जितीश कलाट हा ४२ वर्ष वयाचा मुंबईकर चित्रकार १९९७ पासून, म्हणजे त्याच्या वयाच्या २३व्या वर्षांपासून चित्रप्रदर्शनं करतो आहे आणि समीक्षकांची पसंती त्याला अनेकदा मिळालेली आहे. जितीश अमक्या भाषिक समूहातला आहे, म्हणून त्याला यश मिळालं असा एक प्रवाद मध्यंतरी मुंबईत (सहसा मराठी भाषेतूनच) ऐकू येई. आजही कुठल्याशा कोपऱ्यात तसं ऐकायला मिळेल कदाचित, पण दरम्यानच्या काळात जितीशची प्रदर्शनं अनेक अशा महत्त्वाच्या ठिकाणी झाली की, जिथं तुम्ही कोणत्या भाषिक गटाचे यापेक्षा तुम्ही विचार कसा करता आणि तो तुमच्या कामांत कसा दिसतो याला महत्त्व आहे. शहरातल्या जगण्याबद्दल (विशेषत मुंबईबद्दल) काम करता-करता जितीशनं ‘भारत माझा देश आहे..’ ही प्रतिज्ञा किंवा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं ‘नियतीशी करार’ हे भाषण यांच्यावर आधारित कामंही केली.. म्हणजे, ‘प्रतिज्ञे’च्या इंग्रजी अक्षरांऐवजी त्यानं ‘डिंगबॅट्स’ प्रकारच्या टंकात (फाँटमध्ये) हीच प्रतिज्ञा पोस्टकार्डावर छापली.. या फाँटमध्ये अक्षरांच्या ऐवजी बॉम्बचं, कवटीचं, स्फोटाच्या भडक्याचं अशी चित्रं अगदी छोटय़ा कृष्णधवल बोधचिन्हवजा स्वरूपात असतात! जितीशनं फक्त फाँट बदलला. किंवा, आरशाइतक्या चकचकीत अ‍ॅक्रिलिक शीटमधून कापलेल्या अक्षरांच्या कडा जाळून, नेहरूंच्या ‘नियतीशी करार’ भाषणातली ती अक्षरं कोळपून जात असल्याची जाणीव जितीशनं प्रेक्षकाला होऊ दिली. किंवा, स्वामी विवेकानंदांनी शिकागोत केलेलं अख्खं भाषण त्यानं ‘आर्ट इन्स्टिटय़ूट ऑफ शिकागो’च्या मुख्य पायऱ्यांच्या मध्ये (पाय न पडावा, अशाच जागी) एलईडीद्वारे प्रदीप्त झालेल्या शब्दांत मांडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जितीश हा कॅनव्हासवर रंगचित्रं करणारा चित्रकार आहेच. त्यानं फोटोकॉपी तंत्राचा वापर कॅनव्हासवर भरपूर केला होता म्हणून ‘याला माणूस नाही रे काढता येत,’ अशी त्याची छीथूसुद्धा अनेकांनी (त्याच्या अपरोक्ष) करून झालेली आहेच. पण आजच्या काळातला दृश्यकलावंत म्हणून जितीशनं अभिव्यक्तीची झेप ज्या विविध दिशांनी घेतलेली आहे, ती- त्याच्याबद्दल कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा अशी आहे. अक्षरांवर आधारलेलं काम, हा त्याच्या अभिव्यक्तीचा निव्वळ एक भाग झाला. पण तो भागही लक्षणीय ठरू लागला आहे.
अशा जितीशनं यंदा (१५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१६) मुंबईच्या ‘जहांगीर निकल्सन कलासंग्रह दालना’त, अक्षरांवर आधारलेलं त्याचं नवं काम प्रदर्शित केलं. यातली अक्षरं कुण्या भलत्याच फाँटमधली नव्हती, कोळपलेली नव्हती किंवा प्रदीप्त झालेलीही नव्हती.. साधी पांढऱ्यावरली काळी अक्षरं.. टंकलेखनयंत्रावर टंकित केलेल्या जुन्या पत्रातल्यासारखी. ही अक्षरं जणू काही चित्रपटाची श्रेयनामावली पडद्यावरून वर-वर सरकत जावी आणि सावकाश हलणाऱ्या त्या ओळी प्रेक्षकांना सहज वाचता याव्यात, अशा रीतीनं इथं प्रेक्षकासमोर येत होती. मात्र, त्यासाठी जितीशनं जो पडदा वापरला होता, तो होता धुक्याचा- म्हणजे चित्रपटांमध्ये वापरतात तशा ‘ड्राय फॉग’चा! गॅलरीमधला जवळपास दोनतृतीयांश भाग प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी मोकळा होता, त्यावर या अक्षरांच्या सावल्या आपोआपच पडत होत्या. एका पायपाच्या अनेक छिद्रांमधून ‘पडदा’ करणारं धुकं सतत पाझरत होतं आणि ते विरून गॅलरीभर पसरत होतं. प्रेक्षकाला या धुक्याचा काहीच त्रास होत नसल्यानं ते पुढे जाऊ शकत. पडदा धुक्याचाच, त्यामुळे काही प्रेक्षक तर पडद्यातून आरपार जाण्याची मौजही लुटत. हा असा धुकं आणि प्रकाशाचा दृश्यानुभव तिकडे युरोपात १९६० आणि १९७०च्या दशकांतल्या मिनिमलिस्ट कलावंतांनी याआधी अमूर्तपणे दिलेला आहे, हे चित्रकलेच्या इतिहासाची चाड असणाऱ्या बऱ्याच जणांना आठवायचं (इथं हे लिहितानाही, फ्रँकफर्टच्या ‘एमएमके’ संग्रहालयाच्या एका खोलीत २००६ साली, अँथनी मॅक् कॉल या ब्रिटिश दृश्यकलावंतानं १९७३ मध्ये केलेलं ‘लाइन डिस्क्रायबिंग अ कोन’ नावाचं काम पाहिल्याचं आठवतंय.. १६ मि.मि. प्रोजेक्टर वापरून केलेल्या या कामासोबतही धुकं असल्यामुळे आधी एकच रेषा, मग अंशाअंशांनी वाढत जाऊन ३६० अंशांचं वर्तुळ होणारा कोन दिसायचा!) जितीशच्याही कामात अँथनी मॅक् कॉलनंच वापरलेले घटक आहेत : प्रोजेक्टर, भगभगीत पांढरा प्रकाश, सावली आणि धुकं.. म्हणजे जितीशनं पाश्चात्त्यांची कॉपी केली का?
नाही. जितीश मॅक् कॉलच्या कामामधल्या दृश्यभागापाशी न थबकता राजकीय आशयाकडे गेला. (म्हणजे असंही म्हणता येईल की, ‘पुढे गेला’. पण असं चित्रकारांत पुढे-मागे ठरवू नये, हेच बरं). काय आशय होता त्यात?
जर्मनीचा नेता आणि अनेकानेक अनुयायांचा हृदयसम्राट आणि त्याहीपेक्षा ज्याचा आर्यन वर्चस्ववाद स्वतला आर्यन मानणाऱ्या सामान्य माणसालाही भिडायचा आणि ते ज्याला जर्मनीचा विकासपुरुष मानायचे, असा अ‍ॅडॉल्फ हिटलर याला २३ जुलै १९३९ रोजी भारतातल्या तत्कालीन काँग्रेसचे (३१ जानेवारी १९४८ रोजी खून झालेले) मोहनदास करमचंद गांधी यांनी पाठवलेलं पत्र जितीशनं लोकांसमोर मांडलं होतं! हिटलरला गांधीजींनी लिहिलेलं हे पहिलंच पत्र. ‘प्रिय मित्र, तुम्हांस मी पत्र लिहिणे हे तुम्हांस अवमानकारक होईल की काय अशा विचाराने मी माझ्या मित्रांची विनंती अव्हेरत होतो, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून एक विनंती करण्यासाठी लिहीत आहे..’ अशी त्याची सुरुवात आहे आणि पुढे ‘युद्ध टाळण्याची, थांबवण्याची क्षमता आजघडीला एकटय़ा तुमच्यातच आहे.. युद्धाचा फेरविचार करा.. एखादी गोष्ट तुमच्यासाठी कितीही अमूल्य असली तरी तिची किंमत तुम्ही चुकवायलाच हवी का? .. असो, जर तुम्हांस मी लिहिणे चुकीचे वाटत असेल, तर क्षमा असावी’ अशी वाक्यं आहेत. अहिंसा, इंद्रियनिग्रह यांत स्वतला (गांधींना) यशच आले असे नव्हे, पण तो मार्ग मानवतेसाठी महत्त्वाचा ठरतो अशा अर्थाची वाक्येही आहेत. मुळात हिटलरला पत्र पाठवणं ही कृतीदेखील अहिंसक प्रयत्नांचं महत्त्व जाणण्यातूनच झालेली आहे.
यातून आजच्या ‘फेसबुक-ट्विटर’च्या जमान्यात केवळ ‘हे गांधी हिटलरला ‘प्रिय मित्र’ म्हणाल्याचा लेखी पुरावा आहे!!!’ असल्या थराचा प्रचारही होऊ शकतोच. पण इतिहासाबद्दल अज्ञानाच्या अंधार आणि धुक्यातून लोक बाहेर आले, तर तो प्रचार टिकणार नाही.
जितीशनं या अंधाऱ्या धुक्यातूनच, प्रकाशाचे काही कवडसे प्रेक्षकापर्यंत पोहोचवले. हे काम नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत अमेरिकेत, फिलाडेल्फिया कला संग्रहालयात मांडलं जाणार आहे.
अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com