आमच्या कंपनीच्या मॉस्कोमधल्या एजंटांच्या कार्यालयात मी बसलो होतो. दोन-तीन महिने खोळंबलेलं एक दणकट सरकारी कंत्राट मंजूर झाल्याचा फोन आला. मी प्रचंड खूश झालो. तोंडावाटे शीळ बाहेर पडली. शिट्टीतून ‘एक-दो-तीन’ बाहेर पडलं. ‘चौदा को तेरा संदेशा’ येण्याआधीच ऑफिस मॅनेजर स्वेतलाना डुचमळत येऊन ‘नियत, नियत’ म्हणाली. मला नियतीवर आधारलेलं गाणं पटकन आठवेना. माझी शीळ तोंडातच विरघळली. क्षणभर गांगरून झाल्यावर डबल साक्षात्कार झाला. एक : रशियात नियत म्हणजे नाही आणि दोन : रशियन कॉम्रेड्स अजूनही आवारा राज कपूरच्या प्रेमातून बाहेर पडायला तयार नाहीत.

प्रसंगावधान राखून लगोलग मी शिट्टीवर ‘मेरा जूता है जापानी’ घेतलं. ‘सर पे लाल टोपी रूसी’ घालण्यापूर्वी स्वेतलाना तोंडावर दोन बोटं धरून परतली. मी टोपी कॅन्सल करून विचारलं, ‘आवारा हूं चालेल का?’

ती उत्तरली, ‘हवं ते गाणं गा, पण व्हिसल मात्र करू नका.’

‘शिटी का नाही वाजवायची?’

‘कारण घरात किंवा ऑफिसात शिटी वाजवली तर येणारी धनसंपत्ती यायचं थांबवते.’

हे स्पष्टीकरण ऐकलं आणि मी चक्रावूनच गेलो. अंधश्रद्धेच्या क्षेत्रात आपली आंतरराष्ट्रीय मिरासदारी आहे, असं मी समजत होतो. पण स्वेतलानानं धक्का दिला. तिला नाराज करण्यात शहाणपणा नव्हता. कंत्राट अजून हातात पडायचं होतं. मी तात्काळ शिटी थांबवली आणि लक्ष्मीची एन्ट्री क्लिअर केली.

दुसऱ्या दिवशी कंत्राट सुखरूपपणे मिळाल्यावर मी स्वेतलानाला विचारलं, ‘तुझा विश्वास आहे अशा भाकड समजुतींवर?’

ती नाक उडवून म्हणाली, ‘तुम्हालाच प्रचिती आली ना आता? शिटी वाजवायची थांबवलीत म्हणून तर हे कॉन्ट्रॅक्ट लगेच मिळालं. नाहीतर सत्राशेसाठ विघ्नं आड आली असती.’

‘तुम्ही कम्युनिस्ट लोक देव मानत नाहीत, पण अंधश्रद्धा पाळता, हे एक आश्चर्यच म्हणायचं.’

स्वेतलाना फुरंगटून पाय आदळत निघून गेली. मी एका महत्त्वाच्या कामाकरता कार्यालयाबाहेर पडलो, पण फाइल खणातच राहिली म्हणून ती घेण्यासाठी परतलो. जगबुडी झाल्यासारखी माझी तिथली सेक्रेटरी धावत आली आणि म्हणाली, ‘अपशकुन झाला. असं लगेच परत यायचं नसतं.’

मी कारण सांगितलं. ती म्हणाली, ‘आता निदान जाताना तरी टॉयलेटमध्ये जाऊन या.’

‘काय?’ मी किंचाळलो.

‘आपल्या ऑफिसात फक्त तिथेच आरसा आहे ना? आरशात चेहरा बघून जा.’

‘का? तोंडाला काही लागलंय का माझ्या?’

‘तसं नव्हे. लगेच परत यावं लागलं तर जाताना आरशात स्वत:शीच नजरानजर करायची असते.’

‘नाही केलं तर?’

‘काम फत्ते होत नाही. फेरी फुकट जाते.’

रात्री एजंट अय्यरांच्या घरी रसम्-सांबारम्-राइसम् मेजवानीचा आस्वाद घेता घेता मी विषय काढला. पापडम्चा तुकडा मोडत रजनीकांतसारख्या भुंवया उंचावून अय्यरस्वामी म्हणाले, ‘रशियात काही शतकांपूर्वी जी पेगन संस्कृती प्रचलित होती त्या वेळच्या तर्कशून्य शकुन-अपशकुनांचा पगडा अजूनही रशियन लोकांच्या मनावर आहे. त्यामुळे कधीकधी आपली फजिती उडते.’

अय्यरांनी त्यांचा एक किस्सा सांगितला. एकदा बारमधून बाहेर पडताना त्यांचा पाय चुकून एका रशियन सुधाकराच्या पायावर पडला. ते सॉरी म्हणाले आणि पुढे गेले. पण हाफ टाइट कॉम्रेड सुधाकरोव्ह धडपडत उठून त्यांच्या मागे लागला. ते पुढे, तो मागे. त्यानं मग धापा टाकत ‘प्लीज थांब, थांब’ असा धोशा लावला. रस्त्यावरचे लोक बघायला लागले. धोका नाही अशी खात्री पटली तेव्हा अय्यर थांबले. कॉम्रेड म्हणाला की, ‘मला आता तुझ्या पावलावर पाउल टाकू दे, नाहीतर जन्मभर आपल्या दोघांच्याही नशिबाचे फासे उलटे पडत राहतील.’ अय्यरांना त्याच्या बोलण्याचा अर्थच उमजेना. ते हतबुद्धच झाल्याचा फायदा घेऊन लगेच कॉम्रेडनं त्यांच्या पावलावर जोरात बूट दाबला आणि ते विव्हळत असताना त्यांना बेस्ट लक चिंतून तो लडबडत बारमध्ये परतला. अय्यर आठवडाभर पायावर आयोडेक्स चोळत बसले.

मी म्हणालो, ‘हाच भारतीय आणि रशियन लोकांमधला फरक. आपण कोणाला चुकून पाय लागला तर नमस्कार करतो. हे लोक आपला पाय चेचून सूड उगवतात.’

‘तसं नव्हे. त्यांचा पाय पडला तर आपणही त्यांच्या पायावर आपला पाय दाबायचा असतो. बाई असली तरी गय करायची नसते. पाय नाही दाबला तर तेच लोक गयावया करतात.’

‘पण हल्लीची पिढी नसेल मानत हे शकुन-अपशकुन.’

‘खरं आहे. पण कधीकधी बोलाफुलाची गाठ पडते आणि असले तर्कविसंगत भ्रम द्विगुणित होतात. सोमवारी प्रवासाला निघालं तर वेळच्या वेळी मुक्कामाला पोहोचणं होत नाही, असं रशियन समाजात मानलं जातं. माझ्या ओळखीचा एक सरकारी अधिकारी बायकोची विनवणी धुडकावून सोमवारी सकाळीच बॅग उचलून निघाला. कर्मधर्मसंयोगानं वाटेत त्याची कार बंद पडली. कशीबशी टॅक्सी मिळवून विमानतळावर पोहोचला तर विमान रद्द झाल्याचं कळलं. रेल्वे स्टेशनवर जाऊन आगगाडीत बसला तर बर्फाची अतिवृष्टी झाल्यामुळे अध्र्या रस्त्यात गाडी थांबली ती थांबलीच. शेवटी कसाबसा उलट प्रवास करून गडी घरी परतला तेव्हा मंगळवारचा सूर्य उगवत होता. या अनुभवामुळे धास्तावून तो पक्का अंधश्रद्धाळू झाला. इतका की आता कोणी पसे दिले तर तो ते हातात घेतच नाही.’

या दोन गोष्टींचा संबंध माझ्या ध्यानात येईना. पण अंधश्रद्धाकृपेकरून एका रशियन अंमलदाराचं लाच घेणं थांबलं, हा शुभशकुन वाटला.

अय्यर पुढे म्हणाले, ‘तो आता पसे टेबलावर ठेवा असं सांगतो.’

‘आमच्याकडे टेबलाखालून घेतात.’

‘कारण, पसे थेट हातात घेतले तर देणाऱ्याची निगेटिव्ह एनर्जी घेणाऱ्याच्या अंगात शिरते असं मानतात हे लोक. म्हणून इथले बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर पॅसेंजरला पसे डॅशबोर्डावर ठेवायला सांगतात. पुढे गेल्यावर ते पसे उचलले की बाधा होत नाही म्हणे. तेव्हा तुम्हीही दुकानाबिकानात कॅशिअरच्या हातात पसे कोंबू नका. काउंटरवरच ठेवा.’

मी हैराण होऊन म्हटलं, ‘विचित्रच आहेत यांच्या एकेक समजुती.’

‘यांच्याच का? काळं मांजर आडवं आलं की गोरा साहेबसुद्धा चरकतो. उभ्या शिडीखालून तो कधी जात नाही. हॉटेलातल्या तेरा नंबरच्या खोलीत झोपत नाही. मीठ सांडलं तर त्यातलं एक चिमूटभर उचलून डाव्या खांद्यावरून पाठीमागे फेकून देतो.’

अंधश्रद्धेचा विषय निघाल्याक्षणी संभावितपणे आमच्याकडे बोट दाखवणारा शुभ्रासुर मिठाच्या अक्षता उलटय़ा दिशेनं फेकत शुभमंगल म्हणतोय, हे दृश्य किती मजेशीर दिसत असेल, नाही? 

५ं१ीि२ष्टिद्धr(६४)ॠें्र’.ूे