प्रशांत बागड

तथाकथित ग्रामीण भागात घडणारी, पण ग्रामीण म्हणता येणार नाही अशी ही कादंबरी आहे. या कादंबरीतलं जीवन कुठल्याही जीवनासारखं स्थिती-गती असलेलं, घडतं-मोडतं, व्यक्तींच्या अनंत लहानथोर भावभावनांनी साकारलेलं आणि संपूर्ण असं आहे. ते निवांत, सुस्त, संथ, तऱ्हेवाईक, नागरजीवनाचा आणि आधुनिकतेचा स्पर्श न झाल्याने अद्याप मरगळलेलं असं नाहीये..

Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…

लेखकाचं वाचन हे खुल्या मनाने वा स्वागतशील वृत्तीने केलेलं वाचन नसतं. ते पूर्वकल्पनांनी ग्रस्त असं वाचन असतं. कारण इतर लेखक हे लेखकाचे प्रतिस्पर्धी असतात. त्यांच्या लिखाणाशी झुंजून त्याला किंवा तिला आपल्या विश्वकल्पनेची आणि संवेदनशैलीची प्रस्थापना करायची असते. आपल्या आणि इतर लेखकांच्या लिखाणातला जाणवलेला भेद जोपासणं हे त्याचं-तिचं प्रिय काम असतं. आताचा लेखक आदल्या लेखकांवर जास्त रुष्ट असतो. कारण आदल्यांची, आदल्यांनी रेखाटलेल्या जगाच्या चित्राची सत्ता त्याला उलथून टाकायची असते. त्यांचा जगावरचा वरचष्मा त्याला सलत असतो. लेखक असा दबा धरत, दम धरत, स्वत:च्या लिखाणाला आकार देत वाचत असतो. खरं तर तो या बाबतीत न लिहिणाऱ्या वाचकांहून फार वेगळा नसतो. वाचन म्हणजे आपल्याजवळची अनुभविक आणि बौद्धिक सामग्री वापरून समोरच्या संहितेची नव्याने जुळवाजुळव करणं, त्या रचितातून अर्थ प्रकटू देणं. ‘हान्स-गेओर्ग गादामर’च्या रीतीने म्हणायचं तर वाचकाची खुली, मोकळी दृष्टी शक्य होते, ती त्याच्या-तिच्या सामग्रीतल्या पूर्वग्रहांमुळे. कोऱ्या मनाची निर्विकार ग्रहणशीलता अस्तित्वात नसते; अस्तित्वात असलीच तर ती क्षीण वा संकुचित असते. आपल्या लिखाणाच्या वेगळेपणाची आणि पृथगात्मतेची जोपासना करण्यासाठी लेखक वाचत असतो.

अण्णा भाऊ साठे यांच्या ‘आवडी’ या उत्कृष्ट कादंबरीचं माझं एक वाचन मी लिहिणार आहे. ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ या नावानेही ती ओळखली जाते. असंच कथानक असलेली ‘रक्ताचा टिळा’ या शीर्षकाची एक कथाही अण्णांनी लिहिली आहे. कादंबरीवर आधारलेला एक मराठी चित्रपट १९६०च्या दशकात येऊन गेला आहे. सध्या ‘आवडी’ या नावाने ही कादंबरी बाजारात मिळते.

हलक्या मानल्या जाणाऱ्या जातीतल्या (रामोशी) पुरुषाकडे आपलं सासर व पती सोडून निघून गेली म्हणून घराण्याच्या (चौघुले) इभ्रतीचा टेंभा मिरवणारा भाऊ (नागू) आपल्या बहिणीचा (आवडी) खून करतो, त्याबद्दल तुरुंगवास भोगतो, सुटून परत आल्यावर मेलेल्या बहिणीच्या हलक्या जातीच्या प्रियकराकडून (धनाजी) तिच्या खुनाच्या स्थळी मारला जातो, अशी करुण, पण रंजक आणि रंगतदार पद्धतीने सांगितलेली कहाणी या कादंबरीत आहे. अण्णांची भाषा वाहती आहे आणि कथन उत्कंठावर्धक आहे. ही गोष्टप्रधान कादंबरी बव्हंशी वास्तववादी आहे. तिच्यात वास्तविक वाटतील, विश्वसनीय वाटतील अशा व्यक्ती, घटना-प्रसंग, मन:स्थिती, संकटं, सुटका, सुखदु:खं आहेत. हे सारं सांगितलं जातं ते आपण दैनंदिन चालण्या-बोलण्यात वापरतो तशा वर्णनपर भाषेत. काही वर्णनं, काही घटना जरा वेगळय़ा वा धक्कादायक वाटतात; पण ते वेगळेपण व ते धक्के सौम्य असतात; आपल्याला परिचित असलेल्या वास्तविक जगातल्या वेगळेपणासारखे आणि धक्क्यांसारखे असतात. कादंबरीतलं आपल्या जगासारखं काल्पनिक जग आपण बघत जातो आणि त्याचं वर्णन वाचत जातो ते अण्णांच्या लेखणीच्या किमयेमुळे. ‘‘वास्तवात दु:खद वाटणाऱ्या गोष्टी कथा-नाटकांत वाचताना-बघताना सुखद का वाटतात?’’ या विरोधाभासावर डेव्हिड ह्युमने सुचवलेला तोडगा ‘आवडी’ला लागू पडावा – आपल्याला सुख वाटतं ते लेखकाच्या शैलीमुळे, कल्पकतेमुळे, त्याने केलेल्या काल्पनिक जगाच्या सर्जनामुळे. आपल्याला माहीत असलेलं, आपण अनुभवलेलं इथे बरोबर उच्चारलं गेलं आहे, असा अनुभव ‘आवडी’च्या वाचकाला येतो. शिवाय ही कादंबरी उद्बोधन करते. जातीपातींनी विभागलेला समाज, उच्च-नीचता, उच्च-नीचभावातून निपजणाऱ्या नीतिकल्पना, स्त्रियांचं दमन अशा बाबी ‘आवडी’त उघड होतात. वाचकाला त्यांचा सामना करावा लागतो. आवडी या धाडसी व करारी मध्यवर्ती पात्राबद्दल वाटणारा विस्मययुक्त आदर, तसेच तिची होत जाणारी कोंडी आणि क्रूर हत्या यांच्याबद्दल वाटणारी सहानुभूती आणि या सामाजिक-सांस्कृतिक बाबींचं आकलन यांची वाचकाच्या अनुभवात सरमिसळ होते. व्यक्तीची सुख-दु:खं आणि समाजाची घडी यांचा संबंध वाचकाला हेरता येतो.
अशी गोष्टप्रधान, वास्तववादी कथनावर भिस्त ठेवणारी, वाचकाच्या सर्वसामान्य भावबुद्धीला आवाहन करणारी कथा-कादंबरी मी स्वत: कधी लिहीन असं मला वाटत नाही. ‘आवडी’ काही ठिकाणी दैनंदिन वर्णनांच्या पलीकडे जाते. एखाद्या प्रभावी लोककहाणीसारखी होते, पण – एक लोकप्रिय इंग्रजी शब्द वापरून म्हणायचं तर – ती ‘रिलेटेबिलिटीचा’ प्रांत आणि ध्येय सोडत नाही. दैनंदिन जीवन, सर्वसामान्य अनुभव, मानवी सुखंदु:खं यांची ती त्या जीवनानुभवाचा भाग असलेल्या भाषेत वाच्यता करते. मला मात्र लेखक म्हणून ‘अनरिलेटेबल’ असं काही तरी आविष्कृत करायचं असतं. जीवनानुभवाचा भाग असलेली भाषा, वर्णनपद्धती, भावनाजन्य आकलनरीती यांच्याहून वेगळं असं माध्यम मला घडवायचं असतं. भिन्न, अपरिचित, ‘अनरिलेटेबल’ अशा वस्तूची हाक मला ऐकायची असते. सार्वजनिक भाषा आणि रुळलेल्या आकलनरीती यांच्या सामग्रीतून माझं स्वत:चं माध्यम मी घडवून संपादत नाही तोवर हे ‘अनरिलेटेबल’ काही तरी अस्तित्वात येणार नसतं. ‘आवडी’सारखं पुस्तक वस्तू आणि वर्णन यांची परिचित सांगड तोडत-मोडत नाही किंवा नव्याने घडवत नाही. परिचित सांगडींच्या मालमसाल्यातून ‘आवडी’ची जादू अवतरते. अनरिलेटेबल लेखक हा – अण्णांचे ‘आवडी’तले सुंदर शब्द वापरून म्हणायचं तर – कडुसं पडल्यावर तोंडओळखी पुसल्या जातात अशा प्रदेशात वावरू बघतो. अर्थात अनरिलेटेबल हे रिलेटेबलच्या सापेक्षत: भिन्न ठरतं; अनरिलेटेबल अखेर अजमावलं वा अनुवादलं जातं ते रिलेटेबल साधनसामग्रीनिशी. हा भेद, ही आंतरक्रिया माझ्या ध्यानात आणून देते आणि काही बाबतींत ‘अनरिलेटेबल’च्या दिशेने सरसावते म्हणून ‘आवडी’ ही कादंबरी मला आवडते.

आपल्या नीतिकल्पनांमुळे अलक्षित वा उपेक्षित राहून जाऊ शकेल असा एक धागा मोठी कलात्मक- नैतिक जोखीम पत्करून अण्णांनी ‘आवडी’त ओवला आहे. नागू आवडीची हत्या करतो ते घराण्याची इभ्रत वगैरे राखण्यासाठी हे वरवरचं कारण झालं. नागू या कारणाआड दडतो ते त्याला आपल्या बहिणीबद्दल कामना वाटते म्हणून. आवडीच्या तारुण्याने व सौंदर्याने नागू उत्कंठित होतो, आवडीचं व्यक्तित्व त्याला वासनिक वा इरॉटिक आवाहनासारखं भेडसावतं असं अण्णांनी कादंबरीत सुसंगतरीत्या सुचवलं आहे. या कामभावनेचं काय करावं हे नागूला कळत नाही. त्यात कुस्तीत नागूचा प्रतिस्पर्धी असलेल्या परगावच्या आणि परजातीतल्या धनाजीकडे आवडी आकर्षित होते. आवडीचं सौंदर्य, तिचा धनाजीकडे असलेला ओढा आणि धनाजीचा उमदेपणा नागूला जाचतो. या बाबतीत नागू हा शेक्सपिअरच्या ‘ऑथेल्लो’मधल्या इयागोसारखा भासतो. इयागो कॅसिओचा द्वेष करतो. कॅसिओने त्याचं काही घोडं मारलेलं नसतं; पण इयागोला कॅसिओच्या ‘रोजच्या वागण्याबोलण्यातली सुंदरता’ (डेली ब्युटी) डाचते. आपल्या ठायी अशा सुंदरतेचा अभाव आहे या जाणिवेतून त्याची सूडबुद्धी आकाराला येते. आपल्या वर्तुळात आपण ठिकठाक जगू किंवा आवडीला धनाजीत जाणवतो त्या ‘निर्मळ’पणाचं आपण संवर्धन करू, असं नागू शिकत-सवरत नाही. तो धनाजीच्या उमदेपणाचा आणि आवडीच्या सौंदर्याचा अशक्य असा बदला घेऊ इच्छितो.

कादंबरीच्या सुरुवातीला कैदेतला नागू आणि त्याचा कैदी-मित्र लख्या हे दोघं ‘गुन्हा’ आणि ‘पाप’ यांविषयी बोलत असतात. लख्याच्या मते त्याचं स्वत:चं कृत्य हा केवळ गुन्हा असतो. त्याने हौसा नावाच्या बाईला आपली करून घेण्यासाठी तिच्या नवऱ्याला मारून टाकलेलं असतं. अशा गुन्ह्याचं परिमार्जन ‘सरकारी शिक्षा’ भोगून होऊ शकतं. उलटपक्षी नागूचं कृत्य हे पाप किंवा महापाप या सदरात मोडतं. कारण आवडी ही नागूची सख्खी बहीण असते. लख्या व नागू हे दोघं बहिणीच्या नात्याचा उल्लेख करतात; पण खुनाचा उल्लेख करत नाहीत. कादंबरी बारकाईने वाचली तर प्रश्न पडतो : लख्या आणि नागू पाप कशाला मानतात – बहिणीच्या खुनाला की बहिणीबद्दलच्या कामभावनेला? लख्याला नागूच्या अपराधभावनेतली गोम माहीत आहे, असं कादंबरीच्या शेवटच्या भागावरून म्हणता येतं. तुरुंगातून सुटून आल्यावर आवडीच्या खुन्याचा बदला घेण्याच्या भावनेने पेटलेल्या धनाजीचा पाठलाग चुकवत डोंगरात लपलेल्या नागूला त्याची धाकटी बहीण सुभद्रा चोरून भाकरी पुरवत असते. आवडीगत सुंदर असणाऱ्या सुभद्रेकडे बघून लख्या खुशाल म्हणतो, ‘आता हिची कवा पाळी येणार? हिला तरी मारू नको.’ नागू हा एक प्रकारचा शोकात्म नायक असून त्याच्या व्यक्तित्वात असलेली खोट त्याला दुष्कृत्य करायला भाग पाडते, असं हे आशयसूत्र नाही. कादंबरी नागूला जबाबदारीमुक्त करत नाही. त्याच्या विचित्र अंत:प्रेरणांची खळबळ आणि त्याने आपणहून खुडून टाकलेल्या जगण्याच्या निकोप शक्यता ती भेदक तऱ्हेने मांडते.

‘आवडी’त समाजघडी घटनांची पाश्र्वभूमी म्हणून जाणवते; पण ती शोषक-शोषित अथवा प्रस्थापित-वंचित अशा विभागणीनुसार अवतरत नाही. कादंबरीतल्या जगात स्त्रियांचा वर्ग शोषित आहे असं दाखवलं आहे, असं म्हटलं तर नागूला खुनात मदत करणारी आवडीची थोरली बहीण सारजा किंवा आपल्या मुलाच्या आजाराच्या वेदीवर आवडीचा बळी देऊ इच्छिणारी तिची सासू या वर्णनाला छेद देतात. आवडी धनाजीचं ‘घर शिरल्या’नंतर भरलेल्या चावडीसमोरच्या खटलासभेत निरनिराळय़ा समाजघटकांचे विविध स्वर ऐकू येतात. हे समाजघटक कायदेकानू, मानवी नीतिमूल्यं, शारीरिक बळ, धाकदपटशा, परस्परावलंबित्व अशा कसोटय़ांचा आधार घेत एकमेकांना कह्यात ठेवू बघतात, निदान अराजक टाळू इच्छितात. आणीबाणीच्या वेळी समाजघटक प्रभावी ठरतात. व्यक्तीला, तिच्या पसंतीला, तिच्या निर्णयाला काही किंमत राहत नाही असं या सभेत दिसतं.

तथाकथित ग्रामीण भागात घडणारी, पण ग्रामीण म्हणता येणार नाही अशी ही कादंबरी आहे. या कादंबरीतलं जीवन कुठल्याही जीवनासारखं स्थिती-गती असलेलं, घडतं-मोडतं, व्यक्तींच्या अनंत लहानथोर भावभावनांनी साकारलेलं आणि संपूर्ण असं आहे. ते निवांत, सुस्त, संथ, तऱ्हेवाईक, नागरजीवनाचा आणि आधुनिकतेचा स्पर्श न झाल्याने अद्याप मरगळलेलं असं नाहीये. कदाचित महाश्वेता देवींच्या आदिवासी जीवनविषयक कथांवर गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांनी घेतलेला आक्षेप ‘आवडी’ला लागू पडावा : आपलं जीवनतंत्र असलेला, स्वयंपूर्ण असा ग्रामीण परिवेश ही आधुनिकतेतून उगवणाऱ्या रोमँटिसिस्ट दृष्टीची निर्मिती असते; अशी दृष्टी ग्रामीण वा वन्य जीवनाचं चित्रण करण्यापेक्षा त्यात आपले जीवनादर्श शोधू पाहते; परंतु जीवनच अगतिक, अप्रागतिक आहे म्हणून एखादा समाजघटक किंवा व्यक्ती बळी ठरते असं चित्र ‘आवडी’ रेखाटू इच्छित नाही असं मला वाटतं. बळीच्या कल्पनेत एक प्रकारचा नियतत्ववाद आणि व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा अभाव अनुस्यूत असतो. ते ‘आवडी’ला मान्य नसावं. त्यामुळे कादंबरीतली ग्रामीण सृष्टी रोमँटिक वाटू शकते.

‘आवडी’च्या केंद्रस्थानी आहे ते आवडीचं प्रखर, झुंजार व्यक्तित्व. ती भावाला प्रश्न करते, सासूला जाब विचारते, आवडलेल्या पुरुषाला स्वत:चा स्वीकार करण्याचं आवाहन करते. धनाजीच्या निर्मळ रुबाबदारपणाचा आपल्याला आलेला प्रत्यय प्रमाण मानते. आपल्या भावाने अविचाराने अपस्मारग्रस्त मुलाचं स्थळ आपल्यासाठी शोधलं हे तिच्या लक्षात येतं. माहेर आपल्या दु:खाची दखल घ्यायला तयार नाही हे तिला कळून चुकतं. अशी एकटी, एकाकी, लख्ख आवडी घरदार, नातीगोती, नीती-अनीती, सत्य-असत्य मागे टाकून, कशाकशाची पर्वा न करता, परिणामांचा विचार न करता, स्वतंत्र होत, फुलण्यासाठी, अनिश्चितीच्या आकाशात झेप घेत धनाजीकडे जाते, त्याची सोबतीण होते. अशी झेप घेता आली पाहिजे, असं आत्मप्रत्ययनिष्ठ जगणं जगता आलं पाहिजे, असं आवडीकडे बघून वाटत राहतं. आवडीच्या कृतीने माजलेला समाजातला हलकल्लोळ आपल्याला कथनात दिसतो; पण खुद्द आवडी जरा मागे राहते. आवडीच्या मनातली निर्णयाआधीची वावटळ आणि अशांती, तिचा निर्णयाप्रत झालेला प्रवास यांबद्दल अण्णांनी आणखी लिहायला पाहिजे होतं असं राहून राहून वाटतं.

प्रशान्त बागड हे लेखक, समीक्षक व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. ‘नवल’ या त्यांच्या कादंबरीला राज्य शासनाचा ह. ना. आपटे पुरस्कार मिळाला आहे. ‘सात गोष्टींचं पुस्तक’ आणि ‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे’ हे त्यांचे प्रकाशित कथासंग्रह. इंग्लंडमधील साउदॅम्प्टन विद्यापीठातून त्यांनी साहित्याचे तत्त्वज्ञान या विषयात पीएच.डी. केली असून, आय. आय. टी. कानपूर येथे ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत.

prashantbagad@gmail.com

Story img Loader