१९९० नंतरच्या जागतिक दृश्य-कलाकृतींच्या मराठी मनानं घेतलेल्या अनुभवांचे पाक्षिक सदर!
‘माणसं साठी-पासष्टीच्या आत खपायचीच. त्यामुळे मग ७५ वर्षांचा झाला तरी मेला नाही, हे साजरं करण्यासाठी जो काही सोहळा होईल तो अ-मृत महोत्सव!’ अशी विधानं गमतीनं- आणि अगदी परिचितांमध्येच का होईना, पण अशोक शहाणे यांनी स्वत:च्याच अमृतमहोत्सवी सोहळ्यात काही वर्षांपूर्वी केली होती. अशोक शहाणे हे ‘प्रास प्रकाशना’तून मराठी-इंग्रजी भाषेला समृद्ध करणारे प्रकाशक, समीक्षक, लेखक आणि १९६० च्या दशकातील लघु-अनियतकालिक चळवळीचे उद्गाते म्हणून मोठे आहेतच; पण ते स्पष्टवक्ते आहेत. आणि त्यांच्या या स्पष्टवक्तेपणातून नवे किंवा निराळे दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचतात, ही शहाणे यांना ओळखणाऱ्यांनी बांधलेली खूणगाठ अधिक पक्की झाली. त्या खूणगाठीतून त्यावेळी मिळत असलेला दृष्टिकोन काय होता, हे मात्र जॉर्ज बेसेलित्झच्या महाकाय चित्रांसमोर उभं राहिल्यानंतर उमगलं.
ही महाकाय चित्रं होती आठ. प्रत्येकाला निरनिराळं शीर्षक वगैरे. त्या शीर्षकांमधून बिगरयुरोपीय माणसांनाही चित्रांचा अर्थ कळण्याची शक्यता शून्य! ‘नॉट फॉलिंग ऑफ द वॉल’, ‘नो पोप इज अॅव्हिनॉन’, ‘ द पोप इज इन रोम’, ‘अॅव्हिनॉन डाडा स्ट्रिप’ असली काहीतरी शीर्षकं वाचून अर्थबिर्थ लावण्याचा नाद सोडावाच. त्यापेक्षा सरळ चित्रांपुढे उभं राहून चित्रांमधून काय उमगतंय ते पाहावं, हे अधिक सोपं. चित्राचे प्रेक्षक या चित्रांपुढे खुजे.. ठेंगणे दिसतील, एवढी प्रचंड चित्रं ही. पोवाडय़ातला आवाज वरचाच असतो. देवळं उंचच असतात. फार कशाला, हल्लीच्या नेत्यांचे दणक्यात केलेले उत्सवसुद्धा विक्रमी ठरावेत असेच असतात. यातलं काय चांगलं आणि काय वाईट, याची चर्चा इथे नको करायला; पण अशा उदाहरणांमधलं महत्त्वाचं साम्य म्हणजे ‘भव्यतेतून दिव्यता’ हे तत्त्व. ते इथे या जॉर्ज बेसेलित्झच्या प्रचंड चित्रांसमोर उभं राहून जाणवत होतं. फक्त एक अगदी मोठ्ठाच्या मोठ्ठा फरक होता..
मानवाच्या क्षुद्रतेची प्रचीती या महाकाय चित्रांमधून येत होती.. येणारच होती. एकतर चित्रांमध्ये दिसणारा माणूस हा जराजर्जर म्हणावा इतका वृद्ध. त्या चित्रांमध्ये कितीही गुलाबी आणि अन्य पेस्टल शेडचे छान छान अॅक्रिलिक रंग वापरले तरीही त्या मानवाकृतीचं फाटलेपण, थकलेपण त्यानं अजिबात झाकलं जात नव्हतं. नग्नतेतून सत्य-सुंदराचा साक्षात्कार वगैरे घडवण्याची पाश्चात्त्य चित्रपरंपरा कितीही मोठी असली, तरी या म्हाताऱ्या माणसाचं नागवेपण मात्र तो किती असहाय आहे आणि किती उघडा पडलाय, नागवला गेलाय- हेच दाखवणारं भासत होतं. त्यात भरीस भर म्हणजे चित्राकडे नीट बघितल्यावर जणू भूकंपाची हवाई पाहणी आपण करतोय असं वाटावं इतकी हालचाल.. अगदी अस्वस्थ फराटे आणि त्या रंगांच्या घुसळणीतच अधूनमधून घुसू पाहणारे काळे शिंतोडे, किंवा चुकून सांडलेल्या वाटतील अशा रेषा.
तरीही हे चांगलं चित्र म्हणून वाखाणलं जात होतं. ते का? चित्रकलावाले वेडेच असतात, हे कारण फारच नाक्यावरचं झालं. चित्रकलावाल्यांना जर काही निराळं या चित्रातून कळत असेल, तर ते काय आहे?
एकतर एवढय़ा मोठय़ा आकारात चित्रं रंगवणं हे खायचं काम नाही. दुसरं म्हणजे या चित्रांमध्ये (अगदी त्या अस्वस्थ फराटय़ांमध्येसुद्धा) तोल, लय, विरोधाभास, पुनरुक्ती ही ‘डिझाइनची मूलतत्त्वे’ म्हणून जे काय शाळेत शिकवतात ते व्यवस्थित पाळलं गेलं होतं. पिवळ्या, गुलाबी, खाकी, क्वचित हिरवट अशा सर्व रंगांच्या फिक्या पांढुरक्या छटा दिसत असतानाच काळ्या पाश्र्वभूमीवर ते रंग खुलून दिसत होते. मोठं डोकं आणि काडय़ांसारखे हात-पाय हेच प्रत्येक चित्रात समान असल्यामुळे पुनरुक्तीचा प्रत्यय येत होता. रंग ज्या प्रकारे लावले गेले होते त्यातली सहजता ही लयप्रत्यय देणारी होती.
व्हेनिसमध्ये मे ते सप्टेंबर २०१५ या काळात पार पडलेल्या ५६ व्या द्वैवार्षिक चित्र-शिल्प महाप्रदर्शनात (म्हणजे ‘व्हेनिस (आर्ट) बिएनाले- २०१५’मध्ये) जॉर्ज बेसेलित्झची ही आठ चित्रं होती. बेसेलित्झ हा ज्येष्ठ जर्मन चित्रकार आहे, एवढंच माहिती असणाऱ्यांनाही चित्रकारानं स्वतचंच चित्र काढलं असावं असं चित्राकडे पाहून वाटत होतं. आणि ते खरं ठरवणारी माहिती नंतर शोधल्यास मिळू शकत होती.. अद्यापही मिळते. गूगल झिंदाबादच.
पण आपण प्रचीतीबद्दल बोलत होतो.
किंवा त्याही आधी आपण स्पष्टवक्तेपणातून काय उमगलं, हे बोलत होतो.
आणि उमगणं, प्रचीती वगैरेंचे फार तर शब्दार्थ गूगल देऊ शकेल, किंवा तुम्हाला ‘बेसेलित्झ अॅट व्हेनिस बिएनाले’च्या व्हिडिओंपर्यंत गूगल नेऊ शकेल. उलटी टांगल्यासारखी मानवाकृती भरपूर वेळा बेसेलित्झनं काढलीय, हे ‘गूगल इमेज सर्च’ सांगेल. बेसेलित्झ हा कसा दुसऱ्या महायुद्धानं होरपळलेल्या कुटुंबातला होता, युद्धानंतरच्या हताशेचं चित्रण त्यानं केलं, वगैरे माहिती गूगलवर आधीपासून होतीच. वाटल्यास ती वाचायची, नाही तर सोडून द्यायची.
पण अस्वस्थ रंगरेषा पाहून अस्वस्थतेबद्दलची तुमची समज वाढते आहे, स्पष्टवक्त्या, फटकळपणाच्या बोलण्यासारखे तडक लावलेले रंग किती असोशीचे आहेत हे तुम्हाला कळतं आहे, अशी स्थिती कलासंग्रहालयात किंवा कलादालनात प्रत्यक्ष गेल्याशिवाय येत नाही.
बेसेलित्झ यांची जन्मतारीख २३ जानेवारी १९३८. म्हणजे आज ते ७९ व्या वर्षांत पदार्पण करताहेत, हे गूगल सांगेल. पण ही आठ चित्रं जीर्ण वृद्धत्वात असते तशी मानवी असहायता पोचवताहेत, हे चित्रांमधली अस्वस्थता तुमच्यापर्यंत पोहोचल्यावरच कळेल. ही आठही चित्रं २०१४ मध्ये रंगवून पूर्ण झाली होती. शिवाय चित्रांची मांडणी अशी होती की, जणू आपण एका मोठय़ा मांडणशिल्पाच्या (इन्स्टॉलेशन) आतनं चालतोय असं क्षणभर वाटावं. पण तेवढय़ानं ती ‘आजकालची कलाकृती’ ठरते का?
जे लोभस, तरीही दाहक वास्तव या कलाकृतीतून प्रेक्षकापर्यंत पोचतं, ते वृद्धत्वाचं आहे की महायुद्धानंतरचं, हा तपशिलाचा भाग झाला. चित्र जसं गुलाबी आहे तसंच काळंही आहे. नेत्रदीपक आहे आणि असहायतेचंही आहे. हे विरोधाभास कोणतेही तपशील माहीत नसताना दिसतात आणि जाणवतात की नाही? ते विरोधाभास नेमके पकडणं, एकसुरी आणि एकच अर्थ न पोहोचवता बहुअर्थी राहणं, हे आजकालच्या कलाकृतींचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ तिच्यात आहे की नाही?
त्या बहुअर्थामधला एका मराठी प्रेक्षकापर्यंत पोहोचलेला एक अर्थ अशोक शहाणे यांच्या ‘अ-मृत’ बोलांमागच्या दृष्टिकोनाची समज वाढवणारा होता. स्वत:चं सुखासीन अवडंबर माजवायचं नाही; लेखकराव व्हायचं नाही (आणि लेखकराव झालेल्यांशी फार संबंधही ठेवायचे नाहीत) असं शहाणे यांचं जगणं-वागणं.
बेसेलित्झही मेलेला नाही. तो करतो आहेच काहीतरी. पण जीवन-मृत्यूच्या काठावरला गुलाबी-काळा खेळ त्याच्या अंगी बाणला आणि तो त्यानं आपल्यापर्यंत पोहोचवला. क्षुद्रत्वाची भव्य प्रचीती दिली!
‘मेला नाही याला काही अर्थ नाही. काय करतोय, ते पाहा!’ हे बेसेलित्झ सांगतो आहे. शहाणेही सांगत होते. फटकळ स्पष्टवक्तेपणात काही गोष्टी बोलल्या गेल्या नाहीत तरी ऐकणाऱ्यानं त्या समजून घ्यायच्या असतात.
अभिजीत ताम्हणे- abhicrit@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा