एकदा काना-मात्रा आले हमरीतुमरीवर
ठिय्या मांडून बसले समोरासमोर!
मात्रा म्हणे, लिखाणात मी ठायी ठायी
काना म्हणे, उगाच बरळू नको काहीबाही !
साध्या खणातल्या ‘ख’ लागता होते खाण
मनातल्या ‘म’ला लागता होतो मान !
सगळ्या अक्षरांना करावा लागतो ‘आ’ माझ्यापुढे
सांग आहे का तुला महत्त्व माझ्याएवढे?
मात्रा म्हणे स्वत:शी- हसावे की रडावे
या ‘काना’ला माझे महत्त्व कसे सांगावे?
शब्दांवर जणू मोरपीस तिरपा माझा तुरा
बघ त्या शब्दांकडे होशील तू गोरामोरा!
अरे, नेट, भेट, ऐट माझ्यामुळे शब्द सारे थेट
आणखी काही बरेच सांगेन, नंतर येऊन भेट!
अनुस्वार दुरूनच पाहत होता गंमत
त्याने ठरवले, आपणही आणावी जरा रंगत!
बोले तो दोघांस अपुल्या अनुनासिका स्वरात-
कशास हो भांडता तावातावात?
म्हणे मात्रास तो- तुमच्यावाचून नाही घोडे अडत
तुमच्या जागी मी बसलो तरी फरक नाही पडत!
कुठे खोटे इथे तिथे नाते गोते असू द्या एके स्वरी
उडवुनी मात्रा कुठं, खोटं, इथं, तिथं, नातं गोतं मी करी!
धुंद, फुंद, मंद, गंध साकारती शब्द हे अनुस्वारे
मात्रेवरी माझीही मात्रा चाले परभारे!
स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह जमले एकत्र
प्रश्नचिन्ह म्हणे, उत्तरासाठी माझेच पाय धरावे लागेल मात्र!
सगळ्यांनी मग केला एकच हलकल्लोळ
विरामचिन्ह म्हणे मनाशी- थांबवावा हा पोरखेळ!
म्हणे ते- असे का येता घायकुतीला?
तुम्ही सारेच सजवता भाषेला!
तेव्हा द्या पूर्णविराम कलहाला सत्वर
करू या मराठी मायबोलीचा आपण सारे गजर!!
– चंद्रसेन टिळेकर