कामगार चळवळीपासून ते कन्हैयाकुमापर्यंत जी काही पावलं प्रस्थापित मूठभरशाहीच्या विरुद्ध उचलली गेली, त्यावर मूठभरशाही आणि तिचे हातभर पित्ते यांनी दोन प्रमुख आरोप केलेले आहेत आणि आजही तेच ते आरोप केले जात आहेत. यापैकी पहिला आरोप- तुम्ही तेच तेच बोलताय. दुसरा आणि त्याहून गंभीर आरोप- हे सारं नकारात्मक आहे. या दुसऱ्या आरोपाची भाषा बदलत असते, उदाहरणार्थ : तुम्ही फक्त नकारघंटा वाजवताय.. लोकांच्या मनात विष कालवताय.. नवं काही निर्माण करता येतच नाही तुम्हाला.. दुसऱ्यावर भुंकून स्वतला प्रसिद्धी मिळवणं एवढंच म्हायत्येय तुम्हाला.. तुमच्या असल्या भाषणांनी/ चळवळीनं/ उपोषणानं/ मोर्चानं देशात अराजक माजेल वगैरे वगैरे.. या साऱ्या विधानांच्या मागे, ‘जे काही आत्ता आहे, त्याला नकार देणं म्हणजे महापाप’ अशी एक वैचारिक अंधश्रद्धा असते. यामागे फक्त स्थितीवादच असतो असं नाही, तर आत्ता जे काही आहे त्याचे फायदे आपल्यालाही मिळताहेत अशी आपमतलबी जाणीव झाल्यामुळेच (त्या जाणिवेची कबुली स्वतशीसुद्धा न देता) तथाकथित ‘नकारात्मकते’च्या विरुद्ध आक्षेप घेतले जात असतात. अगदी ‘कलाकृतींबद्दलच्या पंधरवडी सदरात राजकारणाबद्दल कशाला लिहिलं?’ हा प्रश्न विचारू पाहणारेसुद्धा ‘डोक्याला ताप नकोय- सुंदर चित्रं आम्ही कशी बघायची किंवा कुठे पाहायला मिळतील ते सांगा’ अशासारखा भोगवादी विचार करणारे असतात. अर्थात, या ‘सुंदर कलाकृती’ पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा कदाचित, एमिलिओ इसग्रो या ज्येष्ठ (वय ७९) इटालियन दृश्यकलावंताच्या कलाकृतींचं बारूप आवडेल. म्हणजे (उदाहरणार्थ, इथं या मजकुरासोबत) जो काही नकाशा किंवा अरबीसदृश लिपीतलं पुस्तक यांच्यातला प्रत्येक शब्द एमिलिओ इसग्रो यांनी खोडून काढलेला दिसतो आहे, तो नकाशा किंवा ते पुस्तक मुळात किती जुनं, किती अस्सल दिसतं आहे हे लक्षात येईल! बारूपच पाहण्याचा दुसरा भाग म्हणजे, ‘किती मेहनतपूर्वक खोडले आहेत सगळे शब्द!!’ असं म्हणत विस्मित, स्तिमित किंवा तत्सम काहीतरी होऊन जाणं. असं वाटणं चुकीचं नाही. पण तेवढंच वाटून ‘छान!’ म्हणणं आणि पुढल्या कलाकृतीकडे वळणं, हे मात्र उचित नाही.
या खाडाखोडीमागे कोणता नकार आहे, कशाला नकार आहे, त्या नकाराचा अर्थ काय? हे या कलाकृतीचं आंतरिक सौंदर्य आहे. ते समजून घेतलं, तर खरा आस्वाद घेता येईल. आणि ही उत्तरं, एखाददुसऱ्या कलाकृतीतून समजणार नसतं. त्या एखाद्या कलाकृतीत त्यानं स्वत्वाचा जो अंश ओतलाय, तो समजून घेण्यासाठी त्याचं स्वत्व म्हणजे काय आणि ते असंच का आहे, याहीकडे प्रेक्षकाला पाहावं लागणार असतं.
‘का? एक चित्र काहीच नाही सांगू शकतं?? म्हणजे चित्रकार नापास!!!’ अशी टिप्पणी करणारे भारतात बहुसंख्य असले, किंवा व्यवस्थेला आत्ता कोणीतरी प्रश्न विचारतंय ते का विचारतंय हे समजूनच न घेता ‘काय कटकट आहे.. आधी आपलं काम करा की!’ म्हणणारे नेहमीच शिरजोरपणानं वावरत असले, तरीही व्यवस्थेला नकार दिला जातोच. जे आदरपात्र, शिरोधार्य वगैरे मानलं जातं, त्यालाही आव्हान मिळतंच. एमिलिओ इसग्रोनं १९६६ पासून आजतागायत, म्हणजे गेलं अर्धशतकभर हे असं काम केलं- पुस्तकं किंवा ‘सांस्कृतिक दस्तऐवज’ निवडून, त्यांतला प्रत्येक शब्द त्यानं अ-क्ष-र-श खोडून काढला.
‘मग यात नवं काय?’ या प्रश्नाचं मात्र उत्तर द्यायलाच हवं. त्याआधी एमिलिओची थोडी ओळख करून घ्यायला हवी. ‘विकिपीडिया’ तुम्हाला सांगेल की, एमिलिओ इसग्रो हा मुळात लेखक आहे. त्याच्या नावावर वैचारिक लेखांची पुस्तकं, कादंबऱ्या, नाटकं आणि एखाददुसरी चित्रपट-कथा असं प्रकाशित लेखन आहे! (तरीही) त्यानं शब्द खोडण्याची १९६६ साली जी सुरुवात केली होती, ती साध्या पाठय़पुस्तकापासून. त्यातली वाक्यंच्या वाक्यं त्यानं शब्दा-शब्दावर काळय़ा पेनानं गिरवून दिसेनाशी केली. जरा विकिपीडियाबाहेर पडलात तर काही मुलाखतींत एमिलिओ या सुरुवातीबद्दल आणि तिथून आजवरच्या प्रवासाबद्दल बोलतो आहे. पहिल्यांदा जे केलं, तो फक्त ‘शिक्षणव्यवस्थेचा निषेध’ होता, हे त्यातून समजेल. मात्र पुढे एमिलिओनं काय काय नाही खोडलं? कादंबऱ्या, अभिजात मानली जाणारी पुस्तकं, पाश्चात्त्य संस्कृतीचा अतिच अविभाज्य भाग बनलेल्या महान संगीतरचनांच्या स्वरलिप्या.. पुढे, वसाहतवादी काळापासूनचे नकाशे.. बायबल.. मग देशोदेशींच्या समाजजीवनात आणि संस्कृतीत आदरपात्र मानले जाणारे ग्रंथ.. आणि ‘‘प्रत्येक वेळी, प्रत्येक नव्या शब्दाची खोडण्यासाठी निवड करताना मला नव्यानं समजत गेलं की मी कशाला नकार देतो आहे’’ असं यामागचं कारणही एमिलिओ इसग्रो यांनी दिलं आहे.
या मजकुरासोबत जी छायाचित्रं आहेत, ती मिलान शहरातल्या ‘माकरेनी फाउंडेशन’च्या कलादालनात २०१५ साली टिपलेली असली तरी मुळात ही कलाकृती २०१० सालची आहे- तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरात एमिलिओ इसग्रो यांचं मोठ्ठं सिंहावलोकनी प्रदर्शन भरणार असताना ‘या प्रदर्शनासाठी खास नवी कलाकृती’ म्हणून त्यांनी तुर्काचे (ऑटोमन साम्राज्याचे) कायदेकानून सांगणाऱ्या हस्तलिखितातला प्रत्येक शब्द खोडला! सोबत, तुर्कस्तानी दर्यावदर्य़ानी प्राचीन काळात जे जलमार्ग वापरले होते, ते दाखवणाऱ्या नकाशावरला प्रत्येक शब्द- प्रत्येक मार्गाचंच नव्हे तर शहर/गाव/बंदर यांचंही प्रत्येक नाव खोडलं.
म्हणजे काय झालं? हे ‘अगदी मनापासून’ समजून घ्यायचंच असेल तर, समजा हा एमिलिओ नामक चित्रकार शिवजयंतीला मुंबईत आला आणि त्यानं ‘राजा शिवछत्रपती’, ‘श्रीमान योगी’ इथपासून ते ‘शिवाजी कोण होता?’ पर्यंतच्या सर्व पुस्तकांतला प्रत्येक शब्द खोडलेला असल्याची ‘कलाकृती’ त्यानं पुण्यामुंबईत प्रदर्शित केली, तर आपणा मराठीजनांना काय वाटेल याची कल्पना करा.. किंवा ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, दासबोध अशी तिन्ही पुस्तकं खोडून त्यांचं प्रदर्शन कुठेही- कधीही मांडलं गेलं तर कसं वाटेल?
आपल्याला अर्थातच अपमान झाल्यासारखं वाटेल. संताप येईल. अशावेळी होते, तशी बंदीची मागणी केली जाईल. हल्ली तर ‘जीभ छाटणाऱ्याला इनाम’वगैरेसुद्धा आपल्याकडे जाहीर केलं जातं- तसं कदाचित, एमिलिओचे हात छाटण्याची पोस्टरं मंगलोर, दिल्ली, रामनाथी, पुणे.. अशा कोणत्याही ठिकाणी लागू शकतील.
आणि त्याच वेळी, एमिलिओला मात्र त्याच्या (आतापर्यंत न दिलेल्या- पण समजा दिलाच तर,) नकाराचा नवा अर्थ उलगडलेला असेल- ‘‘काही उपयोग नाही झाला या ग्रंथांचा- बंधुत्व, सहिष्णुता, धोरणीपणा यातलं काहीच नाही शिकला समाज’’ असाच काहीतरी असेल का तो अर्थ?
असू दे. हवेमधले हे सारे इमले बांधले ते, मराठीत एमिलिओच्या कलाकृतींबद्दल वाचणाऱ्यांपर्यंत त्याच्या त्या कलाकृतींचा अर्क भिडावा, एवढय़ाचसाठी. त्याखेरीज बरंच काही एमिलिओच्या कलाकृतींतून आकळून येऊ शकतं. ‘निहिलिझम’ ही (डाडाइझमच्या आगेमागे उद्भवलेली) अल्पजीवी कलाचळवळ, पुढे १९५०-६०च्या दशकांत ‘फ्लक्सस’ कलाचळवळीनं संगीतादी कलांमागच्या नियतकल्पनांना दिलेला ठाम नकार, हे तपशील अभ्यासूंना आठवतील. पण कलेशी संबंध नसला, तरी जे कृष्णमूर्तीनी भूतकाळाच्या आणि त्यातून येणाऱ्या ‘अहं’च्या बडिवाराला दिलेला नकार आणखी कुणाला आठवेल. ‘नकार’ ही केवळ भावनिक अवस्था नसून बौद्धिक कृती असू शकते, हे एमिलिओ यांच्या कामातून नक्की कळेल आणि मुख्य म्हणजे, नकार देणं हे काहीतरी चुकीचंच असतं, या पापगंडातून आपण बाहेर येऊ शकू.
‘नकारात्मक, अराजकी’ असे शिक्के जरा बाजूला ठेवून लोकांनी नकारांकडे नीट पाहणं सुरू केलं, त्या नकारांमागचे ध्वनी मेंदूपर्यंत जाऊ दिले, तर मग कदाचित आपला समाज, आपलं राजकारण आणि आपलं अर्थकारणसुद्धा अधिक सुसह्य होऊ शकेल.
अभिजीत ताम्हणे abhicrit@gmail.com

Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
2 arrested for firing in Theur
थेऊर गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी अटकेत
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
shashank ketkar shares post about delayed payment
आधी निर्मात्यांवर आरोप, आता व्यक्त केली दिलगिरी! शशांक केतकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “गैरसमज दूर…”
Indian Maldives loksatta editorial
अग्रलेख : शेजारसौख्याची शालीनता
Story img Loader