दुष्ट आणि अमंगळ विचारांची विल्हेवाट लावणाऱ्या हुताशनी पौर्णिमा किंवा होळीची संधी साधत शेकडो वर्षांची धारदार शब्दास्त्रे अग्नीला वाहण्याची परंपरा पाळणाऱ्या सर्वांसाठी आज शब्दांचा खास शिमगोत्सव. विडंबन. वात्रटिकाच नाही, तर दिनमाहात्म्याच्या निमित्ताने शिव्यांच्या लिखितमौखिक इतिहासावर दृष्टिक्षेप आणि राजकीय नेत्यांची कल्पनानक्कल… अशी भलीमोठी धुळवड… अर्थातच ‘बुरा ना मानो’च्या वैधानिक इशाऱ्यासह…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(‘मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून’ या गुरू ठाकूर यांनी लहिलेल्या गीताचे राजकीय विडंबन)

मतियांनी द्यावी भरून

उम्मीदवारी मतियांनी द्यावी भरून
होय तर देवा, घेऊ हो आम्ही चोरून
ओढ लावते अशी इलेक्शन, विकास होण्यासाठी
जीव अडकतो तिकिटासाठी, बेकारीची भीती
गड भानगडचे आम्ही रहिवासी
घोटाळा झेंडा फडकला दुरून
मतियांनी द्यावी भरून

मते… मते… मते…

मते हो द्यावी मते- २+२+२

मते अम्हास द्या बक्कळ
चहुदिशशी रात्रंदिन चंगळ
मते… मते… मते…
भुलविती जनता भोळीखुळी
एमपी, एमेले गोंधळी

घरोघरी हिंडतो नि गोंधळ लोकशाहीचा मांडतो
पक्षात भांडतो नि पक्षाबाहेर भांडतो
कमानी बसल्या होर्डिंगवरी
पोस्टरे बघून घ्या लवकरी

सान – थोर नेणतो
कुणाला केव्हाही हाणतो
पावली मनी – मसलची मुळी
आम्ही दंभाचे गोंधळी…
मते हो द्यावी मते…

बोला लोकशाहीला – मते
अन् ठोकशाहीला – मते
जोकशाहीला – मते
पोकशाहीला – मते
ठोकशाहीला – मते
चोकशाहीला – मते
झोकशाहीला – मते
बिल्डरशाहीला – मते
फिल्डरशाहीला – मते
बंडलशाहीला – मते
दंडेलशाहीला – मते
शोकशाहीला – मते

  • महेश केळुसकर

भूकंप…

दुभंगते कुणी कुणी
कुणी घेते जोडुन
कळतच नाही
कोण आले
कुणाला सोडुन…
हादरते परी याला
नसे रिस्टर स्केल
खुर्चीचा शोष पंप लागताच
घेती लाँग आणि हाय जंप
यालाच लोक बिचारे म्हणती.
राजकीय भूकंप…

  • प्रभाकर साळेगावकर

फू बाई फू, फुगडी फू दमलास का रं माझ्या गोविंदा तू
नावे ठेवियली, आरोपसुद्धा केले,
भाजपात गेले आणि नेते शुद्ध झाले आता फुगडी फू

राजमहालात श्वान दारी बांधियले
विरोध करता कुणी ईडी, आयटी पिसाळवले आता फुगडी फू

‘मीही खाणे नाही, इतरेही देणे नाही’
निवडणूक रोख्यांना परि हे का लागू नाही? आता फुगडी फू

‘अच्छे दिन आणतो’ सांगू मत मागितले
प्रोपगंडा सिनेमांनी एकजात गुंगविले आता फुगडी फू

लॉटरी लागूनही जणू यावे कुणा रडू
बॅरल गडगडूही जसे पेट्रोल लागे चढू आता फुगडी फू

सत्ता येता त्यांनी ३७० हटविले
सांगा कुणी काश्मिरात पैसे गुंतविले? आता फुगडी फू

स्त्री शक्तीला मान द्याया राष्ट्रपती केले
नव्या संसदी, मंदिरी दूर का ठेविले? आता फुगडी फू

‘फोडा आणि राज्य करा’ इंग्रजांची नीती
हिंदू-मुस्लिम करत इथलेच इंग्रज वापरती! आता फुगडी फू

कष्टकरी, शेतकरी, स्त्रियांचे दमन केले
नक्षली, खलिस्तानी, देशद्रोही ठरविले आता फुगडी फू

‘एकट्याने येणे नाही’ भय हे दाटले
खोके होते, घोडे होते पक्षच फोडले! आता फुगडी फू

परदेशी युद्ध म्हणे ‘टाइमप्लीज’ केले!
मणिपूर का हो मग काणाडोळा केले? आता फुगडी फू

‘मला पहा फुले वहा’ मंत्र त्यांचा खास
नको वाटे सग्या, मित्रा, गुरू सहवास आता फुगडी फू

मैत्रीसाठी पाहू नये दिन किंवा राती
देश विकू केले श्रीमंत मित्र गुजराती आता फुगडी फू

मनकी बात, चायपे, परीक्षापे चर्चा केली
पत्रकार परिषद सातत्याने ओशाळली आता फुगडी फू

जुमले केले, ध्यान केले, पाण्याखालीही गेले
फकिराचे कपडे परि रिपीट नाही झाले आता फुगडी फू

राजदंड आला अन् सेवक राजा झाला
प्रजा झाले सारे, कुणी नागरिक नाही उरला आता फुगडी फू

– आशीष

दुराचार संहिता संपताच

प्रथम तळ्यातील ‘कमळे’

नाहीशी करा म्हणाले

कुठेही कमळ शब्दाचा वापर नको

चित्रात लक्ष्मीची पावले

दिसली तर दिसू द्यात!

हस्तांदोलन अजिबात टाळा

विंदांच्या ‘एक दिवस घेता घेता…’

मधील पुढची ओळ गाळा

त्या शिल्पाचाही कोदंडधारी

भारा तूर्त नको

सर्व स्टेशनातील अगदी सीएसटीपासून

घड्याळांवर काळे फडके गुंडाळा

तसेच वाफ, दगडी कोळसा

आणि

जेम्स वॅटचा उल्लेख नको

असे आयोगाने कडक शब्दांत

फर्मान काढले.

ऐकताच

लक्ष्मी म्हणाली,

तुम्ही लोकांनी

पूर्वी हात मारलात

तरी मी

कमळातच उभी राहणार

मग काय,

सगळीकडे गरम वाफ

आणि धूरच धूर

तरीपण गुरुजी म्हणालेच,

काहीही करा ‘ण’ बाणातलाच!

तसा घड्याळाच्या अंगावर काटा

सुरेश भटांना समन्स

आयुष्याच्या मशाली पेटवणे बंद!

अखेरीस

हात्तीच्या, त्यात काय मोठेसे!

बिचारे ‘केशवसूत’

‘एक तुतारी द्या मज आणुनी’

म्हणत होते,

त्यांना मालगुंडला नजरकैदेत ठेवले.

– अशोक नायगावकर

कवी ना. धों. महानोर यांच्या ‘मी रात टाकली…’ या गाण्यावरचे विडंबन

मी पोस्ट वाचली,
मी पोस्ट(फॉरवर्ड) टाकली,
मी मोडक्या संवादाची अहो
लाज टाकली!
अंगात माझिया
भिनलाय मीडिया
मज ‘गॅरंटी’ लई त्यांची
गो कानी पडली!
मंग ‘ईडी’ मनमानीची
मी बात टाकली !!
धर्म देवा वरती
बहु ‘लाईक्स’ अवतरती,
अन् मुक्त लोकशाहीला
गो नाकं मुरडती
मी पोस्ट वाचली,
मी पोस्ट फॉरवर्डली,
मी मोडक्या संवादाची हो
लाज टाकली….

  • डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर

भांग पिऊन तर्र झालो तरी सारे लक्षात आहे.
जागेपणी कळेना परंतु कोण कुठल्या पक्षात आहे.
कोणाचे घड्याळ कोणाची मशाल कोणाच्या हाती बाण आहे
चिखल एवढा झाला की कमळाच्याही कंठाशी प्राण आहे.
शिव्याशाप उणीदुणी, बापावरच उचलली टांग आहे.
खुर्चीची नशा अशी ही सत्तेची भांग आहे.
भाषणांची यांच्या गाज आज अंतरिक्षात आहे
जागेपणी कळेना परंतु कोण कुठल्या पक्षात आहे.

  • सचिन मोटे

दोस्तपक्ष हो आम्ही तुमचा,
हक्क आमचा जागेवरचा
द्या हो टाकून बावीस तेवीस
हे भलते सोपे असते.

तुम्हास देऊन बावीस तेवीस
सांगू काय मग तेथे दिल्लीस?
कफल्लक आमुचे खाते
हे भलते अवघड असते.

नाही म्हणता साथच देणार
ईडी मग हो घरीच येणार
कुठले तुमचे खाते
हे भलते सोपे असते
पुतण्या की हो सोडून गेला
पागोटे अन् गेला शेला
वृष्टीचाही भरवसा गेला
आता भलते अवघड असते

निळ्या, हिरव्या, भगव्याचा
तो का एका रंगाचा?
रंगाचाही बेरंग करील तो
नेता कुठला कोणाचा?
हे भलते अवघड असते

  • सारिका चाटुफळे कुलकर्णी
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A look at the issues of society politics media using words through poems songs ssb