‘सख्खे शेजारी’ हा खेळ (रिव्ह्य़ू) जेव्हा मी बसवायला घेतला तेव्हा वेळेची मर्यादा पाळता यावी म्हणून एक-दोन प्रवेश बाजूला काढून ठेवावे लागले. रिव्ह्य़ूची हीच गंमत आहे. एकमेकांना पूरक, पण स्वतंत्र प्रवेश गुंफून ही मालिका बनवली जाते. चकचकीत, आकर्षक मण्यांची माळ. एखादा मणी ओघळला किंवा ओवलाच नाही, तर फारसा फरक पडत नाही. हे दोन प्रवेश स्वतंत्र होते. स्वायत्त. पुढे केव्हातरी आणखी प्रवेश लिहून ते त्यांना जोडता येतील, शेजाऱ्यांच्या नव्या कारवायांचा एक वेगळा रिव्हय़ू सादर करता येईल, असे मी मनोमनी ठरवले होते. तात्पुरते मी शेजाऱ्यांना बाजूला सारले. तात्पुरते. माझे वेळापत्रक गच्च होते. सिनेमा, टी. व्ही. आणि नाटक या तिन्ही माध्यमांचा आलटूनपालटून समाचार घेण्यात वेळ कसा संपून जाई, याचा पत्ता लागत नसे. चोवीस तास अपुरे पडत. या धुमश्चक्रीत शेजाऱ्यांना मी पार विसरून गेले. सुप्त संकल्प- संकल्पच राहिला. मध्यंतरी ‘माझा खेळ मांडू दे’ हे नाटक मी लिहिलं, बसवलं आणि ते प्रस्तुतही केलं. पण या गंभीर, समस्याप्रधान नाटकानंतर थोडी मरगळ आली. आता काहीतरी हलकाफुलका, मजेदार आणि रंजनप्रधान प्रकल्प हाती घ्यावा असं प्रकर्षांनं वाटू लागलं. काय करावं? आणि मग शेजाऱ्यांनी साद घातली- ‘आम्हाला विसरलीस?’ कशी विसरेन?
मी लेखणी सरसावली आणि शेजाऱ्यांच्या करामतींचे दोन-तीन नवे, स्वतंत्र किस्से लिहून काढले. पाहता पाहता एक नवा रिव्ह्य़ू तयार झाला. त्याला साधं बाळबोध नाव दिलं- ‘पुन्हा शेजारी.’
‘माझा खेळ..’च्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे माझा आत्मविश्वास बळावला होता. हा नवा खेळ स्वत:च- म्हणजे ‘कौतुक’ या संस्थेच्या अखत्यारीत सादर करण्याचा संकल्प मी केला.
निर्मातीची भूमिका पत्करल्यावर एक खास अनुभव प्रत्ययाला आला. काही उत्साही प्रेक्षक किंवा मुलाखतकार नाटक पाह्य़ल्या पाह्य़ल्या प्रश्न विचारीत- ‘या प्रस्तुतीमधून तुम्हाला ‘नेमकं’ काय म्हणायचं होतं?’ (‘नेमकं’ हा शब्द माझा. ते बहुधा ‘एक्झ्ॉक्टली’ म्हणत.) ‘अहो, मला जे काही म्हणायचं होतं, ते इतका वेळ माझ्या पात्रांच्या करवी मंचावर नाही का मी व्यक्त केलं? ते जर प्रतीत नाही होऊ शकलं आणि तुमच्यापर्यंत नाही पोचलं, तर लेखिका-दिग्दर्शिका म्हणून माझा आणि प्रेक्षक म्हणून तुमचा पराभव आहे. दुर्दैव आपलं! मला काय सांगायचं होतं, ते सांगून झालं आहे. आता पडदा पडला आहे. प्रत्येक माणसाला पकडून त्याला माझं मनोगत उकलून दाखवणं कसं शक्य आहे? तेव्हा क्षमस्व.’ हमखास झेलावा लागणारा दुसरा एक प्रश्न- ‘जनमानस-उन्नतीसाठी केलेल्या तुमच्या कलाकृतींचे तुम्ही मूल्यमापन करू शकाल?’ जनप्रबोधन, संस्कृतीनिष्ठा, सामाजिक बांधीलकी असे शब्द कानी पडले की मी हवालदिल होते. जनहित जपण्याचा कुणी मला मक्ता दिला आहे? ऊठसूठ संदेश देणारी मी कोण? इसापनीतीची आधुनिक आवृत्ती लिहिण्याचा माझा मानस नाही. माझी कलाकृती पाहून जर कुणाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं, कुणी प्रसन्न झालं, क्षणभर विसावलं, तर मी भरभरून पावते. मनोरंजनाला मी खूप महत्त्व देते. निकोप, निरोगी रंजनावर पोसलेली प्रजा तृप्त, आनंदी असते असा माझा विश्वास आहे. तेव्हा माझे लिखाण आणि दिग्दर्शन ही एक अखंड आनंदयात्रा आहे. हा, आता जाता जाता चार चांगल्या गोष्टी सांगता आल्या तर सोन्याहून पिवळं!
तर आता ‘पुन्हा शेजारी’ ही नवी संहिता हाताशी तयार होती. ‘सदाशिव’ सोसायटीच्या बिऱ्हाडक रूंनी आपली रंजनपात्रता सिद्ध केलेली होती. तेव्हा नव्या जोमाने या परिचित शेजाऱ्यांची नवी गाथा पेश करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली. शेजारी जरी तेच होते- तात्या, कृष्णा, जगन, निर्मल, मकरंद, शर्वरी- तरी काही कलाकार आता नवीन होते. प्रदीप वेलणकर, विवेक लागू, सचिन खेडेकर, रश्मी बडे हे कलाकार प्रथमच या खेळात सामील होणार होते. ठामपणे आठवत नाही, पण जुन्या नटांच्या इतरत्र व्यस्ततेमुळे हा बदल केला गेला असणार. परंतु या नवागतांनी तसूभरही कसर सोडली नाही. आपापल्या भूमिकांना उत्तम न्याय दिला. अरुण जोगळेकर (तात्या), रजनी वेलणकर (कृष्णा), प्रतिभा माथुर (शर्वरी) आणि अरुण होर्णेकर (आगंतुक) या आधीच्या मंडळींनी प्रयोगाचा एकसंधपणा इमाने इतबारे राखला.
आधी गाजलेल्या एखाद्या कलाकृतीचा दुसरा किंवा पूरक भाग निघाला की हमखास- ‘आधीच्या प्रयोगाची सर नाही..’ असं म्हणण्याचा प्रघात असतो. या नाटकाच्या बाबतीतही थोडंसं असंच झालं. नव्या नाटकाची भलावण झाली, तरी ‘पहिली गंमत काही औरच होती,’ असाही सूर उमटला. काही ठळक वृत्तपत्रीय अभिप्राय असे होते-
‘सख्खे शेजारीची धम्माल रंगत या शेजारीत नाही’- मार्मिक. ‘सख्खेमधली स्वभावचित्रे जितकी रेखीव होती, तितकी इथे राहिली नाहीत. रेषा पुसट झाल्या आहेत.’- तरुण भारत. ‘शेजाऱ्यांचा सहजपणा आणि टवटवीतपणा कमी झाला आहे..’ इ. सुदैवाने कौतुक करणारी परीक्षणे कितीतरी अधिक पटीने आली. त्यामुळे पुन्हा केलेल्या या उपद्व्यापाचे सार्थक झाले. ‘खळाळणारा झरा’, ‘फेसाळणारी शँपेन’ इ. विशेषणांची नाटकावर उधळण झाली, आणि नाटक जोशात चालू लागले. सख्ख्या प्रेक्षकांचा पाठिंबा होताच. ‘हाऊसफुल्ल’चे झेंडे झळकू लागले.
माझे प्रामाणिक मत सांगायचे, तर लेखनाच्या दृष्टीने मला ‘पुन्हा शेजारी’ उजवे वाटते. या खेळात कथानकाचे चार ढोबळ भाग पडतात. पडदा वर जाताच नटी-सूत्रधाराच्या नव्या अवतारात तात्या- कृष्णा प्रवेश करतात. तात्या प्रेक्षकांचे आभार मानतो- ‘आमच्यावरच्या प्रेमापोटी आज आपण आलात..’ इ. तो बोलत असतानाच कृष्णा त्याचे म्हणणे खोडून काढते : ‘प्रेमापोटी नाही, तर दुसऱ्याच्या घरात डोकावून पाह्य़ची अपरंपार हौस म्हणून ही मंडळी जमली आहेत.. आपला तमाशा पाह्यला.’ एव्हाना बाकीचे चार शेजारी आपापल्या दाराखिडक्यांमधून डोकावताहेत. ते कृष्णाला दुजोरा देतात. ‘आमच्या खाजगी बाबींमध्ये दुसऱ्या कुणी लक्ष घालण्याचं कारण नाही,’ असं ठणकावून सांगतात. यावर तात्याचा युक्तिवाद असा- ‘आपल्या घराची चौथी भिंत आपण उडवून टाकली आहे. आपल्या घराला-किंबहुना सगळ्याच नाटकवाल्यांच्या घरांना तीनच भिंती असतात. तेव्हा कुणी आत डोकावलं, तर तक्रार करायला आपल्याला जागा नाही.’ ‘आणि काय रे?’ तात्या वकिली थाटात विचारतात- ‘आपलं शेजाऱ्यांचं संघगीत विसरलात?’ आणि ते गाऊ लागतात.
तात्या : शेजारी, शेजारी आम्ही सख्खे शेजारी
आमचा खेळ मांडिला
 सगळे : वेशिच्या दाऽऽऽरी!!
तर असे मजेमजेत नाटक सुरू होते. पहिल्या ‘इकेबाना’ या प्रकरणाच्या उगमाचा मागोवा घेतला तर थेट माझ्या दिल्ली दूरदर्शनच्या दिवसांमध्ये जाऊन आपण पोचतो. काही काळ मी महिला विभागाची प्रमुख होते. त्या अवधीत मी किती कलाप्रवीण गृहिणींच्या अनाहूत कलाकृती पाह्यल्या असतील याची गणती नाही. ‘टाकाऊतून टिकाऊ’ असा त्या कृतींचा आशय असे. भुईमूग टरफलांची कमळे, रिकाम्या इंजेक्शन कुपींचा ताजमहाल, काडेपेटय़ांचे सुवर्णमंदिर.. माझ्या टेबलावर पेश केलेली शिल्पे खरोखरीच दयनीय आणि एकापेक्षा एक सुमार असत. त्या उत्साही कलाकार गृहिणींना न दुखावता परतवायचं यात माझं जनसंपर्क कौशल्य पणाला लागत असे. तर त्या अनुभवाचे पडसाद ‘इकेबाना’ या प्रकरणात उमटतात.
सदाशिव सोसायटीमध्ये भगिनींसाठी एक स्पर्धा जाहीर झाली आहे. कचऱ्यातून कला! अर्थातच तिघी शेजारणींनी त्यात हिरीरीने भाग घेतला आहे. आपली प्रतिभा पणाला लावली आहे. निर्मलने बाभळीची वाळकी फांदी मिळवून, तिच्या काटय़ांना पॉपकॉर्न टोचून एक अनोखी पुष्परचना (‘पुष्परचना’ की ‘शुष्करचना’? – इति जगन) बनवली आहे. शीर्षक- ‘हिमपुष्प.’ शर्वरीने एक लांबडा ब्रेड पोखरून नाव तयार करून तिच्यात नाक-डोळे रेखाटलेला उकडलेल्या अंडय़ाचा नावाडी बसवला आहे. हा ‘दर्याचा राजा.’ कृष्णाची कलाकृती ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट’ आहे. (कारण- नेमकं काय आहे, ते तिलाही सांगता येत नाही.) एका चपटय़ा हातझाडूला रंगीबेरंगी बुचे डकवून ही शोभाकृती निर्माण करण्यात आली आहे. शीर्षक- ळँी र६ीस्र््रल्लॠ २३ं३ीेील्ल३. (‘अय्या, किती समर्पक! शिवाय इंग्रजी!) बायकांच्या या टाकाऊ (सॉरी, टिकाऊ!) उपक्रमाची यथेच्छ खिल्ली उडवायची संधी नवरे वाया जाऊ देत नाहीत, हे सांगायला नकोच. एका प्रवेशात आपले बाभळीचे शिल्प टेबलावर ठेवून निर्मल व शर्वरी आणखी पॉपकॉर्न आणायला खाली दुकानात जातात. तेवढय़ात तात्या, जगन, मकरंद जमतात. गप्पा मारता मारता ते अनवधानाने एकेक पॉपकॉर्न खुडून तोंडात टाकत जातात. हा प्रवेश सगळे शेजारी फार बहारीचा करत. तिघीजणींना विभागून पहिले बक्षीस- म्हणजे एक पिटुकला जर्मन सिल्व्हरचा पेला मिळतो. चार-चार महिने तो प्रत्येकीकडे ठेवायचे ठरते.
एका प्रयोगात या इकेबाना प्रकरणाने चांगलाच हादरा दिला. विशेषकरून रजनी वेलणकरला. कृष्णा हातात झाडू घेऊन तात्यांच्या मागे धावते आहे असा काहीसा प्रसंग होता. या विंगेतून त्या विंगेत दोघे नाहीसे झाले की मध्यंतराचा पडदा पडत असे. तर एकदा धावता धावता झाडूला डकवलेलं एक बूच निखळून पडलं आणि त्याच्यावर पाय पडून कृष्णा घसरून पडली. पडदा पडला. पाहता पाहता रजनीचा हात सुजू लागला. प्रसंगावधान राखून तिने बांगडय़ा उतरवल्या आणि कसाबसा प्रयोग पार पाडला. हात फ्रॅक्चर झाला होता. पुढचे चार-पाच प्रयोग ओळीने लागले होते, आणि ते कॉन्ट्रॅक्टने दिलेले होते. प्लास्टर बांधलेला हात सांभाळत तशा अवस्थेतही रजनीने हे प्रयोग केले. कर्तव्यनिष्ठा! ळँी २ँ६ े४२३ ॠ ल्ल.
दुसरा भाग महागाई, भाववाढीचा भस्मासुर पाठी लागल्यामुळे शेजारी चिंतित आहेत. ‘इतके दिवस मन मारून राहिलो, आता पोट मारून राह्यची पाळी आली आहे,’ हे त्यांचे दु:ख. ते सहाजण अनौपचारिकरीत्या भेटतात. दाटल्या कंठाने सर्वजण महागाईची आरती गातात..
जयदेवी, जयदेवी, जय महागाई
त्रासलो, गांजलो, पळवाट नाही॥
कडाडली महागाई, काय सांगू राव,
शंभराच्या नोटेला दहाचा भाव.
दहाची नोट, कोऱ्या कागदाची नाव,
रुपयाला आता पैशाचा भाव.
फ्लॉवर, टमाटो विसरून जा आज,
दुध्या-दोडक्यालाही आलाय माज.
मूठभर मिरच्या फुकट- होता रिवाज,
त्याच नाकाला झोंबतात आज.
तोंडभर आशीर्वाद दुर्मीळ झाला,
भिकाऱ्यांचासुद्धा रेट वाढला.
सलाम आता हो एका रुपयाला,
परोपकारही मुष्कील झाला.
अचानक ऐशी कैशी अवकळा,
पैशाचा रंग हो जाहला काळा.
कुणी मिरवी कंठी नोटांच्या माळा,
आमच्या नशिबी कथलाच वाळा.  
जयदेवी, जयदेवी..॥
मग ठोस उपायांबद्दल चर्चा होते. ‘काटकसर’ हा एक उपाय सुचवला जातो. पण तात्यांच्या मते, हे ‘निगेटिव्ह थिंकिंग’ आहे. काहीतरी ‘पॉझिटिव्ह’ करायला हवं. मग मिळकत वाढवण्यासाठी भगिनींनी हातभार लावायचा असं ठरतं. आपल्या सुग्रणपणाचा अभिमान बाळगणारी कृष्णा रोज ताजा पदार्थ करून विकण्याचा मानस जाहीर करते. निर्मल विणकाम करण्याचं ठरवते. (अर्थात त्यासाठी हजार रुपयांचे मशीन लागणार.) शर्वरी घरच्या घरी योगाचे वर्ग चालवण्याचा घाट घालते. दुर्दैवाने तिघींचेही उपक्रम एकापाठोपाठ एक कोसळतात आणि शेवटी एकमेकांचे ग्राहक होण्यापलीकडे दुसरा पर्याय उरत नाही. मग अर्थातच ‘वळते करून घेण्याच्या’ वाटाघाटी सुरू होतात.
कृष्णा : बस्स झालं. खूप झालं. उद्यापासून धंदा बंद करणार आहे मी.
तात्या : ‘व्यवसाय’ म्हणावं.
निर्मल : शर्वरीच्या योगापायी कंबर मोडली माझी. बिल आलं डॉक्टरचं की धाडून देईन तिलाच.
शर्वरी : का म्हणून? तूच नस्ता उत्साह दाखवलास.  दुसऱ्या कुणाचं- तात्यांचं काही मोडलं नाही कसं?
मकरंद : तात्याचं काय मोडणार? मेडिटेशनच्या नावाखाली झोपा काढायचा तो.
कृष्णा : बरं, आमची वर्गणी परत देशील ना? एका दिवसातच वर्ग गुंडाळलास तू-
शर्वरी : अगं, पण तुम्ही पैसे दिलेतच कुठे?
कृष्णा : नाही कसे? आपण वळते करून घेणार होतो. दहा प्लेट बटाटेवडे, आठ थालिपिठं आणि आजच्या कचोऱ्या..
शर्वरी : घ्या बाई!
निर्मल : आणि हो, दोन स्वेटर्सची विणणावळ द्यायची आहेस हं शर्वरी.
शर्वरी : हे पहा- मी तुम्हाला दहा दिवस योग शिकवीन. फुकट.
कृष्णा : नाव काढू नकोस त्या योगाचं-
(तिघीजणी तावातावाने भांडू लागतात. त्यांचे नवरे त्यांना शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. संगीत उभरते आणि प्रवेश संपतो.)
संशयकल्लोळचा पहिला प्रवेश सुरू होतो तेव्हा जगन आणि शर्वरी (मकरंदची बायको) दोघं तोंड लपवून कुठेतरी बरोबर जात आहेत. त्यांना तात्या- कृष्णा पाहतात. त्यांना चुकवायला म्हणून ही दोघं टॅक्सीत बसून पसार होतात. परत येतात ते दोघांच्या हातात कागदाचे एकेक शानदार पुडके आहे. जगनचे पुडके निर्मलच्या हातात पडते. ते ती खोलते. आतून सुंदर निळा शर्ट निघतो. सोबत चिठ्ठी- ‘एका माणसाला हा शर्ट खूप खुलून दिसेल. तुझीच शरू.’ तिकडे शर्वरीचे पार्सल मकरंद उघडतो. आतून रेशमी साडी बाहेर काढतो. प्रचंड हलकल्लोळ उडतो. दोन्हीकडे रडारड होते. शेवटी खुलासा होतो. निर्मलच्या वाढदिवसाला तिला चकित करण्यासाठी हा साडीखरेदीचा बेत रचला गेलेला असतो. छान शर्ट दिसला म्हणून शर्वरी तो मकरंदसाठी घेते. या गौप्यस्फोटानंतर जगन, मकरंद आपापल्या रुसलेल्या बायकांची मनधरणी करण्यात गर्क होतात. तात्या भारावून जातात.
तात्या : वा! क्या बात है? याला म्हणतात रोमान्स.
कृष्णा : तुम्ही असलं कधी काही करत नाही. नेहमी आपलं माझ्याभोवती गोंडा घोळता.. मलासुद्धा कधी कधी रागवावं, रुसावं असं खूप वाटतं. पण माझी मेलीची हौस कध्धी पुरी होत नाही..
(रागारागात निघून जाते. तात्या हताशपणे प्रेक्षकांकडे पाहतात. प्रकाश मावळतो.)
शेजाऱ्यांच्या कारनाम्यांमधला माझा सगळ्यांत आवडता किस्सा आहे- संशयकल्लोळ २. कृष्णा आपल्याला फारच गृहीत धरून चालते, याची तात्याला अचानक जाणीव होते. ‘तिला वाटतं, मी खुळा आहे. प्रत्येक परस्त्रीला मातेसमान मानतो.. तिला जरा हादरा द्यायचाय.’
ऑफिसमधल्या डिलायला लोबोबरोबर तो खोटी खोटी भानगड रचतो. मकरंद-जगनची त्याला फूस आहे. अलीकडे तात्या रोज उशिरा घरी येतो म्हणून कृष्णावहिनींचे कान भरायला दोघे येतात.
जगन : वहिनी, कशावरून तात्या एखाद्या नाजूक लफडय़ात गुंतलेला नाही?
कृष्णा : काहीतरीच. मी त्यांची गॅरंटी देते.
मकरंद : तात्या कधीच दुसऱ्या बाईकडे पाहणार नाहीत- अशी ग्वाही देता तुम्ही?
कृष्णा : ग्वाही त्यांच्याबद्दल नाही हो. ते ढीग दुसऱ्या बाईकडे पाहतील. तिनं उलटून यांच्याकडे पाह्यला नको का? टाळी एका हाताने वाजते का भाऊजी?
(तात्या येतो. जगन-मकरंद जातात. तात्या दुसऱ्या बाजूला तोंड वळवतो. त्याच्या गालावर लिपस्टिकचा ठसा आहे.)
कृष्णा : का हो? आजकाल उशीर का होतो तुम्हाला? आज कुठे गुंतला होता?
तात्या : खरं सांगू? ऑफिसमधल्या एका मुलीबरोबर बेबंद फिरत होतो.
कृष्णा : उगीच खोटं बोलू नका. ऑफिसात जास्तीचं काम करीत होता की नाही?
तात्या : तसं असतं तर तुला सांगायला काय भीती होती?
कृष्णा : ओव्हरटाइम मिळत नाही म्हणून मी ओरडा करते ना!
तात्या : खरंच सांगतो ग, या नव्या मैत्रिणीबरोबर फिरत होतो मी. खूप मजा आली. मरिन ड्राइव्हवर भेळ खाल्ली. हँगिंग गार्डनला चिक्कू मिल्कशेक प्यायलो. कुल्फीपण-
कृष्णा : बरं, म्हणजे तुम्हाला जेवायचं नसेल. बरं झालं, कढीभातच केला आहे मी.
तात्या : मी एका बाईबरोबर फिरलो, आणि तुला कढीभात सुचतोय?
कृष्णा : इश्श! ओरडायला काय झालं?.. गालाला लाल रंग लागलाय तुमच्या.. पुसून टाका.. कुणाला वाटेल, लिपस्टिक आहे म्हणून.
तात्या : (ओरडून) लिपस्टिकच आहे ती..
कृष्णा : कोण आहे हो तुमची ही मैत्रीण? काही नाव-गाव?
तात्या : डिलायला.
कृष्णा : कसली लैला?
तात्या : डिलायला लोबो.
कृष्णा : हं. गोत्र जुळत नाही.
तात्या : तुझा विश्वास बसत नाहीये?
कृष्णा : तिला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याखेरीज माझा विश्वास बसणार नाही- तुमच्या सुरस आणि चमत्कारिक कथांवर.
(घंटा वाजते. दारात डिलायला.)
कृष्णा : तू- तुम्ही कोण?
डिलायला : मी कलीग गोपीनाथची. डिलायला. डिलायला लोबो.
डिलायलाची भूमिका अरुण होर्णेकरने केली. लाजबाब. स्त्रीपार्टी भूमिका म्हणून जराही अधिकपणा करायचा नाही असं आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणे अरुणने अतिशय संयमित काम केलं. त्याने उभी केलेली डिलायला अगदी खरी होती. लाघवी, सौम्य आणि आकर्षक. (खरंच सांगते.) तिच्यात जराही खोट नव्हती. हां, थोडी उंच होती, बस्स!   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा