दिलीप म्हैसाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथमदर्शनी मंगला गोडबोले हे नव्या पिढीच्या वाचकांना ‘टिपिकल’ नाव वाटण्याचा संभव अधिक. अशा वाचकांनी त्यांची लेखन कारकीर्द नजरेखालून घालायला हवी. ‘लेखिका मंगला गोडबोले’अशी ठाशीव प्रतिमा निर्माण केली असताना जावेद अख्तर यांच्यासारख्या परधर्मीय माणसाचं आत्मचरित्र त्यांना का लिहावंसं वाटलं असावं, याची कारणं तशी उघड आहेत. पण मराठी लेखन करणाऱ्यांचं तिकडे लक्ष गेलं नाही तिकडे मंगला गोडबोले यांचं गेलं. यासाठी त्यांच्यातल्या या शोधकवृत्तीला दाद द्यायला हवी. त्यादृष्टीने ‘जावेद अख्तर : नव्या सूर्याच्या शोधात’ हे पुस्तक मराठी वाचकांसाठी महत्त्वाचं ठरतं.

काहीही असलं तरी भारतीय जनमानसातलं जावेद अख्तर यांचं महत्त्व, स्थान याला ढळ पोचत नाही. आपल्याकडे भाषा, अस्मिता, राष्ट्रवाद यावर बोलणारे अमाप असतात, मात्र त्यात जाणते, अनुभवी आणि निर्भीडपणे व्यक्त होणारे तसे आता फार कमी शिल्लक आहेत. जावेद अख्तर हे अनुभूतीसंपन्न मुरलेलं भारतीय मुस्लीम व्यक्तिमत्त्व असल्यानं त्यांची तप्त कारकीर्द एकुणातच समजावून घेत, नुसतं विस्मयाने भारावून न जाता मंगला गोडबोले एका अनवट वाटेनं जातात. तसंच जावेद अख्तर या माणसाचे तपशील गोळा करून त्याची उत्तम पेरणी करत चरित्राची वाचनीयता जपलेली या पुस्तकात पाहायला मिळते.

मोबाइलच्या साहाय्याने विनासायास माणसाला जिज्ञासेवर स्वार होत कुठेही मुशाफिरी करण्याची सोय असल्याने विशेषत: हिन्दी, उर्दू साहित्य जगतात जावेद अख्तर यांच्याशी संबंधित कितीतरी संदर्भ आज आपल्याला उपलब्ध आहेत. त्या संदर्भाचा कलात्मक वापर करून मराठी लेखक आणि सुजाण नवे वाचक यांच्यापुढे भारतीय माणसाच्या आवाक्याचा परीघ मोजून बघण्याचा जो लेखिकने यत्न केला आहे, तो अनुपमेयच नाही तर अनुसरणीय आहे. अन्य भाषेतल्या माणसाच्या प्रतिभेचे कवडसे आपल्या भाषेवर पडत असतील तर भाषासमृद्धीचं ते एक लक्षण मानून, त्या एकूण प्रक्रियेत सहभागी व्हायला हवं, तरच आपल्या भारतीय भाषांचं सौंदर्य उमगून त्यांचं गुणरसपान अन्य वाचकांना करता येईल.

दिलीपकुमार (युसुफ), लता मंगेशकर, मजाझ लखनवी जॉं निसार अख्तर, गालिब, उर्दू भाषा, काव्य यावर जावेद अख्तर यांची अभिव्यक्ती असो अथवा त्याआडचं वैचारिक स्वातंत्र्य, जावेद हे मुरलेल्या लोणच्यासारखे आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमरही विलक्षण आहे. मंगला गोडबोले यांनी जावेद यांच्या चरितकहाणीतील एक काप बिचकतच वाचकांपुढे ठेवला आहे. सुजाण वाचकांनी त्याचं याआधीच स्वागत केलेलं आहे. मात्र जावेद हे विशाल, बहुआयामी, रसिक माणूस आहेत. त्यांच्या हृदयातला ओलावा आणि माणसाविषयीची अपार आस्था जोवर जिवंत आहे, तोवर आपल्या कानांना जावेदविषयक ऐकू येतच राहणार! जावेदसारखी स्वयंभू प्रतिभासंपन्न माणसं वारंवार जन्माला येत नसतात, तेव्हा मराठी वाचकानं, नव्या पिढीनं जीवनदृष्टी विस्तारित करायची मनीषा बाळगल्यास.. नव्या सूर्याच्या शोधात इज ए मस्ट रीड!
जावेद अख्तर यांच्या ‘तरकश’ या काव्यसंग्रहाच्या २४ व्या आवृत्तीत ‘सुबह की गोरी’ या लहानखुऱ्या नज्मच्या काही ओळी बघा-
‘आओ.. चलके सूरज ढूँढे
और न मिले तो
किरन किरन फिर जमा करे हम
और एक सूरज नया बनाए

जावेद यांची जीवनदृष्टी ही अशी आहे. ही चरित कहाणी वाचल्यावर वाचकाच्या मनात केमिकल लोच्या घडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला अनेकदा जीवनात जादू घडावी असं मनोमन वाटत असतं. या पुस्तकाच्या वाचनानं आधी तुम्ही सपशेल गारद होता आणि आठवत राहते बहुप्रतीक्षित ‘जाद’चे आपल्यातले घडून जाणे!

जावेद यांना मराठी साहित्यविश्वात विशेष सन्मानाचं स्थान आहे. मराठी साहित्य संमेलनात ते हटकून भेटतात आणि जनसमुदायापुढे फक्त मराठीच्याच बाबत घडणाऱ्या या फिनॉमिनाचं जराशा संकोचानं आपली प्रशंसनीय मतं साध्या शब्दात मांडतात. जावेद यांना समजावून घ्यायचं तर त्यांची कविता समजावून घेतली पाहिजे. जेव्हा आपल्या अर्थसधनतेनिशी एखाद्या कवीची कविता जेव्हा संवादू लागते, तेव्हा ब्रह्मानंदानुभूतीची प्रचीती येते आणि तेव्हा ती फक्त कविताच मोठी नसते तर तिचा जन्मदाता एक कमावलेल्या उंचीवरून आपल्या वाचकांकडे बघत असतो. हे पुस्तक याचीच प्रचीती देतं.

‘जावेद अख्तर:
नव्या सूर्याच्या शोधात’,

मंगला गोडबोले, राजहंस प्रकाशन,
पाने-२०८, किंमत- २७० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A search for the poet personality amy
Show comments