१३  जानेवारी २०१४ रोजी भारत पोलिओमुक्त झाला’ ही बातमी तुम्हाला कळली का? नसेलही कळली. या बातमीला बातमीमूल्य कोठे आहे? मी या मुक्तिसंग्रामाची एक ‘साक्षी’ आहे. जसे पाहिले, अनुभवले, तसे सगळे पहिल्यापासून सांगते.
८१-८२ साल असावे. आमचे शिक्षण  सुरू होते. आमच्या कॉलेजमध्ये वेल्लोरच्या सुप्रसिद्ध ‘जेकबजॉन’ डॉक्टरांचे व्याख्यान आयोजित केले होते. विषय होता ‘पोलिओमायलायटिस.’ ज्या आजाराचे जंतू फक्त माणसांमध्येच जगू शकतात आणि ज्या आजारासाठी परिणामकारक प्रतिबंध लस आहे, अशा आजाराचे पृथ्वीतलावरून समूळ उच्चाटन करणे शक्य असते. देवी हा एक असाच आजार. नुकतेच, १९७७ साली देवींचे समूळ उच्चाटन झाले होते. या विजयाने शास्त्रज्ञांचे बळ वाढले होते. आता पोलिओ या दुसऱ्या भयानक आजारावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. जेकबजॉन सर ओघवत्या भाषेत पोलिओविषयी बोलत होते. ‘पोलिओचे विषाणू आणि माणूस यातील हे छुपे युद्ध जिंकायचे असेल तर जगातील सर्व माणसांच्या शरीरात एकाच वेळी प्रतिकारशक्ती निर्माण करायला हवी. हे मोठेच आव्हान आहे, परंतु हे शक्य आहे. तशी प्रतिकारशक्ती ‘पल्सपोलिओ’ पद्धतीने निर्माण करता येते. पल्सपोलिओबाबत मी प्रथमच ऐकत होते. ‘झेकोस्लोवाकिया’ या देशात पल्सपोलिओ मोहीम राबवून पोलिओ निर्मूलन झाले, हे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा मी सावरून बसले.
माझ्या डोळय़ांसमोर वॉर्डातील पोलिओचे पेशंट आले. पोलिओचा पेशंट वार्डमध्ये नाही, असे क्वचितच घडायचे. साधा एक दिवस ताप यायचा. दोन-चार जुलाब व्हायचे. गावातील डॉक्टर एखादे तापाचे इंजेक्शन द्यायचे आणि इंजेक्शन दिलेला हात, नाहीतर पाय, नाहीतर हात-पाय दोन्हीही लुळे पडायचे. अगदी कायमचेच. या आजारावर कोणताही उपचार नव्हता, अगदी आजही नाही. इतकी छोटी छोटी निरागस बाळे कायमची अपंग झालेली पाहून दु:ख होई. हतबल वाटे. त्या मुलांना मात्र या भयानक वास्तवाचा आणि भविष्याचा स्पर्शसुद्धा नसे. लुळे झालेले हात-पाय ओढीत ती पूर्वीच्याच आनंदाने हसत खेळत खिदळत असत. ते पाहताना मन गलबलून जाई. या आघाताने आई-वडील मात्र उद्ध्वस्त होत. त्यांची मानसिकता जपणे हेच आमचे मोठे काम असे.
सरांचे व्याख्यान सुरू होते. सर फार तळमळीने बोलत आणि एकदम त्यांचा आवाज टिपेला पोहोचला, ‘‘मला एका मिराज विमानाच्या किमतीएवढे पैसे द्या. मी भारतातून पोलिओ नाहीसा करीन.’’ सारे सभागृह नि:शब्द झाले. भारतातून पोलिओ नाहीसा करीन? नाहीसा? माझ्या सर्वागावर सरसरून काटा आला. त्याकाळी भारताला युद्धसज्ज करण्यासाठी मिराज विमानांची खरेदी चालू होती. मला वाटले. ‘आता आपल्याला आपले ध्येय सापडले. आता एका मिराज विमानाच्या किमतीएवढे पैसे गोळा करायचे. कसेही करून. किती असते एक मिराज विमानाची किंमत? कोण जाणे. पण खूपच असणार.’ त्यावेळी मनात भाबडा आदर्शवाद होता. ‘आपण ठरवले तर काहीही करू शकू’ असा (वेडा)आत्मविश्वास होता. शिवाय ते वयही ‘Law boiling pointl चे होते. खूप पैसे ताबडतोब गोळा करण्याचे सर्व मार्ग मी कल्पनेने धुंडाळत राहिले आणि सगळय़ात शेवटी ‘सध्या चालू आहे ते शिक्षण पूर्ण करणे’ हा सर्वात लांबचा मार्ग असला तरी तोच योग्य मार्ग आहे, अशा निष्कर्षांपर्यंत आले. आज हा सगळाच वेडेपणा वाटत असला तरी कित्येक दिवस मी मनातल्या मनात खूप उडय़ा मारत राहिले खरी.
अर्थात पोलिओ निर्मूलनाचा प्रकल्प माझ्यासारखीच्या मदतीची वाट पाहात थांबला नव्हताच. जेकबजॉन सरांसारखे शेकडो डॉक्टर्स, लाखो कर्मचारी, रोटरी, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या जागतिक संघटना, अनेक स्तरांतून आलेली अब्जावधी रुपयांची मदत, साऱ्यांनी मिळून १९८८ साली पोलिओ निर्मूलनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी भारतात दरवर्षी दोन लाख मुलांना पोलिओ होत होता. दरवर्षी दोन लाख मुले, नव्हे दोन लाख कुटुंबे उद्ध्वस्त होत होती. १९९४ साली अमेरिका पोलिओमुक्त झाली आणि त्याच वर्षी भारतात जेकबजॉन सरांनी सांगितलेली ‘पल्सपोलिओ मोहीम’ राबविण्यास सुरुवात झाली. वर्षांतील विशिष्ट दिवशी विशिष्ट भूभागातील सगळय़ाच्या सगळय़ा पाच वर्षांखालील मुलांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजायचे, अशी ही मोहीम होती. पोलिओची लस तापमानाला फार संदेशनशील असते. ती ८ अंश से. खालीच ठेवावी लागते, नाहीतर निष्प्रभ होते. अशी ही नाजूक लस भारतासारख्या खंडप्राय आणि उष्ण तापमानाच्या देशात ठराविक दिवशी सगळय़ा मुलांना देणे हे सोपे काम नव्हतेच. अनेक अडचणी आल्या. काही लोकांनीही याला विरोध केला. कल्याणकारी गोष्टींचीसुद्धा बळजबरी केली तर त्यात काहीतरी काळेबेरे असणार असा लोकांना संशय येतो. पल्सपोलिओबाबतही अनेक गैरसमज पसरले. लोक मुलांना घरी लपवून ठेवू लागले. खोटे सांगू लागले. अतिरेकी धार्मिक गटांनीही विरोध केला. शिवाय स्थलांतरित मुले, प्रवासात असणारी मुले, ज्यांच्यामार्फत कर्मचारी पोहोचू शकत नव्हते अशी कितीतरी दूरवरच्या बेटांवरली, दऱ्याखोऱ्यातील जंगलपर्वतातील मुले डोस मिळाल्यापासून वंचित राहू लागली. परिणामी या मोहिमेला अपेक्षित यश मिळाले नाही. २००० साली चीन पोलिओमुक्त झाला, २००२ साली युरोप पोलिओमुक्त झाला. परंतु भारतात मात्र यश दृष्टिपथात येईना. २००९ साली तर जगातील पोलिओग्रस्तांपैकी निम्मी मुले भारतातील होती. पोलिओ निर्मूलनाबाबत भारत हा जगातील शेवटचा देश असेल असे कित्येक नामवंतांनी भाकीत केले.
पोलिओ मोहिमेने पुन्हा बळ एकवटले. अनेक उद्योजकांनी प्रचंड आर्थिक मदत केली. नावाजलेले कलावंत, खेळाडू यांनी जाहिराती करून विरोध असणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष बोलून पल्सपोलिओबाबतचे गैरसमज दूर केले. पल्सपोलिओच्या दिवशी रेल्वे स्टेशन बसस्टँड, हायवे, मोठय़ा जत्रा, बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कार्यकर्त्यांनी मुलांना डोस दिले.
या सगळय़ाचे यश दिसू लागले. १३ जाने. २०११ रोजी पोलिओ झालेली पश्चिम बंगालमधील रक्सार खातून पोलिओची शेवटची पेशंट ठरली. दोन वर्षांनंतर भारत पोलिओमुक्त झाला असे घोषित करण्यात आले आणि १३ जाने. २०१४ रोजी तसे प्रमाणपत्र देण्यात आले.
‘भारत स्वतंत्र झाला’ या बातमीइतकीच ‘भारत पोलिओमुक्त झाला’ ही बातमी मला महत्त्वाची वाटत होती. हा आनंद कसा व्यक्त करावा मला समजेना. त्या दिवशी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येकाला या ना त्या कारणाने विषय काढून ‘‘आज आपला भारत पोलिओमुक्त झाला, बरे का! केवढे मोठे यश आहे हे!’’ असे पुन:पुन्हा सांगत राहिले, कारण ते वाक्य पुन:पुन्हा ऐकताना माझे मलाच फार छान वाटत होते.
जेकबजॉन सर, तुम्ही १३ जानेवारीला काय केलेत? मला खात्री आहे, तुम्ही माझ्यासारखा नुसते बडबडण्यात वेळ घालवला नसेल. पोलिओ निर्मूलनाचा आनंद भारतीय समाजाच्या हातात ठेवून, त्यांचे दुसरे एखादे दु:ख नाहीसे करण्यासाठी तुम्ही हातात घेतलेही असेल.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा