नीलिमा शेख या ज्येष्ठ चित्रकर्ती आहेत आणि त्यांचं कर्तृत्व अनेक महत्त्वाच्या कलासंग्रहालयांनी त्यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या चित्रांमधल्या वेगळेपणामुळे किंवा कलेद्वारे जीवनविचार मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे सिद्ध झालेलं आहे. अलीकडेच दिवंगत झालेले कलाचिंतक आणि दृश्यकलावंत के. जी. सुब्रमणियन यांच्या नीलिमा या एकेकाळच्या शिष्या आणि ज्येष्ठ चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांच्या त्या पत्नी. हे तपशील एरवी नाही सांगितले तरी चालतील, इतकी नीलिमा शेख यांच्या कलाकारकीर्दीची उंची आहे. त्यामुळे हे तपशील त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़ं समजून घेण्यापुरतेच उपयुक्त आहेत. बडोद्याची ‘नॅरेटिव्ह आर्ट’ची परंपरा सुरू करणारे के. जी. आणि ती पुढे नेणाऱ्यांपैकी शेख दाम्पत्य- हे लक्षात घेतल्यास नीलिमा शेख यांची शैली कोणती, या प्रश्नाच्या उत्तराचा पहिला भाग हाती लागतो. नॅरेटिव्ह आर्टनं किंवा कथ्यचित्रांनी थेट कथ्य सांगू नये, तर प्रेक्षकांना चित्रावरून स्वतच्या गोष्टी बनवण्यास उद्युक्त करावं, इतका हा साधा भाग. त्यापुढला भाग असा की, प्रेक्षक- म्हणजे समाजसुद्धा- कोणत्या विराट-कथ्याशी (ग्रॅण्ड नॅरेटिव्ह) नातं जोडत आहे हे चित्रकारानं ओळखावं. मात्र, ज्या बडोद्यात (महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या दृश्यकला विभागात) ही नॅरेटिव्ह आर्टची परंपरा रुजली, तिथेच आणि त्याच काळात कलेच्या इतिहासाचाही अभ्यास योग्यरीत्या होत होता. त्यामुळे इथल्या अनेक चित्रकारांनी रूपांकनाच्या दृष्टीनं विविध चित्रशैलींचा अभ्यास करून त्या स्वतच्या कामात कशा भिनवता येतील याचा विचारही केला. केवळ चित्रतंत्रापेक्षा समाजाचा विचार करण्याची आस हेही चित्रं चांगली होण्याचं कारण असतं, असं ही परंपरा घडवणाऱ्यांनी मानलं. ‘बडोदावाल्यांना माणसासारखा माणूस काढता येत नाही,’ असं मुंबईकर चित्रकारांनी कितीही हिणवलं तरी शहरी संवेदनांचं भान देणारी भारतीय आधुनिक चित्रं प्रथम बडोद्यातच झाली हे नाकारता येणार नाही. या साऱ्या परंपरेत नीलिमा शेखही होत्या. १९८० च्या दशकात तर ‘व्हेन चम्पा ग्य्रू अप’ ही हुंडाबळीच्या निमित्ताने स्त्रीजीवनाबद्दल बोलणारी चित्रमालिकाही त्यांनी केल्यामुळे ‘प्रसंगी ‘प्रचारकीपणा’चा दोष पत्करेन, पण आजचं जगणं माझ्या चित्रांतून दाखवेन,’ असा नीलिमा यांचा बाणा असल्याचंही दिसून आलं होतं.
हे सारं झाल्यानंतर ‘गोध्राकांड’ असा आवर्जून उल्लेख होणारा हिंसाचार गुजरातभरच्या अनेक शहरांमध्ये घडल्यानंतर नाव नीलिमा आणि आडनाव शेख असलेल्या एका संवेदनशील चित्रकर्तीनं जे आत्मपरीक्षण करायला हवं होतं, ते बहुधा नीलिमा यांनीही केलं असणार. काय हरवलं या २००२ च्या दंगलीत? आणखी कुठे कुठे हरवलंय ते? याचा विचार सुरू झाला असणार.
कारण काहीही असो; पण २००२ नंतर नीलिमा शेख यांची चित्रं बदलली आहेत हे दिसू लागलं. २००३ ते २०१० या काळातली त्यांची एक चित्रमालिका या बदलाची निदर्शक होती.
दिसणारा मोठा बदल म्हणजे नीलिमा यांची चित्रं त्याआधी लहान आकारांची असत, ती आता प्रचंड आकारांची झाली. प्रत्येक चित्रातले अनेक तपशील आणखी स्पष्ट झाले. केवळ ब्रशने रंगकाम नाही, तर स्टेन्सिलचा वापरही या मोठय़ा चित्रांमध्ये सुरू झाला.
या चित्रांमध्ये प्रचारकीपणाचा अंश जरा म्हणजे जरासुद्धा नव्हता. गुजरातबद्दल थेटपणे कोणतंही विधान या चित्रमालिकेत तरी नव्हतं. पण जर प्रेक्षकांकडे जर त्या प्रकारची संवेदनाशक्ती असेल तर आणि तरच- चित्रं पाहून जे काही वाटू लागेल ते गुजरातलाही लागू पडतं आहे असं एकटय़ादुकटय़ा प्रेक्षकाला मानता येऊ लागलं. या अशा एकटय़ादुकटय़ा प्रेक्षकांची संख्या आता भरपूर झालेली असणार आणि ती जगभरही असणार. असो.
‘आजकालच्या कलाकृती’मध्ये या चित्रमालिकेची गणना करण्याचं कारण निराळं आहे.. ते पुढे पाहू.
अनेक संकेत या चित्रमालिकेनं मोडीत काढले. स्त्रियांची चित्रं म्हणजे छोटय़ा आकाराचीच, ‘मॉन्युमेंटल’ किंवा प्रचंड आकारांचं स्त्रियांना जरा वावडंच, हा तोवर रूढ झालेला पहिला समज. (तो मोडण्यात नीलिमा यांच्याआधी नलिनी मलानींचाही वाटा होता.) चित्रांमध्ये शब्दांना स्थान नको, चित्रं ही कुठल्याशा साहित्यकृतीवर आधारलेली नकोत, हा दुसरा. (तोही अनेकांनी त्यापूर्वी मोडला होता.) मात्र, काश्मीरमधला हिंसाचार यासारख्या विषयाच्या चित्रांमध्ये काय दिसावं, याचे ठाशीव संकेत या चित्रांनी मोडून काढले, ते पहिल्यांदाच. हिंसाचाराबद्दल थेट न बोलता या चित्रांनी बाकीच्या जगण्याबद्दल, इतिहासाबद्दल, निसर्गाबद्दल प्रेक्षकाशी दृश्यसंवाद सुरू ठेवला. मधेच दुखी माणसांच्या काही आकृती येतात, ‘लादलेल्या स्थलांतरा’सारख्या किंवा सांत्वन करावं लागण्यासारख्या मानवी दुखाची जाणीव देणाऱ्या घटनांचं सूचन करतात.. पण चित्राचा अवकाश त्याहीपेक्षा मोठा असतो. कधी तो एकरंगी असतो, तर कधी गोधडीसारखा बहुरंगी तुकडय़ांचा. कधी सोनेरी रंगासारखे थेट अलंकरणाकडेच जाणारे दृश्यभाग या चित्रांत असतात, तर कधी निव्वळ हलक्या रंगांतली निसर्गदृश्यं.. काय हरवलंय, स्वप्नं कशाची भंगली आहेत, काय परत आणायचंय, याचा विचार चित्रकर्ती सतत करते आहे, हे प्रेक्षकाला जाणवत राहतं. नुकसानाची जाणीवसुद्धा होत राहतेच. साहित्यात ज्याला ‘ऊनोक्ती’ म्हणतात, तसा हा प्रकार.
या चित्रमालिकेचं नाव.. ‘ईच नाइट, पुट कश्मीर इन युअर ड्रीम्स’!
ही चित्रं काश्मीबद्दल आहेत, आणि नाहीतसुद्धा. नाटकाच्या विंगांइतक्या मोठय़ा आकाराचे पडदे गॅलरीभर लावलेले. त्याच्या आडून फिरणारी, ‘दिसता दिसता दिसेनाशी’ होणारी माणसंदेखील चित्रांकडे पाहतेवेळी टाळता येत नाहीत. या सर्व माणसांच्या काश्मीरमधल्या हिंसाचाराबद्दलच्या कल्पना निरनिराळ्या असणार. कुणाच्या मते तो सीमेपल्याडच्या चिथावणीमुळे, कुणाच्या मते, हिंसाखोर धर्मामुळे, आणखी कुणाच्या मते, लष्करामुळे.. अशा. त्या वादांच्या पलीकडे सगळेजण आत्ता पाहताहेत, असा अनुभव प्रेक्षकाला इतरांमुळे येणं अपरिहार्य आहे.
ही नुसतीच छान छान चित्रं आहेत.. काश्मिरी कवी आगा शाहिद अली यांच्या कवितांमधल्या ओळी चित्रांवरच छापल्यासारख्या (स्टेन्सिलनं) लिहिल्या म्हणजे काही ही चित्रं काश्मीरबद्दलची होत नाहीत.. असा टोकाचा आक्षेप घेण्यापासून प्रेक्षकानं परावृत्त व्हावं असे अनेक तपशील या चित्रांमध्येच आहेत. कधी श्रीनगरचा नकाशा असलेली शाल, कधी केशराची फुलं, कधी काश्मिरी कुटुंबं.. पण समजा, काश्मीरबद्दल नसली, तरी ही चित्रं कशाच्यातरी कायमच्या संपण्याबद्दलची आहेत, चिरवियोगानंतरची आहेत, हे अधिक निश्चित आहे.
चढा राजकीय सूर न लावता मानवी हानीबद्दल बोलता येतं, हे या सर्व चित्रांचं सांगणं आहे. अमर कन्वर यांच्या फिल्म्ससुद्धा हेच सांगतात, किंवा दिवंगत रूमाना हुसेन यांची मांडणशिल्पंसुद्धा हेच सांगत होती. तरीही हे सारेजण निव्वळ ‘कलावादी’ नाहीत. कन्वर आणि हुसेन हे ‘काय हरवलं’ याची जाणीव देतात. नीलिमा त्यापुढे जातात आणि स्वप्नं भंगलेली आहेतच, ती कुठली स्वप्नं होती, हे सांधून दाखवण्याचं काम कुणाचंच नसेल तर मी करते, म्हणतात.
अभिजीत ताम्हणे – abhijit.tamhane@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा