वाचकहो, आत्तापर्यंत या सदराअंतर्गत आपण वैचारिक आणि भावनिक कल्लोळामुळे मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या किंवा परिस्थितीची काही उदाहरणं पाहिली. प्रत्येक केसमधून त्या त्या व्यक्तीचे अविचार किंवा अविवेकी विचार सांगितले व विवेकी विचार कोणते, ते सुद्धा सांगितले. पण खरंच प्रत्यक्ष जीवनात इतकंविवेकाने जगणं कधी शक्य आहे का, असंही तुमच्या मनात आलं असेल. इतकं ‘विवेका’ने जगणं म्हणजे स्थितप्रज्ञासारखं जगणं असंही एखाद्याला वाटू लागतं. असं वागणं केवळ संतपदाला पोहोचलेल्या व्यक्तीकडून होऊ शकतं. इतकं ‘विवेका’ने जगणं म्हणजे जीवनात काही आनंदाला जागाच उरणार नाही, असंही कोणाला वाटलं असेल. पण मग, ‘विवेका’ने जगणं म्हणजे नेमकं काय? तर ही गोष्ट एका उदाहरणाने अधिक स्पष्टपणे समजून घेऊ या. आज अनेकांकडे कार किंवा दुचाकी वाहन तर नक्कीच असतं. मग कार चालवताना आपण काय करतो? मोकळा रस्ता दिसला किंवा एक्स्प्रेस वे ‘क्लीअर’ असला तर आपण वाहनाचा वेग वाढवतो. पण एक्स्प्रेस वे संपून साध्या हायवेला आलो की, वेग कमी करतो किंवा एक्स्प्रेस वेवर गाडी चालवताना (सुसाट) लेनचे भान ठेवतो. समोरच्या वाहनावर लक्ष ठेवतो. टोलनाका जवळ आला की, वेग कमी करतो वगरे वगरे. म्हणजेच काय तर आपल्या वाहनाच्या वेगाचं नियंत्रण आपल्या पायाकडून आपण करत असतो.
आपल्या वेगावर परिस्थितीनुसार योग्य तेवढं नियंत्रण-लगाम घालत असतो. घोडय़ावर बसल्यावर त्याचा लगाम आपल्याच हातात असतो की नाही? अगदी तसाच चौखूर उधळणाऱ्या विचारांच्या या घोडय़ाला किंवा सुसाट वेगाने धावणाऱ्या विचारांच्या गाडीला लगाम किंवा ब्रेक लावून त्यांना योग्य मार्गावर ठेवणं हेच या ‘विवेकवादा’त अभिप्रेत आहे. वाहन चालवणं जेवढं अवघड किंवा सोपं आहे तेवढंच हे विचार व भावनांवरचं नियंत्रण अवघड किंवा सोपं आहे.
शक्नोति ह वै य: सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधात् भव वेग: स: युक्त: सुखीनर:॥
कर्मसंन्यासयोगात गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सुखी माणसाची व्याख्या सांगितली आहे. जो आपल्या प्राकृत भावनांचं उद्दीपन नियंत्रित करू शकतो, तो खरा योगी, तो खरा सुखी माणूस आहे.
भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता म्हणजे फइइळचे जणू १८ सेशन्स आहेत. त्यातीलच कर्मसंन्यासयोगात सांगितलेली ही सुखी माणसाची किंवा ‘साक्षात योगी’ माणसाची व्याख्या खरोखरच चपखल आहे. आपल्या सर्वाचेच ‘सुखी होणे’ हे जीवनाचं ध्येय असतं. त्यामुळेच सुखी असणं म्हणजे नक्की काय, हे या व्याख्येतून कळतं. असाच एक खरा योगी ‘साक्षेपी योगी’ आपल्या सर्वाच्याच हृदयावर (मराठीच नव्हे तर सर्व भारतीयांच्या) युगानुयुगे विराजमान आहे, तो योगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!
वयाच्या १६व्या वर्षी छत्रपतींनी स्वराजाचं तोरण लावलं. त्यानंतर नांगर फिरवलेल्या पुण्यात आपल्या आईच्या-जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली सोन्याचा नांगर फिरवून पुण्यास आश्वस्त केलं. मावळच्या मुलखाला आपलंसं केलं. आजूबाजूचे गड-किल्ले आपल्या ताब्यात घेतले. स्वराज्य हळूहळू बाळसं धरू लागलं होतं. शिवराय व त्यांच्या मावळ्यांमध्ये आत्मविश्वास वाढू लागला होता. हीच बाब विजापूरच्या आदिलशाहीसाठी चिंतेची ठरू लागली होती. आताच बाळसं धरू लागलेला हा ‘पहाड का चूहा’ वेळीच ठेचला पाहिजे, यावर सर्वाचं एकमत होत होतं. मग यासाठी काय करावं, याचा बराच खल झाला. त्याचाच परिणाम म्हणून आदिलशाहीचीच चाकरी करणाऱ्या शिवाजीराजांच्या वडिलांना- शहाजीराजांना कैद केलं गेलं. नजरकैदेत ठेवण्यात आलं. ही खबर राजगडावर पोहोचताच सर्वानाच धक्का बसला. स्वराज्यावर आलेलं हे पहिलं राजकीय संकट होतं. एकीकडे वडिलांचा जीव तर दुसरीकडे त्यांचेही स्वप्न असलेल्या नव्या स्वराज्याचा जीव, कोणाला वाचवायचं हा यक्ष प्रश्न होता. कोवळ्या वयाच्या शिवाजीराजांवर किती ताण आला असेल? या वयातील दुसरी कोणीही व्यक्ती निराशेने ग्रासूनच गेली असती. शिवाजीराजेही नक्कीच काळजीत पडले, चिंतीत झाले असतील. पण त्यांनी त्यातूनही मार्ग काढला. त्यांनी चक्क मुघल बादशहा शहाजहानला आर्जवी पत्र लिहिले व मदतीची इच्छा व्यक्त केली. चक्क शहाजहाननेदेखील आदिलशहावर दबाव आणला की, शहाजीराजांना सोडावे अन्यथा त्यांच्यासाठी सामना करण्यास सज्ज व्हावे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या म्हणीप्रमाणे खेळी करून आपल्या पित्याचा व स्वराज्याचा दोन्हीचा जीव वाचवला.
पुढे स्वराज्यावरील प्रत्येक संकटात अगदी पुरंदरचा तह, आग्रा कैद वगरे सर्वच प्रकरणांत त्यांनी अशाच प्रकारे ‘साक्षेपी’ विचारांची-विवेकाची कास धरून मार्ग काढला. अर्थात म्हणूनच समर्थानी त्यांना ‘साक्षेपी योगी’ म्हणून त्यांचा गौरव केला.
शिवाजीराजांना आज आपण देवत्व प्रदान केलं असलं तरी ते एक माणूसच होते. (कदाचित म्हणूनच स्वराज्यावरील बाहेरची सर्व संकटं झेलणाऱ्या महाराजांना घरातूनच आलेल्या शीतयुद्धाने कोलमडून टाकले.) इतक्या लहान वयात विवेकाने वागणं म्हणजे खरंच किती कौतुकाची बाब आहे. अर्थात सातत्याने शंभर टक्के ‘विवेका’ने जगणं हे ‘विवेका’लाही अभिप्रेत नाही. किंबहुना त्याच्या व्याख्येत ते बसत नाही. प्रत्येक माणसाचा घोडा मध्येच भरकटू शकतो. पण विवेकाच्या लगामाने त्याला मार्गावर आणणं हाच खरा विवेक, खरा योग! म्हणूनच ‘साक्षेपी योगी’ असलेल्या शिवाजीराजांचं हे अनुकरण आपण नक्कीच करायला पाहिजे!