हेमंत प्रकाश राजोपाध्ये rajopadhyehemant@gmail.com

आपल्या संस्कृतीत ‘जीवो जीवस्य जीवनम्’, ‘बळी तो कान पिळी’, ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या म्हणी अगदी नैसर्गिक न्याय म्हणून प्रमाण मानल्या जातात. कौटिल्य-चाणक्य यांच्या अर्थशास्त्रात ‘मात्स्यन्याय’ ही संकल्पना अशीच नैसर्गिक नियमांसारखी प्रमाण समजली गेली आहे. ‘मात्स्यन्याय म्हणजे मोठा मासा छोटय़ा माशाला खाऊन टाकणारच..’ ही धारणा! कौटिल्याच्या राजनीतीशास्त्रातून व्यक्त होणाऱ्या तत्त्वज्ञानाने या न्यायाला केंद्रस्थानी मानूनच जणू राजनीतिपर विचार मांडला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर एखादी म्हण समाजात रूढ होणं ही मानवी समाजातील एक सांस्कृतिक अभिव्यक्ती समजली जाते. म्हण रुजणे ही प्रक्रिया पूर्ण होते म्हणजेच त्या म्हणीतून व्यक्त होणारा आशय बहुसंख्याक समाजात संमत किंवा अध्याहृत समजला जातो. मराठी भाषेमध्ये अशा म्हणींची संख्या काही कमी नाही. केवळ मराठीच नाही, तर जवळजवळ सर्वच भारतीय आणि अन्य भाषांतून या म्हणींनी त्या- त्या लोकविश्वाचा मोठा भाग व्यापलेला असतो. वर नमूद केलेल्या म्हणी आज भारतीय समाजमनात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत, हे त्यांच्या दैनंदिन वापरात होणाऱ्या सातत्यपूर्ण उपयोगामुळे सिद्ध होत असतं. अगदी आपल्या समाजाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राजकारणावर गप्पा मारताना तर- ‘अरे, मान्य आहे त्यांनी अमुक केलं किंवा अमुक माध्यमांचा/ सत्तेचा चुकीचा वापर केला. पण यांना त्यावेळी कुणी अडवलं होतं का ते करायला?’ किंवा ‘त्यांच्याकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी केलं, यांच्याकडे आली तेव्हा हे करताहेत, तुम्ही का त्रास करून घेता?’ असे प्रश्न चर्चा शेवटाकडे झुकू लागली की ऐकू येऊ लागतात. असेच एक विधान म्हणजे ‘अरे.. ही पोझिशन मिळवायची असेल तर अमुक चुकीची कामं करावीच लागतात.. त्याशिवाय तिथवर जाता येतच नाही. त्या त्यांनी नव्हतं का ते केलं?’ ही सारी विधानं निर्देशित करतात- वरील म्हणी समाजात किती खोलवर रुजल्या आहेत ते. सामान्य मध्यमवर्गीय, निम्न-मध्यमवर्गीय लोकांत राजकारण करणे हा ‘आपल्यासारख्या’चा प्रांतच नव्हे, हा समज दृढमूल आहे तो बहुधा याचमुळे.

या साऱ्या म्हणी किंवा त्यातून व्यक्त होणाऱ्या धारणांच्या मागे त्या धारणांना अधिकाधिक सशक्त करणारं ‘बळ’ नावाचं तत्त्व केंद्रस्थानी आहे हे आपल्याला एव्हाना लक्षात आलं असेल. सामान्यत: ज्याला ‘बळ’ असे आपण रोजच्या व्यवहारात म्हणतो, त्याला समाजशास्त्रीय चर्चाविश्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘बळ’ (power) या तत्त्वाला नित्याच्या व्यवहारांत जितकं सहजपणे गृहीत धरलं जातं, तितकं सहजपणे गंभीर अकादमिक व्यवहारांत गृहीत धरून चालत नाही. खरं तर ‘बळ’ हे मानवी समाजव्यवस्थांच्या इतिहासातील बहुधा सर्वात महत्त्वाच्या दोन-तीन तत्त्वांपैकी एक तत्त्व. त्याचा प्रभाव जीवशास्त्रीय आणि अन्य अंगाने उत्क्रांतीवाद प्रतिपादित केला गेला तेव्हापासून आधुनिक अकादमिक चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहे. भारतीय चर्चाविश्वात व विशेषत: राजनीतीशास्त्रात ‘बळ’- power हे तत्त्व सत्ता किंवा राजव्यवस्था/ धर्मव्यवस्थेच्या अंगाने आचरले गेल्याचं आपल्याला दिसून येतं ते मोठा मासा छोटय़ा माशाला गिळतो, या मध्यवर्ती कल्पनेच्या अनुषंगाने. उत्तराधुनिक काळाच्या प्रारंभापूर्वीपर्यंत आधुनिक चर्चाविश्वातदेखील ‘बळ’ हे तत्त्व साधारणत: याच अंगाने चर्चिले गेल्याचे दिसून येते. ‘अराजकीय असे जगात काहीही नसते’ (Nothing is apolitical) हा विचार याआधी काही प्रमाणात पाश्चात्य चर्चाविश्वात अभिमत होऊ लागला असेलही; मात्र एखाद्या तत्त्वाचे किंवा शब्दार्थाचे बहुपदरी अर्थनिर्णयन करण्यास उद्युक्त करणाऱ्या सिद्धांत प्रणालींच्या सोस्यूर आणि नंतर अगदी अलीकडच्या काळातील सुप्रसिद्ध अभ्यासक जॅक्स देरीदा किंवा मायकेल फूको या अभ्यासक-तत्त्वज्ञांच्या मालिकेद्वारे उत्तराधुनिक जगात समाजशास्त्रीय तत्त्वांच्या वाढलेल्या व्याप्तीची चर्चा जोर धरू लागली. साधारणत: बळ किंवा स्र्६ी१ हे तत्त्व राजकीय सत्ताकेंद्र किंवा अन्य सांस्कृतिक-सामाजिक व्यवस्थांमधील प्रस्थापित घटकांकडून आचरिले जाते, किंवा या व्यवस्थांशी संबंध सांगणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या स्वतंत्र घटना-पर्व इत्यादींतून अभिव्यक्त होते अशी सर्वसाधारण धारणा समाजात आणि अकादमिक चर्चावर्तुळात होती. याचा प्रतिवाद करताना मायकेल फूको या तत्त्वज्ञाने ‘power is everywherel असा विचार मांडून त्यावर साक्षेपी मांडणी केली. बळ हे विशिष्ट यंत्रणांच्या हातातच केंद्रित नसून ते वेगवेगळ्या समाजस्तरांत वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होत असते असे फूको यांचे म्हणणे होते. बळ व (/ किंवा) ज्ञान या तत्त्वांसंबंधी मांडणी करताना मांडताना फूको यांनी प्रतिपादित केले की, समाजाने ज्ञान आणि शास्त्रशुद्ध सत्य अशी अधिमान्यता ज्या चौकटींना दिलेली असते त्या चौकटींतून बळ हे तत्त्व आचरिले जाते. ज्ञान किंवा शास्त्रशुद्ध सत्य असे ज्याला म्हटले जाते त्या चौकटी शिक्षणव्यवस्था, माध्यमे (media) आणि राजकीय आणि आर्थिक (बाजारपेठीय) चलनवलनाच्या गती व दिशांद्वारे प्रमाणित केल्या जातात. हे करत असताना बळ ही दरवेळी नकारात्मक, शोषक किंवा दुष्ट हेतूंनाच पुष्ट करते असे नाही, तर त्याचा वापर शाश्वत अशा सद्हेतूसाठीदेखील केला जाऊ शकतो हे फूको आवर्जून सांगतात.

भारतीय इतिहासाच्या संदर्भात बळाच्या वेगवेगळ्या अभिव्यक्तींकडे निर्देश करायचा झाल्यास ग्रांथिक परंपरा, गुरू-पुरोहित इत्यादी धार्मिक-आध्यात्मिक व्यवस्था, जातीय व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था या प्रमुख व्यवस्थांना आपल्याला विचारात घ्यावे लागते. ग्रंथप्रामाण्याचा विचार करताना आपसूकच आपल्यासमोर वेदांचे अपौरुषेयत्व, वेदप्रणीत ज्ञानव्यवस्था, बौद्ध धर्माचे त्रिपीटक, जैन आगमे, पुराणे, रामायण-महाभारत इत्यादी गोष्टी ढोबळमानाने समोर येतात. एखाद्या ग्रंथप्रणालीला विशिष्ट अधिकार-प्रामाण्य मान्य करून देण्यासाठी संबंधित विचारव्यूह- मिथकरचना, कर्मकांडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध व्यवस्था-संरचना ईश्वर/ प्रेषितप्रणीत असल्याचे समाजात रुजवणे हे यासंदर्भात प्राथमिक गृहितक! वेदांतील सूक्ते आणि पद्ये ही संकीर्ण रूपात तत्कालीन ‘वैदिक’ विश्वातील तोंडी नित्य गाण्यासाठी व कर्मकांडांसाठी वापरात असली त्यांचे वेगवेगळ्या संपादित संहितांमध्ये रूपांतर होऊन त्यांची संरचना अधिक साचेबद्ध करण्यात आली. ऋग्वेदाच्या २१ शाखा (संहिता/ एडिशन्स), सामवेदाच्या हजारो संहिता वगैरे तपशिलांमधून ही पद्ये स्वतंत्र ग्रंथ-मंडलांच्या रूपात विभागली गेली, किंवा व्यास ऋषींनी एकत्रित वेदराशींची चार भागांत विभागणी केली, या पारंपरिक समज-धारणा-तपशिलातून वेदग्रंथांविषयीच्या आजच्या धारणा ऐतिहासिक परंपराप्रणीत वास्तवांशीही विसंगत असल्याचे आपल्या लक्षात येईल. वास्तवात कुठलाही धर्मग्रंथ संबंधित ऋषी/ अवतार/ प्रेषित यांच्या निर्वाणानंतरच संपादित होत असतो आणि या संपादन प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रकारची भर घातली जाऊन तिला ईश्वर-संदेशाइतके किंवा साक्षात संबंधित प्रेषित-तत्त्वज्ञानाच्या मुखीचेच तंतोतंत शब्द असल्याचे ठसवून त्याला प्रामाण्य बहाल केले जाते, हे वेद, त्रिपीटक, आगमे, पुराणे, कुरआन, बायबलविषयीच्या इतिहासातूनही स्पष्ट दिसते.

दुसरी अशी व्यवस्था म्हणजे गुरू/ पुरोहित/ प्रेषित इत्यादी व्यवस्थांद्वारे प्रस्थापित केलेल्या बळ-आचरणाच्या प्रणाली. गुरू हा शब्द gravitas या लॅटिन शब्दाशी सजातीयता दाखवतो. या शब्दाचा अर्थ मोठा, वजनदार असा होतो. ऋषी, बुद्ध-बोधिसत्त्व, र्तीथकर यांचे प्रामाण्य किंवा उत्तरकाळातील साधू, तत्त्वज्ञ, संन्यासी, आचार्य इत्यादींच्या परंपरा या ‘गुरुत्वा’तूनच प्रामाण्य पावतात हे आपल्याला दिसून येतं. जातव्यवस्था हे आपल्या समाजातील आणखी एक आत्यंतिक कटू वास्तव. जातिव्यवस्थेला वेद-स्मृती ग्रंथांतून मिळालेलं प्रामाण्य हे ईश्वरप्रणीत प्रामाण्य आणि या ग्रंथ व ग्रंथाचार्याना मिळालेल्या प्रामाण्यातून अधिक बळ प्राप्त होत त्यातून वेगवेगळे अधिकार संबंधित उतरंडीतील वरच्या घटकांना मिळाल्याचे दिसून येते. यातून ग्रंथांचा (पर्यायाने शिक्षणाचा!) अधिकार, कर्मकांडांचा व उपासनेचा अधिकार इत्यादी अधिकारांपासून कुणासोबत जेवण करावे, विवाह करावा- इथपर्यंतचे अधिकार प्रमाणित केले गेले. हे सारे तपशील ढोबळमानाने आपणा सर्वाना माहीतच असतात.

आधुनिक काळात या साऱ्या घटकांना काही नवी परिमाणे मिळून, त्यांना संकल्पनांच्या राजकारणाची जोड देण्यात येऊन या तत्त्वांचे पुनरुज्जीवन केले जात असल्याचे सातत्याने दिसून येते. आपल्या लेखमालेतील यापूर्वीच्या लेखांत नमूद केल्यानुसार, वसाहतवाद आणि आधुनिकतेसोबत आपल्याकडे आलेल्या नव्या संकल्पनाव्यूहांनी, राष्ट्रवादासारख्या प्रणाली आणि त्यांच्या धर्म-भाषाधिष्ठित राष्ट्र-राज्यवादासारख्या उपांगांनी ‘बळ’ या तत्त्वाला आणि त्याच्या आचरणाला नवी परिमाणे आखून दिली. व्यवस्थांच्या एकसाचीकरणातून मूळ व्यवस्थांतील उच्च स्थानी असलेल्या भागधारकांना अर्थातच नव्या आधुनिक एकसाची व्यवस्थांमध्ये आपले स्थान राखणे आणि बळकट करणे फारसे मुश्कील गेले नाही. त्यासोबतच बदललेल्या बहुआयामी बाजारपेठी संरचनांमुळे समाजातील ऊध्र्वगामी स्थलांतर किंवा उन्नयनदेखील जातकेंद्री चौकटीतून वाढीला लागले. राष्ट्र-राज्य ही कल्पना युरोपातून ज्या उच्चभ्रू राजकीय-व्यापारी वर्गाच्या हितसंबंधांतून आकाराला आली, तशीच इथली राष्ट्र-राज्य व्यवस्थादेखील स्थानिक उच्च वर्गाच्या (उच्च वर्गात नव्याने प्रवेश करणाऱ्यांच्या) उत्कर्षांला अधिक पूरक ठरत गेली.

‘बळ’ हे मानवीच नव्हे, तर एकूणच सजीवसृष्टीतील एक महत्त्वाचे तत्त्व आहे. जगण्यासाठी, उपजीविकेसाठी सजीवांना बळाचा वापर अपरिहार्य असतोच. मात्र, शारीरिक- बौद्धिक- आर्थिक बळाचा वापर आपले स्वार्थी हितसंबंध आणि अतिरेकी आकांक्षांच्या पूर्तीसाठी करण्याविषयीचा विवेक हा नीतिशास्त्रातून येत असावा अशी अजूनही धारणा आहे. मात्र, मानवी समाजात असलेली विषमता, अन्याय, साधनसंपत्तीचे वितरण इत्यादीसंदर्भातील समस्या वेगवेगळ्या रूपात कायम पुढे येत राहतात. मानवी स्वभावातील स्पर्धा, ईष्र्या, मत्सर, लोभ, दमनशक्तीची आस ही उपजत मूल्यं मानवी समाज असेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने डोके वर काढतच राहतील. ही वास्तवे अपरिहार्यच असतात, हा समज झुगारून देत या मूल्यांचे आणि त्यातून दिसणाऱ्या सार्वत्रिक वर्तणुकीचे संतुलन करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या परीने समाजात होत असतात. मोठय़ा माशाने छोटय़ा माशाला खाऊन टाकणे ही नैसर्गिक वृत्ती आहे असे म्हणताना त्याला मर्यादांची आणि नैतिकतेची चौकट आखलेली असणे अत्यावश्यक असते, ही जाणीव यादृष्टीने महत्त्वाची ठरते. हीच जाणीव माणसाच्या मानवत्वाला वाढत्या बळासोबत वेगळी उंची आणि परिमाण मिळवून देऊ शकते.                   ६

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)