रघुनंदन गोखले

गेल्या वर्षी ३ जुलैला माद्रिदच्या एल रिटेरो बागेमध्ये मॅग्नस कार्लसन आणि ज्युडिथ पोल्गार भेटले, त्या वेळी मॅग्नस हा जगज्जेता होता आणि त्याचा आव्हानवीर ठरवण्यासाठी कँडिडेट स्पर्धा स्पेनच्या राजधानीत सुरू होती. ज्युडिथ खेळातून निवृत्त होऊन सात वर्षे लोटली होती. बागेतल्या लोकांनी त्यांना ओळखले आणि एकच गर्दी झाली. लोकाग्रहास्तव दोघेही एक डाव खेळले आणि अहो आश्चर्यीम्! बुद्धिबळातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून एकमताने सन्मान मिळवणाऱ्या ज्युडिथ पोल्गारनं अवघ्या १९ चालींत मॅग्नसचा पराभव केला. प्रेक्षकांमध्ये ग्रँडमास्टर अनिश गिरीही होता. ज्युडीथनं ज्या क्षणी आपली उंटांचा बळी देण्याची चाल खेळली, त्या वेळी मॅग्नस आणि अनिश या दोघांच्या तोंडून ‘ओह, माय गॉड!’ असे उद्गार बाहेर पडले आणि प्रेक्षकांनी टाळय़ांचा कडकडाट केला. हा प्रसंग तुम्हाला ‘चेस ट्वेंटीफोर’च्या यू टय़ुब चॅनलवर पाहायला मिळेल. फक्त टाइप करा- Only 19 Moves!

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”

सतत हसतमुख असणारी ज्युडिथ चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये आली ती हंगेरियन संघाची प्रशिक्षक म्हणून. पुरुषांच्या संघाला महिला प्रशिक्षक? पण ज्युडिथविषयी सर्वांना इतका आदर आहे की, तिला प्रशिक्षक म्हणून हंगेरीच नव्हे तर जगभर मान आहे. जानेवारी १९८९ रोजी ज्युडीथनं जगातली पहिल्या क्रमांकाची महिला खेळाडू म्हणून मान मिळवला आणि २०१४ च्या ऑगस्टमध्ये निवृत्त होईपर्यंत तिनं २५ वर्षे आपलं अढळ स्थान सोडलं नाही. निवृत्तीनंतर वर्षभरात ज्युडीथला हंगेरी सरकारनं त्यांचा सर्वोच्च नागरी किताब – ‘ऑर्डर ऑफ सेंट स्टीफन ऑफ हंगेरी’ देऊ केला.

आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी : आधुनिक बुद्धिबळाचा जनक

मागे एकदा मॅग्नसला एका कार्यक्रमामध्ये विचारलं गेलं की, ज्युडिथ पोल्गारला तू १० पैकी किती गुण देशील? मॅग्नस म्हणाला, ‘‘मी तिला प्रतिभेसाठी ७ देईन. मात्र ज्युडिथच्या खेळाला प्रेक्षणीय ठरवून मनोरंजनासाठी ९ गुण देईन आणि ती २५ वर्षे सतत आघाडीची महिला खेळाडू राहिल्यामुळे मुलींना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल ९ देईन, पण समजूतदारपणासाठी १० पैकी १० देईन.’’ कारण ज्युडिथ आहेच तशी. सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी. तिला रशियन, स्पॅनिश, इंग्लिश आणि तिची मायबोली हंगेरियन या भाषा अस्खलित बोलता येतात.

मी ज्युडिथला प्रथम १९८६ साली पाहिलं त्या वेळी तिला रेटिंगही नव्हतं आणि सुसानची धाकटी बहीण याहून तिची वेगळी ओळखही नव्हती. खेळायला बसताना पटाच्या बाजूला ज्युडिथ खेळण्यातल्या वाघाचा छोटा पुतळा ठेवायची आणि खेळायचीपण वाघासारखीच! अॅनडलेडच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिनं एकाहून एक विजय मिळवून आपलं नाव सर्वत्र केलं. तिनं रुमानियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर द्रायमर याला एका चमकदार डावात हरवलं होतं. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ज्युडिथ जगातली क्रमांक एकची महिला खेळाडू झाली आणि त्या वेळचा बॉबी फिशरचा विक्रम मोडून १५ व्या वर्षी पुरुषांची ग्रँडमास्टर झाली. यावरून तुम्हाला तिचा झंझावात कळेल!

वयाच्या ९ व्या वर्षीच ज्युडिथनं न्यू यॉर्क ओपन स्पर्धेच्या प्राथमिक विभागात पहिला क्रमांक पटकावून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. त्या काळी जागतिक संघटना दर सहा महिन्यांनी रेटिंग जाहीर करत असत. सगळय़ात कमी रेटिंग २२०० होते. तसे पाहिले तर त्या काळी ऑलिम्पियाडमध्येसुद्धा खूप खेळाडूंना रेटिंग नसायचे. त्यामुळे ज्युडिथच्या विभागात मास्टर दर्जाचे भरपूर खेळाडू होते. ज्युडिथचा खेळ बघायला ग्रॅण्डमास्टर्सपण गर्दी करायचे. तिच्या प्रतिभेची उंची किती मोठी होती याचं उदाहरण म्हणजे वयाच्या ९ व्या वर्षीच तिनं डोळय़ावर पट्टी बांधून दुसऱ्या मास्टरला हरवलं होतं.

आणखी वाचा- चौसष्ट घरांच्या गोष्टी: नित्यदिग्विजयी निहाल..

लहानपणीच तिच्या वडिलांनी ठरवलं होतं की, ती मुलींमध्ये खेळणार नाही. त्यामुळे तिनं मुलांमध्ये खेळून १२ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील मुलांची जगज्जेतेपदं मिळवली होती. अपवाद होता तो फक्त दोन ऑलिम्पियाडमध्ये! आपल्या देशाला सुवर्णपदकं मिळवून देण्यासाठी तिघी पोल्गार भगिनी १९८८ (सलोनीकी) आणि १९९० (नोवी साद) येथे ऑलिम्पियाड खेळल्या होत्या. १९८८ सालच्या ऑलिम्पियाडच्या आधी सोव्हियत संघानं एकही पराभव पहिला नव्हता. त्यांचा प्रशिक्षक ग्रँडमास्टर गुफेल्ड यांनी आधी वल्गना केली होती. त्या वेळी अतिशय अपमानास्पद उद्गार काढले होते. ते म्हणाले होते, ‘‘या स्पर्धेनंतर जगाला कळेल की या खरोखरच प्रतिभावान आहेत की सामान्य मुली आहेत!’’ ज्युडीथनं तर कमाल केली होती. १३ डावांत तिनं एकही पराभव पाहिला नाही आणि फक्त एक बरोबरी सोडल्यास उरलेले १२ डाव जिंकून वैयक्तिक सुवर्णपदकही मिळवलं.

इस्राएलच्या ग्रँडमास्टर लेव साखीस काही दिवस पोल्गार भगिनींचा प्रशिक्षक होता. तो गमतीनं म्हणायचा की, ही ज्युडिथ मुलीच्या वेशातला पुरुष आहे, कारण पुरुषांना जमणार नाहीत इतके प्रखर हल्ले ती करते. ११ जगज्जेत्या पुरुषांना हरवणारी ज्युडिथ ही एकमेव महिला असावी. अगदी स्मिस्लोव, कार्पोव, कास्पारोव्ह, आनंदपासून तिनं कोणालाही सोडले नाही. २००३ साली तिनं नेदरलँड्समधील प्रख्यात कोरस स्पर्धेत (आता हीच स्पर्धा टाटा स्टील नावानं ओळखली जाते) आनंदपाठोपाठ दुसरं बक्षीस मिळवलं होतं. त्या वेळी आनंद म्हणाला होता की, ती आमच्यातलीच एक आहे. ज्युडिथ म्हणाली, ‘‘तो क्षण माझ्या आयुष्यात खास होता.’’ त्यानंतर तिनं स्पर्धामागून स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला होता.

२००२ पर्यंत सगळे जगज्जेते झाले, पण गॅरी कास्पारोव्ह ज्युडिथच्या तडाख्यात येत नव्हता. त्यातही तो उपमर्दकारक बोलून तिला डिवचत असे. एकदा तर तो म्हणाला होता की, ‘‘ती कशाला आमच्यात खेळते? इतर बायकांप्रमाणे तिनं स्वयंपाक करावा.’’ पण ज्युडिथ वाट बघत असलेली घटिका आली ती रशिया विरुद्ध शेष विश्व सामन्यात. ज्युडिथसमोर पुन्हा एकदा उद्दाम गॅरी होता. त्या दिवशी ज्युडिथनं अतिशय संयमी खेळ केला आणि गॅरीला डोकं वर काढायची संधी दिली नाही. पराभव झाल्यावर गॅरीनं सही केली आणि तिथून तोंड लपवून पळ काढला. ज्युडिथ म्हणाली, ‘‘माझ्या आयुष्यातील तो एक सुखद क्षण होता.’’

आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी: महाविक्षिप्त प्रतिभावंत 

ज्युडिथला चमकदार खेळासाठी अनेक वेळा प्रेक्षकांकडून मानवंदना मिळत असे. जागतिक विद्युतगती स्पर्धेत एकदा तर तिनं माजी ज्युनिअर विश्वविजेत्या जोएल लॉटीयरला अवघ्या १२ चालींत हरवलं होतं. तिनं जोएलचा वजीर सापळय़ात पकडताच तो शरण आला आणि प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. ज्युडिथची प्रतिभा इतकी होती की तिला क्लासिकल असो वा जलदगती असो, कोणत्याही प्रकारच्या वेळात काहीही फरक पडत नसे. ती लहान असताना ‘दर स्पिगेल’या प्रख्यात जर्मन साप्ताहिकानं लिहिलं होतं की, ज्युडिथ आपल्या खेळानं आपल्या मोहऱ्यांची एक वावटळ निर्माण करते- ज्यामध्ये भलेभले भांबावून जातात. माजी अमेरिकन विजेता ग्रँडमास्टर जोएल बेंजामिन म्हणतो, ‘‘एकदा माझा ज्युडिथविरुद्धचा डाव तब्बल पाच तास चालला आणि मी पार दमून गेलो होतो. ती एक वाघीण आहे आणि सतत हल्ले चढवत असते. तुम्ही एक छोटी चूक करा, की तुम्हाला ती खाऊनच टाकेल.’’ निवृत्तीच्या काहीच दिवसांपूर्वी ज्युडिथ आणि नायजेल शॉर्ट यांच्यात एक प्रदर्शनीय ऑनलाइन सामना चेस डॉटकॉम या संकेतस्थळावर झाला. तीन प्रकारच्या वेळांमध्ये हा सामना खेळला गेला. पाच मिनिटे, तीन मिनिटे आणि एक मिनिट प्रत्येकी (आणि प्रत्येक खेळीनंतर एक सेकंद) अशा या सामन्यात ज्युडीथनं नायजेलला अक्षरश: लोळवलं. तिनं हा सामना १७.५ विरुद्ध १०.५ असा आरामात जिंकला. दुसऱ्या दिवशी ज्युडीथनं तिच्या फेसबुकवर लिहिलं- ‘‘छान मजा आली नायजेलशी खेळायला!’’ तर नायजेलने ट्विटरवर लिहिले- ‘‘इतक्या वाईट दर्जाचे बुद्धिबळ मी कधी खेळलो नव्हतो. स्वत:ला फाशी लावून घ्यावी असे वाटते आहे.’’ ज्युडिथशी हरल्यावर अनेकांची ही भावना होत असे, कारण तुमची चूक झाली की तिच्याकडून क्षमा नसे. शिक्षेचं गिलोटिन तुमच्या मानेवर पडलंच म्हणून समजा.

आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी: बुद्धिबळातील जीवनसार..

२००२ सालच्या ऑगस्टमध्ये ज्युडिथ पशुतज्ज्ञ गुस्ताव फॉन्ट यांच्याशी विवाहबद्ध झाली आणि तिला अभ्यासासाठी वेळ काढावा लागत असे. नंतर तिला ऑलिव्हर आणि हॅन्ना अशी दोन मुलं झाल्यावर तर तिचा दृष्टिकोनही बदलला. एकदा ती म्हणाली की, व्यावसायिक खेळाडूला स्वार्थी बनावं लागतं. स्पर्धा सुरू असताना तुम्ही कुटुंबाचा विचारही करू शकत नाही. तिला लग्नानंतर पत्रकारांनी विचारलं, ‘‘अजूनही तू पुरुषांची जगज्जेती बनण्याचा विचार करते आहेस का?’’ त्या वेळी तिनं दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणाली, ‘‘बुद्धिबळ हा माझा व्यवसाय आहे, पण ते काही माझं जीवन नाही. मी स्वत:चा खेळ सुधारण्याचा प्रयत्न करीन, पण त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणार नाही.’’ सतत २५ वर्षे सर्वोच्च पदावर विराजमान होणं काही येरागबाळय़ाचं काम नोहे, पण ज्युडीथनं ते सहजसाध्य केलं आणि तेही फक्त पुरुषांमध्ये झुंजून! पोल्गार भगिनी आणि त्यातही ज्युडिथच्या पराक्रमामुळे अनेक देशांत महिलांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. निवृत्तीनंतरही ज्युडिथनं ‘ज्युडिथ पोल्गार फाऊंडेशन’मार्फत लहान मुलांना बुद्धिबळ खेळायला प्रवृत्त करायला सुरुवात केली आहे. बालमंदिरातील मुलांसाठी चेस प्लेग्राऊंड आणि पहिली ते चौथीच्या मुलांसाठी चेस पॅलेस असं मानसिक वृद्धीसाठी बुद्धिबळ प्रोग्रॅम तिनं तयार केलेले आहेत. तिथे बुद्धिबळाच्या मदतीनं गणित, विविध भाषा शिकण्यासाठी मदत केली जाते. हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला की, आता हंगेरीच्या सर्व शाळांमधून तो राबवला जातो. तिच्या पुस्तकांना युरोपियन शिक्षणातले सर्वोत्तम पुरस्कारही मिळालेले आहेत.

अशी ही ज्युडिथ ज्या खेळानं तिला सर्व काही दिलं, त्या खेळाच्या प्रसाराला निवृत्तीनंतरही येनकेनप्रकारेण मदत करत असते. चेन्नईला ऑलिम्पियाडच्या वेळी मॅग्नस कार्लसनच्या बरोबरीनं तिच्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी झुंबड उडत असे. निवृत्तीनंतरही तिचं स्टारडम जराही कमी झालेलं नाही यातच तिचं मोठेपण आहे.

gokhale.chess@gmail.com