गणेश मतकरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘ओपनहायमर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी क्रिस्टफर नोलनच्या आधीच्या चित्रपटांचा महोत्सव भारतातील विविध शहरांतील चित्रगृहांत सुरू होता, इतका त्याचा दोन पिढय़ांचा चाहता वर्ग आपल्याकडे आहे. अणुबॉम्बच्या निर्मितीमागे ओपनहायमरची काय भूमिका होती, स्वत: एवढय़ा प्रभावी अस्त्राचा शोध लावणाऱ्या माणसाने पुढे अण्वस्त्रांविरोधी भूमिका का घेतली, तो देशभक्त म्हणायचा की देशद्रोही, या सर्वाची उत्तरं ही एक चाणाक्ष वकील असल्याच्या थाटात नोलनने दिली आहेत. त्यासाठी आधीच्या चित्रपटांवरून तयार झालेल्या या दिग्दर्शकाविषयीच्या कल्पना ‘ओपनहायमर’ पाहताना बाजूला सारणे आवश्यक ठरते..
हिरोशिमावर बॉम्ब पडल्यानंतर लगेचच घडणारा एक प्रसंग ‘ओपनहायमर’ चित्रपटात आहे. लॉस अॅलॅमोस मधल्या बॉम्बवर काम केलेल्या शास्त्रज्ञांच्या वसाहतीत ही ताजी बातमी पोहोचलेली आहे. अणुबॉम्बचा इच्छित परिणाम दिसला आहे आणि साऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं आहे. या वसाहतीचा आणि या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी ओपनहायमरने एक छोटेखानी सभा आयोजित केली आहे. टाळ्यांच्या गजरात ओपनहायमर खचाखच भरलेल्या हॉलमध्ये दाखल होतो आणि बोलण्यासाठी उभा राहातो. ‘वल्र्ड विल रिमेम्बर धिस डे.’ असं त्याने म्हणताक्षणी पुन्हा एकदा जल्लोष सुरू होतो. तो थांबून ओपनहायमर पुन्हा बोलायला घेणार एवढय़ात त्या शांततेत त्याला सूक्ष्म हादरे जाणवायला लागतात. दबलेल्या गडगडाटासारखा त्या हादऱ्यांचा आवाज यायला लागतो आणि मागची भिंत किंचित हलायला लागते. कदाचित हे त्याच्या मनाचे खेळ आहेत याची जाणीव झालेला ओपनहायमर थांबत नाही. तो सुचतं तसं बोलत जातो, पण पुढल्या वाक्यानंतर होणाऱ्या जल्लोषामागे दडलेली एक किंकाळी त्याला ऐकू येते. हादऱ्यांचा आवाज वाढायला लागतो, टाळ्या वाजवणाऱ्या हातांचा आवाज कोणीतरी ‘स्विच ऑफ’ केल्यासारखा बंद होतो. खोली त्या होऊन गेलेल्या स्फोटाच्या भयानक प्रकाशाने भरून जाते आणि ओपनहायमरला होणारे भास आणखीच वाढत जातात.
जर कोणी मला ओपनहायमरमधला सर्वात लक्षात राहिलेला प्रसंग कोणता असं विचारलं तर मी या प्रसंगाचं नाव घेईन. ‘ट्रिनिटी टेस्ट’ अर्थात अणुबॉम्ब चाचणी आणि त्या दिशेने जाणारा वीसपंचवीस मिनिटांचा भागही प्रभावी आहे, शिवाय ‘आय मॅक्स’ फॉरमॅटचा अधिक परिचित प्रकारचा उपयोगही या भागात होतो, पण तरीही भाषणाच्या प्रसंगात आपण ज्या रीतीने ओपनहायमरच्या डोक्यात थेट प्रवेश मिळवतो, ते मला तरी खूपच लक्षवेधी वाटलं. दृश्यात्मकता, ध्वनी आरेखन, अभिनय, आशय या साऱ्यांचा क्रिस्टफर नोलनने केलेला विचार इथे अधोरेखित होतो, आणि हा दिग्दर्शक आज प्रसिद्धीच्या इतक्या शिखरावर कसा, याचंही थोडं उत्तर मिळून जातं.
माझ्या आठवणीप्रमाणे मी क्रिस्टफर नोलनचा पहिला चित्रपट पाहिला तो त्याने फक्त दिग्दर्शित केलेला ‘इन्सोम्निआ’ (२००२ ). नोलनचा हा तिसराच चित्रपट होता, त्याने केलेला एकमेव रिमेक. तोवर त्याचं नाव फार कानावर पडायला लागलं नव्हतं, पण चित्रपट उत्तम आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी होता. या सुमारालाच ‘डीव्हीडी पायरसी’चं प्रमाण वाढत होतं, आणि जगभरातले उत्तमोत्तम चित्रपट, कधी नव्हे ते आपल्या हातात पडायला लागले होते. एक कालक्रमात उलटय़ा दिशेने प्रवास करणारा वेगळाच सिनेमा म्हणून कोणीतरी ‘मेमेन्टो’(२०००) रेकमेन्ड केला आणि मग तो शोधण्याची कसरत सुरू झाली. नोलनचं नाव आपल्याकडे मेमेन्टोने अधिक पसरलं, पण हा काही वेगळं करणारा दिग्दर्शक आहे असं वाटतंय न वाटतंय तोवर त्याने चक्क ‘बॅटमॅन बिगिन्स’ हा सुपरहिरोपट करायला घेतला, आणि त्याच्या नुकत्या तयार व्हायला लागलेल्या चाहत्यांना धक्का दिला. हळूहळू एक गोष्ट लक्षात येत गेली, की ‘फॉलोइंग’, ‘मेमेन्टो’, ‘प्रेस्टिज’ असे निओन्वार शैलीतले गडद चित्रपट असोत, बॅटमॅन त्रयीसारखे मुख्य धारेतले सुपरहिरोपट असोत, ‘इन्टरस्टेलर’, ‘टेनेट’ यांसारखे विज्ञानपट असोत, किंवा ‘डंकर्क’सारखा युद्धपट, क्रिस्टफर नोलन अपेक्षाभंग होईलसं काही करतच नाही. तो नवनवे चित्रपटप्रकार हाताळून पहातोय, आणि ते सारेच आपल्या वैशिष्टय़पूर्ण दृष्टिकोनातून मांडताना, त्याला स्पर्धा अशी उरलेलीच नाही. त्याच्या चित्रपटांमध्ये काही खास गोष्टी असतील असं आता निश्चित सांगता येतं. पात्रांच्या मानसिकतेचा विचार, काळ आणि मांडणीशी केलेले खेळ, अतिशय महत्त्वाकांक्षी आणि थोडक्यात मांडायला अवघड अशा संकल्पनांचा तितक्याच तयारीने केलेला वापर, अशा अनेक. ‘ओपनहायमर’च्या निमित्ताने तो ‘बायोपिक’ करणार, तीही अणुबॉम्बचा जनक मानल्या गेलेल्या जे रॉबर्ट ओपनहायमर या शास्त्रज्ञाची, हे जेव्हा कळलं तेव्हाही या कल्पनेचं मोठय़ा प्रमाणात स्वागतच झालं. तो ते करून दाखवणार याबद्दल कोणाला काही आश्चर्य वाटलं नाही. कसं करणार याबद्दल कुतूहल मात्र होतंच.
इथे आपल्याला एक गोष्ट पहायला हवी, ती म्हणजे ‘ओपनहायमर’ हा खरोखर चरित्रपट म्हणायचा, की नाही. ढोबळमानाने पहायचं झालं, म्हणजे ओपनहायमरच्या आयुष्यातल्या अनेक खऱ्या घटनांचा तो संदर्भ घेतो या अर्थाने पाहिलं, तर तो चरित्रपट आहे. काय बर्ड आणि मार्टिन शर्विन यांनी लिहिलेल्या ‘अमेरिकन प्रोमिथीअस- द ट्रायम्फ अॅन्ड ट्रॅजिडी ऑफ जे रॉबर्ट ओपनहायमर’ या अत्यंत अभ्यासपूर्ण चरित्रावर तो आधारित आहे, पण रचनेच्या दृष्टीने पाहिलं, तर त्याला नुसता चरित्रपट म्हणणं पुरेसं नाही. चित्रपटाची कथा आणि प्लॉट, या दोन गोष्टींमध्ये खूप फरक असतो. कालक्रमानुसार कथानकात जो काही घटनाक्रम पूर्ण तपशिलात असतो, तो म्हणजे कथा. तर चित्रपटात रूपांतर करताना दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि कथनात अभिप्रेत असलेला कार्यकारण भाव ओळखून ज्या रचनेत ही कथा बसवली जाते, तो असतो प्लॉट. इथे कथा म्हणून वापरलंय ते ‘अमेरिकन प्रोमिथीअस’ हे चरित्रच, कारण या पुस्तकातले अनेक महत्त्वाचे तसेच बारीकसारीक प्रसंगही नोलनने खुबीने चित्रपटात जागोजागी पेरले आहेत. कधी ते जीन टॅटलॉकबरोबरचे ओपनहायमरचे प्रेमसंबंध, हिरोशीमा-नागासाकीनंतर त्याची झालेली राष्ट्राध्यक्ष ट्रूमन बरोबरची भेट, असे महत्त्वाचे आणि नायकाच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे आहेत, तर कधी कोणाची उधृतं, एखाददुसरी सूचना , अनपेक्षित भेट, मिटिंग्ज अशा बारीकसारीक गोष्टींचाही वापर इथे करण्यात आला आहे. पण हे सारे प्रसंग क्रमानुसार येतात, किंवा नुसतेच आयुष्यातल्या घडामोडींचा जमाखर्च मांडतात, तर तो एरवीच्या चार चरित्रपटांसारखाच वाटला असता. मग तो वेगळा ठरतो ते कशामुळे? तर प्लॉटमुळे. मांडणीमुळे.
चित्रपटात वेगवेगळ्या काळात घडणारे दोन प्रमुख कथनप्रवाह आहेत, जे चित्रपटातल्या दोन प्रमुख व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनाचं प्रतिनिधित्व करतात. ओपनहायमर (किलीअन मर्फी), आणि त्याचा विरोधक अॅडमिरल स्ट्रॉज (रॉबर्ट डाउनी ज्यू.) यांच्या नजरेतूनच हा चित्रपट उलगडत जातो. ‘फिशन’ असं शीर्षक असलेला पहिला कथनप्रवाह ओपनहायमरवर चालू असलेल्या एका गुप्त चौकशीभोवती फिरतो. इथला काळ १९५४ चा आहे, ओपनहायमरने अणुस्फोटानंतर घेतलेली अण्वस्त्रविरोधी भूमिका, त्याला आता अडचणीत आणणारी ठरली आहे. ओपनहायमरच्या उत्तरांमधून मागे जात आपल्याला त्याचा संपूर्ण भूतकाळ, तसंच अणुबॉम्बची निर्मिती आणि चाचणी हा भाग पाहायला मिळतो. दुसरा; स्ट्रॉजचा दृष्टिकोन मांडणारा ‘फ्युजन’ या शीर्षकाचा कथनप्रवाह यानंतर चारपाच वर्षांंनी घडणारा आहे. हीदेखील एक चौकशीच आहे, पण गुप्त नाही. अॅटॉमिक एनर्जी कमिशनचा प्रमुख असलेल्या अॅडमिरल लुईस स्ट्रॉजची कॉमर्स सेक्रेटरी म्हणून नेमणूक करण्याआधी त्याला सिनेटसमोर बोलावण्यात आलंय. इथे स्ट्रॉजला विचारले जाणारे प्रश्न त्याच्या ओपनहायमरबरोबर असलेल्या मतभेदांबद्दलचे आहेत. इथेही प्रश्नांच्या अनुषंगाने आपण पुन्हा मागे जातो, आणि जे घडलं, त्याची एक वेगळी बाजू आपल्यासमोर ठेवली जाते. या दोन प्रवाहांना असलेली नावं, फिशन आणि फ्युजन, ही अणुविज्ञानाशी संबंधित आहेत. फिशन तंत्र अणुबॉम्बच्या निर्मितीत वापरण्यात आलं होतं, तर फ्युजन हायड्रोजन बॉम्बसाठी वापरलं जातं. हायड्रोजन बॉम्बला ओपनहायमरचा विरोध होता.
स्ट्रॉजचा कथनप्रवाह हा कृष्णधवल आहे, तर ओपनहायमरचा रंगीत. हे आवश्यक ठरतं ते प्रेक्षकाचा गोंधळ होऊ नये म्हणून. हे दोन प्रवाह एकमेकांत मिसळतात, अनेकदा एकच प्रसंगही आपल्याला दोन्ही प्रवाहात पहायला मिळतो, अशा वेळी रंगसंगतीतल्या बदलाने त्याचा अर्थ हा त्या त्या प्रवाहाशी सुसंगत असा लावणं शक्य होतं. चित्रपटाच्या सुरुवातीला स्ट्रॉज कोण आहे, चौकशा कोणत्या काळात सुरू आहेत, त्यांचा परस्परांशी काय संबंध हे आपल्या नीटसं लक्षात येत नाही, पण जसं हे जोडकाम आपण करायला लागतो, तशी दिग्दर्शकीय भूमिका स्पष्ट होत जाते. क्रिस्टफर नोलनला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. ‘इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं, तर रॉबर्ट ओपनहायमर हा संशोधक दोषी आहे की नाही?’ असा हा प्रश्न आहे.
अणुबॉम्बच्या निर्मितीमागे ओपनहायमरची काय भूमिका होती? स्वत: एवढय़ा प्रभावी अस्त्राचा शोध लावणाऱ्या माणसाने पुढे अण्वस्त्रांविरोधी भूमिका का घेतली? तो देशभक्त म्हणायचा का देशद्रोही? तो कम्युनिस्ट होता का नव्हता? असे अनेक लहानमोठे प्रश्न इथल्या चरित्रनायकाबद्दल लोकांना वेळोवेळी पडलेले आहेत. या सर्वांची उत्तरं ही एक चाणाक्ष वकील असल्याच्या थाटात नोलनने दिली आहेत. ओपनहायमर आणि स्ट्रॉज यांच्यातला पटकथेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रसंग घडतो, तो आइनस्टाइनच्या साक्षीने, आणि या प्रसंगातच दोघांमधल्या वितुष्टाचं मूळ आहे. हा प्रसंग निवेदनात पुन:पुन्हा येत राहातो, आणि शेवटी होणारा त्याचा उलगडा हा चित्रपटातला सर्वात हृद्य क्षण आहे.
ओपनहायमरबद्दल असं मत कुठेकुठे ऐकलं आहे, की तो आयमॅक्स फॉरमॅटमधे पहायची गरज नाही, तो नोलनच्या इतर चित्रपटांसारखा नाही, संथ आहे, वगैरे. असल्या आरोपांमध्ये मला काहीच तथ्य दिसत नाही. मोठय़ा स्केलचा फॉरमॅट हा काही केवळ साहसपटांसाठी, भव्य नेपथ्यासाठीच असतो असं नाही. नोलन, आणि इन्टरस्टेलरपासून त्याच्याबरोबर असणारा छायालेखक हॉइट वॉन हॉइटमा यांनी ओपनहायमरसारख्या बऱ्याच प्रमाणात इनडोअर घडणाऱ्या चित्रपटातही हा फॉरमॅट प्रभावी ठरवला आहे. बॉम्ब सीक्वेन्समध्ये तर पडद्यावरची भव्यता अपेक्षित आहे, पण क्लोजअप्सच्या सततच्या वापरातही ती उतरली आहे. ओपनहायमरच्या मनातला ताण दाखवणाऱ्या दृश्यचौकटी आणि बरोबर येणारा ध्वनी, यांचा वापर चित्रपटात सर्वत्र आहे. अपराधगंडाची भावना त्याच्याशी जोडलेली आहे. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या प्रसंगात हा वापर ठळकपणे येतो पण त्या प्रसंगापुरता तो मर्यादित नाही. आगीचे लोट, प्रकाशरेखा, मिसाईल ट्रेल्स, पाण्यावर उमटलेले (आणि एका ठिकाणी वेगळ्या अर्थासह नकाशावरही जाणवणारे) तरंग, डोळे दिपवणारा प्रकाश, अशा अनेक दृश्यचौकटी चित्रपटात विखुरलेल्या आहेत. त्या चित्रपटातल्या ताणाला मूर्तरूप देतात.
किलीअन मर्फी आपल्याला नोलनच्या चित्रपटात आणि इतरत्रही नियमितपणे दिसत असला, तरी त्याच्या चाहत्यांना तो खरा माहीत आहे, तो ‘पीकी ब्लाईन्डर्स’ मालिकेतल्या थॉमस शेल्बी या व्यक्तिरेखेमुळे. त्याला तुल्यबळ अशी भूमिका त्याने चित्रपटात आजवर केली नव्हती. ओपनहायमरने तो खराखुरा स्टार झाला आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनीअरने चॅप्लिन, होम्स, आयर्न मॅन केल्यावरही त्याला प्रेक्षकांना चकित करण्याची संधी देणाऱ्या आणखी भूमिका मिळतायत, आणि तोही त्या सराईतपणाचा भास होऊ न देता रंगवतो आहे. या दोघांना वगळता मॅट डेमन, एमिली ब्लन्ट, गॅरी ओल्डमन, केसी अॅफ्लेक, रामी मलेक, केनेथ ब्राना अशी ओळखीच्या गुणी नटमंडळींची मोठी यादी ओपनहायमरमध्ये आहे. त्यांच्या भूमिका लहान असल्या, तरी ते त्यात चपखल बसले आहेत.
‘ओपनहायमर’ चरित्र असण्याबरोबरच चर्चानाटय़ आहे, रहस्यपट आहे, व्यक्तिकेंद्रित चित्रपट आहे, इतिहासातली एक महत्त्वाची नोंद आहे, आणि एका मोठय़ा दिग्दर्शकाचं महत्त्वाचं पाऊलही आहे. ओपनहायमर असा असणार, या आपल्या मनातल्या कल्पना बाजूला ठेवून तो जसा आहे तसा पाहाण्याचा प्रयत्न आपण केला तर त्यातल्या अनेक जागा आपल्याला सापडतील. तो सोपा नाही, आणि नोलनच्या सवयीप्रमाणे तो आपल्याला लक्षपूर्वक पाहायला भाग पाडणार आहे हे उघडच आहे. नोलनच्याच एका प्रसिद्ध चित्रपटाची टॅगलाइन ओपनहायमरच्या प्रेक्षकांसाठीही उपयुक्त ठरू शकेल.
‘आर यू वॉचिंग क्लोजली?’
ganesh.matkari@gmail.com