-शिल्पा गोडबोले, अभिजित कोल्हटकर

शैक्षणिक पार्श्वभूमीतून मिळालेल्या पारंपरिक कामकाजाला एका टप्प्यानंतर तिलांजली देऊन आपल्या छंदाचा व्यवसाय करणाऱ्या निर्माता दिग्दर्शकद्वयीची ही गोष्ट. व्यवसायात पाय भक्कम करून झाल्यावर स्वत:ला कलात्मकदृष्ट्या अद्यायावत करण्यासाठी माहितीपटाचा केलेला प्रयोग लक्षात घेण्यासारखा…

snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

साधारणत: २२ वर्षे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून भारत आणि अमेरिकेत काढल्यानंतर लौकिकार्थाने आयुष्य मार्गी लागण्याची परिस्थिती बनली होती. जे करीत होतो, त्या कामात आनंद-समाधान होते. पण पिंड सतत कलात्मक वाटांवर हिंडणारा. मी मूळचा मुंबईचा. भांडुप परिसरात वाढलेला. तिथे लहानपणी फोटोग्राफी, कॅमेरा आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये स्वारस्य असलेला. शिक्षण सुरळीत पार पडले. गुणवत्तेनुसार कामही मिळाले. पुढे कॅलिफोर्नियातील बे एरियात सिमॅण्टेक कंपनीत उच्चपदावर काही वर्षे नोकरी केली. जगण्यासाठी आवश्यक तितकी आर्थिक बेगमी झाल्याचे चाळिशीतच लक्षात आले तेव्हा भारतात परत आलो. पुण्यात औंध येथे ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन’ सुरू केले. माझी फोटोग्राफी आणि ऑडिओ-व्हिडीओ बनविण्याची हौस मला यातून पूर्ण करता येणार होती. व्यवसाय कसा होईल, किती होईल याची बिलकूल कल्पना नव्हती. पण आपला कल असलेल्या क्षेत्राला व्यवसायात परावर्तित कसे करता येईल याची चाचपडणी सुरू झाली. शिल्पा गोडबोले ही मुंबईतील मैत्रीणदेखील याच दरम्यान पुण्यात स्थायिक झाली. टेक्स्टाइल डिझायनर आणि फाइन आर्टिस्ट म्हणून पंधरा वर्षे काम करणाऱ्या शिल्पाला शब्दांची आणि लेखनाची आवड. त्यामुळे तीदेखील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन’चा भाग बनली. आम्ही पुढल्या काळात व्यावसायिक पातळीवर अनेक म्युझिक व्हिडीओ बनविले. ‘सिनेमा टिझर्स’ बनविले. मग आमच्यातील कलात्मक जाणिवेचा भाग म्हणून शॉर्ट फिल्म्स तयार केल्या. म्हणजे आम्ही याचे रीतसर विद्यापीठीय शिक्षण घेतले नाही. पण या गोष्टी बनवता बनवता त्यातून शिकत गेलो. गाण्यांचे ऑडिओ आणि व्हिडीओ बनवताना आम्हाला उत्तमोत्तम कलाकारांचा सहवास लाभत गेला. स्वत:ला अद्यायावत करण्याच्या प्रयत्नात ‘डॉक्युमेण्ट्री’ क्षेत्रात आमची पावले पडली. कलात्मकदृष्ट्या आम्हाला या क्षेत्राचा फायदाच होत गेला.

हेही वाचा…‘नास्तिक्या’ची परंपरा…

साधारण २०१५/१६ साली ‘ये इश्क नाही आसां’ या गझल अल्बमचे ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्या ‘रिव्हर्ब स्टुडिओ’मध्ये सुरू होते. डॉ. शशीकला शिरगोपीकर यांचे गझलगुरू उस्ताद असिफ खानसाहेब यांनी चाल दिलेल्या गजल्सची एक सीडी करायचा प्रकल्प होता. तेव्हा शशीताईंना भेटायचा योग आला. हे रेकॉर्डिंग जवळ जवळ महिनाभर सुरू होते. त्या दरम्यान शेरो-शायरी, वेगवेगळ्या रागांची गंमत याचबरोबर ३७ वर्षे प्राणिशास्त्राच्या (झुओलॉजी) प्राध्यापक म्हणून काम करताना शशीताईंच्या अनुभवाची ओळख आम्हाला झाली. शशीताई या जेष्ठ रंगकर्मी नानासाहेब शिरगोपीकर यांच्या कन्या असल्यामुळे, त्यांच्या लहानपणचे नाटक मंडळींबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवासाचे किस्से, आठवणी अनेक गोष्टी ऐकायची संधी अनायसे चालून आली. जसजसा सहवास वाढत गेला, तसतसे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडायला लागले; आणि या सगळ्याची कुठेतरी नोंद झाली पाहिजे असे प्रकर्षाने जाणवायला लागले. त्यामुळे दृक-श्राव्य माध्यमातील अनुभवांचा वापर करून ‘डॉक्युमेण्ट्री’ बनविण्याचा विचार पहिल्यांदा डोकावला.

‘डिजिटल प्रेझेन्स’ ही जशी काळाची गरज आहे, तसेच ते माहिती दस्तावेजीकरणाचे एक अत्यंत प्रभावी माध्यमही आहे. वेबसाईट, यूट्यूब प्रोफाईल, लिंक्डइन प्रोफाईल अशा रूढ असलेल्या ओळख व्यासपीठांवर शशीताईंची काहीही माहिती उपलब्ध नव्हती आणि फेसबुक, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवरही फारच जुजबी गोष्टी होत्या. पण शशीताईंजवळ आकाशवाणीवरील जुनी रेकॉर्डिंग्ज, जुन्या कॅसेट्स, जुन्या सीडीज, वर्तमानपत्रातील कात्रणे, काही अत्यंत जुनी तर काही अलीकडची छायाचित्रे आणि प्रचंड आठवणी आणि किस्से असा भरपूर खजिना होता. हे सर्व एका ठिकाणी सुसूत्रपणे एकत्र करण्याची गरज आहे, याची जाणीव झाली. त्यामुळे प्रथम शशीताईंची वेबसाईट तयार करायचे काम हाती घेतले. यूट्यूब हा एकमेव डिजिटल प्लॅटफॉर्म नसला तरी सहज उपलब्ध आणि सर्वमान्य असल्यामुळे त्यांचे यूट्यूब चॅनेल तयार केले.

हेही वाचा…लोभस माणूस

वर्तमानात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, किंवा व्यक्ती- ज्यांच्यामुळे समाजाला, विचारांना नवीन दिशा मिळते- त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हे अत्यंत गरजेचे असते. आम्हाला अनुभव होता तो शॉर्ट फिल्म्सचा. गोष्टीवर-कथेवर चालणाऱ्या लघुपटांचा. पण ‘डॉक्युमेण्ट्री’साठी लागणाऱ्या संशोधनाच्या क्षेत्रात आमची ही पहिलीच पावले होती. व्यावसायिक हेतू नव्हता. या गझल क्षेत्रात काम करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला वेध घ्यायचा तर तो कसा, हे आधी आम्ही धडपडतच ठरवत होतो. आमच्या डॉक्युमेण्ट्रीतून मिळणारी माहिती या क्षेत्रात स्वारस्य असणाऱ्यांना, तसेच पुढल्या पिढीला उपयोगी ठरेल, या हेतूने आम्ही पुढे जात होतो.

प्राणिशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून पुण्याच्या गरवारे कॉलेज येथे नोकरी, प्रथितयश शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायिका म्हणून लोकप्रिय असतानाच ‘उर्दू गझल’ या विषयावर शशीताईंनी शोध निबंध लिहिला. तब्बल ४० वर्षं देशभर आणि परदेशातही उर्दू गझल मराठीमध्ये अर्थ सांगून पेश करण्याचा अनोखा कार्यक्रम त्या करतात. त्यांच्याभोवती जमा झालेला मित्रपरिवार आणि शिष्यवर्ग असा प्रचंड आवाका असलेल्या शशीताईंच्या कार्याचा पट आमच्या डॉक्युमेण्ट्रीमधून उभारायचा होता. ७५ वर्षांच्या आयुष्यात चौफेर विषयांमध्ये केवळ शिक्षण घेऊन न थांबता आपले ज्ञान इतरांना देण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. म्हणूनच केवळ एक गायिका म्हणून त्यांना समोर न आणता त्यापलीकडे एका प्रगल्भ, बहुश्रुत, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास दाखविण्याची आमची इच्छा होती.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : ‘ठिय्या’ मांडणी…

जवळ जवळ दोन वर्षे आमच्या मनात हा विषय घोळत होता. हळूहळू कामाला सुरुवात केली. पहिली पायरी ही त्यांच्या बालपणापासून आत्तापर्यंतच्या सर्व आठवणी आणि किस्से एकत्र करणे… त्यासाठी त्यांच्याबरोबर अनेक भेटी घेतल्या. मोबाइलवरून ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग केली. त्यातून काय संकलित करता येईल त्याची कित्येक दिवस चर्चा केली. माहितीची वर्गवारी करन त्याची लायब्ररी तयार केली, डॉक्युमेण्ट्रीसाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या व्यक्ती, प्रसंग, विविध ठिकाणे, त्यांच्या गझलांची, शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाची रेकॉर्डिंग्ज मिळवली, ती ऐकून त्यांचे डिजिटलायझेशन करून त्याची वर्गवारी केली. हा डेटा जुळवणीचा प्रवास वर्षभर आनंदात सुरू होता.

त्यानंतर या चित्रकोड्याचे सर्व भाग आता आपल्याकडे आले आहेत, ते योग्य जागी बसवता येतील अशी खात्री झाली. मग सुरू झाला जनसंपर्क. आमच्या टीमव्यतिरिक्त या क्षेत्रात अनुभव असलेल्या अनेकांनी आम्हाला सहकार्याचा हात पुढे केला. आमचे मित्र कौशल शाह यांनी ‘कामासाठी लागेल तो कॅमेरा खुशाल घेऊन जा’असे सांगितले. शशीताईंच्या शिष्यवर्गाच्या उत्साहाला उधाण आले होते.

ही डॉक्युमेण्ट्री जितकी श्रवणीय बनवता येईल तितकीच ती पाहायलाही आकर्षक असावी, हा विचार सुरुवातीपासूनच होता. त्यासाठी शशीताईंच्या कोल्हापूरजवळ असलेल्या ‘कवठे गुलंद’ या गावी जाऊन तिथल्या १०० वर्षे जुन्या ‘शिरगोपीकर वाड्या’मध्ये आणि आसपास शूट करायचे असे मनात होते. चित्रीकरणाची स्थळे पक्की केली, नियोजन सुरू केले आणि करोनाच्या टाळेबंदीचा पहिला फटका बसला. टाळेबंदीचा काळ कधी संपेल याचा अंदाज येत नव्हता. मग पुण्यामध्येच जागा शोधायला सुरुवात केली. याकामी आमचा कलाकार मित्र, प्रॉडक्शन डिझाइनर सिद्धार्थ तातूसकर याने १८० वर्षे जुनी, सुंदर दगडी बांधकाम असलेल्या शाळेची जागा दाखवली. तिथले डायरेक्टर आशिष जेम्ससर यांनी संपूर्ण सहकार्य द्यायचे कबूल केले. त्यांच्या मदतीने तिथे शूट करायचे नक्की केले, तसेच शशीताईंची शिष्या रजनी देशपांडे यांच्या बंगल्यामध्ये काही भाग शूट करायचे ठरले.

हेही वाचा…पडसाद: स्वावलंबन शिकवणारी गोष्ट

या डॉक्युमेण्ट्रीच्या पार्श्वसंगीतासाठी फक्त आणि फक्त शशीताईंच्याच आवाजातली जुनी रेकॉर्डिंग्ज वापरायची, हेही आधीच ठरवले होते. सर्व जुन्या कॅसेट्स ,जुन्या सीडीज ऐकून, डिजीटाइज करून त्यातून फक्त काही भाग संकलित करणे ही वेगळी परीक्षा होती. चित्रीकरण झाले. पाच तास शशीताईंच्या मुलाखतीचे फुटेज. १० तास ३० जणांच्या मुलाखती असा प्रचंड माहितीचा साठा घेऊन आम्ही संकलनासाठी बसलो; तेव्हा क्षणभर कुठून सुरुवात करावी हेच कळेनासे झाले. पण हा थांबा लवकरच दूर झाला आणि डॉक्युमेण्ट्री आकार घेऊ लागली. प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण मुलाखत घेणे शक्यच नव्हते, मग त्यातील मौलिक, आवश्यक पकडण्यात बरीच मेहनत सुरू झाली. कुठेही न थांबता सलग एक गोष्ट ऐकल्याची आणि पाहिल्याची अनुभूती मिळावी यासाठी आमचा पुढला झगडा होता. तो यशस्वी झाला. आमचे उद्दिष्ट पूर्ण झाले. आमची कलात्मकतेची चाचपणी सुरू असताना शशीताईंनी आणि त्यांच्या शिष्यवर्गाने आमच्यावर विश्वास दाखविला. हा सुरेल प्रवास कायम स्वरूपी येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी डिजिटली बंदिस्त करण्याची आमची धडपड पूर्ण झाली. मेहनतीचे सार्थक झाले.

उर्दू गझलचे सौंदर्य मराठी माणसांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य डॉ. शशीकला शिरगोपीकर करीत आहेत. त्यांच्या सांगीतिक आणि शैक्षणिक कारकीर्दीचा प्रवास ‘नोट्स अनसंग’ या माहितीपटाद्वारे आम्हाला मांडता आला. यूट्यूबवर हा माहितीपट सहज उपलब्ध आहे.

हेही वाचा…अस्तित्वशून्य अवस्थेचा डोलारा

मोबाइल फोन तसेच आताच्या वेगवान इंटरनेटमुळे व्हिडीओ बघण्याचे प्रमाण अनेक पटीने वाढले. ते आणखी वाढणार. ओटीटी फलाटामुळे लोकांना उच्च प्रतीचा जागतिक स्तरावरील ‘कंटेंट’ पाहण्याची सवय लागली. तेथे अनंत पर्याय उपलब्ध असल्याने दर्शक अत्यंत चोखंदळ बनत आहेत. ज्ञानार्जन किंवा मनोरंजनाकरिता असलेल्या व्हिडीओंची, रिल्सची लाखोंमध्ये दर्शकसंख्या बनू शकते. आता रिल्स- क्लिप्सवर अडकलेली एक संपूर्ण पिढी विशिष्ट काळानंतर त्यातून परावृत्त होईल. तेव्हा अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण डॉक्युमेण्ट्रीकडे त्यांना वळवता येईल, असे वाटते. माहितीच्या स्फोटातही उपयुक्त ‘कण्टेण्ट’चा आदर दर्शकांना राहील. अधिकाधिक चांगल्याची अपेक्षा ते करतील. त्यामुळे हे क्षेत्र आमच्यासारख्या हौसेतून तयार होणाऱ्यांना शिकविणारे आहे, तसेच पारंपरिक अभ्यास करून डॉक्युमेण्ट्री निर्मितीत उतरणाऱ्यांसाठी कलात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्याही आश्वासक ठरणार आहे.

हेही वाचा…दिल्लीत अडकलेले ‘मराठी’…

गेली दहा वर्षे दृक् श्राव्य माध्यमात कार्यरत. लघुपट, जाहिरात, म्युझिक व्हिडीओची निर्मिती. ‘ऑप्शन’ या मराठी लघुपटाला पुरस्कार. ‘स्टार्टअप’ आणि ‘डिअर डायरी’ या लघुपटांची निर्मिती आणि लेखन.
abhijit.kolhatkar@reverbproductions.in