राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानला जाणारा २०१३ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हिंदी भाषेतील ज्येष्ठ कवी केदारनाथ सिंह यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या कवीच्या कवित्वाचा शोध घेणारा लेख..
जो सच है वह सच नहीं है
जो जानता है उस तक खबर अभी पहुँचीही नहीं
जो हुक्म देता है वह डरा हुआ है
जो फैसला देता है
उसे पता नहीं की वह गिरफ्तार है
इतके सहज- सोपे लिहिणाऱ्या केदारनाथ सिंह यांचे वागणेही नितांतसुंदर आणि सहज. या साधेपणाचाही प्रभाव पडतोच. ही सहजता हेच केदारनाथांच्या कवितेचे वैशिष्टय़ आहे. सामान्य घटना- प्रसंगांमधून अनुभवांना बहाल केले जाणारे असामान्यत्व ही त्यांच्या कवितेची खरी ओळख.
कोणताही सशक्त कवी हा एका अर्थाने आपले जग उराशी बाळगतच वावरत असतो. कवीची कविता वाचल्यानंतर त्याची मुळेही शोधता येतात. कवी आपल्यासोबत कोणते जग घेऊन येतो आणि कोणत्या शब्दातून व्यक्त होतो यातूनच त्याचे वेगळेपण निश्चित होते. केदारनाथांनी आपले बालपण खेडय़ात घालवले आहे. हे सारे संचित घेऊनच ते शहरात दाखल झाले. ग्रामीण संवेदना आणि शहरी संवेदना असे एक द्वंद्व त्यांच्या कवितेत पाहायला मिळते. एकदा शहरात दाखल झाल्यानंतर हळूहळू आपल्या ग्रामीण संवेदनांवर एक धुळीचा थर चढू लागतो. दीर्घकाळ शहरात वास्तव्य केल्यानंतर खेडय़ातून आलेल्या माणसालाही आपले आता परतीचे दोर कापले आहेत, अशी भावना निर्माण होते. केदारनाथांच्या कवितेत मात्र तसे जाणवत नाही. शहर विरुद्ध ग्रामीण अशी दोन जगांची व्यस्त मांडणी ते करीत नाहीत. ग्रामीण संचित घेऊन ते शहरात वावरतात आणि शहरी आधुनिकतेचा परिवेश धारण करून त्यांच्यातला कवी पुन्हा आपल्या गावी जातो. त्यांच्याच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे-
अब आ तो गया हूँ
पर क्या करूँ मं
एक बुढे पक्षी की तरह लौट लौट कर
मं क्यों यहाँ चला आता हूँ बार बार
असा प्रश्न ते स्वत:ला विचारतात. शेवटी हा प्रश्न केवळ आनुषंगिक किंवा प्रासंगिक राहत नाही, तर तो अंतर्मुखतेकडे झुकतो.
कौन है ये लोग
जो कि मेरे है?
इनके चेहरों को देखकर
मुझे अपनी घडी की सुई
ठिक क्यों करनी पडती है बार बारआपल्या स्वत:ला पुन:पुन्हा तपासावे लागण्याची गरज या कवीतली सजगता स्पष्ट करते. याच कवितेत ते शेवटी म्हणतात, की काय करू म्हणजे या लोकांना मी त्यांच्यातलाच एक वाटेल. हीच आहेत माझी माणसे -की ज्यांना मी कवितेत उतरवतो; आणि हे तेच आहेत, की जे मला कधी वाचणारही नाहीत. शहरातून खेडय़ात गेल्यानंतरची कवीची ही भावावस्था. केदारनाथांना खेडय़ातल्या माणसांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी कमालीची आस्था आहे; पण त्याच- वेळी ते आधुनिकतेकडेही तेवढय़ाच तीव्रतेने पाहतात. जी आधुनिकता टाळता येत नाही त्या आधुनिकतेबाबत या कवीची वृत्ती ही शहामृगी नाही. विशेष म्हणजे या कवितेत खेडय़ांच्या मागासलेपणाचा सूर नाही आणि शहराविषयीच्या तक्रारींचा जाबही नाही. अत्यंत निरागसतेने हा कवी आपल्या समोर मानवी जीवनासंबंधी अर्थपूर्ण असे चिंतन मांडू लागतो. आजच्या तथाकथित ग्रामीण कवितेत ही बाब सर्वस्वी वेगळी आहे.
केदारनाथांच्या संपूर्ण कवितेतून गाव वगळता येत नाही; किंबहुना त्यांच्या कवितेचीच मुळे ही गावात रुतलेली आहेत. मात्र गावाशी त्यांचे नाते केवळ स्मरण-रमणीयतेपुरते मर्यादित नाही. या कवितेत पारंपरिक ‘नॉस्टेल्जिया’ आढळत नाही. ही कविता गावाच्या मातीतली असंख्य प्रतीके, प्रतिमांच्या रूपाने व्यक्त होते आणि शहरी जाणिवेतून येणाऱ्या विसंगतीकडेही अंगुलिनिर्देश करते. यात गावाचे उदात्तीकरण आणि गौरवीकरण कुठेच नाही. मात्र या कवितेत सशक्त असा धागा आहे जो माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या आदिम नात्याशी जोडलेला आहे. त्यांच्या कवितेला हीच बाब सामथ्र्यवान करते. माणसाचे माणूसपण टिकविण्यासंबंधी आणि एका चांगल्या दुनियेची आस बाळगण्यासंबंधी या कवितेचा स्वर कमालीचा कोमल आणि हळुवार आहे. एखाद्या आजीच्या रखरखीत हाताच्या स्पर्शात असलेली ऊब किंवा घट्ट सायीसारखी स्निग्धता याचा जो अनुभव येतो तसा अनुभव ही कविता देते. अनुभव व्यक्त होताना कुठेही अनावश्यक अशी शब्दांची उतरंड नाही, फापटपसारा नाही, विनाकारण ताणलेला विस्तार नाही. उत्स्फूर्तता आणि सहजतेबरोबरच या कवितेत दिसून येते ते केदारनाथांनी परिश्रमपूर्वक रचलेले कवितेचे शिल्प. कवितेतील शब्दांच्या वापराबद्दल ते किती जागरूक आहेत हे त्यांची प्रत्येक कविता वाचतानाच लक्षात येते. म्हणूनच या कवितेचा परिणाम वाचकाच्या मनावर दीर्घकाळ राहतो. छोटय़ा छोटय़ा वाक्यांमधून व्यक्त होत ही कविता आपल्याला अनोख्या वातावरणात घेऊन जाते.
लोकपरंपरा, धारणा, श्रद्धा, संकेत, लोकसमजुती या सर्वाशी केदारनाथांच्या कवितेचे एक अतूट असे नाते आहे. अनेक लोककथा त्यांच्या कवितेतूनही सूक्ष्म असे रूप धारण करून प्रकटतात. ‘कुछ सूत्र जो किसान बाप ने बेटे को दिए’ या त्यांच्या कवितेत अशा काही लोकधारणा येतात. या कवितेत शेतकरी आपल्या मुलाला काही गोष्टी सांगतो. झाडाचे हिरवे पान कधी तोडू नकोस आणि तोडायचेच असेल तर असे तोड, की झाडाला जराही दु:ख होणार नाही. रात्री जेव्हा तुकडा मोडशील तेव्हा शेतातल्या गव्हाच्या रोपांची आठवण येऊ दे किंवा अंधाऱ्या रात्री जर वाट चुकलास तर ध्रुवताऱ्यापेक्षा दुरून ऐकू येणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजावर विश्वास ठेव. अशा कितीतरी बाबी या कवितेत येतात. केदारनाथांची मुळे ही अशी लोकजीवनात घट्ट रुतलेली आहेत. त्यांच्या कवितेतला अनुभव व्यक्त होतानाही कैकदा लोककथेच्या कथनाच्या अंगाने व्यक्त होतो, ज्यात एखादी गोष्ट सांगण्याची शैली आहे, सहजता आहे. एखाद्या बुजुर्ग माणसाने संथ लयीत जगण्याचे सार सांगावे तशी ही कविता वाचताना जाणवते. असंख्य म्हणी, वाक्प्रचार या कवितेत गद्यशीलता टाळून येतात. ‘क्या करूँ मं? क्या करूँ, क्या करूँ कि लगे कि मं इन्ही में से हूँ’ अशा पद्धतीने जेव्हा एखादी कविता व्यक्त होते तेव्हा ती लोकभाषेला किती सहज आपल्यात पचवते. ही फक्त अभिव्यक्तीच्याच अंगाने अशा कथनशैलीतून व्यक्त होणारी कविता नाही, तर लोकसाहित्य, पुराण आदींच्या माध्यमातून असंख्य प्रतिमा या कवितेतून सतत येत राहतात. एके ठिकाणी केदारनाथ म्हणतात, ‘आधुनिक जीवनातील जटिलता आणि अंतर्वरिोधांना व्यक्त करण्यासाठी लोकसाहित्य, धर्म, पुराण आणि इतिहासात इतकी विपुल अशी अपरिचित प्रतीके आणि प्रतिमा आहेत की त्यामुळे नव्या कवितेच्या शक्यतांचा मार्ग अधिक प्रशस्त होऊ शकतो.’ त्यांच्या ‘अभी बिल्कुल अभी’, ‘जमीन पक रही है’, ‘यहाँ से देखो’, ‘अकाल में सारस’ आदी कवितासंग्रहांमधील कवितांमध्ये लोकजीवनाशी संबंधित प्रतिमासृष्टी मोठय़ा प्रमाणावर दिसते. याचा अर्थ त्यांच्या कवितेला अज्ञात अशा मिथकांचेच आकर्षण आहे असे नाही. तसे असते तर ती कविता कदाचित इतकी सोपी आणि सामान्यांच्या इतकी जवळ वाटली नसती. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित इतके विपुल असे संदर्भ ही कविता आपल्यासमोर ठेवते तरीही ती सामान्य वाटत नाही. सामान्य माणसाच्या जगण्यातील आशा, आकांक्षा, हर्ष, खेद, त्यांच्या दैनंदिन जीवनातील चढउतार आणि वरवर भणंग वाटणाऱ्या माणसाच्या आकांक्षांना केदारनाथांच्या जादूई शब्दकळेचा स्पर्श होतो. त्यामुळेच या कवितेतील प्रतिमा आणि प्रतीकांना एक अर्थवत्ता प्राप्त होते.
‘तम्बाखु के खेतों से उठनेवाली खुंखार चमक’, ‘पत्तीयों से सिप सिप सिप सिप गिरनेवाली धिमी गुनगुनाहट’, ‘टमाटरों कि रोशनी मे लहकता हुआ चेहरा’, ‘एक विशाल फुल कि तरह खिलता हुआ शहर’, ‘जाते हुए आदमी कि धुपमें चमकती हुई पीठ’ या त्यांच्या कवितेतील प्रतिमा पाहिल्या म्हणजे कवितेतले त्यांचे अस्तित्व किती प्रभावी आहे याच साक्ष पटते. तीव्र अशी संवेदनशीलता ज्या कवीकडे आहे तोच कवी अशी तल्लख प्रतिमासृष्टी आपल्या कवितेतून उभारू शकतो. त्यांच्या कवितेत धुळीचे अस्तित्व वारंवार जाणवते आणि सूर्यिबबाचेही. धुळीविषयी तर त्यांची कविता सतत बोलत राहते. ‘मं जानता हूँ/ क्योंकि यह धुल इस कसबे की/ और मेरे पुरे देस की/ सबसे जिंदा और खुबसुरत चिज है/ सबसे बेचन/ सबसे सक्रिय/ पृथ्वीकी सबसे ताजा और प्राचीनतम धुल/ जो यहाँ दिनभर आदमी के साथ साथ..’ मग सामान्य माणसाच्या जगण्यात जिथे जिथे धूळ दिसते ते तपशील केदारनाथ आपल्यासमोर उकलत राहतात.
केदारनाथांची कविता कमालीची मितव्ययी आहे. ती कुठेही अनावश्यक शब्द धारण करताना दिसत नाही. कधी कधी ही सहजता अंगभूत आहे की त्यासाठी ते परिश्रमपूर्वक कारागिरी करतात हे लक्षातही येत नाही. त्यांच्या कवितेतील शब्दांची निवड मात्र आपल्याला मोहविते. या कवितेचे गारूड आपल्या मनावर स्वार होते. ही कविता सहजासहजी निसटून जात नाही. एखाद्या नादासारखी आतल्या आत झंकारत राहते. लोकतत्त्वांमधून आशयद्रव्य घेणारी ही कविता आधुनिकतेलाही तितक्याच समर्थपणे सामोरी जाते. सृष्टिचक्रातले असंख्य घटक कवितेत येऊनही ही कविता म्हणजे निसर्गकवी किंवा रानकवीची होत नाही. ती होते अवघ्या समष्टीचीच.
िहदीत अनेक महत्त्वाचे कवी आपल्या राजकीय भूमिकेबद्दल प्रसिद्ध आहेत. केदारनाथांची भूमिका काय किंवा कोणती प्रणाली त्यांना जवळची वाटते याचा शोध त्यांच्या कवितेतून तेवढा स्पष्टपणे दिसणार नाही. एखाद्या साच्यात या कवितेला बसविता येत नाही. समाजबदलासंबंधी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती बाळगणारा एक सूर िहदी कवितेत आढळतो तोही या कवितेत सापडत नाही; पण ही कविता समाजाच्या तळाच्या वर्गाविषयी कमालीचा आस्थाभाव बाळगणारी आहे. त्यांच्या कवितेतून सामान्य माणूस बाजूला काढता येत नाही. ‘अकाल में सारस’ या त्यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी जे औचित्य विधान केले होते त्यातून त्यांची लेखनविषयक दिशा सूचित होते. ‘िहदी कविता आणि एकूणच भारतीय कविता आज आपल्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात स्वत:ला आणि आपल्या काळातल्या माणसाला जिवंत ठेवण्यासाठी संघर्षरत आहेत. माझे लेखन हासुद्धा या संघर्षांचा अल्पसा घटक आहे. हीच बाब मला लिहिण्यासाठी ऊर्जा देते, जिच्या आधारे एक लेखक आपल्या भूमीवर उभा असतो.’ तर केदारनाथ हे सुरुवातीपासून आपल्या भूमीवर भक्कम पाय रोवून आहेत. त्यांच्याच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘मं उनकी तरफसे बोल रहा हूँ, जो चले गये है काम पर.. और देखिए न मेरी मुस्तदी कि मं सबकी ओर से बोलता हूँ। ओर बोलता हूँ अपनी पुरी सच्चाई के साथ.’ केदारनाथ हे एका अर्थाने समूहाचीच भाषा बोलतात. अभिव्यक्ती ही काळाची गरजच आहे याचे भान त्यांच्या कवितेत निरंतर जाणवते. ‘वे चुप क्यों है, जिनको आती है भाषा’ हा सवाल त्यांना अस्वस्थ करतो.
समकालीन हिंदी कवितेचा परिवेश बदलला. अनेक मोठे कवी बदलत्या काळानुरूप आपल्या अभिव्यक्तीत बदल करताना दिसले; पण केदारनाथांच्या कवितेची भाषा बदलली नाही. एका कवितेत ते म्हणतात, ‘ठण्ड से नहीं मरते शब्द, वे मर जाते है साहस की कमी से.’ आजच्या काळात सर्जनशील लेखकांसाठी हे फार महत्त्वाचे आहे.
समूहाची भाषा बोलणारा कवी
राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानला जाणारा २०१३ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हिंदी भाषेतील ज्येष्ठ कवी केदारनाथ सिंह यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या कवीच्या कवित्वाचा शोध घेणारा लेख..
First published on: 29-06-2014 at 01:14 IST
TOPICSकवी
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A poet who speaks language of community