‘तीन पैशाचा तमाशा’ च्या पहिल्या तालमींमध्ये नाटकाच्या आरंभी (पाश्चात्य ऑपेराच्या प्रील्यूड-पूर्वरंगाच्या धर्तीवर) असलेलं ‘तीन पैशाचा तमाशा’ हे गाणं सांगीतिकदृष्टय़ा पक्कं करताकरता त्याच्या सादरीकरणाच्या दृष्टीनं विविध नृत्य/नाटय़ात्मक रचनांची बांधणी व्हायला लागली. आणि एका क्षणी दिग्दर्शक पटेलांना वाटलं की, जर नावापासून नाटकाच्या सादरीकरणाच्या शैलीपर्यंत तमाशा या लोककलाप्रकाराचा आधार घेतलाय, तर तमाशाच्या पारंपरिक पद्धतीनंच या नाटकाची सुरुवात व्हायला हवी. तेव्हा त्यांनी अशी कल्पना मांडली की, एकाच नाटय़गृहाचं एकाच कालखंडाकरिता हिंदी चित्रपटगाणी सादर करणारा ऑर्केस्ट्रा आणि तमाशापार्टी यांना चुकून आरक्षण दिलं गेलंय. त्यामुळे सुरुवातीला हमरीतुमरीवर आलेले दोन्ही गट रसिक मायबापांचा मान राखत एकत्रितपणे त्याचं मनोरंजन करायचं ठरवतात. गणगौळणीच्या प्रस्तावनेनंतर तीन पैश्याचा तमाशा या वगाच्या कथानकस्थळाचं- मुम्बापुरीचं वर्णन करत तिथं नांदणाऱ्या सुरामाराचा उल्लेख करणाऱ्या कटावाची ‘सुन्दरी गंऽ गंऽ गंऽऽऽ, रंगू तू राधा गं ऽ, साळू तू मोहना नारीऽऽ’’ अशी झील टिपेला जाताना अचानक रंगमंचावर काळोख होतो आणि ‘तीन पैशाचा तमाशा’ हे गाणं सुरू होतं..
अशा तऱ्हेनं नाटकाच्या तालमी मोठय़ा उत्साहानं, जोमानं सुरू झाल्या. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मंडळी हजर होत. आदल्या दिवशी शिकवलेली नवी गाणी सादरीकरणासह आणि गद्य संवाद यांच्या तालमी मी आणि सहायक दिग्दर्शक चंद्रकांत काळे घेत असू. मुक्काम दौंड येथील त्याची डॉक्टरी संपवून साडेदहाच्या सुमारास दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे तालमीच्या जागी पोहोचत. त्याच दरम्यान संगीतकार चंदावरकर येत आणि मग नवी गाणी वगैरे..
पण हळूहळू चंदावरकरसरांचं येणं अनियमित व्हायला लागलं. त्यांनी दिलेल्या काही चाली दिग्दर्शक पटेलांच्या अपेक्षांवर उतरेनात. पुरेशा प्रभावी वाटेनात. त्यामुळेही असेल कदाचित- पण त्यांना एकूणच ‘तीन पैशा’ त स्वारस्य वाटत नाहीये, असे जणू संकेतच त्यांच्याकडून येऊ लागले.
झालं असं होतं की – अंकुश नागावकर या गुन्हेगारी विश्वाच्या म्होरक्याच्या भावविष्कारासाठी डॉ. पटेलांना तेव्हा पॉप संगीताचा प्रभाव असलेल्या हिंदी चित्रपट संगीताच्या- (विशेषत: आर. डी. बर्मन यांनी रुजविलेल्या) उसळत्या रक्ताच्या तरुणाईला झिंग आणणाऱ्या संगीतशैलीचा प्रयोग करावासा वाटत होता आणि चंदावरकरांचा बहुधा त्याला विरोध.. शिवाय स्वत: चंदावरकर हे अतिशय बहुआयामी, व्यासंगी प्रतिभावंत असल्यानं त्यांना अभिप्रेत असणाऱ्या ‘तीन पैशाचा तमाशा’ ची संगीतसंकल्पना आणि डॉ. पटेलांची अपेक्षा यांची सांगड घालणं त्यांना बहुधा मानवत नसावं, पण नाटक काय किंवा चित्रपट काय – तिथं दिग्दर्शकाचाच शब्द अखेरचा मानला पाहिजे.. मानला जातो.. आणि ते करणं त्यांना बहुधा अमान्य असावं.
परिणामस्वरूप त्यांच्या अनुपस्थितीमुळे अधिक वाट न बघता डॉ. जब्बार पटेलांनी मला त्यांना हव्या असलेल्या शैलीतल्या चाली संगीतबद्ध करण्याविषयी सुचवलं. मग सुरुवातीची गौळण असो किंवा प्रील्यूडमधल्या गजला असोत,  इथपासून मी संगीतकार म्हणून कार्यरत झालो.  काही गाण्यांचे दिग्दर्शकांना रुचलेले धृवपद चंदावरकरसरांचे, तर समस्यापूर्तीसारखे त्यांचे अंतरे मला नव्यानं स्वरबद्ध करावे लागले. उदा. स्वप्नात माझ्या मला वाटायचं.. (मालन – वंदना पंडित) किंवा असा गारगार वारा+ पटणार नाही (पंचपात्रे दाम्पत्य – डॉ. श्यामला वनारसे / चंद्रकांत काळे) पण मला सांगायला अभिमान वाटतो की गाण्यातलं प्रवाही एकत्व राखून मी ते करू शकलो. तसेच नंदू भेंडेची (‘अमुची प्रीत पुराणी’ वगळता) पॉपशैलीची सर्व गाणी म्हणजे
पु. लं नी लिहिलेले चक्क गद्यसंवाद होते. या गद्यसंवादांचं मी गाण्यात रूपांतर केलं. उदा. माझं नाव अंकुश नागावकर / माझी नवरी कशी नव्‍‌र्हस होऊन गेली ते../ हे ग्यांग्-वाले साले नमकहराम.. / पैसा ही महत्त्वाची गोष्ट../ माफ करा..
हा माझ्याकरिता एक नवा अनोखा अनुभव होता. स्वत:चा शोध घेण्याचा. आणि मी स्वत:ला नव्यानं सापडत गेलो. वेश्यावस्तीचा माहोल उभा करताना सारंगीच्या लेहऱ्यासह तबल्याच्या साथीत नृत्यांगनेचा आविष्कार.. कुठूनशी येणारी ‘नजरिया से सांवरेऽऽ हमे ना सतोओ’ या मीरा पुंडच्या स्वरातली ठुमरीची लकेर आणि माधुरीची जीवघेणी आलापी. हे सगळं एकाचवेळी सादर होई. एकदम स्टिरीओ इफेक्ट. झीनत तळेगावकर ही भूमिका माधुरी पुरंदरे अप्रतिम करायची-
‘लिखकर हमारा नाम जमींपर.. मिटा दिया..
उनका था खेल. खाक मे हमको मिला दिया..’
या मी संगीतबद्ध केलेल्या गजलेची पेशकारी माधुरीला खुद्द खासाहेब वसंतराव देशपांडे यांनी पु. लं. च्या घरी शिकवली. दर शनिवारी दुपारी भाईंच्या घरी मी, नंदू भेंडे, जब्बार पटेल, माधुरी, चंद्रकांत काळे अशी मैफील जमे. त्या आठवडय़ात नवीन झालेली गाणी भाई, सुनीताबाई आणि वसंतराव यांना ऐकवून त्यांची दाद घेताना आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना असे. या नाटकात एकच गाणं नंदू भेंडेनं संगीतबद्ध केलं ते म्हणजे-
‘झीनतची अन् माझी ..अमुची प्रीत पुराणी’
नंदूची ही अप्रतिम पॉपशैलीतली संगीतरचना आणि यावर मी स्वरबद्ध केलेलं- ‘जगायेगळ्या विफल प्रीतीची.. ऐका करुण कहाणी
अमुची प्रीत पुराणी.. अमुची प्रीत पुराणी’
हे बैरागी रागात बांधलेलं झीनतचं लावणीबाजाचं मनोगत- असा दोन भिन्न संगीतशैलीचा सुंदर संगम असलेलं हे गाणं दुसऱ्या अंकाचा उत्कर्षबिंदू असे. तत्पूर्वी ‘तेरे नामपर नौजवानी लुटा दी..’ या कव्वालीला माधुरीनं हमखास टाळ्या घेतलेल्या असत. तर पु. लं. नी लिहिलेला एक फटका-
‘ऐका दोस्तांनो भरल्या पोटी.. शंभर टक्के गोष्ट खरी.
एक बात मज सांगा आधी.. माणूस जगतो कशावरी’
अत्यंत गतिमान जोशपूर्ण आधुनिक पॉपशैलीत ड्रम्स, कोंगो, इलेक्ट्रिक गिटार्स, सिंथेसायझर यांच्या साथीत अन्वर, रवी आणि नंदू गाताना तीन संवादी स्वरावलीतून ‘माणूस जगतो कशावरी’ या ओळीतून स्वरांचं इंद्रधनुष्य उभं करीत. पाठोपाठ ढोलकीच्या कडकडीत तुकडय़ाबरोबर झीनत तळेगावकर (माधुरी पुरंदरे) ही वेश्या प्रवेशत-
‘कधीमधी जर मायभगीनींनो.. याल आमुच्या घरी
तुमचेच पती.. पिते.. भेटतील अमुच्या शेजेवरी
शरीर विकता उभा राहतो.. देव बनून भाकरी
सांगा आधी एक बात मज.. माणूस जगतो कशावरी..’
असा नागडा प्रश्न तमाशाअंगानं जाणाऱ्या सुरावटीतून विचारताना प्रेक्षकांना सुन्न करून  सोडी.
याशिवाय दोन दृश्यांना जोडणारे संगीतखंड – मग ती समूहस्वरातली आलापी असो किंवा वाद्यवृन्दावर वाजणारं पाश्र्वसंगीत असो- मी संगीतबद्ध करत गेलो.. चंदावरकरसर, अस्मादिक आणि नंदू भेंडे अशा तिघांनाही या नाटकाच्या संगीताचं श्रेय दिलं गेलं आणि ते योग्यच होतं.. नंदूचा सहभाग केवळ एका गाण्यापुरता नसून पाश्चात्य वाद्यवृंद संयोजनातही माझ्याबरोबर त्याचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
नाटकाच्या अखेरीस फाशीच्या तक्तावर चढताना अंकुश नागावकरचं साऱ्यांची क्षमायाचना करणारं ‘माफ करा..’ हे गाणं-संथ गतीत झुलणाऱ्या ड्रम्स आणि गिटार्सच्या तालावर कोरसच्या साथीनं उलगडताना – शोषितांच्या शोषणाबद्दल आणि शोषकांच्या क्रौर्याबद्दल जे भाष्य करी ते रसिक प्रेक्षकांच्या हृदयाला कुठेतरी भिडे. नाटकाच्या शेवटी सूत्रधार अंकुशला फाशीच्या दोरातून सोडवत-जीवनातलं मांगल्य, सौंदर्य वगैरे शोधणाऱ्या मायबाप प्रेक्षकांना-नाटकाचा सुखान्त + मंगलाचं जे परममंगल अशा श्रीविष्णूचं दर्शन- असा डबल बोनस देत शेवटी रवींद्र साठेंच्या भैरवीतल्या भरतवाक्यातून सल्ला देई-
‘अमुच्या भाळी उन्मत्तांच्या लाथा खात रहाणे
लाथा खाणाऱ्याहून लाथा देणारेच शहाणे
जाता जाता एक बात पण मनात घट्ट धरावी
लाथा खाता आपणहि एखादी ठेवून द्यावी
पाहिलेत जे इथे.. तुम्ही ते इथेच विसरूनी जाणे
अमुच्या या खेळातील हे तर एक पैशाचे गाणे’
समाजातल्या उपेक्षितांची ही व्यथाकथा खास पुलं-टच देत – हसत्या/गात्या भेदक विनोदीशैलीत मांडणारी भाईंची अप्रतिम संहिता.. डॉ. जब्बार पटेलांचे प्रतिभाशाली दिग्दर्शन, आम्हा तिघांचं अप्रतिम संगीत, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, नंदू भेंडे, रवींद्र साठे, अन्वर कुरेशी आदी गाननिपुण कलावंतांचा उच्च दर्जाचा स्वराभिनय, विजय जोशी, उमेश कुलकर्णी, उदय लागू, डॉ. श्यामला वनारसे, वंदना पंडित, हेमा लेले आदींचा बेमिसाल अभिनय.. आणि थिएटर अकादमीचं खास वैशिष्टय़ असलेली सफाईदार समूहदृश्ये आणि अत्याधुनिक ध्वनियंत्रणेसह (मदनकुमार/नंदू पोळ) परिपूर्ण तांत्रिक अंगे यामुळे केवळ मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीवर ‘परि यासम हा’ अशाच शब्दात ज्याचं वर्णन करावं लागेल ते ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक काळाच्या आधी- खूप आधी – जरी आलं तरी रंगभूमीच्या अमोघ सामर्थ्यांचं-अदृश्य शक्यतांचं भान तत्कालीन रसिकांना/ रंगकर्मीना देऊन गेलं..
पाच महिन्यांच्या अविश्रांत तालमीसह २५ जून १९७८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे संपन्न झालेला ‘तीन पैशाचा तमाशा’ चा पहिला प्रयोग आणि  त्याचे पुढचे अडीचशेहून अधिक प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सादर करताना त्यांच्याबरोबरच आमच्यासाठीही ती एक आनंदयात्राच होऊन गेली.    ( उत्तरार्ध )

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader