोबाइल स्विच ऑफ करून ठेवलेला, तो कशासाठी?) तर अचानक सगळ्याजणी एकदाच जाग्या होतात आणि कलकल.. चिवचिव.. कलकल.. चिवचिव सुरू! तुमच्या या चिवचिवाटाला वैतागूनच एका कवीने कविता लिहिली असावी-
पाखरांची शाळा भरे पिंपळावरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करिती..
तुमचाच विशेष उल्लेख का केला त्या कवीने? आणि पोरेच कशाला? आयापण गोंगाट करतात असा माझा आरोप आहे. आता काही मृदू मनाचे अन् हळव्या स्वभावाचे लोक स्वत:ला ‘पक्षीमित्र’ म्हणवतात. त्यांचे म्हणणे असे की, मोबाइल किंवा घडय़ाळाचे कामच नको. सक्काळी उठण्यासाठी चिमण्यांची किलबिल हा नैसर्गिक आणि सुमधुर अलार्म आहे. (लोकांचे काय, काहीही बोलतात!) तर या लोकांना इतरेजन सुखाने (निष्क्रियपणे नाही!) जगतात हे पाहवत नाही. या पक्षीमित्रांनी घरोघरी जाऊन खापराची पसरट भांडी दिली आणि नम्र आदेश दिला की, या उन्हाळ्यात अंगणात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ही भांडी पाण्याने भरून ठेवत चला. आता कसं आहे नं सरजी- आणि काय आहे नं साहेबजी, की समाजात तुम्हाला प्रतिष्ठित आणि जागरूक आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून मिरवायचं, आणि दया, क्षमा आणि करुणा या तिघीजणी तुमच्या हृदयात वास करीत आहेत हे जगाला दाखवायचं असेल तर अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि आपला सहभाग पुन:पुन्हा भाषणामधून किंवा लेखनातून आवर्जून नोंदवावा लागतो. तर असो..
रोज मी त्या भांडय़ात दोन मग्गे पाणी भरण्याचे कष्टाचे काम करू लागलो. पण एक दिवस माझ्या संतापाचा भडकाच उडाला. एका दुपारी एक चिमणी खापराच्या भांडय़ाला बाथटब समजून नुस्ता धुमाकूळ घालत होती. अरे, ही काय पद्धत आहे? टुणकन् उडी मारून बाहेर यायचं, पुन्हा पायावर जोर देऊन उडी मारायची ती थेट टबात.. सॉरी, भांडय़ात. अन् तेथे पंख फडफडवायचे, चहुबाजूंना तुषार उडवायचे, पाणी बाहेर सांडतंय तिकडे बेफिकीरपणे दुर्लक्ष करायचं. पुन्हा ऐटीत, नखरेलपणे मान हलवीत इकडेतिकडे पाहायचं. आविर्भाव असा, की सांगा- मी (ओलेती) कशी दिसते? मला रागच आला. अशा दुष्काळात, आपण आंघोळ करताना कोणी पाहील याची लाज तर नाहीच, पण पाण्याची नासाडी! (आता आम्ही नळाला बेकायदेशीरपणे मोटरपंप लावून पाणी खेचतो आणि वरचे टाके ओव्हरफ्लो होऊन तासन् तास धो-धो नालीत वाहत राहते पाणी- ही गोष्ट वेगळी. पण असे अनवधानाने होते. त्या उच्छृंखल चिमणीप्रमाणे आम्ही मुद्दाम वागत नाही काही!)
– आणि त्या चिमण्यांची भांडणे.. हरे राम! इकडचा गट आणि दुसरी पार्टी- सामूहिक भांडण. कितीतरी वेळ तारस्वरात. कलकल.. चिवचिव.. काल तू माझ्या चिमण्याजवळ का बसली होतीस? कलकल.. चिवचिव.. माझ्या घरटय़ातील कापसाच्या गादीला चोच का मारलीस? कलकल.. चिवचिव.. माझ्या पिल्लाला अशवन आणि लुकडा का म्हणालीस? काल आम्ही सगळ्याजणी एकत्र घरी परतलो, तू एकटीच उशिरा आलीस. कलकल.. चिवचिव.. कुठे गेली होतीस टवळे? कलकल.. चिवचिव.. अगं उंडगे, तुझे रंगढंग मला माहीत आहेत ना! कलकल.. चिवचिव.. हुश्श!
– हे असेच असतील का भाव? की लेखक-कवी मानवी स्वभाव, विचार, विकृती पशुपक्ष्यांवर लादतात? कोणी ठरवलं किंवा ठसवलं, की चिमणी अशी, कावळा असा, कोल्हा तसा व विंचू असा. पक्षी ‘पक्षी’ म्हणूनच रंगवता येतील का? घोडा शक्ती आणि वासनेचं प्रतीक म्हणून सहसा येतो. तो ‘घोडा’ म्हणूनच चित्रित करायचा असेल तर घोडय़ाच्या सहवासात राहण्याव्यतिरिक्त विज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्या शाखा अभ्यासाव्या लागतील? की असे केले तर ते लेखन ‘ललित’ राहणार नाही. पशू, पक्षी, प्राणी यांच्याशिवाय आपला निभाव नाही, गत्यंतर नाही, हे तर खरेच. म्हणून ससा आणि कासवाची गोष्ट किंवा चिमणी-कावळ्याच्या घरांची गोष्ट अमर आणि श्रवणीय बनून जाते.
आनंद यादवांच्या ‘गोतावळा’मध्ये प्राण्यांचे आणि माणसाचे जैव संबंध त्यांच्या दैनंदिन कार्यकलापांसह जिवंत होतात. ‘माऊली’ या कादंबरीतील मांजरी लळा लावते.
ग्रेस यांच्या कवितेमध्ये अनेकदा कावळा येतो. पण तो प्रतीक किंवा प्रतिमा या स्वरूपात येतो. ‘कावळाच कावळा/ परंतु सभ्य भासला’ ही ओळ किंवा ‘चोचीत पिंड घे तू, सावत्र बाप माझा..’ या ओळींमधून ‘कावळा’ काहीतरी सुचवतो.
असे वाटते की, पशु-पक्ष्यांचे जिवंत वर्णन असणारी आणि काहीही आशय वा गूढार्थ न सुचविणारी पुस्तके वाचायला मिळावीत. डिस्कव्हरी किंवा अॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवरील पक्षी, प्राणी, कीटक यांचे चित्रण पाहतानाही भान हरपून जायला होतं. विस्मय, आनंद अनुभवास येतो. तसे काहीतरी वाचायला मिळावे.
व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’ या कादंबरीचा विषय तिच्या शीर्षकातूनच सूचित होतो. पण त्यात वानरांच्या हालचालींचे, जीवनव्यवहारांचे, समूहातील नियम आणि संकेतांचे जे जिवंत चित्रण वाचायला.. नव्हे पाहायला मिळते, ते मराठीत तरी विलक्षणच आहे. (त्या चित्रणाला आधार असलेले परभाषेतील मूळ लेखन व त्यासंबंधीचा वाद आठवूनही ‘सत्तांतर’मध्ये ‘साक्षात्’ झालेले वानरी (मानवी?) दर्शन प्रत्ययकारी वाटते.)
आगळ्या शैलीचे समर्थ कथाकार श्री. दा. पानवलकर यांच्या ‘अपील’ नावाच्या कथेत एक काळा बोका आहे. डोळे पिंगट, क्रूर आणि तब्येतीने दांडगट. पानवलकरांच्या शब्दात सांगायचे तर ‘त्याला पाहिल्यावर पोलिसांचा कुत्रासुद्धा फळाफळा..’ असं वाटतं की, मांजर जातीचा लुच्चेपणा आणि क्रौर्य (त्यात हा बोका.. आपलीच पिल्ले खाणारा!) पानवलकरांनी अचूक शब्दांमध्ये पकडलं आहे. कथेच्या शेवटी तो वागतोही तसाच. (एकदा ही कथा वाचाच.) आणि अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अॅण्ड द सी’मधील न गावलेला मासा आणि तो महाकाय जखमी शार्क..?
गावाकडे काकी स्वयंपाक करत असायची आणि दुपारचा निवांतपणा. पाच-सहा चिमण्या अक्षरश: त्या खोलीत उडय़ा मारत यायच्या आणि परातीमधल्या कणकेचा उंडा लचके तोडून चोचीत घ्यायच्या आणि बाहेरच्या निंबाच्या झाडावरील घरटय़ात ठेवून पुन्हा यायच्या. काकी हतबल होऊन हाक मारायची, ‘अरे नारायण, त्या सवाष्णींना हाकल रे!’ मी घरी नसलो तर नाइलाजाने ती बारीक बारीक गोळ्या करीत असे अन् थोडे लांब फेकत असे.
मधे एकदा माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीचा ताबा चिमण्यांनी घेतला होता. गवताच्या काडय़ा, फडक्याचे तुकडे, कापूस आणि त्यांचे शिटणे यांचा पसारा सगळीकडे. एकदा मी खोलीत गेलो आणि पंख्याचे बटन दाबले. पण पंखांची हलकीशी फडफड ऐकू येताच चरकलो आणि अक्षरश: ओरडलो, ‘थांब बाई, थांब. उडू नको. मी पंखा बंद करतोय..’ मी बटन दाबले. पण उशीर झाला होता. माणसावरील अविश्वासामुळे म्हणा किंवा यंत्राच्या गोल फिरण्यामुळे म्हणा, चिमणी घाबरून उडाली, पंख्याला धडकली आणि एकीकडचे पंख गमावून टाइल्सवर पडली. मी मटकन् खाली बसलो. लाज, शरम, अपराधीपण, कानकोंडेपणा.. सारं काही दाटून आलं. तिला हात लावला तर इतर चिमण्या तिला त्यांच्यात घेतील का? पाण्याचे तीन-चार थेंब तिच्या चोचीत टाकले. पण ते ओघळले आणि ती गेली..
पशु-पक्ष्यांचा आणि माणसाच्या ऐतिहासिक संबंधांचा आणि आजचा विचार केला की तऱ्हेतऱ्हेचे विचार मनात येतात. माणूस फक्त स्वत:चाच विचार करतो असेही लक्षात येते.
उन्हाळा संपत आला होता. फाटकाजवळील कडुनिंबाचे झाड अफाट विस्तारले होते. आता पावसानंतर आणखीनच फोफावले असते म्हणून लाकूडतोडे विचारायला आले तर ‘छटनी करा’ असे सांगितले. नंतर ज्ञान झाले की, एक मोठी फांदी तोडली तर पन्नास छोटय़ा फांद्या आणि हज्जारो पाने धारातीर्थी पतन पावतात. तोडणारे निघून गेले तेव्हा पाहिले तर खूप मोठा हिरवा विसावा मावळून गेला होता आणि जळजळीत निळ्या आभाळाचा भलामोठा उष्ण तुकडा डोळ्यांवर धावून आला होता.
उदास ओशाळवाणेपणा मनात दाटून आला होता. झोपलो रात्री नेहमीसारखा. सकाळी जाग आली आणि काहीतरी एकदमच जाणवल्यासारखे झाले आणि कळवळलोच. नैसर्गिक अलार्म वाजला नव्हता. लगबग नाही, किलबिल नाही, भांडणे नाहीत. भकास शांतता. मनाशी म्हटले की, दोन-चारच फांद्या तोडल्या, अजून खूप फांद्या आणि सावली आहे ना! पण या समजावणीला आणि समर्थनाला काही अर्थ नव्हता. आता एकच शक्य होते- हात जोडून  केविलवाण्या स्वरात विनवणी.. ‘चिमणे चिमणे, दार उघडे आहे. ये.. ये.. क्षमा कर. शिक्षा कर. पण सोडून जाऊ नकोस.. चिऊताई, ये..’
म. म. देशपांडे यांची एक कविता आठवते आहे- ‘भरवसा’ नावाची.
नंगधडंग खार
नाही विचार
की कुणी पाहतो
चाहतो
हा कावळाही तसाच
कमरेला वस्त्र नाही
बेटय़ाच्या
अनावृत इथे सारे
पशु, पक्षी, वृक्ष, वारे
आवृत माणसाने
मात्र कसा
गमावला भरवसा