ओस पडलेल्या घरांमध्ये मानवी आयुष्य असतं का? ‘उरलेलं’ असतंच ना काहीतरी? फक्त आठवणीच नसतात, तर कुणीतरी इथं जगलं होतं याच्या खुणाही थेट समोर दिसत असतात.. भिंतीवरला रंग कुठे विटलेला नाही हे पाहून ‘इथं कपाट होतं’ हे परक्यालासुद्धा सांगता येतं. आपण सगळेच जण स्वत:च्या जगण्यावरून परक्या, अपरिचित, कालौघात गडप झालेल्या माणसांच्या जगण्याची कल्पना उगाचच किंवा आपसूक करू शकतो. इमारत पाडायची म्हणून ती रिकामी केलेली असो, की भूकंपानं पडलेली- तिच्या आतली घरं माणसांचीच असतात कधीतरी. इंजिनीअर/ बिल्डर/ आर्किटेक्ट किंवा तत्सम भूमिका न घेता सहज म्हणून आपण या घरांत गेलो, तर माणूस म्हणून आपले डोळे आपसूकच काम करू लागलेले असतात आणि काहीही कारण नसताना आपण- केवळ दृश्यांवरून- त्या घरांमधून अदृश्य झालेल्या माणसांच्या जगण्याची कल्पना करू लागलेले असतो. दृश्यातून जीवनजाणिवेचा खेळ आपण सगळेजण खेळू शकतो.
हा खेळ पुढे कुठे जातो? कदाचित ‘पर्यटक’ म्हणून कुठल्या ऐतिहासिक स्थळांवर गेलो तर तिथेसुद्धा- म्हणजे एका अर्थानं इतिहासाकडे. पण हा पुन्हा इतिहासाच्या ‘अभ्यासकां’ना अभिप्रेत असलेला इतिहास नसतोच! तो आपल्या या ‘खेळा’तला इतिहास असतो. आता त्या खेळात शाश्वत भावनाही सहभागी झालेल्या असतात, म्हणून ‘मानवी भावनांचा इतिहास’ म्हणू शकू आपण याला. यातून मग मांडवगडला राणी रूपमतीची हुरहूर जाणवते, किंवा आग्य्राच्या किल्ल्यातल्या एका खोलीच्या गवाक्षातून ताजमहाल पाहणाऱ्या वृद्ध शाहजहानची तगमग लक्षात येते.. रायगडावरल्या भग्न बाजारपेठेकडे पाहताना ‘हे आपलं राज्य, हे आपले लोक’ अशी- स्वत:पुरतं न पाहणारी प्रशस्त ऐट काय असेल, हे त्या दगडांतून नाही जाणवलं तरी स्वत:च्याच फुललेल्या छातीतून जाणवू शकतं..
या खेळातले अनेक प्रयोग हल्लीच्या चित्र-शिल्पकलेच्या प्रेक्षकांवर सुदर्शन शेट्टी या शिल्पकारानं केले आहेत. ‘दृश्यं मी उभारणार.. जाणिवा तुमच्या’ हा या खेळाचा जणू एकमेव नियम. सुदर्शन शेट्टीच्या कलाकृती पाहताना तुम्ही ओळखीचंच काहीतरी पाहत असता. म्हणजे उदाहरणार्थ, सुमारे २० वर्षांपूर्वी त्यानं बाथटबमधल्या पाण्यात सपासप उघडझाप करणाऱ्या कात्र्या उभारल्या होत्या. यंत्रचलित कृतीमुळे त्या मोठय़ा कात्र्यांना नियमित गती होती.. पाणी वारंवार कापलं जात होतं. आणि या कृतीत अशक्यपणा ओतप्रोत भरलेला आहे, पाणी कापलं जातच नाहीए, हे तुम्हा-आम्हाला ‘नुसतं पाहून’ जाणवत होतं. पुढे अशी भरपूर उदाहरणं देता येतील. पण आपल्यासाठी आत्ता महत्त्वाचं हे, की यातून सुदर्शन शेट्टीसुद्धा काहीतरी पुढला (केवळ ‘अमक्या विषयावरचं चित्र/ शिल्प’ याच्या तर नक्की पुढला)- संकल्पनात्मक विचार करतो आहे हे प्रेक्षकाला समजा शब्दांत नाही लक्षात आलं, तरी प्रेक्षकांनीसुद्धा सुदर्शनप्रमाणेच संकल्पनांचा विचार सुरू केलेला असे. उदाहरणार्थ, अख्खी पांढरी अॅम्बेसेडर कार शेवाळलेल्या पाण्यात सुदर्शन शेट्टी बुडवून ठेवतो, तेव्हा ‘पांढरी अॅम्बेसेडर’ हे कशाचं प्रतीक आहे हे त्याला सांगावं लागत नाही. आणि मग शेवाळलेलं पाणी हेसुद्धा प्रतीकच असणार- हे तर प्रेक्षकानंच ठरवून टाकलेलं असतं!
पण ही झाली जुनी उदाहरणं. त्यावर टीकाही भरपूर झालेली होती अशी. ‘सुदर्शन फक्त चमकदार काहीतरी दाखवतो’, ‘लोकांना नुसता भुलवतो हो!’, ‘जीवनाचं आकलन कुठेय सुदर्शन शेट्टीच्या कामात?’ असा साधारण या टीकेचा सूर असायचा. त्यापैकी ‘जीवनाचं आकलन’ ही टीका अगदीच अनाठायी ठरणार, हे उघड होतं. सात-आठ वर्षांपूर्वीपासून तसंच होऊ लागलं. म्हणजे सुदर्शनचं कामही बदलू लागलं. केवळ शिल्प किंवा मांडणशिल्प न करता त्यानं मुंबईतल्या एका प्रदर्शनात (गॅलरी स्केच्या सहकार्याने हे प्रदर्शन मुंबई महापालिकेच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात २०१० साली भरलं होतं.) सुरुवातीलाच फक्त दोन स्पीकर मांडले आणि त्या ध्वनिवर्धकांमधून ‘प्रेक्षकां’ना पुरुषाच्या आवाजात एक गोष्ट आणि स्त्रीच्या किनऱ्या आवाजात ‘श्रावणात घननिळा बरसला’सह तीन गाणी ऐकता येतील अशी व्यवस्था केली. हे काय? तर म्हणे ‘मौखिक परंपरा’! ‘माझं प्रत्येक शिल्प हे ‘वस्तू’ नसून माझं गाणं किंवा मी सांगितलेली गोष्ट आहे,’ असं सुदर्शन म्हणू लागला होता. ‘‘पण ‘श्रावणात घननिळा’?’’ या प्रश्नावर सुदर्शन ठामपणे प्रश्नकर्त्यांच्या डोळय़ात पाहून समजूतदार स्मितहास्य करत (मराठीत) म्हणाला, ‘‘हो. आणि ती गाणारी मुलगी पंजाबी आहे.’’
‘श्रावणात घननिळा’सारख्या गाण्याचं ‘मौखिक परंपरे’तलं स्थान सुदर्शननं ओळखणं महत्त्वाचं होतं, हे त्याच्या गेल्या पाच वर्षांतल्या कलाकृती सांगू लागल्या. इथून पुढे त्यानं फिल्म करायला सुरुवात केली. २०१५ साली मुंबईतल्या एका छानशा चाळवजा इमारतीतलं आयुष्य त्यानं टिपलेलं फिल्ममध्ये दिसलं. याच्या पुढला टप्पा म्हणजे आत्ता तुमच्यासमोर या मजकुरासोबत असणारी दोन छायाचित्रं.. खांब-खांब दिसताहेत पाहा.. ती! हे दोन्ही फोटो ‘शून्य घर’ नावाच्या प्रदर्शनातले आहेत. जानेवारी २०१६ पासून हे प्रदर्शन दिल्लीच्या ‘एनजीएमए’मध्ये सुरू झालं. यापैकी ज्यात उभी स्त्री आणि आणखी कुणी कुणी दिसतंय, तो फोटो फिल्ममधला आहे आणि याच फिल्मचा ‘सेट’ म्हणून वापरलेलं भलंमोठं वास्तूवजा शिल्प गॅलरीच्या आत (दुसरं छायाचित्र) आहे. त्या गॅलरीतल्या ‘सेट’वर प्रेक्षक मंडळी फिरत, फोटो/ सेल्फी टिपत ‘कायै हे?’ असं एकमेकांना विचारत होती. मग गॅलरीच्याच काही भागात फिल्म.. मोठय़ा पडद्यावर आणि ६० जण एकत्र पाहू शकतील अशा दालनात. हा सेट फिल्मध्ये ‘जिवंत’ होतो. खांब ऐतिहासिक दिसताहेत खरे; पण ते अमुकच शैलीचे आहेत असं नाही सांगता येत. हिंदू मंदिरं, दिलवाडय़ासारखी जैन मंदिरं, महाल असं काहीही ते खांब पाहून आठवू शकतं.
सगुण म्हणू की निर्गुण रे..
खेळातले अनेक प्रयोग हल्लीच्या चित्र-शिल्पकलेच्या प्रेक्षकांवर सुदर्शन शेट्टी या शिल्पकारानं केले आहेत. ‘
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-04-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व आजकालच्या कलाकृती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional indian paintings