कोणत्याही राजकीय पक्षानं हाक दिली, किंवा कोणत्याही धर्मपीठानं हाक दिली तर हातात काठय़ा-लाठय़ा घेऊन धावणारी पोरं कलेला सामोरी गेली तर बदलतील का?  शक्यता नाकारता येत नाही. स्वत:ला व्यक्त करण्यासाठीच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या तर ते कदाचित आपल्या जगण्याचा विचार करतील.. आपले प्रश्न समजून घेतील. सृजनाचा खळाळता झरा त्यांच्यासमोर आला तर ही मुलं मरणाची, हिंसेची, विध्वंसाची वाट सोडतील. कदाचित निर्मितीच्या भावनेनं झळाळून उठतील.

फार पूर्वी आमच्या अभ्यासक्रमात पंडित नेहरू यांचा एक धडा होता. त्यात त्यांनी भारतीयांच्या वेगवेगळ्या स्वभाववैशिष्टय़ांची चर्चा केली होती. जुन्या आणि नव्या परंपरांची सांगड घालणे, पाहुण्यांचं आदरातिथ्य करणे अशा वेगवेगळ्या वैशिष्टय़ांबरोबरच भारतीयांमध्ये असलेल्या सहिष्णुतेच्या भावनेचा नेहरू यांनी अतिशय सन्मानपूर्वक उल्लेख केला होता. आज या धडय़ाची आठवण झाली ती सगळीकडे वाढत चाललेली असहिष्णुता पाहून. खरं तर आपल्या देशात प्राचीन काळापासून वेगवेगळ्या वंशांचे आणि धर्माचे लोक आले. काही वसाहत करण्यासाठी, काही आक्रमण करण्यासाठी, तर काही प्रवासाच्या निमित्ताने आले. या देशातील मूळ लोकांबरोबर ते एकरूप झाले. या देशातील लोकांनीही त्यांची भाषा, संस्कृती, त्यांचा धर्म याविषयी आस्था दाखवली. काहींनी तर ती स्वीकारलीही. विशेषत: मोगलांच्या आक्रमणानंतर आणि ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीयांनी धर्मातर केलं. आपल्या मातीत जन्मलेला बौद्ध धर्मही अनेक देशांत स्वीकारला गेला. उर्दू आणि इंग्रजीसारखी भाषा आज आपलीच भाषा झाली आहे. त्यांची खाद्यसंस्कृती, वेशभूषा, कला, साहित्य यांना आपण आपलंसं केलं. अनेक ठिकाणी भाषासंकर आणि  संस्कृतीसंकर झाले. आजही जागतिकीकरणाच्या लाटेत होणारे परकीय देशांचे, विशेषत: त्यांच्या आíथक धोरणांचे आक्रमण आपण स्वीकारतो आहोतच. याबाबत आपण सहिष्णू आहोतच.
पण मग कधीतरी अचानक धर्म, भाषा, जात, पाश्चात्य संस्कृती, परंपरा यांसारख्या मुद्दय़ांवर माणसं का पेटून उठतात? आपला प्रांत, आपली भाषा, आपली जात, आपला धर्म, आपल्या देवदेवता आणि आपले नेते आपली दुखती नस का होऊन जाते? संशोधन करताना किंवा चच्रेच्या दरम्यान त्यांच्याविषयी उच्चारलेला एखादा शब्द, एखादं वाक्य किंवा एखाद्या चित्रकारानं किंवा व्यंगचित्रकारानं काढलेलं एखादं चित्र, किंवा अगदी फेसबुकवरची एखादी कॉमेन्ट आपल्याला हातात लाठय़ाकाठय़ा घ्यायला का भाग पाडते? या साऱ्यांविषयी आपल्या मनात आदर असतो म्हणून? प्रेम असतं म्हणून? की कोणीतरी आपल्याला या वाटेवर येण्यासाठी भाग पाडतं म्हणून?
धर्म, भाषा, जात हे मुद्दे आहेतच; पण अलीकडे आपण आपल्या नेत्यांविषयी जास्त संवेदनशील झालो आहोत. समाजाला दिशा दाखवणारे, आपलं असं एक वैचारिक अधिष्ठान असलेले अनेक लोकनेते आपल्याकडे होते आणि आहेत. त्यातील काहींना आपण देवत्व बहाल केलं, तर काहींना आजही आपण माणूस म्हणूनच पूजतो आहोत. त्यांचे पुतळे बांधून किंवा त्यांची नावं रस्त्यांना, रेल्वेस्थानकांना किंवा विमानतळांना देऊन त्यांच्यावरचं आपलं प्रेम आपण व्यक्त करतो आहोत. अशा तऱ्हेनं प्रेम व्यक्त करणं वाईट नाही. पण त्यांच्यावरचं आपलं हे प्रेम कधी कधी इतकं टोकाला जातं, की या साऱ्या माणसांमध्ये आपल्यासारखाच राग, लोभ, वासना-विकार असलेला एक माणूस असल्याचं आपण विसरतो. आपण ज्याला आपला नेता मानलं आहे, आपला आदर्श मानलं आहे, त्याच्यात नेतृत्वगुण असतात, दूरदृष्टी असते, शहाणपण असतं. त्याच्यात अनेक बलस्थानं असतात. पण त्याशिवाय काही वैगुण्यंही असतातच.
महात्मा गांधींनी तर स्वत:च त्यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात त्यांनी लहानपणी केलेल्या चुका, त्यांच्यात असलेले वासनाविकार यांविषयी लिहून ठेवलं होतं. खऱ्या अर्थानं पारदर्शी असलेल्या या माणसानं स्वत:तल्या चांगल्या-वाईट गुणांचा हिशेब मांडला असल्यानंच त्यांच्याविषयी इतरांनी काही म्हणायचा प्रश्न येत नसावा. तसं नसतं तर अिहसेच्या या प्रणेत्याच्या अनुयायांनीही हातात काठय़ा घेतल्या असत्याच. हे जे लोक अनुयायी म्हणून पुढे येतात, त्यांच्याविषयी माझ्या मनात नेहमीच एक कुतूहल असतं. यातले किती सच्चे अनुयायी असतात आणि किती वापर करण्यासाठी आणलेले  असतात? ज्या महात्म्यांना ते आपल्या देशाची अस्मिता मानतात, त्या महात्म्याचा विचार त्यांनी पचवलेला असतो का? की केवळ राजकीय नेते, धार्मिक पीठांचे मुख्य, वेगवेगळ्या संघटनांचे नेते यांच्या हातातलं ते बाहुलं असतात? की आपल्या अस्तित्वासाठी भावना दुखावणाऱ्या घटनांची वाट पाहणाऱ्या नेत्यांचे आदेश मानणारे ते रोबो असतात?
कोणत्याही गोष्टींमुळे दुखावले जाणारे आणि संवेदनशीलतेच्या नावाखाली िहसाचार घडवून आणणारे, मारझोड, तोडफोड करणारे हे अनुयायी नेमके कोण असतात? खरं तर हे सारे लोक आपल्यातलेच असतात. आज सुशिक्षित तसेच अल्पशिक्षित बेकारांचा मोठा गट भांबावलेल्या, भरकटलेल्या मन:स्थितीत आहे. आपल्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी झालेली ही मुलं आíथकदृष्टय़ा दुबळी आणि मानसिकदृष्टय़ा खचलेली आहेत. अशी मुलं राजकीय पुढाऱ्यांच्या किंवा संघटनांच्या म्होरक्यांच्या हाताला नेमकी लागतात. त्यांना राजकीय स्वप्नं दाखवली जातात. बाकी काही नसलं तरी पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ही मुलं या स्वप्नांकडे ओढली जातात. विशेषत: आज ज्याच्या हाती सत्ता असते, तो स्वत:चं बऱ्यापकी भलं करून घेतो, हे गणित कळलेली ही मुलं मग कमीत कमी आपल्या गल्लीत सत्ता स्थापण्यासाठी या पुढाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनतात. आणि नेतेही त्यांना साधन बनवून आपलं ईप्सित साध्य करतात. राजकीय वातावरण तापत ठेवण्यासाठी लागणारी लाकडं या मुलांच्या रूपानं त्यांना मिळतात. आणि त्यांच्या धगीवर नेते मंडळी आपली पोळी शेकून घेत राहतात. या अशा आगीत जळणाऱ्या मुलांना अनेकदा आपण कोणत्या कारणासाठी िहसाचार घडवून आणतो आहोत याची कल्पनाही नसते. त्यांना वेगात दौडणाऱ्या सात वीरांच्या पंगतीत बसवलं की त्यांच्या मनातले घोडे फुरफुरायला लागतात. मग या घोडय़ांवर स्वार होऊन हे घोडेस्वार लढाईला निघतात. वाटेत येणारी नगरं, त्या नगरातील पुतळे, संशोधन केंद्रं, महाविद्यालयं, त्या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात लावलेली आणि त्यांच्या नेत्यांना न आवडलेली पुस्तकं जाळून टाकतात. त्यांच्या नेत्यावर व्यवस्थित उपचार न होणाऱ्या हॉस्पिटलची नासधूस करतात. या नेत्यांवर भाष्य करणाऱ्या लोकांवर हल्ला करतात. पोलिसांवर दबाव आणतात. त्यांच्या नेत्यांकडून सतत केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक विधानांवर नजर ठेवून असणारी ही मुलं या नेत्यांनी केवळ एक आदेश दिला तरी आपला जीव पणाला लावण्याची तयारी ठेवतात.
त्यांना आंबेडकरांनी कोणते विचार मांडले, किंवा शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रकारचे संयमी आणि हुशारीचे राजकारण केले, किंवा संभाजीराजांमध्ये एक संवेदनशील कवी दडला होता, याविषयी जाणून घेण्याची गरज वाटत नाही. कारण मुळात त्यांच्या नेत्यांनाच या जाणत्या लोकांसारखी समज नसते. त्यांच्यासारखं रयतेविषयी, देशाविषयी प्रेम नसतं. जात, धर्म, भाषा या गोष्टींचा उपयोग आपले राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी करायचा असतो, एवढंच त्यांना माहीत असतं. आणि त्यांच्या या पोरांना, स्वयंसेवकांना केवळ आदेश पाळणे यापलीकडे काहीच माहीत नसतं. या आदेशाचं पालन आपले कान, डोळे आणि सारासार विचार करणाऱ्या बुद्धीची दारं बंद ठेवून ते करत राहतात, असं एक चित्र नेहमीच दिसतं.
अर्थात ही नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू ही त्यांच्या आíथक, सामाजिक आणि मानसिक परिस्थितीशी निगडित आहे. अनेकदा केवळ अभावच पदरात घालणाऱ्या व्यवस्थेविरोधातला राग ते अशा तऱ्हेनं व्यक्त करत असावेत. पसा आणि सामाजिक प्रतिष्ठा याबाबतीत मागे पडलेली ही मुलं समाजात राहताना वाटय़ाला आलेल्या अवहेलनेमुळे मनातून अनेकदा दुखावली गेलेली असतात. मनात दाटून आलेली चीड व्यक्त करण्याचा मार्ग माणसाकडे राहत नाही तेव्हा तो अशा तऱ्हेनं व्यक्त होत जातो. मनानं कमकुवत झालेल्या अशा लोकांच्या भावना सहज पेटवल्या जाऊ शकतात. परप्रांतीय तुमच्या नोकऱ्या हडपताहेत, परभाषिक तुमची भाषा मारू पाहताहेत, दहशतवादी तुमच्या जीवावर उठले आहेत, तुमच्या धर्मावर संकट कोसळलं आहे, तुमच्या देवांविषयी, संतांविषयी, राष्ट्रीय नेत्यांविषयी वाईट लिहिलं जात आहे, कितीही मार्क मिळवले तरी तुमच्या वाटेचं अ‍ॅडमिशन आणि नोकरी मागासलेल्या जातींतले लोक पळवू पाहत आहेत, अशा गोष्टींचा नुसता उच्चार जरी केला, आणि त्याविरोधात रस्त्यावर उतरायची हाक दिली की ते ताबडतोब पेटून उठतात, दंगली घडवून आणतात.
जे पक्ष, ज्या संघटना एखाद्या वैचारिक बठकीवर उभ्या राहण्यापेक्षा अशा भावनिक प्रश्नांवर उभ्या राहतात, त्यांना हेच प्रश्न त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न वाटायला लागतात. याशिवाय लोकशाहीवर आज त्यांचा विश्वास राहिलेला नाही, हेही एक कारण आहे. आज कायदा सुव्यवस्थाच धोक्यात आली आहे. लाखोंनी पसे भरून नोकरीत गेलेले लोक कायद्यानं कसे वागणार? केवळ पोलीस खातं, शिक्षण खातं, जलसंपदा खातं, वीज मंडळ इत्यादी खातीच घोटाळे करतात असं नाही, तर आपली न्यायव्यवस्थाही यात मागे नाही. अशा परिस्थितीत भरडला जाणारा सामान्य माणूस  एखाद्या पक्षाच्या पंखाखाली आला तर त्याच्या हातात बळ येतं आणि ते बळ तो आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी किंवा मनातला सारा राग, उद्रेक िहसाचारातून व्यक्त करण्यासाठी  वापरतो.
अशा लोकांचं नेमकं काय करायचं? त्यांना या विध्वंसक मार्गापासून कसं परावृत्त करायचं, आणि विधायक कामात कसं आणायचं, या प्रश्नांवर अनेक उत्तरं आहेत. ती मानसोपचार तज्ज्ञांकडे मिळतात. या मुलांची बलस्थानं ओळखून त्यांना विधायक कामांत सहज आणता येऊ शकतं. फक्त ही मुलं योग्य माणसांच्या हातात सापडायला हवीत. वर्गात सगळ्यात जास्त मस्ती करणाऱ्या मुलाला मॉनिटर करून इतरांना शिस्त शिकवायला सांगितलं तर जे साध्य होतं, तेच कदाचित यातून साध्य होऊ शकेल.
‘प्रिय रसिक’ या पॉप्युलर प्रकाशनाच्या मासिक पत्रिकेत या महिन्याच्या अंकात ‘चाहूल नव्या दशकाची’ या सदरात यावेळी नव्या पिढीचे धर्मकीर्ती सुमंत यांनी एमिनेम व रॅप संगीत याविषयी एक लेख लिहिला आहे. रॅपमध्ये होणारा शब्दांचा वापर, कधी  विनोदी, कधी प्रेमकवितांच्या अंगानं जाणारं, तर कधी ओबडधोबड रचनेतून वेदना आणि ठसठसलेली ऊर्जा बाहेर काढणारे त्यातले शब्द, त्यात कालानुरूप झालेले बदल, ब्लॅकस्ची मक्तेदारी असलेल्या या प्रांतात एमिनेमसारखा गोरा शिरल्यावर होणारी आदळआपट (संकर) याविषयी ते बोलतातच; पण त्याचबरोबर या बदलांना आजच्या भारतीय समाजाच्या मानसिकतेशीही ते जोडून घेतात. ही सगळी चर्चा करताना शेवटी ते म्हणतात, ‘अनेक रॅपर हे मूळचे गुंड. पण त्यांना त्यांचा फॉर्र्म सापडला आणि गुंडगिरी थांबली.’ कला असा हस्तक्षेप  खरोखरीच करत असते. इथं ज्या तरुणांनी काही दिवसांपूर्वी सुहास पळशीकरांची विद्यापीठातील खोली फोडली, ते कुठली गाणी गात असतील? ते कुठले सिनेमे बघत असतील? त्यांच्या कलेतून त्यांचा राग व्यक्त होईल का? त्यांचं निरसन होईल का? कारण कला म्हणजे रचना, घाट, तत्त्वज्ञान, विचार, भावना, समीक्षा  हे सगळं करणं आलं. या प्रक्रियेतून गेल्यानंतर ते त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना अधिक ताकदीनं सामोरे जातील का? किंवा आपला प्रश्न नेमका कोणता आहे, असा विचार करतील का?
धर्मकीर्ती सुमंत यांनी शेवटी उपस्थित केलेले हे प्रश्न मला पडलेल्या प्रश्नांसारखेच आहेत. खरंच, आपल्याकडे कोणत्याही राजकीय पक्षानं हाक दिली, किंवा कोणत्याही धर्मपीठानं हाक दिली तर हातात काठय़ा-लाठय़ा घेऊन धावणारी पोरं अशा कलाप्रकारांना सामोरी गेली तर बदलतील का?  शक्यता नाकारता येत नाही. स्वत:ला व्यक्त करण्यासाठीच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या तर ते कदाचित आपल्या जगण्याचा विचार करतील.. आपले प्रश्न समजून घेतील. सृजनाचा खळाळता झरा त्यांच्यासमोर आला तर ही मुलं मरणाची, िहसेची, विध्वंसाची वाट सोडतील. कदाचित निर्मितीच्या भावनेनं झळाळून उठतील. काही तोडण्यासाठी, कोणाला मारण्यासाठी उठणारे त्यांचे हात लेखणी पकडतील, कुंचल्याला कुरवाळतील, सतारीवर किंवा गिटारवर थिरकतील, एखादं शिल्प घडवतील. त्यांच्या रागाचं, उद्रेकाचं विरेचन अशा पद्धतीनं  झालं तर सृजनाचा विध्वंसावर विजय होईल. आणि ही कलाच त्यांना त्यांचे आजचे नेमके कोणते प्रश्न आहेत, याचा विचार करायला भाग पाडेल.

Story img Loader