सुभाष अवचट Subhash.awchat@gmail.com

रेखाचित्र : अन्वर हुसेन

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

४, ‘शाकुंतल’..

‘साहित्य सहवासा’तला हा पत्ता मूळचा माझा नव्हे. तो शांताबाईंचा.

शांताबाई म्हणजे एकच- शेळके!

१९८० च्या आसपास कधीतरी पहिल्यांदा मी या घराचं दार वाजवलं होतं. दुपार सरत आलेली. वाटलं, बाई असतील; तर दारात त्यांचे मित्र. प्रभुणे. चट्टय़ापट्टय़ाचा लेंगा आणि वर बनियन- असे. हातात एक फाऊंटन पेन होतं आणि शाई भरायचा ड्रॉपर.

‘आत या..’ म्हणाले. मी गेलो.

– तर एखादा जुनाट, थकलेला, विटका माणूस असावा तसं घर. सगळीकडे अंधार. चिमुकल्या खिडक्या. आत नुस्त्या भिंती आणि ज्यात त्यात का कोण जाणे, पार्टिशन्स घातलेली. पुस्तकांचा हा एवढा पसारा. पुस्तकं तेवढी चकचकीतशी. बाकी सगळ्या घरावर जुनाट, कुबट कळा.

एक भिंत आणि आणखी एका पार्टिशनच्या मागल्या खोलीत जुन्या प्रचंड पलंगावर शांताबाई बसलेल्या होत्या. गादीवर. मुटकुळं केल्यासारख्या. समोर उतरत्या पाठीचं लाकडी डेस्क. लिहिता लिहिता शाई संपली असावी. प्रभुणे मला आत घेऊन गेले. त्यांनी मला तिथे बसवलं. ताजी शाई भरलेलं पेन पुन्हा नीट पुसून शांताबाईंना दिलं आणि माझ्यासाठी चहा टाकायला म्हणून ते आणखी एका भिंतीच्या आत गडप झाले.

मग शांताबाईंशी गप्पा झाल्या. चहा झाला. मी तिथे कशाला गेलो होतो ते आता आठवत नाही. आठवते ती त्यांची गाठोडय़ासारखी आकृती आणि त्यांच्या कपाळावरचं ते हसरं, ठळक, ठसठशीत लाल कुंकू!

निघायच्या तयारीत निरोप घेत मी उठलो, तर शांताबाई हसून म्हणाल्या,‘‘चल, आज मी तुला भेळ खायला नेते. कवितेचं मानधन आजच आलंय. दहा रुपये. आपण भेळेची पार्टी करू!’’

साहित्य सहवासच्या कोपऱ्यावर तेव्हा गुप्ता नावाचा कुणीएक भेळवाला होता, त्याच्याकडे ही पार्टी होणार होती.

प्रभुण्यांनी बनियनवर शर्ट चढवला आणि शांताबाईंच्या हाताला धरून अलगद जिने उतरून ते त्यांना खाली घेऊन आले. एकेक पाऊल टाकणं म्हणजे शांताबाईंना फार त्रास होत होता. एकमेकांच्या आधाराने चालणारी ती दोन थकलेली माणसं पाहताना माझ्या पोटात तुटत राहिलं. शांताबाईंचा चेहरा मात्र चमचमीत भेळेच्या नुसत्या कल्पनेनेच चमकत होता. आम्ही शेवटी ती भेळ खाल्ली. पैसे द्यायला पाकीट काढलं तर मला रागावल्या. म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, मी आज श्रीमंत आहे रे! मानधन आलंय ना कवितेचं!! तेव्हा आजची पार्टी मीच देणार. तू असा येत जा मात्र. गप्पांना ये. नक्की ये हो!!’’

मी कुठला नेहमी जाणार गप्पांना?

शांताबाई मुंबईत. मी पुण्यात.

पण आम्ही गप्पांना रोज एकत्र भेटणार हे नियतीने आधीच ठरवलेलं होतं.

प्रभुणे निवर्तले आणि शांताबाई मुंबईत अगदीच एकटय़ा पडल्या. त्यांना साधं घर चालवणं जमेना. कसं जमणार? आयुष्यात कधी घरात काही पाहिलं नव्हतं. संसार असा केला नव्हता. स्वयंपाक सोडा, साधा आमटी-भातही कधी रांधला नव्हता. मुंबईतलं त्यांचं अख्खं आयुष्य हे अभ्यास, लेखन, कविता, गाणी आणि उदंड यश, कीर्ती यांच्या समृद्ध वैभवाने अखंड गजबजलेलं होतं. इतक्या कमिटय़ांवर कामं केली. इतका अभ्यास, इतकं लेखन, इतकी गाणी लिहिली. गायक-संगीतकारांबरोबर इतक्या बैठकी रंगवल्या. खुद्द लताबाई आणि अख्ख्या मंगेशकर कुटुंबासह आयुष्यात इतकी स्नेहाची श्रीमंती मिळवली. दुसऱ्याकशाला जागा होती कुठे कधी?

शांताबाईंच्या अवघ्या आयुष्याला लखलख देणारे हे सगळे दिवे हलके हलके मंदावू लागल्यावर मग मात्र उतरत्या उन्हांनी कदाचित काहीशी कासाविशी आणली असावी त्यांच्या आयुष्यात.

प्रभुणे गेले.. आणि त्या कासावीस जंगलात एकाकीपणाचं श्वापद घुसलं.

शांताबाईंचे बंधू राम शेळके. पुण्यात राहात. मोठा दिलदार माणूस. रामभाऊंशी, शांताबाईंच्या वृद्ध, पण खणखणीत आईशी माझी सख्खी मैत्री होती. माझं त्या घरी जाणं-येणं होतं.

रामभाऊंना वाटे, आयुष्यभर कुटुंबाबाहेरच राहिलेल्या आपल्या गुणी बहिणीने आता घरी परतावं. तिची निवृत्ती सुखाची व्हावी. एका भेटीत त्यांनी माझ्याकडे विषय काढला. म्हणाले, ‘‘बंगला आहे एवढा. वर एक खोली बांधतो मी तिच्यासाठी स्वतंत्र. सगळ्यांमध्ये आनंदात राहील इथे पुण्यात!’’

शांताबाईंच्या आईनेही गळ घातली होतीच. मग मी मुंबईत जाऊन एकदा भेटलोच शांताबाईंना. म्हटलं, ‘‘रामभाऊ एवढे म्हणतायत तर आता ऐका की त्यांचं! चला पुण्याला!!’’

शेवटी माझ्यासारखे मित्र आणि कुटुंबाच्या अगत्याचा मान राखून शांताबाई मुंबईतला त्यांचा एकाकी संसार उचलून पुण्यात यायला तयार झाल्या. आल्याही. रामभाऊंच्या बंगल्यात वर एक नवी खोली बांधली गेली. ती पुस्तकांनी सजली. शांताबाईंच्या उत्तरायुष्यातला पुण्यातला काळ सुरू झाला.

मीही पुण्यातच होतो. माझ्या स्टुडिओत कामांचा पूर असे तेव्हा. माझा गोतावळा मोठा. स्टुडिओत मित्रांचे अड्डे पडलेले असत. मी भरपूर मजा करीत असे. दंगा घालत असे. त्याहून दुप्पट कामही करीत असे.

असाच एके दिवशी दुपारी शांताबाईंचा फोन. मला म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, मी आज येऊ का तुझ्या स्टुडिओत संध्याकाळी? माझं काहीही काम नाहीये तुझ्याकडे. फक्त गप्पा मारायच्या आहेत.’’

मी म्हटलं, ‘‘अहो शांताबाई, विचारताय काय? या की!!!’’

त्या आल्या.

आणि मग येतच राहिल्या.

अख्खं आयुष्य मुंबईत गेलेलं.  इथे पुण्यात आल्यावर त्या एकटय़ा पडल्या होत्या. त्यांना माणसांची भूक फार. माणसं आणि गप्पा यावरच त्या जगत.. आणि खाणं!!

गप्पा मारायला म्हणून दुपारच्या स्टुडिओत आल्या की जमिनीवर अंथरलेल्या गादीवर मुटकुळं करून बसत. डोक्यावरचा पदर सारखा सावरीत लडिवाळ, गोड, आग्रहाचं, लाघवी बोलत राहत. मला म्हणत, ‘‘सुभाष, तुला त्रास नाही ना रे होत माझ्या बोलण्याचा? मी आपली रिकामी आहे, तू असा कामात!! म्हणशील, काय म्हातारीची टकळी काही थांबत नाही!’’

मी म्हणायचो, ‘‘नाही हो शांताबाई, बोला तुम्ही.. मला कसलाही त्रास नाही होत.’’

कधी कधी मी कामात असलो की नुसत्याच अवघडल्यासारख्या बसत. मग एकदा त्यांना विचारलं, ‘‘कागद देऊ का तुम्हाला लिहायला?’’

‘‘कागद?’’ त्यांनी काहीशा विचित्र रिकाम्या नजरेने माझ्याकडे पाहिलं अन् म्हणाल्या, ‘‘काही सुचत नाही रे आता..’’

चटका बसल्यासारखा मी चरकलो.

मग त्याच म्हणाल्या, ‘‘तू असं कर, मला एक ड्रॉईंग पेपर दे. मला चित्र काढायचंय.’’

मग मी त्यांना ड्रॉईंग पेपर द्यायला लागलो. सोबत पेन्सिली, रंगखडू असत. शांताबाई दोनच चित्रं काढत. एक त्यांच्या लाडक्या मांजरीचं चित्र आणि दुसरी म्हणजे स्मिता पाटील!

स्मिता त्यांची फार लाडकी. तिचं चित्र म्हणजे काय, तर तिचा चेहरा रेखणाऱ्या काही रेघा आणि कपाळावर कुंकू. ही स्मिता. तिच्या-माझ्या प्रेमाबद्दल शांताबाईंना भारी कुतूहल आणि कौतुकही!! स्मिताची आठवण आली की त्यांच्या डोळ्यात लगेच पाणीच भरे!!

मी म्हणायचो, ‘‘शांताबाई, स्मिताचं चित्र काढायची ही आयडिया भारी आहे तुमची! दोन-चार रेषा काढल्या आणि वर एक कुंकू ठेवलं की झालं!’’

त्या म्हणायच्या, ‘‘हो रे सुभाष!! तुला माझंही असंच चित्र काढता येईल. एक मोठ्ठं गाठोडं काढ आणि त्याच्यावर एक कुंकू ठेव, की झाल्या शांताबाई शेळके! काय?’’

असं साधंच बोलता बोलता अचानक इतक्या उन्मळून हसत की त्यांच्या डोळ्यांतून पाणीच वाहू लागे. मग गप्पगप्पशा होऊन जात. असं अस्वस्थ अबोलपण आलं की मी त्यांना चित्र काढायला नवा कागद द्यायचो. मग शांतपणे काहीतरी रेघाटत खूप वेळ मुक्याने त्या बसून राहात.

आठवडय़ातून दोन-चारदा यायला लागल्या तशी मला शांताबाईंची तहान हळूहळू उमजू लागली. घरचे लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असत. पण कुटुंबाबरोबर कसं राहायचं याची त्यांना सवयच नव्हती. घरातल्या कामांत रस नसे. साधं भाजी निवडणं, देवपूजा, घरातल्या शिळोप्याच्या गप्पा हे त्यांनी आयुष्यात कधी केलेलंच नव्हतं. तरी घरातला प्रत्येक जण त्यांच्यासाठी जीव पाखडीत असे. शांताबाई त्या प्रेमाने गुदमरून जात आणि अधिकच एकटय़ा होत.

 

त्यांची नजर सतत भिरभिरत असे आणि नाकाला सारखे कसकसले वास येत. स्टुडिओत आल्या की म्हणत, ‘‘खमंग वास येतोय रे सुभाष!!’’

हा खमंग वास खालच्या बाजूला तळल्या जाणाऱ्या काका हलवाईंच्या सामोशाचा असे. मग मी विचारी, ‘‘खाणार का सामोसा शांताबाई?’’

‘‘कशाला रे उगीच ते तळकट खायचं?’’ असले लटके नकार त्या देत खरे, पण त्यांची लकलकलेली नजर बरोबर पकडायला मी एव्हाना शिकलो होतो. मग मी विचारायचो, ‘‘हे बघा, स्टुडिओच्या खाली उतरलं की कल्पना भेळ मिळते, सामोसे मिळतात आणि पलीकडच्या गल्लीत फक्कड आल्याचा चहा मिळतो. काय खायचंय तुम्हाला?’’ की त्या खूश होऊन म्हणत, ‘‘आज सामोसे खाऊ, चल!’’

वरून आवाज दिला की काका हलवाईंच्या दुकानातला मुलगा सामोशांच्या बशा घेऊन धावत आलाच वर!

तेव्हा मी ‘तुंबाडचे खोत’ या पुस्तकाचं काम करत होतो. पेंडश्यांचं हे एवढं भलंमोठं पुस्तक! चांगलंच वजनदार.

हलवाईंचा तो गरगरीत सामोसा बघून एकदा शांताबाई हसून म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, हा तुंबाड सामोसाच आहे की रे!’’

तेव्हापासून आम्ही त्याला ‘तुंबाड सामोसा’च म्हणायला लागलो. शांताबाई एका वेळी दोन-तीन तुंबाड सहज संपवत असत. मला हळूहळू त्यांची काळजी वाटायला लागली होती. यांचा हा एकटेपणा कसा संपवावा याचा विचार माझ्याही नकळत मी करायला लागलो. म्हटलं, पुणं नवं आहे यांना.. अजून रुळल्या नाहीयेत इथे!! तर आता आपणच काहीतरी करू या!

संध्याकाळ झाली की माझ्या स्टुडिओत संपादक, प्रकाशक, लेखक, कवींचा राबता सुरू होई. गप्पांचे अड्डे जमत. सुभाषच्या स्टुडिओत शांताबाई असतात, ही बातमी पसरायला पुण्यात कितीसा वेळ लागणार? मग त्यांच्याशी गप्पा मारायला म्हणून मुद्दाम लोक येऊ लागले. कुणी आलं आणि गप्पा रंगल्या की मी ‘आलोच’ म्हणून हळूचकन् निसटून माझी कामं करून यायचो. संध्याकाळ उतरली की मग खायच्या-प्यायच्या ओढीने स्टुडिओ बंद करून आम्ही सगळे बाहेर पडत असू. हळूहळू आग्रह करकरून आम्ही शांताबाईंनाही आमच्याबरोबर नेऊ लागलो. त्या असल्या की जुन्या आठवणींचा पाऊस अखंड कोसळत असे. आम्ही सगळे चिंब भिजून जात असू. मैफिलीत खुललेल्या शांताबाईंना बघताना माझ्या पोटातला त्यांच्यासाठीचा खड्डा तेवढय़ापुरता का असेना, आनंदाने भरून जाई. रात्री उशिरा शांताबाईंना घरी सोडायलाही जो-तो आनंदाने तयार असे. त्या गाडीत नीट बसल्या का, त्यांची साडी दारातून नीट आत घेतली का, अशी काळजी करून आपल्या आज्जीला सांभाळून न्यावं तसं लोक त्यांना अलगद घेऊन जात.

अर्थात रोज त्यांना स्टुडिओत बोलावणं शक्य नसे. मग मी मुद्दाम प्रयत्न करून शांताबाईंना कुणाकुणाच्या घरी गप्पांची आमंत्रणं मिळतील असं पाहू लागलो. कधी तात्या माडगूळकर, कधी मिरासदार.. हळूहळू शांताबाईंना पुण्यात कार्यक्रमाची निमंत्रणं येऊ लागली. पुढे खुद्द शंतनुराव किर्लोस्करांशी त्यांची मैत्री झाली. शंतनुराव त्यांना गाडी पाठवून गप्पांसाठी बोलावत. हलके हलके शांताबाईंची स्वत:ची वर्तुळं पुण्यात तयार झाली.

मग एकदा मला कुठला तरी पुरस्कार मिळाला. कार्यक्रम कोल्हापूरला होता. मी आयोजकांना म्हटलं, ‘मला शांताबाईंच्याच हस्ते पुरस्कार घ्यायला आवडेल.’ सगळे खूश! कोल्हापूरच्या प्रवासाचा बेत ठरल्यावर शांताबाई लहान मुलीसारख्या खुलल्या. तेव्हा व्होल्व्हो गाडय़ा नुकत्याच सुरू झालेल्या. आम्ही त्या गाडीने फक्त पुण्याहून कोल्हापूरला गेलो, तर शांताबाईंनी गाडीत खायला म्हणून पिशव्याच्या पिशव्या भरून खाऊ आणलेला! मी म्हटलं, ‘‘अहो, मोजून पाच तासांत पोचू आपण कोल्हापूरला! कशाला हे?’’

तर म्हणाल्या, ‘‘मला सारखी भूक लागते रे, सुभाष!! तोंड चाळवायला हवं काहीतरी बरोबर!!’’

कोल्हापुरातले मित्र आधीच आतिथ्यशील. त्यातून शांताबाई बरोबर.. मग काय विचारता!! खाण्यापिण्याची, कोडकौतुकाची नुसती धूम उडाली. यजमानांच्या घरच्या लेकी-सुना, त्यांनी बोलावलेल्या पाहुण्या मुलीबाळी शांताबाईंना चिकटल्याच. शांताबाई मुळातच लाघवी स्वभावाच्या.. सगळ्यांमध्ये विरघळून गेल्या. यजमानीणबाईंनी मला विचारलं, ‘‘जेवायला काय करू? शांताबाईंना काय आवडेल?’’ मी म्हटलं, ‘‘त्यांना काय तुम्ही साबुदाण्याची खिचडी देणार की काय? शांताबाई म्हणजे फक्त मटण!!! बास!! दुसरा विचारसुद्धा करू नका.’’

सकाळी नाश्ता झाला, दुपारी मटण झालं, संध्याकाळी च्याऊम्याऊ झालं आणि मग पार्टी सुरू झाली. शांताबाई आमच्या यजमान डॉक्टरांना सारखं म्हणत होत्या, ‘‘डॉक्टर, काहीतरी उपाय सांगा हो, माझं वजन फार वाढलंय. गुडघे फार दुखतात हो सारखे!’’

डॉक्टरांना यजमानधर्म निभावणं भाग होतं. ते म्हणत राहिले, ‘‘जाऊ दे हो शांताबाई, वयानुसार अशा तक्रारी असायच्याच आता!’’

की शांताबाई लगेच म्हणणार, ‘‘अगंबाई, हो का? तरी सांगा हो काहीतरी.. गुडघे फार दुखतात!!’’

शेवटी एकदाचे ते गोरेपान काळे डॉक्टर म्हणाले, ‘‘खरं सांगू का शांताबाई तुम्हाला, तुम्ही तुमच्या तोंडाला चिकटपट्टी लावा!!’’

‘‘अगंबाई, म्हणजे खायचं नाही का? तसंच करते आता.’’ शांताबाई गंभीर होऊन म्हणाल्या.

ही रात्रीची गोष्ट.

सकाळी उठून सगळे नाश्त्याच्या टेबलाशी आलो. पोहे, खिचडी, इडली-सांबार असे कितीएक प्रकार हौसेने रांधलेले. टेबल मस्त सेट केलेलं. शांताबाई अंघोळ करून नाश्त्याला आल्या. डोक्यावरचा पदर सरळ करत घरातल्या तरुण, उत्साही सुनेला कौतुकाने म्हणाल्या, ‘‘किती गं बाई हौशी तू!! किती छान मांडलंयस हे सगळं! पण ते कालचं मटण असेल ना शिळं? मुरलं असेल आता छान. तेच दे मला नाश्त्याला. बरोबर एखादा पाव चालेल!’’ मी थक्क होऊन बघत राहिलो. काय बोलणार?

कोल्हापूरच्या त्या मुक्कामात ‘महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन मला बांगडय़ा भरायच्यात..’ म्हणून हट्ट धरून बसल्या. मी म्हटलं, ‘‘अहो, गाडी नाही जात आतपर्यंत. कशा चालणार तुम्ही? एक पाऊल नाही टाकता येत तुम्हाला!!’’

तरीही मेहतांच्या दुकानात जाऊन गप्पा मारून आलोच आम्ही! संध्याकाळच्या कार्यक्रमात इतकं सुंदर भाषण केलं शांताबाईंनी- की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एकदा बोलायला लागल्या की खरंच सरस्वती असे त्यांच्या वाणीत. स्मरणशक्ती, पाठांतर, वाचन, कविता आणि अनुभवांची स्तिमित करणारी श्रीमंती!!

हळूहळू शांताबाईंना बाहेरगावच्या कार्यक्रमांची निमंत्रणं येऊ लागली. त्या हौसेने सगळीकडे जायला लागल्या. कार्यक्रम झाला की मानधनाचं पाकीट मिळे आणि त्यांच्या आवडीची एक साडी. मग मला त्या कौतुकाने दाखवीत. शांताबाईंना ना त्या पाकिटातल्या पैशांची मिरास होती, ना त्या साडीचं अप्रूप. आयुष्याच्या उतरत्या एकाकी संध्याकाळी मिळणारा मानसन्मान, कानात प्राण आणून त्यांचा शब्दन् शब्द टिपून घेणारे श्रोते, त्यांच्याकडची पोतडी उघडून गाण्यांच्या निर्मितीच्या कहाण्या ऐकणारे रसिक या लोभात त्या गुंतून पडल्या होत्या. स्वत:चं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही? पण तरीही इतकं लखलखतं वैभव अनुभवलेल्या शांताबाईंमध्ये अजूनही टिकून असलेली ही तहान समजून घेताना मी सारखा अडायचोच.

शेवटी हे सगळे प्रवास, दगदग त्यांना झेपेनाशी झाली. रामभाऊ माझ्याकडे तक्रार करीत. मला म्हणत, ‘‘तू तरी सांग रे तिला. आता नाही होत तिच्याच्याने.’’ मलाही ते दिसत होतंच. शेवटी एकदा स्टुडिओत आल्या तेव्हा विषय काढलाच. म्हटलं, ‘‘शांताबाई, आता खूप झाले तुमचे कार्यक्रम आणि प्रवास. आता बास करा!! लोक प्रेम करतात तुमच्यावर. त्यांना हव्या असता तुम्ही. पण आता तुम्हाला चालता येत नाही, उभं राहता येत नाही. कशाला स्वत:ला एवढा त्रास घेता करून? घरी बसा आता छान!’’

‘‘अरे, पण मी घरी बसून करू काय?’’ त्या एकदम कळवळल्याच! मी म्हटलं, ‘‘का? लिहा की भरपूर. खूप दिवसांत काही लिहिलं नाहीये तुम्ही. इतके प्रकाशक मागे असतात सारखे तुमच्या. मी करतो कव्हर. मी सगळं करतो. तुम्ही फक्त लिहा!!’’

‘‘..नाही रे सुचत आता काही!’’ त्या म्हणाल्या आणि एकदम गप्पच बसल्या.

मी त्यांच्या उदास, रिकाम्या, भरून आलेल्या डोळ्यांत खोल पाहिलं.

इतके दिवस मला छळणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथे होतं.

अवघं आयुष्य सर्जनाच्या प्रांतात मनमुक्त विहरलेल्या शांताबाईंजवळ सगळं होतं. वैभव, कीर्ती, प्रेम करणारी माणसं, जीव लावणारं कुटुंब. उरली नव्हती ती फक्त त्यांच्यावर जन्मभर प्रसन्न असलेली त्यांची प्रतिभा!! जे जे म्हणून लिहून झालं होतं, त्या त्या सगळ्याची पुस्तकं काढून झाली होती. सगळं खरवडून, उपसून संपलं होतं. आता दिवाळी अंकासाठी लेख, कथा, कविता मागणारे फोन येतात, त्यांना द्यायला आपल्याजवळ नवं काही असत नाही, या दु:खाचा लसलसता निखारा शांताबाईंना आतून जाळून काढत होता.

मला काय बोलावं सुचेना.

उगीच अपराधी वाटत राहिलं.

मुंबईत रुजलेल्या या बाईंना तिथून उचकटून ज्यांनी पुण्यात आणलं, त्यात आपणही होतो.. अवेळी उपटल्याने वठलं असेल का त्यांच्या मनातलं झाड? इतक्या जिवंत, रसरशीत शांताबाई या अशा वाळत का गेल्या असतील?

मी हडबडलोच.

त्याही विझल्यासारख्या समोर बसल्या होत्या.

मग उगीचच शब्द जुळवून मी म्हटलं,

‘‘डॉक्टरांकडे जा. चेकअप् करायला हवंय तुमचं. औषधाने बरं वाटेल तुम्हाला.’’

तर म्हणाल्या, ‘‘नाही रे सुभाष! काही उपयोग नाही.. आता कशाचाही उपयोग नाही.’’

त्या सळसळत्या झाडाने आता आपला पसारा आवरायला घेतला होता. आपल्याकडे फार दिवस शिल्लक नाहीत याची कसली तरी विचित्र खूण शांताबाईंना नक्की मिळाली होती. त्यांना झालेलं जीवघेणं दुखणं डॉक्टरांना कळायच्या आत त्यांनी स्वत:च ओळखलं होतं. आधी शांताबाईंच्या कविता, त्यांची गाणी गेली. कवितांच्या मागोमाग शांताबाई गेल्या. मग कालांतराने त्यांचं शरीरही गेलं.

..तरी त्यांची एक खूण आहे माझ्याजवळ!

‘४, शाकुंतल’मध्ये ज्या गादीवर बसून त्यांनी अमर्याद सौंदर्याची निर्मिती केली, ती त्यांची गादी!

साहित्य सहवासातलं शांताबाईंचं हे घर मी विकत घेतलं आणि राहायला यायच्या आधी त्या कुबट, दमलेल्या घरातला सगळा अंधार उपसून बाहेर काढला. भिंती पाडल्या. आधीच्या चिटकूर खिडक्या उखडून मोठय़ा केल्या. फक्त एकच गोष्ट ठेवली जपून : शांताबाईंची गादी!

माझ्या हॉलमध्ये अजून आहे ती. मी तिथेच असतो दिवस-रात्र. त्या गादीच्या बैठकीवर. गप्पा मारतो. गाणं ऐकतो. शांत बसतो. विचार करतो. मित्रांना शिव्या घालतो. दंगा करतो. तिच्याचसमोर बसून मी हजारो पेंटिंग्ज रंगवली असतील आजवर. अमिताभ बच्चनपासून विंदा करंदीकरांपर्यंत आणि श्रीदेवीपासून राशीद खानपर्यंत किती स्नेही आले माझ्या घरात; तेही त्याच गादीवर गप्पांना बसले.

..आता माझे दोन नातू त्या गादीवर खेळतात.

आज शांताबाई असत्या तर आम्ही दोघांनी त्या गादीवर बसून मजेत दोन-दोन ‘तुंबाड’ खाल्ले असते..

Story img Loader