एखाद्या परीक्षेत निबंधाला समजा हा विषय दिला- ‘अभिव्यक्ती हवी की कलामूल्यं?’ – तर हमखास सग्गळेजण म्हणणार : ‘कलामूल्ये राखून अभिव्यक्ती हवी!’ छानच आहे हे विधान. शिवाय, निबंधाला मार्क देणाऱ्यांच्या मॉडेल आन्सर्समध्येही तसलंच काहीतरी आदर्शवादी लिखाण अपेक्षित असेल. पण मुळात कला ही जगाला हवाहवासा वाटणारा आदर्शवाद पाळणारी गोष्ट नव्हे. कलेचा आधुनिक इतिहास हा कलावंतांनी स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी कलामूल्यांचं काय करायचं, याबद्दलचे जे- जे निर्णय घेतले, त्यांचा इतिहास आहे! कलानिर्मितीच्या आधीची विचारप्रक्रिया यातून महत्त्वाची ठरत गेली, हेही आजच्या कलानिर्मितीबाबतचं सत्य आहे. हा आधुनिक कलेचा इतिहास मराठीत अनेकांना माहीत असतो, तो सहसा ‘कलानिर्मिती’च्या अंगानं.. म्हणजे पिकासोला क्युबिझमच्या आधी कोणकोणत्या कलामूल्यांचे पर्याय उपलब्ध होते, आणि त्यातून त्यानं काय निवड केली, हे शिकण्यासाठी एक्स्प्रेशनिझम- फॉविझम, जर्मनीतल्या ‘ब्लू रायडर’ चळवळीतल्या चित्रांमधल्या जाड बाह्य़रेषा, मग जॉर्ज ब्राक आणि त्याच वेळी पिंक पीरियड, ब्लू पीरियडमधून बाहेर पडलेला पिकासो अशी सगळी पूर्वपीठिका- म्हणजेच त्या प्रक्रियेत ज्या- ज्या घटकांना ‘कलामूल्यांचा भाग’ म्हणून मान्यता मिळाली ते घटक- हे सगळं माहीत असल्यावर मग पिकासोचा क्युबिझम हा ब्राकपेक्षाही कसा वेगळा होता, हे कळतं. ज्यांना आधीचं कळत नाही, त्यांना नंतरचंही कळणार नाही (कदाचित ‘कळत नाही, पण आवडतंय’ अशा पातळीला ते असतील), हे उघड आहे. कारण मामला कलामूल्यांच्या बदलत, विस्तारत गेलेल्या व्याख्येचा आहे.
याउलट, आजचं चित्र! ते कशाचं आहे, हे कळलंयच तुम्हाला! फोटोंतल्या तरुणीचे कपडे हे मुळात तोकडे आणि अगदी नव्या फॅशनचे असणार, ते परिधान करून फोटो टिपण्यात आले असणार, आणि नंतर त्या फोटोंमधलं ‘उघडं अंग’ झाकून टाकण्यासाठी काळं मार्कर पेन फिरवण्यात आलेलं असणार.. हा सगळा क्रम फोटो पाहणाऱ्या जवळपास प्रत्येकीला/ प्रत्येकाला समजलेलाच असेल.. तोही फोटो पाहताक्षणीच!
पण असं कसं काय समजलं हे आपणा सगळ्यांना?
‘कलाकृती पाहायची सवय असेल तर कलाकृतींचे बारकावे लक्षात येतात’ हे खरं आहे. पण आपल्यापैकी काहीजणांना तशी सवय नसतानासुद्धा या फोटोंत काय केलेलं आहे ते समणारच. कारण- तेच. अशा प्रकारे काळ्या रंगाचे फराटे ओढून ‘अंग झाकण्या’चे दृश्य प्रकार पाहण्याची आपल्याला सवय आहे. नग्नता, बीभत्सता यांपासून जनतेचं ‘रक्षण’ करावं, या हेतूनंच हे काळं फासलेलं असतं.
मग या कलाकृतीबद्दल उरतो तो फक्त तपशिलाचा भाग.. नाही का? म्हणजे, या कलाकृतीचं शीर्षक ‘वेस्ट बाय ईस्ट’ असं असून इराणची फोटोग्राफी-कलावंत शादी घदिरिआन हिनं ती सिद्ध केली आहे. ही फोटो-मालिका आहे आणि या मालिकेतला प्रत्येक फोटो ६० सेंमी रुंदी आणि ९० सेंमी उंची (सुमारे दोन बाय तीन फूट) अशा आकारात जगभरच्या काही कलादालनांमध्ये प्रदर्शित झाला आहे. याच मालिकेतले दहा निवडक फोटो ‘शादिघदिरिआन.कॉम’ या संकेतस्थळावरही जरा शोधलंत तर ‘गॅलरी’मध्ये सापडतीलच.
या तपशिलांमधूनही एक-दोन प्रश्न उरतात. ते नंतर. त्याआधी ज्याबद्दल प्रश्न पडू नयेत, अशा काही विधानांची उजळणी करू..
शादी घदिरिआन ही इराणी चित्रकार. बुद्धिवादी आणि बुद्धिजीवी समाजघटकांना नामोहरम करून, त्यांना नांगीच टाकायला लावून आयातुल्लांच्या नैतिक अधिपत्याखाली धर्माच्या आधारानं गेली काही दशकं या राष्ट्राची वाटचाल सुरू आहे. याच धर्मनिष्ठ राष्ट्रप्रेमींच्या देशातली शादी घदिरिआन! तिची चित्रं सांगतात की, तिला तिच्या देशात जे चाललंय ते पटत नाही. अशा न पटणाऱ्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी अन्य राष्ट्रांतही आढळतात. उदाहरणार्थ- ‘नग्नते’ला पाश्चात्त्य मानणं. अगदी आपल्याही देशात ‘आम्हाला चालते हो नग्नता!’ असं सांगण्यासाठी खजुराहोच्या मंदिरांचा भक्कम आधार उपलब्ध असतानासुद्धा ‘जहांगीर आर्ट गॅलरी’सारख्या (सार्वजनिक ठिकाण असलेल्या आणि खासगी मालकी नसलेल्या) कलादालनातून काही नग्नशिल्पं/ नग्नचित्रं यांची झाकपाक करण्याचा निर्णय घ्यावा लागेल इतपत दबाव चित्रकार वा आयोजकांवर आला होता, हा अनुभव एकविसाव्या शतकातला आहे. तो अनुभव मुंबईत अपवादात्मकच होता, हेही खरं आहे. मुंबईत हिंदू अधिक राहतात; आणि पाकिस्तान वा इराण किंवा अफगाणिस्तानात मुसलमान; हे न सांगतासुद्धा ‘तिकडे असा दबाव अधिक’ यावर भर देता येतो, हेही खरं. पण मुद्दा दबावाच्या वारंवारितेचा नसून नग्नता दिसली की ‘ही पाहा पाश्चात्त्यशरणता!’ असं म्हणण्याच्या प्रवृत्तीचा आहे. आणि ही प्रवृत्ती बलात्काराचा दोष ‘तोकडय़ा कपडय़ां’ना देण्यापर्यंत जाते.
इथं ‘मुद्दा वारंवारितेचा नसून प्रवृत्तीचा’ या विधानाच्या आदली बरीच विधानं या ना त्या प्रकारे कलेशी संबंधित आहेत. प्रवृत्ती- बलात्कारासंदर्भातल्या दोषारोपाचा उल्लेख हे ‘कलाबा’ वाटतं आहे.. बरोबर ना?
ही ‘कलाबाह्यतासुद्धा कलेच्या प्रांतामध्ये आली पाहिजे’ असं ज्यांना वाटतं, त्यांच्यात शादी घदिरिआन आहे!
त्यामुळे खरे प्रश्न येतात : (१) अभिव्यक्ती हवी की कलामूल्यं? (२) सामाजिक भाष्याला आम्ही कशाला कलाकृती मानू? त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या परिच्छेदातून थोडं आणि पुढल्या काही लेखांतून थोडं थोडं मिळेल. पण सध्या जगात घडतंय ते असं, की ‘कलामूल्यांऐवजी अभिव्यक्ती असेल तरीही ती कलाच!’ असंही जाणकारांना मान्य होत असल्यामुळे पारंपरिक अर्थानं कलामूल्यं नसलेल्या कलाकृती आता कलादालनं, महाप्रदर्शनं वगैरेंत मानानं दिसतात, हे व्यावहारिक वास्तव आहे.
दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या अधिक जवळचं आहे. जे सामाजिक भाष्य तुम्हाला सहजपणे, संस्कृती आणि वैचारिकता यांच्या मिलाफातून कळतं, त्याला कला नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं?
अभिजीत ताम्हणे abhicrit@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा