गणेश विसपुते

ऐंशी वर्षांपूर्वीच्या ‘सिटिझन केन’ या गाजलेल्या सिनेमात मरणासन्न असलेला चार्ल्स केन हा काचेचा ग्लोब हातात घेऊन शेवटचा एक शब्द उच्चारतो – रोझबड्. त्याच्या चरित्राची रहस्यं उलगडतानाच्या प्रवासात तो काय शोधत होता याचा शोध घेतला जातो. आपल्याला ते रहस्य अखेरच्या एका झर्रकन सरकणाऱ्या चौकटीतून कळून गेलं असलं तरी कुणाला त्याचा शोध लागू शकलेला नाही, हेही आपल्याला उमजतं. त्याचप्रमाणे ‘गॉगल लावलेला घोडा’ ही काय प्रतिमा आहे याचा वाचक विचार करीत राहील. इथं मात्र ठोस उत्तर मिळेलच असं नाही, पण आपलं आपल्यासाठी एक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता येईल. ‘पपायरस प्रकाशना’तर्फे आलेला निखिलेश चित्रेंचा देखणा कथासंग्रह वाचकाला स्वत:लाही नेणिवेच्या बहुस्तरीय पातळय़ांवर विचार करत राहण्याला भाग पाडतो. असा वाचक कथेच्या निवेदनशैलीनं, वाचनीयतेनं त्यातील आशयाला भिडू पाहतो, गुंतून जातो आणि समांतरपणे त्यातल्या तीव्र दृश्यात्मकतेला त्यातल्या हवा, पाणी, रूप आणि रंगांसह उभारू लागतो. हे या लेखनाचं वैशिष्टय़ आहे. चांगल्या फिक्शनचंही हेच वैशिष्टय़ असतं.
फिक्शन हा शब्द ज्या ‘फिम्क्तिओ’ या लॅटिन शब्दापासून आलेला आहे, त्याचा अर्थच मुळी दगड-मातीला दाबून-खोदून-कोरून नव्यानं आकार देत, कल्पनेतली एक स्वतंत्रच निर्मिती करणं असा आहे. फिक्शनमध्ये थेट वर्णनबाज वास्तवाला जागा नाही, ते टाळून आशयाकडे जाता आलं तर नेणिवेतलं अद्भूत विलक्षण जग दिसू लागतं. ते तर्कातीत किंवा असंगत वाटलं तरी जगण्याचे धागे त्यात जीवट रीतीनं शिल्लक असतात. त्यामुळेच पूर्णपणे ते कल्पनातीत, अ-घटितही नसतं. ते अटळपणे असतंच. फिक्शनमधलं जग अर्थान्वयाशी वाचकाला झगडायला लावतं. त्याच्या वाचनीयतेनं गुंगवून टाकतं. त्यात कथाशयाला रूपकाच्या स्तरावर खेचून नेण्याची ताकद असते.

vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Pet dog owner, Dombivli, Samrat Chowk,
डोंबिवलीत सम्राट चौकात पाळीव श्वान मालकाची वडील-मुलाला ठार मारण्याची धमकी
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत
Clash between two generations in virtual and real world
सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा
ti phulrani dramatization by P L deshpande
‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!
Saturn transit in purva-bhadrapada nakshatra
१८ ऑगस्टपासून बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

निखिलेश चित्रे यांच्या ‘गॉगल लावलेला घोडा’मधल्या कथा या वरील कसोटय़ांवर उतरतात. एका वेगळय़ाच विश्वामित्री परावर्तन असलेल्या समांतर जगात नेऊन गरगरवून टाकणाऱ्या कथा आहेत. या कथा वाचकांकडून एका नव्या बोधवत्तेची-तमीज़्ची रास्त मागणी करतात. यात वास्तवाच्या अनेक अबोध पातळय़ांना वाचकानंही कल्पित विश्वात पुनर्रचना करण्याचं आवाहन आहे.

चित्रे यांचं ‘आडवाटेची पुस्तकं’ या जागतिक साहित्यातील महत्त्वाच्या (आणि बव्हंशी अपरिचित) पुस्तकांविषयी आणि लेखकांविषयीच्या पुस्तकाचं ग्रंथप्रेमी वाचकांनी चांगलं स्वागत केलं. शिवाय जागतिक सिनेमा हासुद्धा चित्रे यांच्या आस्थेचा विषय आहे. या दोन्हींचा त्यांच्या कथालेखनाशी थेट संबंध सांगता येतो. ते स्वत: उत्तम वाचक, ग्रंथसंग्राहक किंवा ग्रंथवेडे (बिब्लिओलेटर) असल्याने त्यांच्या कथांमध्ये पुस्तकांचे संदर्भ येतात. असलम-आत्मारामसारख्या अस्सल पुस्तक विक्रेत्यांचे उल्लेख येतात. असलमकडे पुस्तकशोधासाठी जाताना त्याचा रहस्यमय ठावठिकाणा ते मुंबईतल्या झोपडपट्टय़ांमधल्या भूलभुलैयासारख्या गल्ल्यांमधले निओ-न्वार सिनेमांतल्यासारख्या काळोख-उजेडाच्या, ओलसर वासांसह दृश्यात्मक करतात. त्यांच्या कथांमध्ये जुन्या-नव्या लेखकांची उपस्थिती दिसते. असलमसारखा खानदानी पुस्तकविक्रेता त्याची वंशवेल ‘अकबरनामा’ लिहिणाऱ्या अबुल फज़्ालपर्यंत नेऊन भिडवतो. शतकांचे भूतकाळ साठवलेली जुन्या पुस्तकांची नक्षीदार पुठ्ठय़ांच्या कव्हरांची वर्णनं येतात. लेखकाच्या लिहिण्याच्या प्रक्रियेविषयी त्यातली लेखकपात्रं बोलतात.

निखिलेश चित्रेंच्या कथाचं जग २१व्या शतकातल्या दुसऱ्या दशकाला घट्टपणे जोडलेलं आहे. त्याचा अवकाश पालघर-डहाणू-मुंबई असा पसरलेला आहे. त्यांच्या कथांना पालघरातले अनेक भौगोलिक-सांस्कृतिक संदर्भ थेटपणे चिकटलेले आहेत. हा संग्रहच पालघर नावाच्या गावाला अर्पण केलेला आहे. प्रथमपुरुषी निवेदन करणारी कथेतली पात्रं वर्तमानातल्या सर्वार्थानं व्यवहारी जगात ताबेदारी करणारी आहेत. ती करता करता ओरखडे उमटवून, सालपटं काढून घेणारी, जखमी होत राहाणारी आहेत. कुणीतरी नियंत्रित करत असलेल्या व्यवस्थेच्या कळसूत्रावर इच्छेविरुद्ध नाचणारी आहेत. त्यांना आपल्या आवडत्या इच्छांच्या-गोष्टींच्या घडय़ा करून विसरवून टाकायला लावलं गेलं आहे. ती तशी नोकऱ्या-व्यवसाय करणारी असली तरी वर्तमानाशी जखडून ठेवता येईल अशी शाश्वती त्यांच्या उपजीविकेत नाही. गाय स्टॅन्डिंग हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो तसं, अस्तित्वाला ऐहिक कल्याणाची-मानसिक सुरक्षिततेची हमी नसणारा हा ‘प्रिकॅरिएट’ असा वर्ग आहे. त्याचं भविष्यही अनिश्चित आहे. एक प्रकारचं सततचं असमाधान आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपड अशी त्याची ओळख आहे. या वर्गाला डोळसपणे लेखनाच्या कक्षात अशा रीतीने आणणं हे मराठी साहित्य व्यवहारातलं स्तुत्य पाऊल आहे आणि त्याचं उचित श्रेय निखिलेश चित्र्यांना द्यावं लागेल.

पण हे निव्वळ वास्तव म्हणून येत नाही. नेणिवेतल्या अनेक पातळय़ांवर उभी राहिलेली-धूसर राहिलेली अज्ञात जगं-देश-लोक असं कल्पित आणि कल्पितामधलं वास्तव, कल्पित इतिहास, खऱ्या आणि रचलेल्या दंतकथा, रहस्यं, स्वप्नं, स्वप्नलोक-दु:स्वप्नलोक त्यातल्या अद्भुत, गूढ विलक्षणासह अतिशय सर्जक गुंतागुंतींमधून एखाद्या वास्तुशिल्पीनं निव्वळ कोऱ्या अवकाशात विलक्षण जादुई भवनं उभारावीत तशी ती आशयांमध्ये अवतरतात. लेखक आणि वास्तुशिल्पीची तुलना या संग्रहातल्या ‘पाषाणभूल’ या कथेचा निवेदक-जो लेखक आहे, तो स्वत:च करतो. त्याला चित्रेंचा गर्भित नायक म्हणता येईल. तो म्हणतो, ‘‘सृजनशीलतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एखाद्या इमारतीमधली अवकाशाची रचना काल्पनिक, म्हणजे आर्किटेक्टच्या कल्पनेतून जन्मलेली असते.. शहरंसुद्धा नगररचनाकारांच्या कल्पनेतूनच निर्माण होतात, म्हणजे तीसुद्धा फिक्शनच असतात. स्वत:च्या कल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेल्या घरात राहणारा वास्तुरचनाकार म्हणजे स्वत:च्या कथेत किंवा कादंबरीत राहणारा लेखकच. तो भाषेच्या आधारे कथा किंवा कादंबरीची वास्तू उभारतो आणि वाचक त्यात काही काळ वास्तव्य करतो.. इमारत आणि कथा-कादंबऱ्या या दोन्ही ठोस ऐसपैस आणि टिकाऊ असायला हव्या. इमारतीमध्ये राहणाऱ्याला जसं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज वावरता आलं पाहिजे, तसंच कथेतही वाचकाला एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात, एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात निर्विघ्न जाता आलं पाहिजे. इथं अनावश्यक खांब, निरुपयोगी भिंती, बिनकामाच्या खिडक्या दरवाजे यांना जागा नाही. कथा आणि वास्तू यांचे विविध घटक कार्यक्षम आणि नेमकेपणानं घडवलेले असले पाहिजेत. माणसाला निर्विघ्नपणे वास्तव्य करता यावं यासाठी साहित्य आणि इमारतींची निर्मिती होत असते.’’

‘गॉगल..’मधल्या कथांमध्ये नेमकी ही सोय आहे. एका कथेतलं पात्र दुसऱ्या कथेत दिसतं. ती पात्रं एकमेकांमध्ये गुंतलेलीही आहेत. तोच अवकाश आपल्याला बाकीच्या कथांमध्येही दिसू शकतो. त्यांचा परस्परांशी सांधा जुळतो. एका कथेतून आपल्याला दुसऱ्या कथेत जाताना मागचेही सुटलेले संदर्भ सापडतात. त्यामुळे या संग्रहातल्या नऊ कथांना एकसंधता आहे. त्यांची रचना सायक्लिक-चक्राकार आहे.या कथांमध्ये आशयानुरूप आलेल्या पुस्तकांचे, स्थळांचे संदर्भ देणाऱ्या टिपा आहेत. त्या काल्पनिक, तशा वास्तवातल्याही वाटू शकतात. खऱ्या वास्तवातल्या लेखकांची परिचित आणि काल्पनिक नावं, वास्तव आणि कल्पनेतल्या पुस्तकांची शीर्षकं यांची सरमिसळ झालेली असल्यानं वास्तवाच्या भूमीवरून पलीकडे उड्डाण करण्याला, असंगततेला आणि गूढ विलक्षणाला हे फिक्शन यशस्वीपणे बांधून ठेवतं.

चांगला लेखक हा चांगला वाचक असतो. किमान तो तसा असला पाहिजे. वाचनाला नावं ठेवत, ‘मी लिहितो ते स्वयंभू प्रतिभेनंच,’ असं म्हणणं बाष्कळपणाचं होईल. उम्बेर्तो इको, इतालो काल्विनो, बोर्हेज, पामुक असे कितीतरी लेखक त्यांच्या लेखनाबरोबरच त्यांच्या दांडग्या वाचनासाठीही प्रसिद्ध आहेत. भरपूर वाचून पचवल्यानंतर आणि जागतिक सिनेमातले अनेक दशकांतले महत्त्वाचे चित्रपट पाहिल्यानंतर लेखनात आपल्या भाषेचं भान राखत, आपल्या परंपरेशी जोडलेलं आणि परंपरेशी बंड करणारं, काय असलं पाहिजे हे सापडण्याच्या शक्यता खुल्या होणं सुलभ होतं. ते भान चित्रे यांनी नीटपणे सांभाळलं आहे.

सदानंद बारी नावाचं त्यांच्या एका कथेतलं पात्र म्हणतं की,‘ खरं तर आपली स्वप्नं हेसुद्धा फिक्शनच. त्यांना आपणच रचतो. फक्त ती रचना अजाणतेपणी होते. स्वप्नांचं फिक्शनत्व ज्याला उमगलं तो मोठा लेखक.’ अबोध पातळीवरच्या स्वप्नांचं सर्जक पुनर्वाचन हे नवं फिक्शन जन्माला घालणं असू शकतं. त्यातले आशय तर्कातीत वाटू शकतील पण त्यात एक अंतर्गत सुसंगती, तर्क आहेच.यातल्या प्रत्येक कथेवर स्वतंत्रपणे लिहिता येईल इतके त्यांना सघन संदर्भ आणि पैलू आहेत. ‘सिनाराचा प्रवासी’ ही चित्रेंची कथा फॅन्टसीचा अद्भुत वापर धूसर होत गेलेल्या, हरवलेल्या त्या स्वप्नलोकापर्यंत (युटोपिया) जाण्यासाठी करते. बालपणी वाचलेल्या कादंबरीतल्या आशयातून टेक ऑफ घेताना तिच्या आशयाला वास्तवाच्या धुळीचे खरेखुरे संदर्भ लागलेले असतात. अज्ञात बेट, त्यावरच्या आदिवासी जमातींचं परस्परांशी असलेलं वैर. त्या बेटावर वीस वर्ष आधीच पोचलेला निवेदकाचा भाऊ. तिथल्या अभेद्य गढीचा दरवाजा उघडायला त्यानं मदत मागणं. निळय़ा फुलपाखरांच्या पंखांवर बसून सिनारा या देशात पोचणं अशी विलक्षण फॅन्टसी उलगडत जाते. कल्पनातीतही शक्य असतं, ते पाहता आलं पाहिजे असं निवेदक सांगतो.

‘गॉगल लावलेला घोडा’ या कथेतही सिनारा नावाचा देश आहे. पण तो नकाशावर कुठेच नाही. प्रत्यक्षात आहे की नाही याविषयी कुणीही ठामपणे सांगत नाही. त्याच्या शोधात निरीह होऊन निरंतर भटकत राहणं आणि त्यात अर्थ सापडल्यासारखं वाटणं हा विलक्षण प्रवास या कथेत येतो.
‘पाषाणभूल’ या कथेतला नवोदित लेखक स्वत:च्या त्याच त्याच प्रकारच्या कथांना वैतागला आहे. त्यात तो सोनवडला जातो तेव्हा तिथल्या शिळेजवळ गेल्यावर एक प्रकारच्या चकव्यात अडकतो. एका तीरावरून दुसऱ्या तीरापर्यंत आयुष्यभर प्रवाही वाहणाऱ्या आणि त्यातून सुटका नसलेल्या नावाडय़ाची तात्पर्यकथा आपल्याला आठवते. त्यातून सुटायचं असेल तर कुणाला तरी हातातली वल्ही सोपवावी लागतील. अशा कथांमध्ये कालातीत आवाहकता असते. चित्रे ज्या प्रकारे गोष्टीतून गोष्ट प्रवाही पद्धतीनं सांगतात, त्याच वेळी ते परंपरेतल्या समजुती, लोककथांनाही आधार बनवतात. ‘गोष्टीत राहणाऱ्या बाईची गोष्ट’, केवळ पुस्तकं खाऊन वाढत जाणारा आणि अवस्थांतर होत गेलेला सुरवंटासारखा प्राणी लोकऱ्या, घर गमावण्याचा अनुभव सांगणारी ‘विस्थापन’ ही कथा, लिहिता न येण्यातल्या अगतिकतेतून वेगानं, गूढरीत्या ऱ्हासाच्या उताराकडे नेणारा प्रवास मांडणारी ‘मुंगीमानव अर्थात अनिकेत आख्यान’, अशा सगळय़ा कथांमधून पारंपरिक कथांमधल्या घटकांना ते नाकारतात. त्याचबरोबर लोकप्रिय म्हणून हिणवल्या गेलेल्या साहित्य प्रकारांतील साधनं वापरत चित्रे त्यांच्या कथेला संपूर्णत: नवं रूप देतात आणि ते निश्चितच स्पृहणीय आहे.

‘पाषाणभूल’ या कथेतला लेखक अनिकेत कानडे एका अर्थानं त्यांच्या कथेची भूमिकाच मांडतो. त्याचं म्हणणं चित्र्यांच्या कथालेखनाला चपखल लागू होतं. तो म्हणतो, ‘‘माझ्या बहुतेक कथा पुस्तकांचं जग, लेखक, वाचनप्रक्रिया, लेखक- वाचक संबंध अशा विषयांवर लिहिलेल्या आहेत. सध्या मराठी साहित्याच्या बोकांडी बसलेल्या सामाजिक वास्तववादात मला काडीचाही रस नाही. कथांच्या नावाखाली लिहिलेले सातबाराचे उतारे आणि शाब्दिक / माहितीपटासारख्या कादंबऱ्यांची मला शिसारी येते. मराठी लेखक कल्पनाशीलतेकडून कल्पनाहीनतेकडे जाताना पाहून दु:खही होतं. उत्कृष्ट कथा कशी असावी, या प्रश्नाच्या उत्तरादाखल मला नेहमी घनगोल आठवतो. त्या घनगोलाची स्वयंपूर्णता, बंदिस्तपणा, त्यातल्या प्रत्येक रेणूमधले घट्ट विद्युत चुंबकीय बंध हे सगळं कथेलाही लागू आहे. मीही कथाकार म्हणून हे कथेत शक्य तेवढय़ा नैसर्गिकपणे कसं येईल याकडे लक्ष देतो. रहस्यकथा, भयकथा, गूढकथा यांसारख्या लोकप्रिय आणि अभिजात मराठी साहित्यानं त्याज्य ठरवलेल्या वाङ्मयप्रकाराचे घटक कथेत आणून त्यांना गंभीर जाणिवांशी कसं जोडता येईल, याचा मी सतत विचार करत असतो. माझ्या अनेक कथांमधून मी तसा प्रयत्न केलेला आहे.’’
हा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे असं म्हणता येतं. कारण त्यांच्या कथा अस्सल वाचकाला वाचनाचा अवर्णनीय आनंद तर देतातच, पण जगण्याशी घट्टपणे जोडूनही घ्यायला लावतात. चांगल्या फिक्शनचं तेही एक वैशिष्टय़ असतं.

निखिलेश चित्रे यांच्या ‘गॉगल लावलेला घोडा’मधल्या कथा या एका वेगळय़ाच विश्वामित्री परावर्तन असलेल्या समांतर जगात नेऊन गरगरवून टाकणाऱ्या आहेत. या कथा वाचकांकडून एका नव्या बोधवत्तेची रास्त मागणी करतात. वाचक कथेच्या निवेदनशैलीनं, वाचनीयतेनं त्यातील आशयाला भिडू पाहतो, गुंतून जातो आणि समांतरपणे त्यातल्या तीव्र दृश्यात्मकतेला त्यातल्या हवा, पाणी, रूप आणि रंगांसह उभारू लागतो..
कविता, समीक्षा, कलाविषयक लिखाणात सक्रिय असलेल्या गणेश विसपुते यांनी देशातील तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या कथात्म पुस्तकांचा अनुवाद केला आहे. हिंदूी लेखक उदय प्रकाश यांच्या ‘पिली छत्रीवाली लडकी’ आणि तुर्की लेखक ओरहान पामुक यांच्या ‘माय नेम इज रेड’ ही त्यापैकी गाजलेली. ‘आवाज नष्ट होत नाहीत’, ‘धुवाधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध’ हे काव्यसंग्रह. याशिवाय चित्र आणि शिल्प या दोन्ही माध्यमांत कार्यरत.