मिरज, मुंबई, चंद्रपूर, व्हेनिस, धुळे, न्यूयॉर्क, देवरुख.. अशा अनेकविध ठिकाणच्या चित्रप्रेमींना मूळचे मुंबईकर आणि पुढे दिल्लीवासी (आता दिवंगत) वासुदेव गायतोंडे हे थोर अमूर्तचित्रकार माहीत आहेत. या गायतोंडे यांच्या अमूर्तचित्रांचा संस्कार ज्यावर झाला, अशा महाराष्ट्रीय मनांना ‘अमूर्तीकरण’ हा शब्दच मुळात पटणार नाही. ‘मूर्त काहीतरी असतं आणि आपण त्याचं अमूर्तीकरण करतो, असं नसतंच. अमूर्त आपल्या आत असतं. ते कॅनव्हासवर उतरतं..’ अशी उमज भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्रीय चित्रप्रेमींना देण्यात गायतोंडे यांच्या चित्रांचा वाटा आहे. त्याचप्रमाणे अशोक वाजपेयी, प्रभाकर कोलते आदींनी केलेल्या समीक्षेचंही श्रेय त्यात आहे. न्यूयॉर्क आणि व्हेनिस या शहरांत गायतोंडे यांच्या ४० हून अधिक चित्रांचं प्रदर्शन भरलं, ते पाहायला अमेरिका-कॅनडातून न्ययॉर्कला आणि युरोपभरातून व्हेनिसला आलेले लोक त्या चित्रांकडे कसं पाहणार होते? केवळ ‘फ्लोटिंग फॉम्र्स’- तरंगते, अधांतरी केवलाकार- एवढंच या पाश्चात्त्य प्रेक्षकांनी पाहू नये, यासाठी प्रदर्शनाच्या विचार-नियोजकांना खास प्रयत्न करावे लागले होते.
त्या पाश्चात्त्य प्रेक्षकांची गायतोंडे समजून घेताना दमछाक किंवा पंचाईत किंवा खडतर वाटचाल गृहीत धरण्याजोगी होती. तशीच काहीशी गत आपणा मराठीभाषक प्रेक्षकांचीसुद्धा- सोबतच्या फोटोंमधली डॅमिएन ओर्तेगाची ‘कॉस्मिक थिंग’ ही कलाकृती ‘अमूर्त’ म्हणून समजून घेताना- होऊ शकते. मुळात ‘अमूर्तीकरण’ हे काही गैर आहे आणि अमूर्त जे काही असणार ते ‘आतूनच यावं लागतं’ हा आग्रह सोडल्याखेरीज ओर्तेगाच्या या कलाकृतीकडे अमूर्त म्हणून पाहता येत नाही. शिवाय, ‘राजकीय आशयाची अमूर्तकला’ या शब्दप्रयोगाला झिडकारूनच टाकायचं असेल तर डॅमिएन ओर्तेगाचा अनुभव घेता येणार नाही. पण हवं तर आपण आपले आग्रह कायम ठेवून सुरुवात करू. ओर्तेगाची ही ‘कॉस्मिक थिंग’ अमूर्त वगैरे नाहीच मुळी, असं वाटत असलं तरीसुद्धा तिच्याकडे पाहायला सुरुवात करू. ‘पाहून जाणण्या’च्या क्रियेत (अधिक) प्रामाणिकपणा असू शकतो!
ओर्तेगाच्या एकंदर २६ लहान-मोठय़ा कलाकृतींसमवेत ही भाग भाग सुट्टे केलेली मोटारगाडी जगभरात अनेक मोठय़ा कलादालनांमध्ये प्रदर्शित झालेली आहे. मिलान (इटली) इथल्या ‘हंगर बिकोका’ नावाच्या प्रचंड आकाराच्या कलादालनातही २०१५ साली जून ते सप्टेंबर या काळात ती मांडली गेली होती. ओर्तेगा हा मुळात शिल्पकारच असल्याचं या साऱ्या कलाकृती- मग त्या ‘परफॉर्मन्स आर्ट’ प्रकारात मोडणाऱ्या असोत की ‘फिल्म’ म्हणून पडद्यावर दिसणाऱ्या- सांगत होत्या. त्या साऱ्यांमधून, वस्तूबद्दल वस्तू म्हणून त्याला भावना व्यक्त करायच्या नाहीत, त्याला ‘पलीकडलं काहीतरी’ सांगायचंय, हेही स्पष्ट होत होतं. याच प्रदर्शनातली सर्वात मोठय़ा आकाराची कलाकृती म्हणजे दोऱ्यांना टांगून एकमेकांपासून (मधून माणूस चालत जाऊ शकेल, इतकं!) अंतर राखून मांडलेले मोटारीचे सुटे-सुटे भाग. ही मोटार फोक्सवॅगन बीटल या प्रकारातली होती. तिचा कोणताही भाग ओर्तेगानं तोडला नसला, तरी जमिनीपासून तिला अधांतरी नेणं.. प्रत्येक भाग सुटा करून मगच तो मांडणं.. एकाच दृष्टिक्षेपात ‘ही मोटार आहे’ हे कळू नये अशा रीतीनं त्या सुटय़ा भागांची फेररचना करणं.. हे त्या मोटारीचं ‘मूर्तिभंजन’ आहे, एवढं लक्षात येत होतं!
औद्योगिक वस्तू आणि ‘फाइन आर्ट’ म्हणवल्या जाणाऱ्या चित्र-शिल्पादी कला यांचा अगदी थेट संबंध १९५० च्या दशकात जेव्हा आला होता, तेव्हा ‘औद्योगिक भंगारा’तल्या विविध आकाराच्या (मोठ्ठे स्क्रू, चक्रं, पत्रा, साखळ्या वा पट्टय़ांचे सुटे भाग इत्यादी) वस्तूंना वेल्डिंगच्या प्रक्रियेनं एकत्र जोडून त्यातून आपल्या कल्पनेतला आकार घडवायचा, असं शिल्पकारांनी बऱ्याचदा केलं. आपल्याकडे (दिवंगत) पिलू पोचखनवाला यांची शिल्पं तशी होती. हल्लीचा ‘मेक इन महाराष्ट्र’चा लामणदिवा हीसुद्धा त्याच प्रकारातली एक रूपरचना आहे. या सर्व रचना कोणत्यातरी वास्तव किंवा काल्पनिक दृश्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या (रिप्रेझेंटेटिव्ह) होत्या; तर इथे ओर्तेगाची मोटार ही मात्र त्याउलट! तिचे सुटे भाग नुसते एकमेकांच्या साहचर्यात- पण एकमेकांपासून लांबच- आहेत. त्यांची फेररचना झालेली नाही. तो ओर्तेगाचा हेतूच नाही. त्याला कशाचंही प्रतिनिधित्व न करणारी.. नॉन-रिप्रेझेंटेटिव्ह कलाकृती घडवायची आहे. आणि ती घडल्यावर त्यानं तिला ‘कॉस्मिक थिंग’ असं नावही दिलेलं आहे.
‘कॉस्मिक’ वगैरे शब्द आपल्याकडले मुरली लाहोटींसारखे चित्रकार खूप वापरायचे आणि त्यांची चित्रंसुद्धा अमूर्त म्हणूनच लोक पाहायचे, हे आज कुणाला आठवणारही नाही. अमूर्तचित्रातून अशा काहीतरी अकल्पनीय विश्वाचा दावा करणं- हा आता धोपटपाठ (क्लीशे) मानला जातो. ओर्तेगानं मात्र २००२ सालच्या कलाकृतीला ‘कॉस्मिक थिंग’ असं नाव दिलं. नावाकडे क्षणभर दुर्लक्ष करून मोटारीच्या त्या भागांच्या मधून फिरतानाचा अनुभव हा दोन पातळ्यांवरला असतो. त्या भागांकडे पाहताना रचनेतली शिस्त आणि दृष्टिकोनामुळे त्या रचनेतच दिसणारा गोंधळ यांचं बदलतं रूप आपण अनुभवू शकतो- ही एक पातळी. आणि दुसरी पातळी म्हणजे- समोरच्या भिंतीवर त्या सुटय़ा भागांच्या (आणि क्वचित आपल्याही) सावल्या दिसतात, त्या सावल्यांचं दृश्यरूप आपण कुठून पाहतो आहोत यानुसार बदलतं.. दोरीला चुकून किंचित स्पर्श झाल्यानं आपल्याभोवतीच्या ‘तरंगत्या आकारां’मधला एखादा जरी हलू लागला, तरी सावल्या सचेत होतात! जितकं पाहत जावं तितकं दिसण्याचा हा तरंगत्या आकारांचा खेळ जणू काही मानवाच्या अंतराळ- जिज्ञासेमागचे शोधक डोळेच तुम्हाला देणारा ठरतो.
अमूर्ताचाच हा अनुभव- एवढय़ावर समाधान मानता येणार नाही. ते ‘राजकीय अमूर्त’ कसं काय, हे जरा संदर्भ माहीत करून घेतल्यावर कळेल. ‘फोक्सवॅगन बीटल’ ही नाझी जर्मनीत ‘लोकांना परवडणारी गाडी’ म्हणून तयार झाली आणि हिटलरच्या तथाकथित ‘लोकाभिमुख विकासा’चा एक आदर्श ठरली.. पण ओर्तेगा ज्या देशाचा आहे त्या मेक्सिकोत किंवा अन्य दक्षिण अमेरिकी देशांमध्ये गेली कित्येक र्वष हीच ‘बीटल’ गाडी टॅक्सी म्हणून वापरली जाते. मेक्सिकोत ‘कमी पैशांत कामगार मिळतात’ म्हणून तिथल्या कामगारांची युरोपच्या तुलनेत आर्थिक पिळवणूकच करून जर्मन कंपनीनं मेक्सिकोत उत्पादन सुरू केलं. तेही आता बंद होणार, अशा काळातलं हे काम आहे. ते थेट काहीही सांगत नाही. प्रेक्षकाला अमूर्ताचा अनुभव देतं. प्रत्यक्षात ते एका चिरपरिचित वस्तूचं मूर्तिभंजन आहे. या वस्तूमागे ज्या ‘लोकाभिमुख विकास’, ‘देशाभिमान’, ‘पिळवणूक’ या राजकीय संज्ञा दडल्या आहेत, त्यांचं ते अमूर्तीकरण आहे.
अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
rupali bhosale buys new mercedes car
मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!
Story img Loader