मणिपूर या ईशान्येकडल्या राज्यात शनिवार-रविवारी कडकडीत बंद पाळला गेला. देशाच्या अन्य राज्यांतले लोक हे मणिपूरवासींप्रमाणेच भारतीय असले तरी बिगरमणिपुरींना या राज्यात प्रवेश आणि संचारासाठी ‘इनर लाइन परमिट’ आवश्यक असतं. ते नियम शिथिल झालेले मणिपुरी अस्मितावादी गटांना खपले नाहीत. म्हणून बंदची हाक. बंदला ‘यश’ कशामुळे? तो पुकारणाऱ्यांच्या भीतीमुळे की लोकांचा खरोखरच पाठिंबा असल्यामुळे? हे देशाच्या कोणत्याही अन्य राज्याप्रमाणेच इथंही गुलदस्त्यात. याहून वाईट हे की, ‘इनर लाइन परमिट’चे नियम शिथिल होणार, अशी नुसती अफवा जरी उठली तरीही या राज्यात बंद यशस्वी होतो, हा इतिहास आहे. सैन्यदलांना विशेष अधिकार देणारा कायदा (‘अफ्स्पा’) मणिपुरात १९८० च्या इंदिराकाळापासून लागू आहे. केंद्रात वाजपेयींसकट कोणतीही, कितीही सरकारं आली तरी त्यात बदल झालेला नाही व या अनास्थेविरोधात इरोम शर्मिलानं २००० सालच्या नोव्हेंबरात धरलेलं उपोषणही काही सुटत नाही. या असल्या स्थितीत कला वगैरे वाढू शकतात का? तरीही संगीत नाटक अकादमीचे फेलो (अकादमीरत्न) रतन थिय्याम हे इथलेच! थिय्याम यांच्या नाटय़कृतींचा कल काहीसा अभिजातवादाकडे असतो. असं म्हणता येईल की, मणिपुरी लोकक्षोभ हे काही अपरिपक्व अस्मितावादी गटांचं काम आहे, या आम भारतीय मताशी थिय्याम सहमत आहेत. दुसरीकडे लोककलेतून लोकपरंपरा जिवंत ठेवण्याचं काम करणारी झामथिंग्ला रुइवा हीदेखील इथलीच! आणि या झामथिंग्ला रुइवाची सहानुभूती लोकक्षोभाच्या बाजूने आहे. क्षोभ का असावा, याचा अनुभव ती २० वर्षांची असताना तिच्यासमोर आला. मात्र, म्हणून झामथिंग्ला हिंसक वा अतिरेकी बनली नाही. उलट, त्या अनुभवामध्ये ‘लोककथा’ होण्याची ताकद आहे, हे तिनं ओळखलं..
म्हणजे नेमकं काय झालं, हे जरा खुलासेवार सांगायला हवं. ते असं :
झामथिंग्ला रुइवा यांचा जन्म मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यतील ङ्गाइङ्गा (मराठीतील सोप्या उच्चारानुसार लिहिल्यास : ‘अंगाअिंगा’) या गावात १९६६ साली झाला. या गावातील तङ्खुल (किंवा ‘तंखुल’) नागा जमातीच्या वस्तीत रुइवा यांचे घर होते. तेथून काही अंतरावर लुइंगम्ला मुइनाओ (जन्म १९६८) ही मुलगी राहत असे. या वस्तीतील मुली सहसा घरीच राहून शाली किंवा अन्य कपडे विणत असत. लुइंगम्ला घरात एकटीच विणत बसलेली असताना १९८६ सालचा २४ जानेवारी हा दिवस तिच्यासाठी अखेरचा ठरला. त्या दिवशी तिच्या घरात ‘झडतीसाठी’ सुरक्षा दले घुसली. काही वेळाने या घरातून आधी किंचाळ्यांसारखे, मग गोळीबाराचे आवाज ऐकू आले आणि मग रक्ताच्या थारोळ्यात लुइंगम्लाचा देह सापडला. ‘स्वत:च्या अब्रूरक्षणासाठी ही मुलगी सुरक्षा दलांशी प्राणांची पर्वा न करता भांडली..’ असा निष्कर्ष शेजाऱ्यापाजाऱ्यांनी काढला. लोकक्षोभ इतका उसळला, की त्यावर्षीच्या आणि पुढल्याही वर्षीच्या प्रजासत्ताक दिनावर गावानेच नव्हे, तर समस्त तंखुल नागा जमातीनेच बहिष्कार घातला. दुसरीकडे नागा विद्यार्थी संघटनांमार्फत तातडीने हे प्रकरण धसाला लावण्यात आले आणि अखेर १९८८ पासून लष्कराने या प्रकरणी ‘कोर्ट मार्शल’ सुरू केले. त्याचा निकाल यथावकाश (बहुधा १९९० मध्ये!) लागून कॅप्टन मनधीर सिंग आणि लेफ्टनंट संजीव दुबे हे अधिकारी दोषी ठरले. म्हणजेच ‘अब्रूरक्षणासाठी प्राणत्याग’ हे नागांचे म्हणणे खरे ठरले.
झामथिंग्ला हे सारे पाहत होती. कोर्ट मार्शलचा निकाल नागांची बाजू उचलून धरणारा असेल असे अनेकांप्रमाणेच तिलाही अजिबात वाटले नव्हते. पण ती स्वस्थ बसली नव्हती. तिने तंखुल शालींवर वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिमांचा नवा अर्थ लावून ‘लुइंगम्ला कशान’ तयार केली. ‘कशान’ म्हणजे शाल. हेच नागा स्त्रियांनी अंगभर वापरण्याचे वस्त्र असते. त्या अर्थाने कशान हे अब्रूरक्षणाचे मूलभूत साधन असते.
पण ही नवी ‘लुइंगम्ला कशान’ म्हणजे ‘आजकालच्या लोककले’चा नमुना कशी काय? हे समजून घेण्यासाठी लुइंगम्ला-झामथिंग्ला यांच्यापलीकडे विचार करू.
लोककला (विशेषत: दृश्य-लोककला) ही त्या लोकसमूहामध्ये पिढय़ानुपिढय़ा चालत आलेल्या कथा, मिथकं यांची प्रतीकरूपं ‘डिझाइन’च्या अंगाने दाखवणारी असते. मग दागिन्यांची घडण, स्मारकस्तंभ (वारली, मधुबनी आदी), भिंतींवरली देव, निसर्ग, लोकनृत्याची चित्रं या साऱ्यामागे प्रतीकं असतात आणि ती कसली आहेत, हे किमान त्या- त्या लोकसमूहाला माहीत असतंच.
दुसरीकडे ‘दृश्याचा नवा अर्थ लावण्याची मोकळीक असणं- तो अर्थ प्रेक्षकानुसार बदलतसुद्धा जाणं’ आणि ‘मूळ कर्त्यांने घडवलेल्या चित्रभाषेचा, त्यातून निर्माण झालेल्या प्रतीकांचा अर्थ आणखी निराळा असू शकणं’ ही कलाकृतींमध्ये आजकाल आढळणारी वैशिष्टय़ं लोककलेच्या विरुद्ध म्हणावीत अशी आहेत. व्यक्तिवादी चित्रभाषेचा अर्थ सांगण्यासाठी मग ‘क्युरेटर’ किंवा कलासमीक्षक मंडळी सरसावतात आणि प्रेक्षकांच्या मनातला गोंधळ जरा कमी होण्यास मदत करतात. हेच आजकालच्याच नव्हे, तर १०० वर्षांपूर्वीपासूनच्या ‘आधुनिकतावादी’ कलेबद्दलही खरं आहे.
झामथिंग्लानं या दोन्हीचं एकत्रीकरण केलं!
म्हणजे तिनं ‘अब्रूरक्षणासाठी दिलेल्या झुंजीचा आदर्श’ या अर्थानं दंतकथा बनलेल्या लुइंगम्ला-प्रसंगावर शालीसारखी दृश्य-कलाकृती निर्माण करताना व्यक्तिवादी चित्रभाषा वापरली. पण पुढे नागा महिलागटांपुढे (यांना तंखुल भाषेत ‘शानाओ-लाँग’ म्हणतात) ही शाल कसली आहे, ही अशीच का केलेली आहे, तिच्यातल्या प्रतीकांचा अर्थ मला कसकसा अभिप्रेत आहे, हे सगळं झामथिंग्लानं सांगितलं.
‘फुलपाखरू’ आणि ‘बेडकाची घाण’ अशी प्रतीकं या शालीवर आहेत! यातलं फुलपाखरू म्हणजे लुइंगम्ला- किंवा कोणतीही स्त्री.. हे प्रतीक हिरव्या-पांढऱ्या रंगांतल्या दोन त्रिकोणांतून बनलेलं आहे. आणि अशा प्रत्येक ‘फुलपाखरा’च्या पुढे वा मागे करपट काळसर रंगाची ‘बेडूक-घाण’ आहे.. तिचा अर्थ न सांगता साऱ्यांना समजलाच!!
या शालीचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे शाल आडवी धरली असता डाव्या-उजव्या दोन्ही बाजूंना कंगव्यानं विंचरल्यासारख्या दिसणाऱ्या आडव्या रेघा. नागांच्या किमान दहा जमाती. प्रत्येक जमातीची एक शाल. पण अशा विंचरलेल्या रेघा इतक्या पसरलेल्या कुठल्याच शालीत नसतात. या रेघांना ‘फोरेइ-फोर’ म्हणून ओळखावं, असं झामथिंग्लाचं म्हणणं आहे. या नाजूक रेघा म्हणजे स्त्रीची अब्रू. त्यातून काही धागे बाहेर निघालेले आहेत. ते अर्धेमुर्धेपण झामथिंग्लानं तसंच जपून ठेवलं आहे. याखेरीज पत्त्यातल्या ‘चौकट’सारखे अगदी बारीक आकार आहेत.. ते ‘लोकांचे डोळे’ आहेत.
शाल का केली आहे, ती काय सांगते आहे, हे बायकांना कळलं. आता पुढला टप्पा- ‘लोककला’ होण्याचा. तो या बायकांनीच गाठला. प्रत्येकीच्या घरात अशाच्या अशा डिझाइनची शाल- म्हणजेच ‘लुइंगम्ला कशान’- विणली गेली! इथे संघटित स्त्रीशक्ती होतीच. ‘शानाओ लाँग’च्या सर्वच जणी सदस्य होत्या. तंखुल बाईनं या संघटनेची सदस्य नसणं म्हणजे टोळीबाता असा खास आदिम जमातींनाच शोभणारा विश्वास या संघटनेच्या ताकदीमागे होता. त्याहीमुळे असेल, पण आजघडीला घरोघरी ‘लुइंगम्ला कशान’ आहे! तंखुल नागा जमातीच्या बायका दर २४ जानेवारीला ही ‘लुइंगम्ला कशान’ आवर्जून परिधान करतातच.
..आणि हो, या कशाननंतर देशभरच्या कोणत्याही शहरात ‘तंखुल शॉल आर्ट’चे क्लासेसबिसेस काढण्याचा आदिवासीद्रोह कोणीही केलेला नसल्यामुळे या कलाकृतीचा दुरूनच आदर करावा लागणार आहे. ईशान्य भारतातील समकालीन कलेचा अभ्यास करताना मूळ मुंबईकर असलेल्या झाशा कोला यांना झामथिंग्ला शालीची माहिती कळली, म्हणून दिल्लीतल्या ‘माटी घर’मध्ये २००९ साली भरलेल्या ‘इन्सर्ट’ या मोठय़ा प्रदर्शनात झामथिंग्ला आणि इतर स्त्रियांनी विणलेल्या या शाली प्रदर्शित झाल्या. त्या तिथं पाहताना ‘लोककला स्वत्व टिकवूनही समकालीन असू शकते’ याचा आनंद अधिक उत्कट होता.
अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा