दाटला काळोख होता चहूदिशांना
नीरवाचा शाप होता वेदनांना
त्याच काळोखातुनी पण सूर आले
विंधलेल्या काळजाचे गीत झाले.
आंसवे माझीच. माझ्या मालकीची
आण त्यांना मूक सारे सोसण्याची
गाठूनी एकांत त्यांना फितूर केले
विंधलेल्या काळजाचे गीत झाले
लपविलेला एक वणवा अंतरात
अन् निखाऱ्याचीच होती पायवाट
नकळता पण अग्नीला त्या फूल आले
विंधलेल्या काळजाचे गीत झाले
कवी म्हणून माझी मलाच नव्याने ओळख होऊ लागली, त्या प्रारंभ काळातली ही एक महत्त्वाची कविता आहे.. तशी कवितेच्या या नव्या अनाहूत ओळखीची चाहूल मी माझ्या मूळ गावाकडे असतानाच सुरू झाली होती. पण त्या वेळी ती तेवढी लक्षणीय वाटली नसेल किंवा मीच त्या चाहुलीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं असणार. कारण आपल्या आतल्या सुप्त भावकल्लोळांना वाहतं करणं हा कवितेचा, विशेषत: आधुनिक मराठी कवितेचा प्रधान हेतू असला, तरी तेव्हाचा मी मात्र एकूणच कासवासारखा स्वत:ला आत आत ओढत राहणारा जीव होतो. नंतर बऱ्याच पुढच्या काळात एका कवितेत मी लिहून गेलोय..
मन ओथंबून मज सांगत होते काही
मी तसा चतुर ऐकून ऐकले नाही
ती ओढ आर्जवी ओलांडूनिया गेलो
मी कसा मनाच्या मनोगताला भ्यालो
पुढे हे सारं खूप बदललं, जी प्रक्रिया आजही चालूच आहे. पण एक निखालस सत्य की, गाव सोडून पुण्यात आलो तेव्हा मी खूपच वेगळा होतो. पंचविशी नुकतीच ओलांडली होती. पण आमच्या पिढीची खासीयत म्हणावी अशी वय १६/१७ ची कमसिन कोवळीक देहमनाला व्यापून होती. मस्तकात अहोरात्र शब्द आणि सूर पिंगा घालीत असायचे.. दिवस-रात्र अनाकलनीय स्वप्नांची माळ उलगडत असायची.. आणि तरीही आत खोल कुठेतरी अकाली येणारं प्रौढत्व पहुडलेलं अखंड जाणवायचं. बहरलेपण आणि करपलेपण या दोन टोकाच्या अवस्था जणू एकरूप होऊन सुखेनैव एकत्र नांदत होत्या. मुख्य म्हणजे कसलीही तक्रार काळजात धुमसत नव्हती. कारण आता आयुष्याचं सुकाणू पूर्णपणे मुठीत सामावलं होतं.. आणि दीर्घकाळ गुंडाळी करून निपचित पडून राहिलेल्या शिडातून पुन्हा वारा भरू लागला होता.
तेव्हाचं शहर पुणेही फार वेगळं होतं.. खूप मोकळाढाकळा परिसर मिरवणारं, आजच्या तुलनेत भलत्याच शांत, निवांत रस्त्यांची रेखीव नक्षी ल्यालेलं.. बालपणापासून उघडं आकाश, मोकळे माळ, मुबलक झाड-झाडोरा आणि डोंगरमाळ यावर पोसलेला माझा जीव-पिंड इथे पाहता पाहता हरखून आणि हरवूनही गेला.. तशा लाडक्या जागा खूप होत्या. पण बी.एम.सी.सी.कॉलेजचा परिसर ही एक विशेष आवडती जागा होती.. विशेषत: रात्रीच्या वेळी. अजून नवे सखे-सोबती जोडले गेले नव्हते. त्यामुळे खूपदा एकटाच तिथे जायचो.. तासनतास रमायचो. कॉलेजची सुबक तरीही प्रशस्त वास्तू.. समोर दोन्हीकडे सुंदर उतरते रस्ते, मधोमध भलं मोठं मैदान.. त्या मैदानात उतरायला अर्धवर्तुळाकार पसरलेल्या विस्तीर्ण सुंदर पायऱ्या.. जणू मैदानातले खेळ पाहण्यासाठी मुद्दाम केलेली दगडी गॅलरी. त्यावरून खाली उतरण्यापेक्षा त्यावर बैठक मारावी आणि समोरून अखंड येणाऱ्या वाऱ्याच्या लहरी अंगभर पांघराव्या.. तिथेच वर तीन-चार गुलमोहोराची झाडं होती आणि त्यांच्यामध्ये तीन मस्त फरशीचे बाक होते.. त्यातला मधला बाक विशेष आवडीचा होता. खूपदा रात्री तिथे मी बसलेला असायचो. समोर कॉलेज-परिसराची हृद्यसीमारेषा सूचित करणारी उंच वृक्षांची रांग.. आणि रस्त्यापलीकडे छोटी छोटी बैठी घरं.
संध्याकाळी हे सगळं स्पष्ट दिसत राहायचं. पण रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर रात्रीचा काळोख त्या सगळ्या परिसराला काही वेगळंच परिमाण द्यायचा. माझ्यासाठी रात्रीच्या वेळी ते सगळं दृश्य एक निराळाच आभास निर्माण करायचं. नुकतंच मागं टाकलेलं कुठलं तरी भावविश्व समोर साक्षात साकार झालंय, असं वाटायचं. मी मनाचा खेळ म्हणून सोडून द्यायचो. पण नंतर एक गंमत झाली. माझा चुलत भाऊ-सुहास-परगावाहून घरी आला होता. रात्रीची जेवणं आटोपल्यावर दोघे भटकायला बाहेर पडलो.. एकदम एक कल्पना आली. मी त्याला म्हणालो, तुला एके ठिकाणी नेतोय. तिथे बसल्यावर मी तुला एक प्रश्न विचारीन.. कुठलेही अवांतर प्रतिप्रश्न न करता तू फक्त तुझं असेल ते उत्तर द्यायचं. दोघेही माझ्या त्या आवडीच्या जागी गेलो. मधल्या बाकावर स्थानापन्न झालो. काही क्षणांनी मी त्याला म्हणालो. ‘आत्ता हे जे समोर दृश्य दिसतंय.. ते पाहून काय वाटतंय? काही भास होतोय का?’.. क्षणभर तो गोंधळला. मग काही काळ काही न बोलता फक्त समोर पाहात राहिला. मग हळूहळू त्याची मुद्रा थोडी उजळली. उत्तेजित स्वरात तो म्हणाला.. ‘गावच्या शाळेच्या व्हरांडय़ात आपण बसलोय. समोर आपलं खेळाचं मैदान. पुढे मिणमिणते दिवे दिसताहेत. त्यातून जी गल्ली जाते ती आपल्या घराकडे जाणारी..’ मी मनातल्या मनात एक लक्ष उडय़ा मारल्या.
तर अशा त्या विशेष जागी एका विशेष रात्री मी एकटाच बसलो होतो. खरं म्हणजे ती रात्र तशी रोजचीच होती. पण नंतर एकाएकी ती विशेष झाली. कारण काही आसभास नसताना, खोल खोल मनातले तंतू आपसूक काही तरी विणू लागले.. आणि पाहता पाहता एक कविता साकार झाली, ‘विंधलेल्या काळजाचे गीत झाले.’ मनात कविता उमटण्याचा पहिला अनुभव आरती प्रभूंनी फार सुंदर शब्दात मांडलाय. कितीही वेळा सांगितला तरी पुन्हा सांगितल्यावाचून राहावत नाही. ‘एखाद्या भिकारी पोराच्या डोक्यावर आकाशातून एकाएकी जरीची टोपी पडावी, तसं वाटलं.’ इतकं उच्च कदाचित नसलं, तरी मलाही कवितेचं ते अकस्मात अवतीर्ण होणं सुखावून तर गेलंच. पण त्याहीपेक्षा अधिक चकित करून गेलं. खरं तर भरल्या पोटी, शांत, निवांत, स्वस्थचित्त बसलो होतो. आत कसलाही कोलाहल जाणवत तरी नव्हता.. असलं तर भविष्याचं एक मूक आश्वासन होतं, जे केवळ माझं मलाच कळणारं होतं.
मग ही कविता कुठून आली? आज कळतं की, फार पुढच्या काळात शब्दबद्ध झालेल्या एका अनुभवाची ती पहिली चुणूक होती.
मी रित्या आभाळी रिता मेघसा होतो
शून्यात बिंब शून्याचे रेखित होतो
जागले काय? हे कुठले वारे सुटले?
शब्दांत..मनाचे.. थेंब दाटुनी आले ..
जाणीव आणि नेणीवेचे सूक्ष्म पापुद्रे म्हणजे काय ते बहुधा प्रथमच इतक्या निर्मळपणे उमगलं. ‘जाणीव-नेणीव / दोन्ही विलक्षण’ या कवि-उक्तीचा खोल अर्थ त्या क्षणापासून हळूहळू उलगडत चालला. आणि असंही वाटलं, या कवितेच्या रूपानं स्वत:चा आतल्या आत जणू पुन्हा नवा जन्म झालाय. (म्हणजे चक्क, ‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी’..) पण तरीही ती काही माझी पहिली कविता नव्हती.. ते श्रेय दुसऱ्याच एका कवितेवर कोरलं गेलं आहे.
पुण्यात येण्याच्या आधीच्या काळात ती कविता लिहिली गेली.. ती अनेकार्थी मला माझी पहिली कविता वाटते, कारण तिच्यातून प्रथमच मी आणि फक्त मीच व्यक्त होत होतो. तरीही कालपावेतो माझी अशी (गैर) समजूत होती, की ती कविता केवळ तेव्हाच्या भूतकाळाशीच निगडित आहे. आज मात्र कळतं की, त्या शब्दातून वाहणारी माझी तेव्हाची बेचैनी ही थेट माझ्या आंतरिक अस्तित्वाशी जोडलेली आहे, कायमची..
लाख हाते द्यावया आभाळ पुढती वांकले
ओंजळी पसरावया पण हात नसती मोकळे
स्वछंद वाटा धावत्या डोळे दिवाणे शोधती
रेशमी तंतूत पण हे पाय पुरते गुंतले ..
सागराच्या मत्त लाटा साद दुरु नी घालती
ओढतो जीवास वेडय़ा जीवघेणा तो ध्वनी
शीडभरल्या गल्बतातुन शीळ वारा घुमवितो
तीच वाटे येतसे जणू हांक अज्ञातातुनी .
सांग ओलांडू कसा पण हा वितीचा उंबरा
झेप घेण्याला जरी तू दान पंखांचे दिले
थांबता नां थांबती ही वादळे रक्तातली
मस्तकी नां मावणारे वेड तू कां घातले ?..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा