ज्येष्ठ संगीत अभ्यासक, शास्त्रीय गायक आणि भारतीय संगीतशास्त्राचे मर्मज्ञ अभ्यासक (कै.) डॉ. अशोक दा. रानडे यांच्यावरील ‘मर्मज्ञ’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन नुकतेच झाले. बुद्विगम्य विनोदाच्या झालरी घेऊन शैलीदारपणे त्यांचा अभ्यास, चिंतन आणि अधिकार यांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे डॉ.रानडे.  हा व्यासंगाचा महामेरू ‘अंतरी नाना कळा’ वागवतो, हे जाणवल्यानंतर त्यांचा थोडा का होईना सहवास आपल्याला मिळाला हे आपलं थोर भाग्य, अशी ओतप्रोत भावना व्यक्त करायला लावणारा हा त्या गौरवग्रंथातील एक लेख!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ए नसीपीएमध्ये डॉ. अशोक दा. रानडे यांच्या हाताखाली सुमारे वर्षभर काम करण्याचा योग अगदी सहज बोलण्यातून जुळून आला. तत्पूर्वी अशोकजींचा परिचय प्रो. बी. आर. देवधरांचा एक व्यासंगी विद्यार्थी, मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख, संगीत विषयाचे लेखक वगरे म्हणून झालेला होताच. माझे वडील (कै.) पं. वामनराव सडोलीकर यांच्याकडून अशोकजी गिरगावात राहत असताना गजाननबुवा, बोडस आणि गानू यांच्याकडे कसे शिकत, तसंच प्रो. बी. आर. देवधरांकडून ग्वाल्हेर गायकी बरोबरच अन्य घराण्यांच्याही उठावदार बंदिशी कशा आत्मसात करत असत हेही ऐकलं होतं.
शास्त्रीय संगीताची साधना म्हणजे सतीचं वाणच! ते एकदा स्वीकारलं की, अथक परिश्रमांना पर्याय नसतो. पण ही साधना सर्वसमावेशक दृष्टीशिवाय एकांगी वाढ झाल्याप्रमाणे खुरटी होते. केवळ गाणंच नव्हे, तर संगीत या विषयाचा जीवनाच्या ज्या ज्या अंगांना स्पर्श होतो त्या सर्वाचं भान येणं, त्याची व्याप्ती ओळखणं हा सर्वात कठीण भाग अशोकजींनी आपल्या अभ्यासाचा विषय केला होता. अशोकजी फक्त वाचलेलं बोलत नसत, तर वाचलेलं पचवून गात देखील. व्याख्यान देताना न अडखळता अनुरूप शब्द वापरून जसे ते विषय समोर मांडत त्याच नेमकेपणानं अशोकजी ख्याल, भक्तिगीत, गवळण, लावणी इ. संगीतप्रकारही सादर करत. आवाज-साधना-शास्त्रसुद्धा आपल्या गुरूंप्रमाणे अशोकजींनी अभ्यासलं असून गायन आणि संभाषण, नाटकातील संवाद इत्यादी सर्वासाठी त्याचा उपयोग कसा करावा याचे अभ्यासवर्गही ते घेत असत.
अशोकजींची साहाय्यक म्हणून काम करत असताना मला संगीताच्या विविध विधांकडे पाहण्याची एक निरोगी नजर मिळाली. अशोकजींच्या सहवासातील माझं ते वर्ष म्हणजे सर्जक प्रवृत्तींनी ओतप्रोत भरलेला, झपाटलेला असा काळ होता. ज्योत्स्ना भोळे, गजाननराव वाटवे अशा नामवंत भावगीत गायकांच्या सोबतीनं पु.ल. आणि अशोकजी यांनी भावगीत या प्रकाराची भावनात्मक आणि स्वरात्मक गुंफण अलगद सोडवून पुन्हा अशी विणली की, कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद मिळालाच पण वेळेच्या मर्यादेलाही श्रोते जुमानेनात. मल्हार प्रकारांवर आधारित श्रावणगीतं असोत की मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणं असो, अशोकजी त्या विषयाचा कसून सर्वागीण अभ्यास करणार आणि आपल्याला ज्ञान व मनोरंजन या दोन्हीचा लाभ होणार ही श्रोत्यांची खात्री कधीही खोटी ठरली नाही.
‘बठकीची लावणी’ हा कार्यक्रम आपल्या नावापासूनच श्रोत्यांची उत्सुकता जागवत होता. सामान्यत: लावणी म्हटली की ती फडावरचीच असा एक अपसमज दिसून येतो. मी त्या कार्यक्रमात बठकीची लावणी म्हणणार असं कळताच मला अनेकांनी प्रश्न केला, ‘‘अहो, तुम्ही तर घराणेदार गायकी गाता आणि हे काय (भलतंच)?’’ सुदैवानं माझे वडील संगीताकडे मोकळ्या मनानं पाहणारे होते. ते म्हणाले,‘‘अहो, एक लावणी तालासुरात बंदिशीसारखी बसवून बघा, म्हणजे कळेल !’’ नर्म शृंगार, कोणत्याही हावभावांविरहित शब्द-सुरांतून प्रकट करण्यासाठी संयम आणि भावनोत्कटता याचा अतिशय उत्तम समतोल कसा राखावा याचा अनुभव मला या लावण्या गाताना आला. शृंगार आणि भक्ती या दोन्ही पराकोटीच्या उत्कट भावना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू.
अशोकजींनी भक्तीरसाचेही अनेक पदर ‘देवगाणी’ या कार्यक्रमात उलगडून दाखवले. या कार्यक्रमात मी गायलेल्या ‘पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती’ या रचनेची मजा आगळी होती. तालात अगदी मजेशीर बांधली होती, तरी अर्थावर किंवा स्वरगत भावावर तालाचे अतिक्रमण होत नव्हते. मी गायलेली अशोकजींची दुसरी रचना होती एक रिवायत. गरीब अब्दुल या कवीनं पुत्रशोकानं एक आई कशी व्याकुळ होते, ते या काव्यात प्रकट केलं आहे. याची चाल दिली ती तालविरहीत. फक्त शब्द आणि स्वरांची अशी मनोरम गळाभेट या काव्यात घडवली की, ती ऐकून श्रोते सद्गदित झाले.
केवळ राग-स्वर-बंदिशींचाच नाही तर तालांचाही अशोकजींनी खूप खोलात जाऊन अभ्यास केला होता. १० मात्रांचे कित्येक प्रकारचे ताल आणि त्यांची वजनं कशी वेगवेगळी हे त्यांनी मला एकदा समजावून सांगितलं होतं. ऑफिसमध्ये खूप लिहून-वाचून त्यांना आणि मला कंटाळा आला की, आमची गाडी बंदिशींच्या गप्पांकडे वळत असे. एका पाठोपाठ एक अनेक रागातील अनेक बंदिशी धडाधडा म्हणणं आणि त्यातील बारकावे उलगडून सांगणं हे त्यांचं प्रकट चिंतनच असे.
अनेक चर्चासत्रं आणि कार्यशाळांमध्ये अशोकजींबरोबर विविध सांगीतिक चर्चामध्ये माझे पेपर्स वाचण्याची, आपली मतं मांडण्याची संधी मला मिळाली आहे. परंतु उद्घाटन होताच विषय प्रवेशाचं पहिलंच भाषण डॉ. अशोकजींनी केलं, की नंतर उरते ती फक्त द्विरुक्ती असं बव्हंशी दिसून येई. याचं कारण म्हणजे डॉ. रानडे संगीत विषयाशी संबंधित एकही पलू अभ्यासायचा सोडत नसत. ‘‘आम्ही फक्त स्वरांचे दास, छापील पुस्तकांशी आम्हाला काय देणं-घेणं ?’’ अशी कूपमंडुक वृत्ती त्यांनी बाळगली नाही. हे संगीतविषयक साहित्यावर अशोकजींचं फार मोठं ऋण आहे.
 डॉ. अशोक दा. रानडे यांची ग्रंथसंपदा मला प्रथम परिचित झाली, ती एम.ए.(संगीत)च्या अभ्यासासाठी मी ‘संगीताचे सौंदर्यशास्त्र’ हे पुस्तक हातात घेतलं तेव्हा! खरं सांगायचं तर त्यांची पुस्तक फारशी ‘लठ्ठ’ वगरे मी कधी पाहिली नाहीत. पण ती त्यांच्या शरीरयष्टीसारखीच फसवी. ‘वरवर भपका न् आतमध्ये फुसका’ असा प्रकार आपल्या कितीतरी ‘ग्रंथां’बाबत आढळतो. पण अशोकजी जसे साधे कपडे, खांद्यावर झोळी (फार तर फक्त एखादं जाकीट) या पद्धतीत वावरत, तशी त्यांची पुस्तकंही अर्थवाही वेष्टनं पांघरून अवतरतात. परंतु अशोकजींच्या अतिशय बुद्विगम्य विनोदाच्या झालरी घेऊन शैलीदारपणे त्यांचा अभ्यास, चिंतन आणि अधिकार जेव्हा साक्षात्कारासारखा समोर उभा राहतो, तेव्हा हा व्यासंगाचा महामेरू ‘अंतरी नाना कळा’ वागवतो आहे हे कळून येतं. त्यांची ग्रंथसंपत्ती ज्ञानसंतृप्त असून शब्दकळा आशयसंपन्न आहे; ती आकारानं आटोपशीर वाटली तरी आतील प्रत्येक पृष्ठ सुवर्णमोलाचं आहे हे अभ्यासूंना कळल्यावाचून राहत नाही. विनाकारण पानं भरण्यासाठी विषयाभोवती िपगा घालण्याचा व्यर्थ उद्योग करण्याऐवजी अशोकजी थेट विषयाच्या मुळालाच हात घालतात. त्या विषयाच्या नावाच्या व्युत्पत्तीपासून ते व्याप्तीपर्यंतचा प्रवास नेमका आणि नेटका कसा असावा याचा वस्तुपाठच ते घालून देतात. कित्येकदा त्यांची पुस्तकं (नव्हे, एक पुस्तक) वाचण्यासाठी, समजण्यासाठी अनेक प्रकारचे संदर्भ ग्रंथ धुंडाळावे लागतात असा माझा अनुभव आहे. एकदा त्यांच्याकडे मी सहज खटय़ाळपणानं तक्रार केली. ‘‘किती सूत्ररूपानं अर्कासारखं ज्ञानाचं अत्तर देता?’’ तर अशोकजी माझी टोपी उडवते झाले, ‘‘वाच, वाच, वाचशील तर वाचशील. आणखी थोडी सुक्षिशित गायिका झालीस तर छान होईल!’’ स्वत: वाचून इतरांना वाचवणारी फार थोडी माणसं आढळतात. डॉ. अशोक दा. रानडे हा एक वाचल्यानं वाचलेला व इतरांना वाचवणारा माणूस मी पाहिला, हे माझं थोर भाग्य !

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A readable man