मराठी दुसरीच्या वर्गाचे मास्तर एक शिवी देत. ती जनाक्काला आवडत नसे. पण सांगणार कसं? मास्तर दुपारी झोपलेले असताना लहानशा बोटांच्या चिमटीत मावेल तितकी तपकीर घेऊन ती मास्तरांच्या नाकात खुपसून जनाक्कानं बाहेर धूम ठोकली. शिंकून बेजार झालेल्या मास्तरांनी विचारल्यावर जनाक्का म्हणाली, ‘‘मास्तर, जेव्हां पहावें तेव्हां तुम्ही ती शिवी देतां. आम्हाला नाहीं खपत असली शिवी. म्हणूनच मी तपकीर तुमच्या नाकांत घातली.’’ मास्तरांकडून पुन्हा ती शिवी मुलींना ऐकू आली नाही.
हा प्रसंग आहे तो जे डाचतंय, त्याला थेटपणे भिडणाऱ्या जनाक्का शिंदे (१८७८-१९५६) यांच्या ‘आठवणी व संस्मरणे’ या प्रा. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेल्या ग्रंथातला. महर्षी वि. रा. शिंदे यांची चार वर्षांनी धाकटी बहीण म्हणजे जनाक्का. प्रार्थना समाज, भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी आणि ब्राह्म समाज अशा विविध संस्थांमधून त्या महर्षीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत राहिल्या. जनाक्कांनी उत्तरायुष्यात निवेदन केलेल्या आठवणी, त्यांनी लिहिलेली आणि त्यांना आलेली पत्रं, त्यांच्याबद्दल महर्षीच्या लेखनात आलेले उल्लेख आणि त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेले लेख असे समकालीन दस्तऐवज संपादित स्वरूपात टिपांसह प्रकाशित केल्यामुळे शंभर वर्षांपूर्वी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करण्यात जनाक्कांचा जो हातभार लागला, तो या पुस्तकातून स्पष्ट होतो.
जमखंडी या संस्थानात जन्मलेल्या जनाक्कांचं तत्कालीन मराठा घरातल्या मुलींसारखंच लहानपणी लग्न झालं. वडिलांसारखं लिहा-वाचायला येणाऱ्या या मुलीचा खासकरून सासऱ्यांना फार अभिमान वाटे. पण त्यांच्या पतीला शिक्षणाची अजिबात गोडी नसल्याने जनाबाईंचं लिहिणं-वाचणं हा पतीसाठी असूयेचा विषय झाला आणि ते नातं सासुरवासात कोमेजून गेलं. नवविचारांनी भारलेल्या भावाला म्हणजे विठ्ठलरावांना बहिणीची अशी कुचंबणा सहन झाली नाही आणि त्यांनी जनाक्कांना कायमचं माहेरी आणलं. हुजूरपागेत शिकायला ठेवून तिला समाजकार्याची गोडीही लावली. विठ्ठलरावांच्या आधी जनाक्काच पुण्यात प्रार्थना समाजात नियमितपणे जाऊ लागल्या.
पुढे घरगुती अडचणींत इंग्रजी सहावीनंतर शिक्षण थांबलं, ती समाजासाठी काम करण्याची संधी मानून जनाक्कांनी एकेक जबाबदाऱ्या पेलायला सुरुवात केली. पनवेलला म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नोकरी स्वीकारून एकीकडे जातिभेद निर्मूलनाचं काम सुरू केलं. महर्षीची या विषयावर तिथे व्याख्यानंही झाली. आंतरधर्मीय विवाह असणाऱ्या अब्दुल कादर सय्यद आणि कल्याणी सय्यद या सुहृदांसह विविध जातधर्मीय लोकांसोबत जनाक्कांनी पनवेलमध्ये सुधारक विचारांचा प्रसार सुरू केला. त्यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी टाकलेल्या बहिष्काराचाही अनुभव घेतला. मात्र त्यामुळे नोकरी सोडून न जाता त्यांनी मुलींच्या शिक्षणाचं काम चालू ठेवलं. त्यांच्याजवळ शिकलेल्या सर्व मुली उत्तीर्ण झाल्या. परिणामी बहिष्कार घालणाऱ्या लोकांनीही ‘झाल्या प्रकाराचे वैषम्य ठेवू नये’ असं कबूल केलं.
त्यांच्या आणि महर्षीच्याही लिखाणात प्राप्त परिस्थितीतही टिकून असलेला नर्मविनोदाचा शिडकावाही हृद्य आहे. महर्षी ऑक्सफर्डला शिकायला गेले असताना जनाक्कांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात, ‘‘अरे आण्णा, आधीच कळविले असते तर मी लंडनास आले नसते कां?’’ असं विचारून पुढे ‘स्वस्त आहेत म्हणून बटाटे घेऊ नको’ असंही दटावलं आहे. तर ऑक्सफर्डमधून शिकून भारतात परतल्यानंतर जयपूरला प्रवासासाठी गेलेल्या महर्षीनीही ‘‘आम्ही ज्यांचे घरी उतरलों आहो, ते फार जुने सोवळे आहेत. त्यांनी मला मोरीजवळ जेवायला वाढलें. मी खप्पी जेवलो.’’ असा आपल्या स्थितप्रज्ञपणाचा दाखला दिला आहे.
पुढे मुंबईच्या ग्लोब मिल परिसरात, वाईच्या ब्रह्म समाजात अशा अनेक ठिकाणी जनाक्कांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी अनेकांची मनं वळवली. अस्पृश्य मानलेल्या माणसांच्या वस्तीमध्ये शारीरिक स्वच्छतेपासून प्राथमिक औषधोपचार आणि शुश्रूषेपर्यंत अनेक प्रकारची कष्टाची कामं त्यांच्या पुढाकारानं केली जात. महर्षीच्या सोबत अनेक ठिकाणी व्याख्यानांच्या दौऱ्यांनाही त्या जात असत. बाईमाणूस असल्याने अनेक वस्त्यांमध्ये थेट स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश मिळून प्रार्थना समाजाच्या कामाला चांगली गती मिळत असे. महर्षीच्या पत्नी रुक्मिणीबाई या घर, नातेवाईक, शेतीची कामं या आघाडय़ांवर लढत असल्याने त्यातून वेळ मिळेल तेव्हा महर्षीच्या सोबत प्रवास करू शकत. मात्र जनाक्कांचा पूर्वानुभव आणि स्वभाव यांमुळे त्या मात्र समाजातल्या प्रश्नांना स्वतंत्रपणे किंवा महर्षीच्या सोबतीने आपला वेळ सातत्याने देत असत. वैयक्तिक सेवा शुश्रूषेपासून ते बुद्धविचार, धर्मोपासना यांवर चर्चा आणि चिंतन करण्यापर्यंत त्यांच्या आचारविचारांची झेप असे असं त्यांच्या आठवणी आणि पत्रांमधून स्पष्ट होतं.
आईनं गोडधोड केलं की लहानपणी जनाक्का म्हणत, ‘‘विठू अण्णा कांहीं काम करीत नाहीं. मी शेण गोळा करून खर्च वांचवते. मलाच जास्त वाढ ना गं.’’ आई उलट उत्तर देई, ‘‘अगं, तूं दुसऱ्या घरीं जाणारीं. तुझा काय उपयोग?’’ अशा वैयक्तिक वाटेवरून समाधानाचा शोध घ्यायला सुरुवात केलेल्या जनाक्कांचा प्रवास समाजासाठी आत्मचिंतन करण्यापर्यंत पोचलेला दिसतो. ‘‘आतां कोठे जरा समजू लागले कीं आपल्याला सुख देणारे दुसरे नसतांत, आपणच मिळवावे! आपण मात्र दुसऱ्याला दु:ख देवू नये. सुख देण्याचा डौलही दाखवण्याचा प्रयत्न मी करूं नये.’’
विसाव्या शतकातल्या राजकीय घडामोडींनी समाजसुधारणेच्या क्षेत्रालाही ढवळून काढलं. त्यात महर्षीच्या सौम्य सुधारणेच्या मार्गावरची वर्दळ कमी झाली. कौटुंबिक आणि सार्वजनिक परिस्थितीचा विचार करून महर्षीनी आणि जनाक्कांनीही वाईच्या बह्म समाजाला अधिक वेळ दिला. १९४४ मध्ये महर्षीचं निधन झालं. वृद्धत्वामुळे जनाक्कांची दृष्टी मंदावली. ‘तरुण महाराष्ट्र’ या वृत्तपत्रात त्यांच्या काही आठवणी प्रकाशित झाल्या. १९५६ मध्ये जनाक्कांचं निधन झालं. महर्षीच्या कार्याचे अभ्यासक गो. मा. पवार यांच्या संग्रहातून आणि अनेक प्रकाशित, अप्रकाशित साधनांमधून प्रा. रणधीर शिंदे यांनी साक्षेपानं संपादित केलेल्या जनाक्कांच्या आठवणी या एका सुधारणावादी ब्राह्मणेतर कुटुंबातल्या स्त्रीचं आयुष्य मांडतात, ते सर्वांसाठी वाचनीय आहे. यात उद्धृत केलेल्या महर्षीच्या सूनबाई म्हणजे लक्ष्मीबाई शिंदे यांच्याही आठवणींचं प्रकाशन लवकर व्हावं अशी अपेक्षा वाचकांच्या वतीनं नोंदवायला हरकत नाही.
‘आठवणी व संस्मरणे’ – जनाक्का शिंदे, संपादक- रणधीर शिंदे, माध्यम पब्लिकेशन, पाने- २१९, किंमत- ३५० रुपये.
shraddhakumbhojkar@gmail.com