धबधब्यासारखे कोसळणारे शब्द, रातराणीतून झिरपणाऱ्या चांदण्यासारखे शब्द, काटेरी शब्द, हळुवार मोरपिसासारखे शब्द.. कधी बिलगणारे, कधी कान धरणारे, कधी आई होऊन दृष्ट काढणारे शब्द आणि कधी बाई होऊन वेड लावणारे शब्द. हळवे शब्द, वेडे शब्द, गोंडस शब्द, शाश्वत शब्द, उनाड शब्द, ओसाड शब्द, नवखे शब्द, वठलेले शब्द, रंगीबेरंगी शब्द.. आणि एकटे शब्द!! कधी रेनकोटवरून पावसाचं पाणी वाहून जावं आणि आत एकही थेंब येऊ नये, तसे नुसतेच वाहून जातात. कधी हातात हात घेऊन काही पावलं चालतात आणि मग आपल्या वाटेनं निघून जातात. कधी नुसतंच लांबून हसून निघून जाणाऱ्या अल्लड पोरीसारखे हुरहुर लावून जातात. आणि कधी मात्र असे सुटतात या शब्दांचे बाण, या ओळी, या कल्पना; की बाण आरपार जावा, जखमही दिसू नये, वेदनेची मजा यावी, आणि ती जखम आयुष्यभर जपून ठेवावी.
गाता गाता, वाचता वाचता आणि खरं तर जगता जगता समृद्ध करणाऱ्या अशा हजारो, लाखो मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत ओळी.. असे अपरिमित शब्द येऊन बिलगले की लहान मुलाच्या दोन मुठींत न मावणारी चॉकलेटं मिळावी तसे ते मी उराशी धरून असतो. आणि मग जाणवतं, की काही ओळी बाळासारख्या खांद्यावर डोकं ठेवून असतात. काही प्रेयसीसारख्या मिठीत शिरतात. आणि काही भुतासारख्या मानगुटीवर बसतात. सगळ्यांचाच आनंद तर वाटतोच; पण कळत-नकळत त्या आपले ‘नातलग’ होतात आणि मग वेळोवेळी कौतुकाची, धीराची, शृंगाराची सोबतही करतात. आपला हात धरून जगभर फिरवतात.. अगदी चंद्रावरही नेतात आणि मग चंद्रालासुद्धा वेगळी मिती देतात.
शांताबाई शेळकेंचे शब्द मला आजीच्या पैठणीसारखे वाटतात. ऊबदार, मऊ, सच्चे, प्रेमळ तरीही विरक्त. अगदी बालपणापासून चंद्राचे बदलते संदर्भ मांडणाऱ्या कवितेत शेवटी शांताबाई म्हणतात-
आणि परवा चंद्र पाहिला..
चंद्र पाहिला.. एकटाच फिरताना
जड पावलांनी आभाळ पार करताना
चंद्र थकलेला, खाली वाकलेला
वयाचे ओझे वाहून
– ओळखीचे उदास हसला
चंद्र माझ्याकडे पाहून.
आपलंच प्रतिबिंब बघतो ना आपण पावसात, चंद्रात आणि जगण्यातसुद्धा. कितीतरी तेजस्वी आजोबा, आजी आयुष्याच्या संध्याकाळी बागेत एकटे फेरफटका मारताना दिसतात. डोळ्यांत खूप काही असूनही शून्यांत बघणारे त्यांचे डोळे, सगळं काही उमगल्यावर येतं तसं उदास हसू.. मला नेहमी शांताबाईंच्या या ओळी आठवतात.
स्वत:शी किंवा स्वजनांशी या सगळ्या शब्दांविषयी गप्पा मारताना सूरपारंब्या खेळताना जशी कोणती पारंबी हाताला लागेल सांगता येत नाही तसंच एका कवितेवरून, एका ओळीवरून काय मनात येईल, हेही!!
उदास आजी-आजोबा म्हणता म्हणता बा. भ. बोरकरांच्या ओळी मनात आल्या..
‘आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे गोवीत ओवीत
त्याची ओढीतो स्मरणी’
सुंदर, उत्कट आठवणींची, पुन्हा पुन्हा आठवावे अशा क्षणांची जपमाळ ओढणारे हे आजोबा- आकर्षणाच्या, शारीर ओढीचा खळखळाट वाहून गेल्यावर आत्म्याचा आत्म्याशी संवाद घडावा तसे म्हणतात-
‘कधी पांगल्या प्रेयसी
जुन्या विझवुन चुली
आश्वासती येत्या जन्मी
होऊ तुमच्याच मुली..
आता विसाव्याचे क्षण..’
या ओळींना लतादीदींचा स्वर लाभला हे या शब्दांचं भाग्य! आणि हे शब्द व तो स्वर्गीय सूर यांचा संवाद माझ्यासारख्या छोटय़ाशा संगीतकाराला साधता आला, हे माझं भाग्य!!
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यापासून ते ‘जिणे गंगौघाचे पाणी’ असा विचार मांडणाऱ्या ‘बाकीबाब’ यांचे शब्द- आजोबांनी नातवाचे बोट धरून त्याला आयुष्याच्या गमतीजमती दाखवाव्यात तसे माझं बोट धरून मला कायम सोबत करतात.
जळणाऱ्या जळत राहा, जळतो सारेच आम्ही
जळण्याच्या लाख तऱ्हा, राख मात्र जास्त कमी..
या बोरकरांच्या ओळीसुद्धा सतत मनात घुमत राहतात.
दर पाच वर्षांनी पुन्हा एकदा नव्याने त्याच शब्दांना, ओळींना सामोरं जायला हवं असं मला कायम वाटतं. प्रत्येक पाच वर्षांनी आपण वेगळे घडत असतो आणि बिघडतही असतो. सोसत असतो, चालत असतो.
उंची न आपुली वाढते फारशी, वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा..
ज्यांच्याशी कवितेवर, शब्दांविषयी गप्पा मारण्याचं भाग्य मला कॉलेजवयात मिळालं त्या विंदांच्या या ओळी. विंदा सतत बरोबर असायला हवेत. प्रत्येकाचा झोपी जाऊ पाहणारा आतला आवाज जागा करायला विंदांचे शब्द; उगाच स्वप्नरंगांत बुडून हवेत उडू पाहणाऱ्यांना जमिनीवर आणणारे त्यांचे शब्द एखाद्या स्पष्टवक्त्या मित्रासारखे साथ देतात. ‘आपण बोलतो तो या क्षेत्रातला शेवटचा शब्द’ असं मिरवणाऱ्यांना-
‘जाणती जे सांगती ते ऐकुनी घ्यावे सदा
मात्र तीही माणसे, एवढे लक्षात ठेवा’ असं म्हणून माणूसपण जागं ठेवतात. सगळ्या श्रद्धा, अधिकार, नाती यांच्या पलीकडे ‘माणूसपण’ मोठं मानणारे विंदा आणि त्यांचे शब्द दीपस्तंभासारखे वाटतात.
‘माणूसपण’ हा उल्लेख केल्यावर गेली जवळजवळ २०-२२ वर्षे माझ्या मानगुटीवर बसलेल्या आरती प्रभूंची आठवण झाली. आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता त्या उत्तरांमधून पुन्हा एकदा प्रश्न उभे करणारे चिं. त्र्यं. खानोलकर!
दगड लागता रक्त भळभळे इतुके ठाऊक
माणूस म्हणजे काय नक्की, ते नव्हते कळले..
या दोन ओळींमध्ये माणूसपणाविषयी खूप काही सांगता सांगता पुन्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण करणारे खानोलकर..
‘देवे दिलेल्या जमिनीत आम्ही
सरणार्थ आलो; शरीरेही त्याची
दरसाल येतो मग पावसाळा :
चिंता कशाला मग लाकडांची?’
अनेक पिढय़ांमधील अनेक मंडळींच्या मानगुटीवर कायमच्या बसलेल्या या आणि अशा खानोलकरांच्या अनेक ओळी! आणि हा कवी फार कमी वयात या जगाच्या गर्दीतून निसटला, तरीही खूप काही सांगून गेला. आजच्या इव्हेंट्सच्या जमान्यात काय वाटलं असतं खानोलकरांना? खूप खूप प्रतिभा असली की ती घेऊन जगतानाची वेदना जाणवते त्यांच्या प्रत्येक शब्दांत. ती कविता काव्यसंग्रहासाठी नव्हती. गाण्यासाठी तर नव्हतीच. तो त्यांचा श्वास होता.. आणि त्यांना झालेला त्राससुद्धा.
असे हे शब्द प्रवासात, सुन्न रात्रींत, रंगमंचावर एकाकी असताना खूप काही देत असतात. शब्दांशी झालेल्या भेटींविषयी भरभरून बोलावंसं तर वाटतं; पण एकीकडे असंही वाटतं, की हा प्रवास ज्याचा त्याचा एकटय़ाचा असतो.. आणि असावा. पण तरीही ज्या शब्दांनी, कवितांनी माझ्यावर गारूड केलं, त्या शब्दांची तुम्हा मित्रांशी गाठ घालून द्यावीशी वाटते. तुम्हीही यातलं काही कुठेतरी खोल जपून ठेवाल. कारण..
प्रत्येकाला कवळायचा असतो
आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातांत,
ते न जमल्यास निदान
वेचायचे असते चिमूटभर चांदणे तरी
जे डबीत ठेवायचे असते जपून
आणि दाखवायचे असते म्हातारपणी पोराबाळांना
एक अपूर्वाईची चीज म्हणून!
..पुन्हा शांताबाईंच्या शब्दांशी येऊन थबकलो. पुन्हा एकदा आनंद.. पुन्हा एकदा वेडावून जाणं.. पुन्हा कृतज्ञ..!!
मला भेटलेल्या शब्दांशी आणि मला जाणवलेल्या, मी अनुभवलेल्या त्या दोन शब्दांमधल्या अवकाशाशी माझा संवाद पुढच्या काही लेखांतून मांडावासा वाटतोय.. तुम्हा रसिकांसाठी! (क्रमश:)
सलील कुलकर्णी – saleel_kulkarni@yahoo.co.in
शब्द एकेक ‘असा’येतो की!!
धबधब्यासारखे कोसळणारे शब्द, रातराणीतून झिरपणाऱ्या चांदण्यासारखे शब्द, काटेरी शब्द, हळुवार मोरपिसासारखे शब्द.. कधी बिलगणारे, कधी कान धरणारे, कधी आई होऊन दृष्ट काढणारे शब्द आणि कधी बाई होऊन वेड लावणारे शब्द.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 28-06-2015 at 12:28 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Words come