उद्या. १४ जुलै रोजी फ्रेंच राज्यक्रांतीला २२५ वर्षे होत आहेत. १४ जुलै १७८९ रोजी या क्रांतीची पहिली ठिणगी पडली. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या क्रांत्यांपैकी  पहिली क्रांती म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीचे स्थान अनन्य आहे. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव’ या मूलभूत मानवी मूल्यांची त्रिसूत्री जगाला देणाऱ्या या क्रांतीने जगभरात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारांचे आमूलाग्र परिवर्तन घडवून आले. फ्रान्समधील राजेशाहीचा अंत, समाजवादी प्रजासत्ताकाची स्थापना, उदारमतवादी मानवी मूल्यांचा स्वीकार, सामाजिक बदलांचा प्रारंभ अशा अनेक गोष्टी या क्रांतीची निष्पत्ती होत.
‘ब्लिस वॉज इट इन दॅट डॉन टू बी अलाइव,
बट टू बी यंग वॉज व्हेरी हेवन!’ – वर्ड्स्वर्थ
माझा दुसरे महायुद्ध या विषयात असणारा तीव्र रस क्रांती या विषयाकडे कसा वळला याचे मला आज  स्मरण नाही. काहीतरी घटना आठवतात नि त्या दोन घटना परस्परांशी संबंध दर्शवतात. पहिले महायुद्ध संपले आणि त्याच्या अखेरीस ऑस्ट्रियन साम्राज्याचा अंत झाला नि रशियन क्रांतीला प्रारंभ झाला. दुसऱ्या महायुद्धातील जर्मन-रशियन घनघोर युद्धाची नि त्यातल्या झुकॉव्ह, कोनिव्ह रोकोकोव्हस्की या रशियन सेनानींची माहिती वाचली. तसेच जर्मन सेनानी माइन्टिन, पॅन्झर, लीडर गुडेरिन इत्यादींची माहिती वाचली. त्यामुळे रशियन क्रांतीचा इतिहास वाचणे अपरिहार्य झाले. सोव्हिएट युनियन कोसळल्यावर रशियन दफ्तरखाना अभ्यासूंना मुक्त झाला. त्याचा उपयोग एका इतिहासकाराने केला. त्याने दोन ग्रंथ लिहिले : ‘रोड टू स्टॅलिनग्राड’ नि ‘रोड टू बर्लिन.’ या ग्रंथांवर समीक्षकांनी सर्वोत्तम नि अधिकृत असा अभिप्राय दिला आहे. हे दोन्ही ग्रंथ माझ्या संग्रही आहेत.
क्रांतीबद्दल अ‍ॅरिस्टॉटल लिहितो की, ‘क्रांती ही क्षुल्लक गोष्टींनी होते. पण ती क्षुल्लक गोष्टींसाठी नसते.’ क्षुल्लक गोष्टींसाठी नसली तरी महान तत्त्वासाठी असते असे म्हणावे लागते. पण फ्रेंच क्रांतीच्या वेळी फ्रान्स आर्थिक, सामाजिक आणि सैनिकीदृष्टय़ा दरिद्री होता. मग तो सधन कशात होता? ‘बौद्धिकदृष्टय़ा’ हे त्याचे उत्तर आहे. युरोपला ज्याने भविष्यात बौद्धिक दृष्टीने आपले ऋणी करून ठेवले, त्याचे नाव होते डिदेरो. त्याने अफाट कष्ट केले. त्यात बुद्धिमंतांचे महत्त्वाच्या विचारांचे साहाय्य मिळवणे, मुद्रित तयार करणे नि ते छापखान्यात देणे, प्रुफे तपासणे अशी सर्व हमाली त्याने एकटय़ाने केली. एन्सायक्लोपीडियाचे कौतुक करताना मॅकॉर्थी लिहितो- ‘क्रांती निर्माण करणाऱ्या विचारांवर एन्सायक्लोपीडियाचा परिणाम अगणित झाला.’ व्होल्तेरइतकाच जवळजवळ तो मोठा होता. आणि क्रांती घडवून आणण्यात व्होल्तेरचा प्रभाव जितका कारणीभूत झाला, त्यापेक्षा अधिक प्रभाव रुसोचा झाला. येथे व्होल्तेरचा राजेशाहीची चेष्टा करणारा विनोद देणे उचित ठरेल. अशी एक वार्ता आली, की रिजंटने सरकारी खर्च कमी करण्यासाठी राजाच्या तबेल्यातील अर्धे घोडे काढून टाकले. तेव्हा व्होल्तेर म्हणाला की, ‘यापेक्षा दिवंगत राजाची दोन पायांची अर्धी गाढवे काढून टाकली असती तर अधिक बरे झाले असते.’ फ्रान्समध्ये सरदारवर्ग नि व्यापारीवर्ग सोडले तर फ्रान्सची आर्थिक स्थिती दयनीय होती. त्याची कल्पना पुढील परिच्छेद देतो- ‘व्हर्सायच्या दरबाराने लोकांचे डोळे दिपून जात. पण या ऐश्वर्यी राहणीने शासनाची आर्थिक स्थिती  डबघाईस आली. १६९० नि १७०९ मध्ये राजाला स्वत:ची चांदी-सोन्याची भांडी नि सिंहासन वितळवावे लागले. करांच्या बोजाने सामान्यजन वाकले होते. ला ब्रुयेरने तत्कालीन शेतकऱ्यांच्या स्थितीविषयी म्हटले आहे की, ‘स्त्री-पुरुष चिडलेल्या प्राण्यांसारखे होते. त्यांची त्वचा उन्हाने काळी पडली होती. द्राक्षे, ब्लॅक ब्रेड नि पाणी हे त्यांचे अन्न होते.’ ही चिडलेली माणसे रक्तपिपासू होण्यासाठी अजून एक शतक बाकी होते.
ती वेळ आली तेव्हा फ्रेंच शेतकरी दैन्याने अत्यंत ग्रासले होते.  सरदारवर्ग निव्यापारीवर्ग हेच तेवढे श्रीमंतीचे जीवन जगत होते. देशाची स्थिती सुधारावी यासाठी अनेक उत्तम सूचना केल्या जात होत्या, परंतु प्रत्येक सूचनेमध्ये एखादी गोष्ट एखाद्या वर्गाला बोचक ठरत असल्याने ती मान्य होत नव्हती. शेवटी स्टेटस जनरलची बैठक बोलवावी अशी सूचना पुढे आली. राजाने प्रथम तिला नकार दिला. पण काही काळाने त्याने ती स्वीकारली.
तथापि स्टेटस जनरलची शेवटची बैठक भरली त्याला तोवर दोनशे वर्षे झाली होती. त्या काळाची माहिती असणारा कोणीही नव्हता. परंतु लोकांत उत्साह होता. सर्व जिल्ह्यांतून जी माहिती मिळाली ती डोंगरभर होती. तिचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम लॉर्ड प्रिव्ही सील बारानॅंकडे सोपवण्यात आले. आणि मग स्टेटस जनरलचा आराखडा तयार झाला. आता त्यापुढची पायरी होती- निवडणुका. त्या झाल्या. त्यात निवडून आलेल्या सभासदांची संख्या १२१४ इतकी होती. त्यांत सरदारवर्ग होता, धर्मगुरूंचाही वर्ग होता. व्यापारी नि उद्योगपतींचा वर्ग होता नि सामान्य वर्गही होता.
स्टेटस जनरलच्या पहिल्या बैठकीपासून मतभेद, भांडणे, विवाद सुरू झाले. त्यातून भविष्यात घडणाऱ्या प्रसंगांची कल्पना मिराबोचे पुढील भाषण देते. तो म्हणाला, ‘आपण जे ऐकलेत ते लोककल्याणासाठी असू शकेल. परंतु हुकूमशाहीने दिलेली बक्षिसे नेहमीच धोकादायक असतात. तुम्ही सुखी व्हा, असा आदेश देणारे हे कोण? जनता स्वत:च्या सुखासाठी आपणाकडे पाहत आहे. चर्चेने आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. आपल्या देशाचे शत्रू दाराशी आहेत. तेव्हा मी असे सुचवितो की, घेतलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे तुम्ही वर्तन करा नि राज्यघटना तयार झाल्याशिवाय येथून हलू नका.’
पुढे राज्यघटना तयार झाली. स्टेटस जनरलने त्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने घटनेच्या प्रारंभी मानवी अधिकारांचा जाहीरनामा असावा अशी सूचना मांडली. थोडी वादावादी होऊन तो जाहीरनामा २७ ऑगस्ट १७८९ या दिवशी मान्य झाला. पण नीग्रो लोकांना या जाहीरनाम्यातून वगळण्यात आले. याबद्दल रॉबर्टसन नावाचा लेखक म्हणतो की, ‘भूतदयावादी लोकांपेक्षा मळेवाल्यांचे वजन असेंब्लीत जास्त होते. त्यामुळे नीग्रो वगळले गेले.’
या सर्व गोष्टी घडत असताना इतिहासात ठळक अक्षरांत लिहिला गेलेला प्रसंग घडला. तो म्हणजे बास्तिलचा पाडाव! बास्तिलचा किल्ला हा तुरुंग म्हणून वापरण्यात येत असे. व्होल्तेरला दोन वेळा या तुरुंगाची हवा खावी लागली. दुसऱ्या वेळी सुटायच्या वेळेला व्होल्तेरने गव्हर्नरला प्रश्न विचारला, ‘खोटे वॉरंट तयार करून कोणा व्यक्तीने दुसऱ्यास तुरुंगात कोंबले तर त्याला काय शिक्षा होते?’ गव्हर्नरने उत्तर दिले- ‘फाशी.’ यावर व्होल्तेर म्हणाला की, ‘खऱ्या दोषी माणसाला फाशी देण्याची कायदेशीर पद्धत चालू होत नाही तोपर्यंत ही जुनी पद्धत ठीक आहे.’
बास्तिलचा तुरुंग सामान्य जनतेच्या डोळय़ांत सलत असे. तिथल्या कैद्यांविषयी लोकांत विविध गावगप्पा सांगितल्या जात. आता एक गावगप्पा उठली की, बास्तिलमध्ये तोफा लावण्यात आल्या आहेत. चवताळलेल्या जनतेने त्यावर हल्ला केला. पण त्यात मूठभर कैदी होते. पण बास्तिल पडला ही युरोपला हलवणारी घटना ठरली. ती प्रसिद्ध झाल्यावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. रशियात सरदारांनी घरांवर रोषणाई केली. परराष्ट्रांच्या राजदूतांनी हषरेन्मीलित होऊन रस्त्यांवर एकमेकांना मिठय़ा मारल्या. हेगेलने नि गटेने ‘ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे,’ असे म्हटले. ‘बास्तिलचे पतन’ या नावाची तीन नाटके लिहिली गेली. अमेरिकेतही या घटनेचे कौतुक झाले. काही दिवसांनी कामगारांनी कुदळ नि फावडे यांच्या साहाय्याने बास्तिलचा तुरुंग जमीनदोस्त केला.
स्टेटस जनरलने सर्वात महत्त्वाची डिक्री पारित केली, तिचा परिणाम जगभर चिरकाल झाला. पोपच्या ऐहिक वर्चस्वाखालून धर्मगुरू मुक्त झाले नि निधर्मी शासनाची वाटचाल हळूहळू सुरू झाली. मात्र, ही डिक्री फ्रान्सची असल्याने फ्रान्स पूर्ण निधर्मी झाला. त्या डिक्रीचे नाव होते- ‘द सिव्हिल कॉन्स्टिटय़ूशन ऑफ द क्लर्जी.’ यापुढे धर्मगुरूंची निष्ठा पोपला असणार नाही, ती शासनाला असेल आणि त्यांचे पगार वगैरे शासन देईल, असे नियम डिक्रीत होते. (असे काही आपल्याकडे घडावे यासाठी भारतातील साम्यवादी नि इतर जहाल गटांनी काही कृती का केली नाही, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो.) डिक्रीचा दिनांक होता- २७ नोव्हेंबर १७९०.
आतापर्यंत छोटे-मोठे दंगे, मोर्चे, लूटमार इत्यादी गोष्टी घडल्या तरी फ्रान्सचे राजकारण कायद्याच्या चौकटीत होते. पण आता त्या राजकारणाने हिंसक मार्गाचा आश्रय घेतला. तो इतिहास प्रदीर्घ आहे. अशा प्रकारच्या अनेक घटनांनी फ्रेंच राज्यक्रांती घडली.
या क्रांतीच्या वेळी राजदम्पतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. नेपोलियनने त्याचे वर्णन पुढील शब्दांत केले आहे- ‘या अकल्पित ओझरत्या दृष्टिक्षेपाने जगाचा चेहरा बदलला.’ या पलायनाच्या प्रयत्नाचा अंत फ्रेंच राजा नि राणीचा गिलोटिनखाली शिरच्छेद करण्यात झाला. गिलोटिनचे काम मग वेगाने सुरू झाले. प्रथम जिरोदिन (मवाळ) पक्षाची पाळी आली. तो संपला. मग कमी जहाल लोक गिलोटिनवर चढले. या हत्याकांडाच्या पर्वाचा सारांश व्हिक्टर ह्युगो याने पुढील शब्दांत व्यक्त केला आहे : ‘सोळाव्या लुईला मृत्यूची शिक्षा देण्यात आली, त्या क्षणापासून जिवंत राहण्यासाठी रोबस्पिएरला अजून अठरा महिने बाकी होते. दांतोला पंधरा महिने, व्हेनिओला नऊ महिने, माराला पाच महिने नि तीन आठवडे, लपेलतीए सें फाजरेला एक दिवस.. मानवी मुखातून वेगाने नि भयंकर आवाज बाहेर पडत होते.’
शेवटचा जहाल नेता रोबस्पिएरचा अंत झाल्यावर फ्रान्समध्ये शांतता निर्माण करण्यासाठी डायरेक्टिरचे शासन स्थापन झाले. त्याची अल्पकाळची राजवट नेपोलियनने संपवली आणि त्याची राजवट सुरू झाली. तिला ‘नेपोलियन पर्व’ असे नाव देऊन फ्रेंच क्रांतीचा निरोप घेतो.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा