चर्चा सेन्सॉर बोर्डाबद्दल ‘उडता पंजाब’मुळे सुरू झालेली असो किंवा ‘एआयबी’ (ऑल इंडिया बक्चोद) या गटातल्या कुणा तन्मय भटनं केलेल्या विनोदांमुळे.. त्या चर्चेतला एक सूर हा- ‘पण त्यांना तसं करण्याची गरज काय होती?’ हा असतो. तो मुद्दा म्हणून मान्य केला, तर एकंदर अभिव्यक्तीचीच गरज काय, असा त्या सुराचा अर्थ असल्याचं लक्षात येईल. ज्यांना ते लक्षात येणारच नाही, त्यांना अभिव्यक्ती मूलत मुक्तच असते, हे पटलेलं नसतं. अभिव्यक्ती बेछूट नको, अर्निबध नको अशा अपेक्षा अगदी आर्जवी मृदू आवाजात आणि सभ्यपणेच मांडणारे लोक अभिव्यक्तीवर र्निबध नेमके कसले हवे आहेत याचा विचार आजकालच्या संदर्भात करत नसतात. देश किंवा राज्य किंवा धर्मश्रद्धा किंवा सामाजिक सहमती हे र्निबध आजच्या जागतिकीकरणोत्तर आणि इंटरनेटच्या काळात पुरेसे ठरतात का? केवळ इंटरनेटमुळे नव्हे, तर वैचारिक आणि तात्त्विक पातळीवरही ‘धर्मश्रद्धा’ किंवा ‘देशाविषयी आदर’ या संकल्पनांना आव्हान मिळालेलं असताना त्याच संकल्पनांचा बचाव करता येतो का? हे प्रश्न अभिव्यक्ती अर्निबध नको, असं म्हणणाऱ्यांकडून विचारात घेतले जात नाहीत. त्यांचं म्हणणं एवढंच असतं की, अभिव्यक्तीवर काही किमान किंवा वाजवी (!) र्निबध असतील तर समाजाचं भलंच होईल.
अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर र्निबध हवेत असं म्हणणारे बहुतेकदा सभ्यतेच्या संकेतांचेही पुरस्कर्ते असतात. त्यामुळे, हा ‘भलंच होईल’ वाला युक्तिवाद नाकारता येणं कठीण आहे. पण अशक्य नाही. स्वतच्याच धर्माचा किंवा स्वतच्याच देशातल्या जिवंत नेत्याचा अपमान करावासा वाटण्यासारखी परिस्थिती कधी असूच शकत नाही का? लौकिकाच्या पाठीमागे आपण इतके लागलो आहोत की पारलौकिकाचा आदर आजही सर्वच जणांनी केला पाहिजे, ही अपेक्षाच मुळात हास्यास्पद ठरत नाही का? समजा, ती तशी हास्यास्पद ठरते आहे असं कुणाला वाटत असेल आणि त्यातून एखादी कलाकृती घडणार असेल, तर तिला दाबून टाकणार आपण? आणि दाबणार तरी कसे? – तर ‘हे आमच्या देशात किंवा अमुक धर्माच्या लोकांची बहुसंख्या असलेल्या ठिकाणी- चालणार नाही’ एवढय़ाच भांडवलावर ना?
अभिव्यक्तीवर र्निबध घालू पाहणाऱ्यांची वैचारिक आयुधं कमी आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांकडे त्यापेक्षा अधिक वैचारिक ताकद आहे. मात्र कायदेशीर बंधनं, समाजाचा किंवा लोकांचा दबाव अशी हत्यारं अभिव्यक्तीवर र्निबध घालण्यासाठी आजही भरपूर मोठय़ा प्रमाणात आहेत. म्हणजे आता, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी युक्तीच्या लढाया आवश्यक आहेत.
अँटोनिओ गारुलो आणि मारिओ ओट्टोसेन्टो यांनी हीच युक्ती केली. ते दोघे इटालियन दृश्यकलावंत. गारुलो हा अगदी मानवाकृती वगैरे काढणारा चित्रकार होता आणि ओट्टोसेन्टो हा अमूर्त भासणारी शिल्पं घडवायचा. हे दोघे पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडले. मग जिथं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता आहे, अशा द हेग शहरात जाऊन त्यांनी लग्न केलं. या विवाहाची कागदपत्रं इटलीतल्या त्यांच्या लॅटिना या गावाची पालिका दाखल करूनच घेईना, तेव्हा त्यांनी कायदेशीर लढा सुरू केला. अखेर दहा वर्षांन- २०१२ मध्ये इटलीच्या सर्वोच्च न्यायालयानं हा विवाह मंजूर केला. ही अत्यंत खासगी (पण इंटरनेटवर वाचता येणारी) पाश्र्वभूमी एवढय़ाचसाठी महत्त्वाची की, त्या दहा वर्षांत लग्नसंस्थेचा अगदी मूलभूत विचार धसाला लावताना धर्म, समाज, आजचे सामाजिक संकेत अशा अनेक ‘बंधनां’चाही विचार या दुकलीला करावा लागलेला असणारच, हे कुणाच्याही लक्षात यावं. त्या दोघांच्या कलाकृतींत मोठा फरक पडला, तो या कायदेशीर झगडय़ाचा काळ संपत आला असताना. त्यांनी किती गोष्टींचा सामना केला होता आणि त्यातून त्यांच्या अभिव्यक्तीमागची वैचारिक भूमिका किती स्पष्ट होत गेली होती, हेच या ‘नव्या’ (२०१०-११ पासूनच्या) कलाकृतींतून स्पष्ट होत होतं.
या दुकलीनं केलेल्या दोन कलाकृती व्हेनिसच्या ५६ व्या द्वैवार्षिक महाप्रदर्शनाच्या (बिएनालेच्या) निमित्तानं भरलेल्या एका सह-प्रदर्शनात २०१५ साली मांडल्या गेल्या. त्यापैकी पहिली होती, काचेच्या पेटीत जणू एखाद्या ख्रिस्ती संताच्या शवासारखी ठेवली गेलेली हुबेहूब मानवाकृती. दुसरी कलाकृती एका बंद खोक्यात होती. या खोक्याला एकच भोक होतं आणि त्या भोकाला भिंगासारखी काच लावली होती. त्या काचेतून आत पाहिल्यावर काय दिसायचं? तर क्रूसासकट आडवा निश्चेष्ट पडलेला येशूख्रिस्त आणि त्याच्या विदीर्ण बरगडीला जणू आता हा गुदगुल्या करणार की काय, अशा पवित्र्यातला मिकी माऊस! येशू ‘आहे’; तसा मिकीसुद्धा ‘आहे’च. लोक धर्म मानतात. पण हेच लोक डिस्नेच्या सचेतपटांचे (अॅनिमेशन फिल्म्सचे) दिवाणे नाहीत काय? डिस्नेचा मिकी माउस प्रयत्नवादी आहे आणि ‘टॉम कॅट’च्या क्रूर डावांचा तितक्याच शूर आणि क्रूर तडफेनं प्रतिकार करणाराही आहे. क्रौर्य किंवा हिंसकपणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी जीवनेच्छा पाहावी आणि भरपूर हसावं, अशी ‘सिद्धी’ त्याच्या डिस्ने या क्रिएटरमुळे त्याला लाभली आहे. या दोघांना एकत्र पाहून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील, तर अँटोनिओ आणि मारिओ हेदेखील मुळात त्याच धर्माचे होते.. फक्त आजघडीला एकंदरच धर्मसंकल्पनेशी माणूस कसा वागतो याची जाण त्यांना आलेली आहे.. एवढं लक्षात ठेवावं.
आणि तो काचेच्या पेटीतला राजकारणी? त्याचं नाव सॅव्हिओ बर्लुस्कोनी. इटलीचे माजी पंतप्रधान! भ्रष्टाचार आणि अन्य आरोपांखाली आता तुरुंगात आहेत, ते. पण तेही कधीकाळी अत्यंत लोकप्रिय होते. ‘मी म्हणजे अनेक इटालियनांचं स्वप्न’ असं ते (विशेषत महिलांकडे पाहात) म्हणायचे, तेव्हा टाळय़ांचा कडकडाट होई. पुढे बर्लुस्कोनी भ्रष्टच ठरल्यामुळे त्यांची प्रतिकृती प्रेतासारखी ठेवून ‘देशद्रोह’ नसेल झाला, पण एखाद्या संततुल्य धर्मगुरूचंच शव जसं जपतात, तसं बर्लुस्कोनीचं जपल्याची कल्पना मांडल्यामुळे ‘धर्मद्रोह’ तर झाला असेलच की नाही? बर्लुस्कोनीला चर्चचा पाठिंबा होता, ही बाब लक्षात घेतल्यास ही कलाकृती अधिकच झोंबरी ठरते. या काचपेटील्या बलुस्कोनीनं जे बूट घातलेत, ते मिकी माऊसच्या आकाराचे आहेत.
आधुनिक कलेच्या काही जाणकारांना इथं ‘पिस ख्राइस्ट’ ही आन्द्रेस सेरानो या अमेरिकी चित्रकाराची कलाकृती आठवेल. पण तिची चर्चा इथे करण्याचं कारण नाही (ती चर्चा तर विकिपीडियावरसुद्धा असेल). इथे एवढंच सांगायचंय की, अभिव्यक्तीतला कडवटपणा, ‘द्रोही’पणा, ‘निंदा’ केल्यासारखं वाटणं.. हे सारे बाहेरून किंवा अमुक चष्मा घालून पाहिल्यावर होणारे आरोप आहेत. मुळात अभिव्यक्ती ही कलाकाराच्या स्वानुभव-मालिकेतून त्याचा जो अभिगम (अॅटिटय़ूड) तयार होत जातो, त्यातून सहजपणेच निपजलेली असू शकते. या सहजपणाला जर आत्ताच्या जगाबद्दल कलावंतांला पडणाऱ्या प्रश्नांची जोड मिळाली, ते प्रश्न इतरांपेक्षा पुढले असले, तर बाकीच्यांना ती कलाकृती न समजल्यामुळे तिच्यावर आरोप करण्याखेरीज काहीच सुचणार नाही. ‘मिकी माउस’ या प्रतिमेचा अतिवापर करून ही समलिंगी दुक्कल काय साध्य करते आहे, याची चर्चाही मग बाजूलाच राहील.
अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा