‘वास तिला वाळ्याचा.. पिकल्या पिकल्या आंब्याचा,
गार गार कुल्फीचा.. सुट्टी!!’
दोन आठवडय़ांपूर्वी ते छोटे छोटे चेहरे किती काळजीत होते! ‘कधी एकदा हा ट्रॅफिक जॅम सुटणार आणि घर lok02येणार?’ असं आपण म्हणतो ना.. तसंच त्यांचं झालं होतं.
टीव्हीबीव्ही झाला बंद
खेळबिळ सारे बंद
छंदबिंद सारे बंद.. बोंबलाऽऽऽ
लाटांवर आल्या लाटा गणिताच्या, भूमितीच्या
विज्ञानाच्या, भूगोलाच्या.. बोंबलाऽऽऽ
पाढे, सूत्रं, घोकू.. मेंदूमध्ये ठोकू.. पेपरमध्ये फेकू..
मग सुट्टी ऽऽऽ
या सगळ्या ट्रॅफिक जॅमला ओलांडून ही छोटी मंडळी ‘सुट्टी’ नावाच्या स्वर्गात येऊन पोचली आहे. बघा.. बघा.. त्यांचे चेहरे बघा.. रोज रोज गजर ऐकून रडतखडत उठून, डोळे बंद ठेवूनच दात घासणारे हे छोटे जवान आता किती छान गाऽऽढ झोपताहेत. गाढ झोपलेलं लहान मूल म्हणजे खरंच देवासारखं रूप. गेल्या दहा वर्षांत माझे कित्येक तास आमच्या शुभंकर, अनन्याला ते झोपलेलं असताना एकटक पाहत मी आनंदात जगलो आहे..
फक्त छोटय़ांचेच चेहरे नाही, तर सगळं जगच जणू परीक्षा संपवून निवांत टेकून बसलंय असं मला प्रत्येक मे महिन्याच्या सुटीत वाटतं. हवेत असलेल्या उष्णतेबरोबर एक वेगळा खास ‘मे महिन्याच्या सुट्टी’चा गंध असतो. दिवसभर मुलांचा चिवचिवाट, फुलांपेक्षाही मुलांनी फुलून गेलेली उद्यानं, कुठेही दहा-बारा फूट जागा मिळाली की जे उपलब्ध असेल ते साहित्य सर्वोत्तम मानून जीव तोडून क्रिकेट खेळणारे सगळे भावी सचिन, आमरस खाण्यापेक्षाही गाल, हनुवटी, कपडे आमरसानं रंगवून निवांतपणे गप्पा मारणारी ही छोटी मंडळी!
छोटय़ा दोस्तांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडताना पालकांच्या चेहऱ्यावरील रेषा मात्र विविध प्रकारच्या आहेत. काही पालक स्वत:लाच मे महिन्याच्या सुट्टीची प्रतीक्षा जास्त असल्यासारखे मुलांत मूल होऊन खूश आहेत. काहींना विविध प्रकारे सुट्टीचा उपयोग करायचाय. काहींना या छोटय़ा गुंडांचं आता दोन महिने करायचं काय, असा प्रश्न पडलाय. सहली, शिबिरं, व्यवसायवर्ग यांचे प्रवेश तर दोन महिन्यांपूर्वीच हाऊसफुल्ल झाले आहेत. काहींनी मुलांच्या हातात लॅपटॉप आणि फोन देऊन ‘तू मला त्रास देऊ नकोस.. मी तुला देत नाही..’ अशा पद्धतीने सुट्टीचा प्रश्न सोडवलाय.
झुकूझुकू आगीनगाडीमध्ये बसून मामाच्या गावाला जाणारी मंडळी आता तुरळक उरली आहेत. आता मुळात ‘हे दिवस आनंदात कसे जातील?’ यापेक्षाही ‘या दिवसांचा उपयोग कसा होईल?’ असा दृष्टिकोनातच मूलभूत फरक पडला आहे. सकाळी सात ते आठ- स्विमिंग, नऊ ते अकरा- नाटय़शिबीर, दुपारी- गायन, पेटी, जादूचे प्रयोग, कागदाच्या बाहुल्या इत्यादी, संध्याकाळी- क्रिकेट किंवा फुटबॉल, रात्री-टॉनिक घेऊन लवकर झोपणं.. असं वेळापत्रक बघितलं की वाटतं- शाळा बरी! अर्थात हे असं करावं किंवा नाही, हे सांगायला मी बालमानसशास्त्रज्ञ वगैरे नाही; पण माझ्या मुलांचा बेस्ट फ्रेंड असलेला बाप नक्की आहे. तेव्हा मला इतकं नक्की ठाऊक आहे, की मुलांना आपल्याशी बोलायचं असतं, बरंच काही सांगायचं असतं.. बहुतेक वेळेला ते ऐकायचं राहूनच जातं आणि पालकच सांगत राहतात की, आम्ही लहानपणी कसे दिवसभर पेरूच्या, आंब्याच्या झाडावर खेळायचो, आमचे बाबा कसे आम्हाला रोज स्तोत्र म्हणायला लावायचे.. आम्ही कसे स्वत:चं स्वत: खेळायचो, मित्रांबरोबर बागेत जायचो..
अहो, हे सगळं खरंय; पण ती कुठे म्हणताहेत, की आम्ही झाडांवर खेळणार नाही. द्या त्यांना अंगणात झाड.. देताय? अंगण आहे का मुळात? बाबा स्तोत्र म्हणायला लावायचे तेव्हा ते स्वत:पण म्हणायचे.. तेव्हा ते व्हॉट्स अ‍ॅपवर इकडचे विनोद तिकडे पाठवण्यात बिझी नसायचे. आणि आपण रस्त्यावर क्रिकेट खेळायचो तेव्हा पाच मिनिटांनी एकदा एक गाडी रस्त्यावरून जायची. आता पाच गाडय़ा रांगेत असतात प्रत्येक क्षणी. उगाच स्वत:च्या गोष्टी सांगत त्यांना त्रास देण्यापेक्षा त्यांना विचारू या, की तुला काय करावंसं वाटतंय? सतत फोडी करून काटय़ाने आंबा खायला लावून टिशू पेपरनी तोंड पुसण्यापेक्षा बरबटू दे त्यांना तोंड, कपडे.
अगदी परवा माझी लख्ख गोरी असलेली पाच वर्षांची भाची माझ्या बहिणीला विचारत होती, ‘आई, मी गोरी आहे का? मला सगळे गोरी आहे, गोरी आहे म्हणतात!’ मला पुन्हा एकदा जाणवलं की, ही छोटी मनं किती नितळ, किती खरी असतात. आपण त्यांना ‘हा गोरा, हा जाडा, हा श्रीमंत, हा आंधळा, हा मठ्ठ’ अशा संज्ञा शिकवतो. कुठल्याही छोटय़ा मुलाला उपजत ज्ञानाने ‘मॉल म्हणजे काय? महाग म्हणजे काय? पगार म्हणजे काय?’ हे माहीत नसतं. पण आपण मुलांना आठवडाभर वेळ देऊ शकलो नाही की आपल्याला अपराधी वाटू नये म्हणून मग पालकच मुलांना मॉलमध्ये घेऊन जातात. महागडय़ा वस्तू घेतात. आणि मग त्याची मुलांना सवय लागली की म्हणतात, ‘‘तुमची पिढी नुसती लाडावलीये.. आम्ही असे नव्हतो..’’ तुम्ही एकदा मुलांना नुसतं वाळूत, चिखलात, एक गलोल करून बागेत असं नेऊन पाह्यलंय का कधी?
कुठल्याही स्तरामधल्या मुलांना सगळ्यात जास्त आवडतं ते मातीत, वाळूत, झाडांवर, नदीत, ओढय़ात खेळायला. आपण निसर्गाशी तर वाईट वागतोच, पण निसर्गाचा सर्वागसुंदर आविष्कार असणाऱ्या लहान मुलांनाही निसर्गापासून तोडतो. प्रत्येक फुलाचा आपला गंध असतो, आपला रंग असतो. त्याला त्याच्या वेगानं फुलू द्यावं असं मला कायम वाटतं. अभ्यासाची मजा तेव्हाच येईल- जेव्हा त्यातून शिकलेल्या गोष्टी आयुष्यात जगताना पाहता येतील. प्रत्येक छोटं मूल कलाकार नाही होऊ शकत; पण त्याच्यातून उत्तम रसिक तर नक्कीच घडवू शकू आपण. सगळेच कसे नाटककार, नट, नर्तक होतील? पण उत्तम वाचक, समीक्षक तर होतील. सर्वोत्तम होऊन स्पर्धा जिंकण्यासाठी तयार करता करता त्यांचं हसू कुठंतरी हरवेल अशी भीती वाटते. भविष्यासाठी त्यांना तयार करायलाच हवं, त्यांनी त्यांच्या अंगातल्या सगळ्या शक्यता पडताळून बघायला हव्यात. पण हे सगळं एकदम नाही होणार. कोणी पाचव्या वर्षी चुणूक दाखवेल, कोणी बाराव्या. आणि कोणी फक्त उत्तम माणूस म्हणून जगून दाखवेल.. जे या सगळ्यापेक्षा अवघड असेल!!
या एकाच सुट्टीत उत्तम हॉकी खेळणारा, तबला वाजवणारा, जादूगार छोटा मुलगा तयार करण्याचा अट्टहास खरंच करावा का? आपल्या मनात सुट्टीचा जो रंग आहे, जो गंध आहे, तोच देता येईल का आपल्या मुलांना?
‘मधली सुट्टी’ कार्यक्रमात ज्यांना ज्यांना मी त्यांच्या शाळेत घेऊन गेलो आणि भूतकाळातल्या आठवणी जागवल्या, ते शाळेविषयी तर बोलायचेच; पण मे महिन्याच्या सुट्टीविषयीपण बोलायचे. आपण आपल्या मुलांना अशी सुट्टी देऊ शकू का, जी त्यांच्या कायम लक्षात राहील.. आणि मोठे झाल्यावर ते त्यांच्या भूतकाळाविषयी बोलताना पुन्हा पुन्हा बोलतील.. त्या ‘मे’ महिन्याच्या सुट्टीविषयी.. जी असेल अशी..
स स स सुट्टी स स स सुट्टी अ अ अ अ आभाळाशी ग ग ग गट्टी

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?