अरुंधती देवस्थळे
काही वर्षांपूर्वी महिनाभर गॉटलंडवर विसबीत माझं घर होतं. बाल्टिक समुद्राकाठी वसलेलं जुनंपुराणं गाव. आधुनिक प्रशस्त लायब्ररी, सुबक ठेंगणी घरं, दगडगोटय़ांचे रस्ते, सुरेख गल्ल्या, जुनं शांत चर्च, गरजेपुरतं मार्केट आणि हाकेच्या अंतरावर समुद्र. पाहताक्षणी प्रेमात पडावं असंच. त्याच दरम्यान सप्टेंबरमधल्या पौर्णिमेला असणारी ‘फोर्रानाट’आली आणि जवळच्याच बेटावर हा उत्सव असल्याने आम्ही मित्रमैत्रिणी तिथे गेलो. फोर्राचं जुनं दीपगृह स्वीडनच्या इतिहासात सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं! ही रात्र त्याच्या आसपास किनाऱ्यावर खात-पीत, समुद्रात पोहत, खेळत घालवायची असते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथेही घर असणारी मैत्रीण आम्हाला बेटावर हिंडायला घेऊन गेली. एका अनपेक्षित क्षणी आम्ही इंगमार बर्गमनच्या घरासमोर उभे होतो! मला खाडकन् शुद्धीवर आल्यासारखं झालं. तोवरचा मूड अगदी वेगळा होता. बर्गमनचं लाकडी मोठय़ा खिडक्यांचं बैठं, लांबट चौकोनी घर. त्याच्या समोरचा हजार वर्षांहून अधिक वयाचा म्हणवणारा खानदानी, देखण्या पुराणपुरुषासारखा ओक वृक्ष. बघता बघता मी बर्गमनच्या तोवर फारशा माहीत नसलेल्या विश्वात हरवलेली. ‘‘आमच्या बेटावर मोजकीच वस्ती म्हणून सगळे एकमेकांना माहीत असतात. सगळेच मदतीला धावून येणारे! इथे कोणी घराला किंवा कशालाच कुलपं लावत नाहीत. बर्गमनच्या जिवंतपणी कधी न लागलेलं कुलूप आता त्यांच्या माघारी लावावं लागतंय, कारण इथे येणाऱ्या प्रवाशांची उत्सुकता! बर्गमनजवळ अगदी छोटासा कुत्रा होता. पण आपलं खासगीपण जपण्यासाठी त्यांनी ‘खतरनाक कुत्र्यापासून सावधान..’ अशी पाटी मात्र लावलेली होती!’’ मैत्रीण सांगत होती. आम्ही घराभोवती बाहेरूनच चक्कर मारली. भरदुपारी माझ्या मनभर ‘ऑटम सोनाटा’ पसरलेला.. त्यावेळचं एवढंच आठवतंय!
संध्याकाळी विसबीला परतताना तासभर बर्गमन आणि त्यांच्या ‘दि सेवन्थ सील’, ‘पर्सोना’, ‘फॅनी अँड अलेक्झान्डर’, ‘क्राइज अँड व्हीस्पर्स’ आणि माझी आवडती ‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज’ वगैरे फिल्म्सभोवतीच संभाषण फिरत होतं. वेगवेगळ्या सांस्कृतिक चष्म्यांतून एकमेकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ऐकत होतो. दोन इनग्रिड बर्गमन असल्याचं मला प्रथमच कळलं. एक त्यांची पत्नी आणि दुसरी त्यांची सहचर आणि विख्यात अभिनेत्री. संभाषणातून स्टॉकहोममधल्या बर्गमन फाऊंडेशन आणि फोर्रावरल्याच बर्गमन सेन्टरचा उल्लेख आला. बात निकली तो बहुत दूर तक जाएगी! तात्पर्य इतकंच, की बर्गमनवरच्या एका प्रकल्पात काम करायची संधी मिळाली आणि त्यांच्या चारपैकी एका घरात राहून मूळच्या गोठय़ातून बनवलेल्या होम थिएटरमध्ये त्यांच्या आणि त्यांच्यावरच्या हव्या तेवढय़ा फिल्म्स बघायची संधीही! या फिल्म्स तर स्टॉकहोममध्ये फाऊंडेशनही दाखवू शकलं असतं, पण त्या वर्षांतून एकदा जूनमध्ये आठवडाभर भरणाऱ्या बर्गमन फेस्टमध्ये त्यांच्याच होम थिएटरमध्ये पाहू शकणं ही एक पर्वणीच. साठ सिनेमे आणि त्याहून जास्त नाटकं बसवणाऱ्या बर्गमनचे सिनेमे, विषय आणि हाताळणी यावर खूप बोलण्यासारखं आहे.. पण ते नंतर कधीतरी. ते त्यांनी जिथे लिहिले / कल्पिले, ते त्या भारलेल्या वातावरणात पाहायला मिळणं, आपण अडाणी असताना देशोदेशींच्या बर्गमन तज्ज्ञांना ऐकता येणं हा एक समृद्ध करणारा अनुभव! अर्धे स्वीडिशमध्ये बोलणारे होते, पण इंग्लिश अनुवाद हाताशी होता. या फेस्टला अनेकदा बर्गमनची सहचरी आणि बेजोड अभिनेत्री लिव उलमन किंवा/ आणि मुलगी लिन हजर असतात. फोर्रा बेट बर्गमनमय झालेलं असतं.
बर्गमन स्वत:च एक ब्रँड होते. भावनांचे सूक्ष्म विभ्रम दाखवणाऱ्या चेहऱ्यांच्या क्लोजअप्सचा प्रभावी वापर आणि कमालीची सिनेमॅटोग्राफी ही त्यांची खासियत. त्यांचे सिनेमॅटोग्राफर स्वेन निक्विस्ट यांच्याशी तारा जुळलेल्या. स्वीडिश निसर्गदृश्यांच्या प्रभावी वापरावर मास्टरी असलेल्या स्वेनना त्यांच्या कौशल्यासाठी दोनदा ऑस्करही मिळालेलं. माध्यमाइतकीच भाषेवर पकड असलेल्या बर्गमनना त्यांनी लिहिलेल्या संवादातला एकही शब्द इकडचा तिकडे झालेला चालत नसे असं लिव म्हणाली.
बर्गमन म्हणजे मनाच्या तळाचा ठाव न लागू देणारं रसायन. त्यांचं ‘दि मॅजिक लँटर्न’ हे आत्मकथन वाचल्यावर काहीबाही सापडल्यासारखं वाटलं. विशेषत: त्यांचं अस्थिर बालपण, वडिलांबरोबरचे असहज संबंध याचे पडसाद पुढे त्यांच्या फिल्म्समध्ये उमटणार होते. बर्गमन भेटतात ते अर्थपूर्ण तुकडय़ातुकडय़ांतून. जिसका जितना आंचल था, उतनीही सौगात मिली.. ते सापडणं म्हणजे मानवी जीवनातली फोलता स्वीकारणं, नात्यांच्या उभ्या-आडव्या धाग्यांचा पोत निर्मम स्कॅनरखाली तपासणं, कटू सत्यांसमोर स्वत:ला वस्तुनिष्ठपणे पारखणं, म्हणून झेपायला जडच. ‘ऑटम सोनाटा’ ही ग्लॅमरस, यशस्वी कलाकार आई आणि इतर कशाहीपेक्षा आपलं माणूसपण जपणाऱ्या सामान्य रूपाच्या मुलीची कहाणी. आई यश आणि कीर्तीसाठी दोन्ही मुलींकडे दुर्लक्ष करणारी. लेक नेहमीच तिला समजून घेण्याच्या प्रयत्नांत; पण आतून खदखदत असलेली. दोघी- खरं तर तिघी सात वर्षांनी भेटतात आणि एकमेकींशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांत उद्रेक होत राहतात.. जखमा भरून येण्यासाठी ते आवश्यकच असल्याचं दोघींना उमगतं. लिवने तिच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.. ‘‘इंगमार दिग्दर्शनात त्यांच्या नट-नटय़ांना सविस्तर सूचना कधी देत नसत. काय हवं आहे हे सांगून बाकीचं कलाकारावर सोडत. कोणी अडकत असेल तर ते त्यांना अचूक समजे आणि ते काम थांबवून त्याच्याजवळ जात आणि मदतीचं नेमकं काहीतरी सांगत. हवा तसा शॉट झाला की त्यांचे डोळे भरून येत.’’
‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज’मध्ये सन्मान स्वीकारण्यासाठी स्टॉकहोमहून लुंडला गाडीने जाणारा सुप्रसिद्ध अभिनेते व्हिक्टर शोस्ट्रॉमनी साकारलेला वृद्ध विक्षिप्त ठरवला गेलेला, मी जिवंत असून मेलेलो आहे म्हणणारा एकलकोंडा प्रोफेसर अक्षरश: कमाल! साथीला आहे त्याच्याशी फारसं न जमणारी, मुलाशी डिव्होर्स घेत असलेली गर्भार सून. प्रवासात आठवणींच्या तुकडय़ातुकडय़ांतून दोघे एकमेकांना थोडेसे उलगडत जातात. फारसा संवाद नसलेल्या लेकाशीही अबोल जवळीक सुरू होते. सिनेमा संपतो तो सुखाचा अंश गवसण्यावर! ‘दि सेव्हन्थ सील’मधला नायक मरण्याआधी एक तरी सार्थक कृत्य करून मगच मरावं अशी आस लागलेला आणि म्हणून मृत्यूला बुद्धिबळाच्या खेळाचं आव्हान देणारा. या फिल्मबद्दल बर्गमन म्हणतात, ‘‘My fear of death- this infantile fixation of mine-was, at that moment, overwhelming. I felt myself in contact with death day and night, and my fear was tremendous. When I finished the picture, my fear went away. I have the feeling simply of having painted a canvas in an enormous hurry, but without any arrogance. I said, ‘ Here is a painting; take it, please’’!
‘पर्सोना’मध्येही अशीच अभिनयाची जुगलबंदी आहे.. नाटकाचा प्रयोग चालू असताना मधेच वाचा हरवलेली अभिनेत्री लिव उलमन आणि तिच्या देखरेखीला ठेवलेली नर्स बीबी अँडरसन या दोघींमधली. दोघींचे (विशेषत: लिवचा) बोलके चेहरे आणि स्वेन नाईक्विस्ट यांच्या कॅमेऱ्याची कमाल.. मला सिनेमा तांत्रिकदृष्टय़ा अजिबातच कळत नाही, पण एक आम प्रेक्षक म्हणून इथे पाहिलेल्या १८ पैकी प्रत्येक सिनेमा हा स्वतंत्र लेखाचा ऐवज वाटतो.
स्वीडनच्या पूर्वेकडच्या टोकाला एकाकी पडल्यासारखं असलेलं हे बेट पोहोचायला कठीण. शांत समुद्रतट, वाळूचा किनारा आणि मध्येच ओबडधोबड रूपात उभ्या लाइम स्टोनच्या खडकांचं फोर्रा. निर्मनुष्य समुद्रकिनारा भरदिवसा गूढतेने झपाटल्यासारखा वाटायला लागतो. बर्गमनच्या सिनेमातलं अगम्य गहिरं करडेपण इथून असेल का आलेलं? पानगळीचा ऋतू त्यांचा सर्वात आवडता! पावसाळी हवेला ‘बर्गमनची हवा’ म्हणतात इथे.
१९६६-६७ मध्ये हॅमर्सचं पहिलं घर बांधल्यापासून ते त्यांचं घरच नव्हे, तर आयुष्याचा जोडीदार झाल्यासारखंच होतं. हॉलीवूड, बॉलीवूडमधल्या यशस्वी फिल्म मेकर्सच्या चमकदार दिखाऊपणाशी काहीही संबंध नसलेलं, म्हणूनच बर्गमनच्या स्वभावाचं!! अगदी साधं लाकूड आणि दगडांचं घर. मोठय़ा आयताकृती खिडक्या.. सगळीकडून भरपूर सूर्यप्रकाश खेळता ठेवणाऱ्या. मालकाच्या व्यक्तिमत्त्वाची आभा त्यात रेंगाळतेय. प्रशस्त खोल्यांपैकी दोनच पाहता येतात. बाकी सगळं बर्गमनच्या इच्छेनुसार फक्त कुटुंबीयांसाठी राखलेलं आहे. एकतर ऐसपैस लायब्ररी. त्यात भरपूर पुस्तकं, कमीत कमी फर्निचर. भिंतींवर त्यांचे, कुटुंबीयांचे आणि फिल्म्समधले फोटो. तिला लागून असलेली खोली तर आणखीनच वेगळी. भिंतींमधल्या लांब-रुंद शेल्फमध्ये देशोदेशीच्या सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सिनेमांच्या चित्रफिती आणि त्यांच्याबरोबर बर्गमन पाहतील अशी शंकासुद्धा येऊ नये अशा गल्लाभरू फिल्म्स!! भलीथोरली फायरप्लेस आणि फक्त एक लाकडी खुर्ची. आपल्या घरून लाल टेम्पोमधून धडधडत होम थिएटरमध्ये येणारे बर्गमन अनेकांनी पाहिलेले. जवळच असलेल्या अंगेनच्या घरात पाहुणे, बहुतेक वेळा सहकारी मंडळी. बर्गमन सेंटर घरापासून सात-आठ कि. मी.! म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाहन आवश्यक.. स्वत:चं किंवा भाडय़ाचं. घरात इंटरनेट नसल्याने इथे राहून बाहेरच्या जगाबरोबर काम करता येत नाही. थोडेच आणि कच्चे रस्ते. दूरच्या शेतांच्या तुकडय़ांमध्ये चरणाऱ्या पांढऱ्या-काळ्या धष्टपुष्ट गाई, घोडे. जागोजागी जंगली स्ट्रॉबेरीजची झुडपं, बटाटय़ाची शेतं.. आणि तरीही सर्वत्र जाणवणारं निर्जनपण. इथली लोकसंख्या जेमतेम ५००-५५०! एक-दोन किराणा मालाची दुकानं आहेत- घरापासून आठ किलोमीटर दूर. बर्गमन सेन्टरसुद्धा घरासारखंच लाकडी. त्याच्या शेजारीच फोर्राचं म्युझियम आहे. समोर बर्गमनच्या ‘दि सेव्हन्थ सील’मध्ये असणारा बुद्धिबळाचा पट मांडून ठेवलाय.
बर्गमननी त्यांचा अंत्यविधी नि:संदिग्ध शब्दांत प्लॅन केला होता. त्यांच्या फायरप्लेसला लाकूड पुरवणाराच शवपेटिका तयार करणार होता आणि मोजक्याच लोकांना निरोपासाठी बोलावलं गेलं होतं. फोर्राच्या चर्चमध्ये त्यांच्या पत्नीच्या कबरीतच बर्गमन (१९१८-२००७) चिरनिद्रेत आहेत. दोघांचा ग्रेव्ह स्टोनही एकच कातळ आहे.
arundhati.deosthale@gmail.com