अमेरिकेत मुक्काम असताना एकदा बायकोच्या मत्रिणीला भेटायला गेलो. अर्थातच बायकोसकट. ३० वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेली ती कट्टर जैनधर्मीय मत्रीण अजूनही सहकुटुंब शाकाहारी होती. तिच्या पतिदेवांनी खीरीच्या वाटीला बोटही लावलं नाही. कारण विचारलं, तर तिकडून उत्तर आलं, ‘‘मी व्हेगन आहे.’’
‘‘अरेच्चा! मी समजत होतो की, तुम्हीपण जैन आहात.’’
‘‘आहेच की. माझा कुटुंबधर्म जैन. आहारधर्म व्हेगन.’’
मत्रिणीनं खुलासा केला, ‘‘व्हेगन म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ सेवन न करणारे शाकाहारी.’’
‘‘अरेरे! हे कधीपासून?’’
‘‘झाली दोन वर्षे.’’
‘‘मग चार महिन्यांपूर्वी मुंबईत आमच्या घरी आला होतात तेव्हा रबडीसकट रसगुल्ले कसे चाखले होते?’’ पतिपत्नी आणि तीन मुलं यांनी एकमेकांशी शर्यत लावून सगळेच्या सगळे रसगुल्ले हादडले होते आणि माझ्यासाठी एकही शिल्लक ठेवला नव्हता, हे शल्य मला अजूनही बोचत होतं.
‘‘कारण भारतातले दुधाचे पदार्थ घ्यायला हरकत नसते.’’
‘‘हा काय झमेला आहे?’’
‘‘कारण अमेरिकेतलं दूध नॉन-व्हेज असतं.’’
शॉक बसल्यासारखा मी थिजलो. काही उलगडाच होईना. दुसऱ्या दिवशी अमेरिकेतला आमचा ‘मेड इन इंडिया, सेटल्ड इन अमेरिका’ शेजारी त्र्यंबक धांदरफळे ऊर्फ टॉम डॅडफॉल्स त्याच्या घरासमोरचं गवत कापताना दिसला. त्याला थांबवून विचारलं. मशीन बंद न करता तो म्हणाला, ‘‘राइट यू आर. घर्र्र.’’
‘‘म्हणजे इथलं दूध म्हशीचं नसतं?
‘‘घर्र्र. करेक्ट. घर्र्र.’’
‘‘त्र्यंबक, सॉरी, टाऽम, मशीन बंद होईल का दोन मिनिटांसाठी?’’
‘‘ओके. टी ब्रेक! अदरखवाली चाय विथ टाऽम.’’
घरात येऊन तो डायिनग टेबलवर स्थानापन्न झाल्यावर मी विचारलं, ‘‘दूध म्हशीचं नाही तर कोणाचं? आणि नॉन-व्हेज दूध म्हणजे नक्की कोणत्या प्राण्याचं असतं?’’
बायको किंचाळली, ‘‘ई बाई! नॉन-व्हेज प्राण्यांचं म्हणजे कुत्र्या-मांजरांचं आणि अस्वला-डुकरांचंही दूध काढत असतील. या अमेरिकन धंदेवाल्यांचा काही भरवसा देता येत नाही. आजपासून मीपण वॅगनच होते कशी.’’
‘‘वॅगन नाही, वहिनी. व्हेगन. आणि इथलं दूध फक्त गायीचंच असतं. तुम्हाला रेग्युलर मिल्क नको असेल तर ऑरगॅनिक मिल्क घ्या.’’
‘‘ते तरी म्हशीचं असतं का?’’
‘‘नाही. चहात दूध आणि साखर नको. गूळ टाका भरपूर. खडा चम्मच गुळाचा चहा मारला नाही कित्येक वर्षांत.’’
‘‘ई! दाट दुधाशिवाय चहा खडा चम्मच कसा होणार?’’
मी विचारलं, ‘‘टाऽम, पण दूध का नको चहात?’’
‘‘बाहेरचं दूध नॉन-व्हेज असतं, म्हणून मी घराबाहेर दूध घेतच नाही. घरी ऑरगॅनिक दूधच आणतो.’’
‘‘ऑरगॅनिक दूध म्हशीचं नाही तर कोणाचं?’’
‘‘गायीचं. वहिनी, कुकीज खाऊन कंटाळा आला. सकाळी ब्रेकफास्टला बटाटेपोहे केले होतेत ना?’’
मी त्र्यंबकला मूळ मुद्दय़ावर आणला, ‘‘हे दूधसुद्धा गायीचंच? फरक काय मग दोन दुधांमध्ये?’’
‘‘ऑरगॅनिक दुधाच्या गाई शाकाहारी खुराक खातात. गवत वगरे.’’
‘‘मुळात गोमाता शाकाहारीच असते. सगळ्याच गाई चारा खातात.’’
‘‘नाही. अमेरिकन दुकानात जे रेग्युलर दूध मिळतं ते देणाऱ्या गाई शाकाहारी नसतात.’’
‘‘काय?’’ बायको किंचाळली. मीही किंचाळलो, असं वाटतं. पण रेल्वे इंजिनाच्या शिट्टीपुढे कुकरची शिट्टी कुकरच्याही कानात पडत नाही.
‘‘म्हणजे बटर चिकन, फिश करी, मटन चॉप वगरे खिलवता की काय गाईंना?’’
‘‘छे, छे! बटाटेपोहे फक्कड झालेत. िलबू नाही का घरात?’’
‘‘अरे हो. अमेरिकेतले पदार्थ वेगळेच असतात नाही का? चिकन नगेट्स, फिश अॅण्ड चिप्स, बर्गर.’’
त्र्यंबकनं माझ्या बायकोकडे पाहून म्हटलं, ‘‘तुमच्या मराठी मालिकांची वेळ झाली की.’’
बायको पायाला िस्प्रग लावल्यासारखी झपाटय़ानं वरच्या मजल्यावर गेली. त्र्यंबक म्हणाला, ‘‘इथल्या गाईंना दुप्पट दूध येण्यासाठी काय खायला घालतात ते वहिनींना ऐकवणार नाही.’’
माझं कुतूहल प्रचंड चाळवलं. ते चेहऱ्यावर लखलखीतपणे उमटलं. ते पाहून त्र्यंबक निरिच्छेनं राष्ट्रीय गुपित फोडायला राजी होऊन कुजबुजला, ‘‘डुकरांचं मांस, पोल्ट्रीच्या जमिनीवर सांडलेली कोंबडय़ांची विष्ठा आणि पिसं, मासे, कत्तलखान्यात मारलेल्या गाय-बल-वासरं यांचे निरुपयोगी अवयव आणि रक्त हे साहित्य वापरून गाईंचा खुराक बनवला जातो.’’
‘‘शी!’’ मी किंचाळलो. या वेळी माझी किंचाळी मलाच काय पण मालिकामग्न बायकोलाही ऐकू गेली. ती धावत आली. त्र्यंबक शांतपणे गुळाचा काळा चहा मिटक्या मारत पीत आपण त्या गावचेच नसल्याचा चेहरा करून बसला. मी बायकोला सारं काही आलबेल असल्याचं पटवून परत मालिकेत पाठवली.
त्र्यंबक कुजबुजला, ‘‘झाल्या ना गाई नॉन-व्हेज! जे खाल्लं, त्याचा अंश दुधात उतरणारच. म्हणून त्यांचं दूधही नॉन-व्हेज.’’
‘‘समजलं. म्हणूनच जैनसाहेब अमेरिकन दुधाला तोंड लावत नाहीत तर.’’ इथल्या गाई अमेरिकन नागरिक असल्यामुळे त्यांना ‘गोमाता’ हा अखिल भारतीय स्टेट्स द्यायचा की नाही याबद्दल माझ्या मनात घोळ असायचा. आता त्या शाकाहारी नसल्याचं उघड झाल्यामुळे गोमाता किताब आपोआप रद्द झाला.. पुढे ऐकणार? पिगफार्ममधल्या डुकरांना गोमांसापासून बनवलेलं खाद्य पुरवलं जातं.’’
‘‘डुकराला काय फरक पडतो? ते तर नॉन-व्हेजच असतं.’’
‘‘काय झालं? गहजब होतोय. गाईंच्या पोटात डुकराचं मांस गेलं आणि डुकरांच्या पोटात गायीचं मांस गेलं म्हणजे शेवटी गाईंच्या शरीरात गोमांस गेलं नाही का? वर्तुळ पूर्ण झालं. फिनिश्ड! माणसानं नरमांसभक्षक व्हावं तशा या गाई गोमांसभक्षक झाल्या. त्यामुळे त्यांना ‘मॅड काऊ’ यासारखे डेंजरस रोग होतात.’’
‘‘अरे बापरे!’’
‘‘पुढचं सांगतो. आणखी जास्त दूध येण्याकरता या गाईंना आरबीजीएच या हॉर्मोनची इंजेक्शनं दिली जातात. अशा गाईंच्या दुधामुळे लोकांना हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग होण्याचा धोका कित्येक पटीनं वाढलाय असं काही तज्ज्ञांचं मत आहे. म्हणून आता अमेरिकेतल्या सकस दूध तयार करणाऱ्यांनी कटाक्षानं त्यांच्या गाईंना ही इंजेक्शनं न देण्याचा आणि केवळ नसíगक खुराकच खिलवण्याचा निर्णय घेतलाय. असं दूध बाजारात ‘ऑरगॅनिक मिल्क’ नावानं मिळतं. साहजिकच त्याची किंमत खूप अधिक असते.’’
त्र्यंबक गेल्यावर तपशील वगळून मुख्य बातमी बायकोला सांगितली. ती धास्तावून म्हणाली, ‘‘दुधात पाणी आणि युरिया वगरे घालून भेसळ करतात, म्हणून भारतात अधूनमधून आरडाओरड होते खरी, पण अमेरिकनांची कॉपी टू कॉपी करण्याच्या नादात आपल्याकडेही गाई-म्हशींचं दूध अशा तऱ्हेनं दुप्पट-तिप्पट करण्याचं फॅड आलं तर आपल्याला पत्तासुद्धा लागणार नाही.’’