रघुनंदन गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबई येथे गेल्या रविवारी ‘टेक मिहद्र ग्लोबल चेस लीग’ नावाची महाजत्रा संपली. कमालीच्या यशस्वी झालेल्या या स्पर्धेची आता बुद्धिबळ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या स्पर्धेने बुद्धिबळ क्षेत्रातल्या नव्या क्रांतीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. लेव्हॉन अरोनियन, सारा खादेम यांच्या कामगिरीसह या स्पर्धेतील चुरशीविषयी..

प्रख्यात उद्योगपती आणि बुद्धिबळ प्रेमी आनंद मिहद्र यांच्या कल्पनेला साद देत ‘टेक मिहद्र ग्लोबल चेस लीग’साठी अनेक उद्योगपती पुढे आले. सहा संघांची ही स्पर्धा अखेरच्या क्षणापर्यंत इंटरनेटवर बघणाऱ्या लाखो प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकली आणि यातच स्पर्धेचं यश सामावलेलं आहे. त्रिवेणी काँटिनेंटल किंग्स या संघानं चुरशीच्या लढतीत मुंबा मास्टर्सना पराभूत करून पाच लाख डॉलर्सचं पहिलं बक्षीस जिंकलं.
कार्लसन आणि आनंद यांच्या संघांचा धडाका..

तब्बल ५-५ वेळा जागतिक विजेते राहिलेल्या मॅग्नस कार्लसन आणि विश्वनाथन आनंद यांचे संघ समतोल आहेत असं मानलं जात होतं. कार्लसनकडे तर भावी जगज्जेते मानले गेलेले गुकेश, एरिगेसी आणि प्रज्ञानंद हे भारतीय युवा त्रिकूट होतं. आनंदच्या गँजेस ग्रॅण्डमास्टर्स संघात जागतिक क्रमवारीत कायम नंबर एक टिकवणारी हू यिफान होती. असं मानलं जात होतं की यिफान सगळे डाव जिंकेल आणि ती ज्या संघात असेल त्या संघाला वरचष्मा असेल. त्यामुळे यिफानला लिलावात सर्वोत्तम भाव मिळाला.

सहा संघ एकमेकांमध्ये पांढऱ्या आणि काळय़ा सोंगटय़ांनी खेळणार असल्यामुळे ही स्पर्धा १० फेऱ्यांची होईल आणि त्यातून पहिले दोन संघ अंतिम फेरी खेळतील असं ठरलं होतं. स्पर्धा चुरशीची व्हावी म्हणून पांढऱ्या मोहऱ्यांना विजयासाठी तीन तर काळय़ा मोहरांना चार गुण ठरवण्यात आले होते. पहिल्या पाच फेऱ्यांत चार जिंकून आनंदच्या गँजेस ग्रॅण्डमास्टर्स आणि कार्लसनच्या अल्पाइन वॉरिअर्स या संघांनी जोरदार आघाडी घेतली. आता अपेक्षा होती ती याच दोन संघांमध्ये अंतिम लढत होण्याची. याउलट अर्धी स्पर्धा संपली त्या वेळी मुंबा मास्टर्स आणि त्रिवेणी कॉंटिनेंटल किंग्स हे संघ अनुक्रमे २.५ आणि दोन गुणांवर चाचपडत होते.

अरोनियन आणि खादेमनं चित्र पालटलं

आर्मेनियन/ अमेरिकन ग्रँडमास्टर लेव्हॉन अरोनियनचं आगमन ग्लोबल चेस लीगमध्ये झालं ते योगायोगानं! जगज्जेत्या डिंग लिरेननं आपलं नाव मागे घेतलं आणि त्रिवेणी संघासाठी कर्णधाराचा शोध सुरू झाला. संघ व्यवस्थापक लूक वॅन वेली यानं लेव्हॉनची शिफारस केली आणि त्रिवेणीला कर्णधार मिळाला- तोपण ऐनवेळी. संघाचं मनोबल अशा वेळी खचलेलं असण्याचा संभव असतो. अशा वेळी आणखी एक घटना घडली. नाना डागणितझेनं पाच फेऱ्यांनंतर वैयक्तिक कारणासाठी नाव मागे घेतलं आणि स्पर्धेच्या नियमाप्रमाणे राखीव ठेवलेल्या साराची एन्ट्री झाली. स्पर्धेत सगळे खेळाडू ग्रॅण्डमास्टर्स आणि त्यात ही आंतरराष्ट्रीय मास्टर मुलगी काय दिवे लावणार अशीच चर्चा होती; पण एकही डाव न जिंकणाऱ्या नाना ऐवजी या हसतमुख मुलीचं सर्वानी स्वागत केलं आणि तिनं इतिहास घडवला. सहावी फेरी सारा हरिकाशी हरली, पण त्यानंतर तिनं उरलेल्या चार फेऱ्यांत तीन डाव जिंकून आपल्या त्रिवेणी संघाला अंतिम फेरीत नेलं.

कोण आहे ही सारा?

साराचं खरं नाव आहे खादेमालशारीह सारासादत! २०१८ साली सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या महिलांच्या जागतिक जलदगती आणि विद्युतगती या दोन्ही स्पर्धामध्ये तिनं दुसरा क्रमांक पटकावला होता. कॅनडाचा नागरिक असणाऱ्या, पण इराणी वंशाचा चित्रपट दिग्दर्शक अर्देशीर अहमदीशी लग्न करणाऱ्या खादेमालशारीह सारासादतचं नामकरण युरोपिअन लोकांनी सारा खादेम केलं. २०२२च्या डिसेंबरमध्ये कझाकस्तानमध्ये अल्माटीला झालेल्या महिलांच्या जागतिक जलदगती आणि विद्युतगती स्पर्धासाठी सारा आली ती हिजाब शिवाय! त्यामुळे एकच खळबळ उडाली. कारण इराणी खेळाडूंनी परदेशातही हिजाब घातला पाहिजे असा दंडक आहे. २०२३ च्या जानेवारी महिन्यात साराविरुद्ध इराणी सरकारनं अटक वॉरंट काढलेलं आहे. परंतु स्पेन सरकारनं तिला राहण्याचा परवाना दिला आणि पुरोगामी अरब अमिरातीनं तिचं स्वागत केलं. पण तिचा खरा गौरव केला तो ग्लोबल चेस लीगच्या आयोजकांनी- तिला आपल्या खेळाडूंमध्ये सामावून घेऊन!

चित्र पालटलं..

स्पर्धेचा पहिला भाग गाजविणाऱ्या गँजेस आणि अल्पाइन संघाना पहिला दणका बसला तो सहाव्या फेरीत! पाच फेऱ्यांत फक्त एक विजय मिळवणाऱ्या चिंगारी गल्फ टायटन्स आणि बालन अलास्कन नाईट्स या संघानी त्यांना नमवलं. या विजयामुळे आनंद आणि कार्लसन यांच्या संघाला मानसिक हादरा बसला, त्यातून ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. याविरुद्ध आतापर्यंत चाचपडणाऱ्या संघांना एक संजीवनी मिळाली. सगळय़ा मागे पडलेल्या संघांनी जोरदार खेळ सुरू केला आणि होत्याचं नव्हतं झालं.

पहिल्या पाच फेऱ्यांत चार फेऱ्या जिंकणारे गँजेस ग्रॅण्डमास्टर्स नंतरच्या पाच फेऱ्यांत अवघा एक विजय मिळवू शकले; आणि तोही स्पर्धेत शेवटच्या आलेल्या बालन अलास्कन संघाशी! मॅग्नसच्या अल्पाइन वॉरिअर्सची अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांनाही अवघा एक विजय मिळाला आणि तोही आनंदच्या दिवसेंदिवस पराभवाला समोर जाणाऱ्या गँजेस ग्रॅण्डमास्टर्स विरुद्ध! या दोन्ही भूतपूर्व आघाडीवीरांना फक्त एका विजयाची गरज असताना शेवटच्या दोन फेऱ्यात हार मानावी लागली.

त्रिवेणी आणि मुंबा अंतिम फेरीत

पहिल्या सहा फेऱ्यांत अवघे दोन विजय मिळवणाऱ्या त्रिवेणी ग्रॅण्डमास्टर्सनं अखेरच्या चार फेऱ्यांत रक्ताची चटक लागलेल्या वाघाप्रमाणे सर्व दिग्गजांना गारद केलं आणि साखळी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. जर्मन फिल्ड मार्शल रोमेलप्रमाणे सैन्याच्या पुढे होऊन लढणाऱ्या कर्णधार लेव्हॉन अरोनियननं एका दिवसात मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोमानेची यांना वैयक्तिक लढतीत पाणी पाजले. त्यामुळे संघाला उभारी मिळाली आणि एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे संघाने भरारी घेतली.

मुंबा मास्टर्सकडे नाशिकचा विदित गुजराथी, कोनेरू हंपी आणि द्रोणावली हरिका हे मोहरे होते. सुरुवातीला दडपणाखाली खेळणाऱ्या विदित आणि हंपीनं गँजेस ग्रॅण्डमास्टर्स विरुद्ध संघाला गरज असताना प्रभावी खेळ केला आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत पोचवलं. मजेची गोष्ट म्हणजे त्रिवेणीकडे होती अनेक वेळा जलदगती जगज्जेती राहिलेली कॅटरीना लहानो, तर मुंबा मास्टर्सचा आधारवड होता तिचा नवरा आणि अनेक वेळा विद्युतगती जागतिक स्पर्धा जिंकणारा अलेक्झांडर ग्रीसचुक. नवरा-बायकोच्या भांडणात बहुतेक वेळा जे होतं तेच झालं. कॅटरीनाचा संघ जिंकला!

अंतिम फेरीचा थरार

गेले तीन फेऱ्या सतत दडपणाखाली राहून अंतिम फेरी गाठणाऱ्या या दोन्ही संघांची देहबोलीही वेगळी होती. मुंबा मास्टर्सचा संघ गृहपाठ पूर्ण करून परीक्षेची वाट बघणाऱ्या हुशार मुलाप्रमाणे गंभीर होता. त्या विरुद्ध त्रिवेणीचे खेळाडू त्यांच्या कर्णधाराप्रमाणे खुशाल वाटत होते. त्यांचा कर्णधार लेव्हॉन आणि त्यांची स्टार (ठरलेली) खेळाडू सारा तर अभ्यास न करता आयत्यावेळी स्पर्धेसाठी आले होते. लेव्हॉन तर चक्क म्हणाला होता की, आम्हाला संजीवनी मिळाल्यासारखे वाटते आहे. आम्ही जे होईल ते स्वीकारायला तयार आहोत.

नियमाप्रमाणे नाणेफेक होऊन त्रिवेणीला पांढऱ्या सोंगटय़ा मिळाल्या आणि कर्णधार लेव्हॉन अरोनियन आणि चिनी ग्रॅण्डमास्टर्स वेई यी यांनी मॅक्सिम वाचिअर लाग्रेव्ह आणि सध्या फॉर्मात नसलेला विदित गुजराथी यांच्यावर मात करून आपल्या संघाला विजयी केलं. पण लगेच पांढऱ्या सोंगटय़ांकडून खेळताना मुंबा मास्टर्सनं परतफेड केली. अलेक्झांडर ग्रीसचुक, कोनेरू हंपी आणि जोवाखीर सिंदारॉव्ह यांनी चमकदार विजय मिळवले. आता वेळ आली होती टाय ब्रेकर्सची. दोन्ही संघांना एक फेरी काळय़ा आणि एक पांढऱ्या सोंगटय़ांकडून खेळावी लागणार होती. आणि तीही घडय़ाळात फक्त तीन मिनिटे घेऊन विद्युतगतीनं!

जरी खेळाडूंचे पट संगणकाद्वारे इंटरनेटला जोडले गेले असले, तरीही खूप वेळा खेळाडूंच्या खेळी वाचण्यात संगणक गोंधळ करतात इतक्या द्रुतगतीनं खेळाडू खेळत असतात. सिंदारॉव्ह, हरिका आणि विदितनं छान खेळ केला आणि पहिल्याच फेरीत काळय़ा मोहऱ्यांकडून खेळताना मुंबानं बाजी मारली. पण मागे राहूनही जिद्दीनं पुनरागमन करण्याची त्रिवेणीला सवय लागली होती. कर्णधार लेव्हॉन अरोनियन पडला तरी न डगमगता वेई यी, यू यांगयी आणि कॅटरीना लहानो यांनी प्रतिस्पध्र्याचा पाडाव केला. आता सुरुवात झाली ती तणावपूर्व वैयक्तिक टाय ब्रेकर्सची!

भरवशाच्या म्हशीला टोणगा

प्रत्येक संघात सहा खेळाडू असल्यामुळे पंचांनी पत्त्यांमधील एक्का, र्दुी, तरी असे सहा पत्ते तयार ठेवले होते. पहिला नंबर आला पाच! सारा खादेम विरुद्ध द्रोणावली हरिका अशी लढत होती. पहिल्या सांघिक विद्युतगती टाय ब्रेकरमध्ये हरिकानं काळय़ा सोंगटय़ांकडून साराला पराभूत केलं होतं. त्या पाश्र्वभूमीवर साराचं काही खरं नव्हतं. पण अतिशय खंबीर बचाव करून सारानं बरोबरी केली. हंपी- लहानो, ग्रीसचुक – यू यांगयी या लढतीही बरोबरीत सुटल्या. चौथ्या टाय ब्रेकरमध्ये छक्कीचा पत्ता आला आणि मुंबा मास्टर्सच्या पाठीराख्यात आनंद पसरला. कारण दोन जलदगती आणि दोन विद्युतगती टाय ब्रेकर्समध्ये योनास बिर्रेला सगळय़ा डावात मुंबाच्या जोवाखीर सिंदारॉव्हकडून हार पत्करावी लागली होती. अशा वेळी कर्णधार अरोनियननं योनासला सांगितलं, ‘‘प्रत्येक डाव वेगळा असतो. तू फक्त शेवटपर्यंत लढत राहा. निकालाकडे लक्ष नको देऊस.’’

डावाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत पटकन् हरणारा यवनास जिवाच्या निकरानं लढत राहिला. हताश झालेल्या सिंदारॉव्हनं एक चाल बघितली नाही आणि त्याच्यावर मात झाली. त्रिवेणीच्या संघात एकही भारतीय नव्हता आणि त्यांचा व्यवस्थापकही परदेशी होता.सहा संघांमध्ये ९ भारतीय खेळाडू होते आणि सहापैकी पाच व्यवस्थापकही भारतीय होते. सगळे अतिशय प्रतिभावान खेळाडू ऐनवेळी आपल्या संघासाठी सर्वोत्तम खेळ का करू शकले नाहीत याचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मला वाटतं की, कोनेरू हंपी दुबईमध्ये बोलली त्यात तथ्य आहे. ती म्हणाली होती, ‘‘आम्हाला एवढय़ा लोकांसमोर खेळायची सवय नाही; त्यामुळे आम्हाला सुरुवातीला अवघडल्यासारखं होत होतं, पण नंतर नंतर सवय होत गेली.’’

ते काहीही असो! ग्लोबल चेस लीग कमालीची यशस्वी झाली आणि ती पुन्हा कधी होते याची बुद्धिबळ रसिक आतुरतेनं वाट बघत राहतील हे नक्की!
gokhale.chess@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A grand fair called tech mihdra global chess league was held in dubai last sunday amy
Show comments