– स्वप्निल वसंत लता कापुरे

डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकिंग ही जीवशास्त्रातील ‘पिन प्रिक टेस्ट’सारख्या वाटणाऱ्या दिग्दर्शकाची गोष्ट. निर्मितीच्या प्रवासात अनेक चाचण्या एकाच वेळी माहितीपट बनविणाऱ्याला द्याव्या लागतात. त्यातून असंख्य टाचण्या टोचल्या जातात आणि काही तरी निर्माण करण्याची उमेद मिळत राहते. मजूर अड्ड्यांवर (म्हणजेच ‘ठिय्या’वर) ‘ठिय्या’ मांडून तयार झालेल्या डॉक्युमेण्ट्रीबद्दल…

Dr. Shantanu Abhyankar, rationalist, atheist, tribute, scientific approach, Wai, medical legacy, progressive thinker,
लोभस माणूस
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
rationality, atheism, atheist,
‘नास्तिक्या’ची परंपरा…
marathi sahitya sammelan delhi marathi news
दिल्लीत अडकलेले ‘मराठी’…
os nila ekant novel lokrang
अस्तित्वशून्य अवस्थेचा डोलारा
doctor, doctor work life, doctor security,
एक दिवस धकाधकीचा…
Documentary, future, struggle,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…

काही दिवसांपूर्वी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नेरळ येथील घरात झालेल्या चोरीच्या घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आपण नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी केली आहे हे समजल्यावर चोरी करणाऱ्या इसमाने चोरी केलेलं संपूर्ण सामान घरात पुन्हा नेऊन ठेवत माफीचं पत्र लिहून क्षमा मागितली.

‘सारस्वतांनो माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे’ लिहिणाऱ्या नारायण सुर्वे यांचा ज्याही वेळेस उल्लेख होतो; तेव्हा काही ठरावीक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर जिवंत होतात. गावाकडे शिवणकाम करणाऱ्या माझ्या वडिलांना नारायण सुर्वे लिखित ‘माझे विद्यापीठ’ हा कवितासंग्रह तोंडपाठ होता.

एखाद्दिवशी वडिलांची तंद्री लागली की शिलाई मशीनचं फिरणारं चाक आणि त्याच्या लयीत नारायण सुर्वे यांची कविता यांची जुगलबंदी सुरू व्हायची.

‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती,

दुकानांचे आडोसे होते; मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती…’ इथपासून ‘दर वळणावर आम्ही नवे मुक्काम करीत गेलो,

एकाच जागी स्थिरावणे आम्हांला जमलेच नाही…’ येथपर्यंत अनेक कविता माझे वडील कपडे शिवताना एकामागून एक घडाघडा बोलत राहायचे. दिवसभराच्या गजबजाटाने क्षीण झालेल्या बाजाराच्या शांततेत रात्री फक्त शिलाई मशीनचा आवाज आणि नारायण सुर्वेंची कविता ऐकू यायची. त्यांच्या कवितांचं गारुड माझ्यावरही कायम राहिलं. माझ्या ‘ठिय्या’ या मजूर अड्ड्यावरील पहिल्यावहिल्या डॉक्युमेण्ट्री फिल्मची सुरुवात ‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटकाबाहेर तर कधी फाटकाआत आहे…’ या नारायण सुर्वे यांच्या ओळींनी होऊन आणि शेवट ‘आता आलोच आहे जगात, वावरतो आहे या उघड्या-नागड्या वास्तवात जगायला हवे; आपलेसे करायला हवे; कधी दोन घेत; कधी दोन देत’ या विच्छिन्न करणाऱ्या ओळींनी झाला.

भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान, पुणे (एफटीआयआय) या संस्थेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून डॉक्युमेण्ट्री करणं आवश्यक होतं. सुरुवातीपासून काल्पनिक कथानक असलेल्या सिनेप्रकारात (फिक्शन फिल्म) जास्त रुची असल्याने डॉक्युमेण्ट्री करण्याचं दडपण आलं. हा प्रांत जड जाणार याची कल्पना होती. पण डॉक्युमेण्ट्री केल्याशिवाय पर्याय नव्हता. विषय शोधण्यासाठी चाचपडणं सुरू झालं. पण हाती काही ठोस लागत नव्हतं.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…

पुण्यात राहून आयुष्यभर विजेचा वापर न करणाऱ्या वनस्पतिशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी डॉ. हेमा साने यांच्या दिनचर्येत डॉक्युमेण्ट्रीच्या काही चांगल्या शक्यता शोधता येतील या उद्देशाने काम सुरू केलं. पण डॉ. हेमा साने यांच्या प्रकृतीच्या कारणानं ते थांबलं. मग पुन:श्च हरिओम.

पुणे विद्यापीठात संज्ञापन विद्या विभागात शिकत असताना सुरुवातीच्या काळात चिंचवड-पुणे विद्यापीठ-चिंचवड बसने प्रवास व्हायचा. बायामाणसांनी गजबजून गेलेला डांगे चौकातला मजूर अड्डा दररोज सकाळी बसमधून दिसायचा. विद्यापीठाचा थांबा येईपर्यंत ती जत्रा मनात घोळत राही. गावाकडे गावहोळी चौकात भरणारा ठिय्या आठवायचा. संध्याकाळच्या परतीच्या प्रवासात चौक मात्र सुना सुना; पण सकाळच्या काही खाणाखुणा शिल्लक. फ. मुं. शिंदे यांच्या कवितेतल्या ओळी आठवायच्या- ‘जत्रा पांगते पालं उठतात… पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात…’ रोज सकाळी डबा बांधून कामाच्या शोधात ठिय्या गाठायचा. चातकासारखी काम मिळण्याची वाट पाहायची. नशिबाने साथ दिली आणि काम मिळालं तर कामावर जायचं. नाही मिळालं तर घरी परतायचं- पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने ठिय्यावर. एवढी अनिश्चितता, पण तरीही रोज न चुकता ठिय्या गाठणं अंगवळणी पडलेलं. स्वत:च्या गावशिवाराशी नाळ तोडून पोटापाण्याच्या शोधात स्थलांतरित झालेली कोण कुठली ही माणसं. हे महानगर आपल्याला सहकुटुंब आपलंसं करेल या भाबड्या आशेनं रोज ठिय्या गाठणारी माणसं मला अस्वस्थ करायची. ‘कामाच्या शोधात असलेल्या बायामाणसांचे भिरभिरणारे डोळे’ हे दृश्य सतत माझ्या मनात रुंजी घालायचं. मग एक दिवस न राहवून मी दुष्काळी भागातून स्थलांतरित होऊन मोठ्या आशेने ठिय्या गाठलेल्या एका तरुणाची काल्पनिक कथा लिहायला घेतली.

इकडे वेळ पुढे सरकत होता, पण डॉक्युमेण्ट्री करण्यासाठी विषय हाती लागत नव्हता. विषय सादर करायची तारीख जवळ येत होती. वेळ मारून नेण्यासाठी ठिय्या (मजूर अड्डा) हा विषय असल्याचं मी सांगून टाकलं. त्याच दरम्यान जास्मिन कौर आणि अविनाश रॉय यांचे डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकिंगसंदर्भात असलेलं वर्कशॉप महत्त्वाचं ठरलं. त्यामध्ये या विषयावर सखोल चर्चा झाली. त्यांना या विषयाचं महत्त्व लक्षात आलं. डॉक्युमेण्ट्रीच्या माध्यमातून अनेक गोष्टी चित्रचौकटीत बंदिस्त करता येऊ शकतील याची खात्री मला पटू लागली. डॉ. मिलिंद दामले आणि जे. व्ही. एल. नारायण या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात अनेक शक्यतांचा मी विचार केला. मग डॉक्युमेण्ट्रीसाठी हिरवा कंदील मिळाला.

मजूर अड्ड्याविषयी माझ्या डोक्यात असलेलं काल्पनिक कथानक बाजूला ठेवून त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं होतं. म्हणून तिथल्या भोवतालाचं, माणसांचं आणि घटनांचं केवळ वस्तुनिष्ठ वर्णन न करता डॉक्युमेण्ट्रीसाठी काही ठोस कथानक सापडेल या दृष्टीने मी संशोधन सुरू केलं. फक्त लांबून मजूर अड्ड्याकडे न पाहता त्याच्या आत शिरणं गरजेचं होतं. डांगे चौक, काळेवाडी फाटा, हडपसर गाडीतळ, वनाज कॉर्नर येथे भरणाऱ्या ठिय्याला भेटी द्यायला मी सुरुवात केली. तिथल्या माणसांशी संवाद साधला. मला पत्रकार समजून माझ्यासमोर त्यांनी त्यांचे फक्त प्रश्न मांडायला सुरुवात केली. मी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून सरकारला जागं करेन अशी अपेक्षा त्यातून स्पष्टच दिसत होती. पण त्यांचे प्रश्न कॅमेऱ्यात कैद करत त्यांना रडायला लावणं आणि त्यातून प्रेक्षकांची केवळ सहानभूती मिळवणं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. आपणच आपल्या विषयाबद्दल भावनिकदृष्ट्या बेजबाबदार न होता त्या माणसांच्या भावना आणि अनुभवांची परिपूर्णता व्यक्त करण्यास सक्षम झालं पाहिजे याविषयी मी ठाम होतो. मी माझी कार्यशैली बदलण्याचं ठरवलं.

आपण पत्रकार किंवा तत्सम वाटणार नाही, किंबहुना आपण त्यांना त्यांच्यातलेच जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत आपल्याशी त्यांचे हितगुज होणार नाही. म्हणून मी रोज सकाळी उठून साधे कपडे अंगावर चढवून त्या जत्रेचा भाग होऊ लागलो. कॅमेरा असला की आपसूक गर्दी होते आणि काहीच हाताशी येत नाही, हा अनुभव असल्याने मी कॅमेरा टाळला. उघड्या डोळ्यांनी कॅमेराचे काम करत तिथं घडणाऱ्या सबंध गोष्टीचा चौफेर मागोवा घेत राहिलो. जत्रा पांगली की मीही होस्टेलची वाट पकडायचो. मनामेंदूत छापलेल्या गोष्टीची टिपणं काढायचो.

बसच्या खिडकीतून दिसणाऱ्या ठिय्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीतला ठिय्या बराच अस्वस्थ करणारा होता. त्यातील अनेक बरेवाईट पदर मला दिसू लागले होते. पण त्यात स्पष्टता नव्हती. त्याची चिकित्साही मी करतच होतो. या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेत आपली नैतिक कलात्मकता विशेष भूमिका बजावत असते. एका पातळीनंतर तो फक्त फिल्मचा विषय न राहता आपण त्या विषयाला योग्य तो न्याय देत त्याचे सन्मानजनक प्रतिनिधित्व करतो आहोत का, हा प्रश्न ऐरणीवर येतो. म्हणूनच निर्मितीच्या या व्यापक अन्वेषणात सत्याची बांधिलकी सांभाळत वादग्रस्त मुद्द्यांची संवेदनशील हाताळणीही आमच्या चमूला करायची होती.

विषय विस्तृत असल्याने डॉक्युमेण्ट्रीला पुढे नेण्यासाठी पात्रं गरजेची होती. त्यासाठी संपूर्ण व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारी माणसं हवी होती. माणसांशी संवाद तर व्हायला लागला, पण शूटिंगची कल्पना दिल्यावर ही मंडळी माघार घेत होती. फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करून घ्यायचा आणि रामराम करायचा हेही मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले. शूटिंगच्या दरम्यान त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची शाश्वती त्यांना दिली. हळूहळू त्या सर्वांशी एक नातं निर्माण झालं. ते सगळे स्वखुशीने या प्रोजेक्टचा भाग झाले. अखेर रोजच्या जत्राभेटीत हवी ती माणसं मला गवसली. तशी प्रत्येकाच्या आयुष्याची एक गोष्ट असतेच. थोडी सारखी, थोडी वेगळी. पण कामाच्या शोधात वेगवेगळ्या गावकुसातून विस्थापित झालेली महानंदा (गुलबर्गा), दत्ता आदमाने (लातूर), सुनंदा कटकगोंड (वाघजरी), कस्तुराबाई कडमोशे (उस्मानाबाद) यांच्या कहाण्या मला प्रातिनिधिक स्वरूपात महत्त्वाच्या वाटल्या. रोज भरणाऱ्या ठिय्यावर फळकूट टाकून दाढी-कटिंगचं काम करणाऱ्या भारत राऊत (सोलापूर) यांची अत्यंत त्रयस्थ असणारी भूमिका मला फिल्मसाठी गरजेची वाटत होती. फक्त मजुरांचीच बाजू न मांडता नाण्याच्या दुसऱ्या बाजूचं वास्तव थेट सांगणारे महादेव शिंदे (कंत्राटदार, पुणे) याचा दृष्टिकोनही गरजेचा होताच. सीसॉमध्ये बोर्डाच्या मध्यभागी एक मुख्य बिंदू असतो त्याला ‘पिव्होट पॉइंट’ म्हणतात. दिग्दर्शक म्हणून मी पिव्होट पॉइंटवर स्वत:ला बसवलं.

माझ्याबरोबरीनेच माझ्या संपूर्ण टीमचा पात्रांसोबत गाढ परिचय झाला. त्यामुळे शूटिंगसाठी अपेक्षित असलेली आश्वासक परिस्थिती निर्माण झाली होती. मुलाखती इन्वेस्टिगेशन न होता तो एक संवाद झाला पाहिजे याची जाणीवपूर्वक काळजी घेणं गरजेचं होतं. शूटिंग, कॅमेरा, साऊंड, लायटिंग याचं त्यांना दडपण येणार नाही याची माझ्या संपूर्ण टीमने काळजी घेतली. किमान संसाधनांचा वापर करत आम्ही शूटिंग केलं. संवादाच्या प्रवाहात मंडळी आपसूकच अत्यंत मोकळेपणाने बोलली. कुठल्याही बोजड शब्दांचा सहारा न घेता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही निमित्तमात्र उरलो. भावनिक पातळीवर गुंतवून ठेवण्याची आणि विचारांना चिथावणी देण्याची ताकद असणारा ऐवज आमच्या हाती लागला होता.

जागा आणि वातावरणाची जाणीव निर्माण करणं सौंदर्यशास्त्राच्या अंगाने महत्त्वाची भूमिका बजावतं. मजूर अड्डा हेच एक पात्र होतं. त्यामुळे जे काही नैसर्गिकपणे घडतं ते स्थितप्रज्ञपणे कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ‘फ्रेमिंग रिअ‍ॅलिटी’ हा आमचा अट्टहास होता. चैतन्य पुराणिक या माझ्या छायाचित्रकार मित्राने अत्यंत प्रभावी चित्रण केलं.

दृश्यांची मांडणी कशी केली जाते, किती कल्पकतेने विषय कसा मांडला जातो आणि प्रभावी वातावरणनिर्मिती कशी केली जाते याचा प्रेक्षकांच्या आकलनावर लक्षणीय परिणाम होत असतो. श्रुती सुकुमारन या आमच्या संकलक मैत्रिणीने कथानकाचा विपर्यास होणार नाही याची काळजी घेत संकलनाच्या पातळीवर बरेच प्रयोग केले. रिदमिक कटिंग, पेसिंगचा वापर करत विषयात गुंतवून ठेवण्याचं काम मोठ्या कुशलतेने केले. प्राध्यापिका सुचित्रा साठे यांच्या मदतीने वास्तवाला सिनेमॅटिक अनुभवात साकारण्याचं काम संकलनाद्वारे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. चित्रचौकटीतील दृक्श्राव्य कलात्मकतेला अजून प्रभावी करण्याचं काम अमोसना ठोकचोम या आमच्या मित्राने ध्वनी आरेखनाच्या माध्यमातून केलं.

वस्तुस्थिती आणि कथन यांचा ताळमेळ साधत बेरोजगारी, विस्थापन, ठिय्या व तिथलं वास्तव, मजूर- कंत्राटदार व्यवहार, लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, व्यसनाधीनता, मजुरांचे वैयक्तिक आयुष्य अशा अनेक मुद्द्यांना आम्ही डॉक्युमेण्ट्रीच्या माध्यमातून स्पर्श करू शकलो. सत्याची कास पकडून दिग्दर्शकाच्या चष्म्यातून वास्तव पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न मी व माझ्या सहकाऱ्यांनी केला. अत्यंत नेमक्या शब्दांत मजुरांची गाथा शब्दांत मांडणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या ओळी सुरुवात आणि शेवटाकडे वापरण्याचा गुन्हा करताना मला भीती वाटली नाही ती त्यामुळेच.

माझ्या मनातील कोलाहल ‘ठिय्या’ या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून मी मांडू शकलो आणि जगभरातील प्रेक्षकांनी त्याला आपलंसं केलं यासाठी मी एफटीआयआय आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या संपूर्ण टीमचा कायम ऋणी आहे.

हेही वाचा – दिल्लीत अडकलेले ‘मराठी’…

वास्तविक जीवनातील घटना, अकथित कथा, सामाजिक प्रश्न, उपेक्षित आवाजांवर नॉन फिक्शन स्टोरीटेलिंग लेन्सद्वारे मांडण्याचं एक सशक्त माध्यम आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक समस्यांवर प्रकाश टाकत आपल्या भोवतालाबद्दलची समज वाढविण्यात डॉक्युमेण्ट्री फिल्म्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. बदलत्या तंत्रज्ञान, प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि सामाजिक समस्यांशी जुळवून घेत काळानुरूप माहितीपटाची शैली ज्या प्रकारे विकसित झाली आहे, त्यावरून ती अधिक प्रचलित आणि गतिमान झालेली दिसून येते. पण तरीदेखील मनोरंजनासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या व्यासपीठांच्या गर्दीत अजूनही डॉक्युमेण्ट्री फिल्म्सचा श्वास कोंडलेला आहे.

माणूस जिवंत आहे की मृत? त्याच्या संवेदना जाग्या आहेत की मृत? याचा निष्कर्ष लावण्यासाठी जीवशास्त्रातील ‘पिन प्रिक टेस्ट’चा वापर केला जातो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचसंवेदना मनुष्यप्राण्याच्या जिवंत असण्याची मूलभूत लक्षणं आहेत. पण खरोखरच या क्षमता कितपत कार्यक्षम आहेत हा मात्र कळीचा मुद्दा असतो. डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकिंग ही मला ‘पिन प्रिक टेस्ट’ वाटतात. निर्मितीच्या या संपूर्ण प्रवासात अशा अनेक टेस्ट्स एकाच वेळी घेतल्या जातात. असंख्य टाचण्या आपल्याला टोचल्या जातात आणि त्यातून काही तरी निर्माण करण्याची उमेद ती व्यवस्थाच आपल्याला देते असं माझं मत आहे.

sk.24frames@gmail.com