अवलिये साहित्यकार दिवंगत चंद्रकांत खोत यांचे बहुढंगी साहित्य व व्यक्तित्वाचा वेध घेणारा लेख..
चंद्रकांत खोत यांचा हात जरी हल्लीहल्लीपर्यंत लिहिता असला तरी लेखक म्हणून त्यांचं अस्तित्व गेली अनेक वष्रे गुडूप झालेलं होतं. मात्र, मराठी साहित्याच्या साठोत्तरी कालखंडाविषयी ज्यांना आत्मीयता आहे, त्या सर्वानाच त्यांच्या अस्तित्वाविषयी सदोदित उत्कंठा होती. उत्तर ‘विशेष काही नसावं’ असं येणार हे ठाऊक असलं तरीही ‘हल्ली खोतांचं काय चाललंय?’ हा प्रश्न वाङ्मयीन वातावरणात अधेमधे ऐकू यायचा. याचं कारण हे की १९६० च्या आसपास समाजातील नव्याने लिहू लागलेल्या विविध स्तरांमधून कवितांचं जे भरभरून पीक येऊ लागलं, त्याच्या अवाढव्य आकारमानामुळे तसंच अभिरुचीमध्ये -देखील तफावत असल्याने ‘सत्यकथे’च्या प्रतिष्ठित, लक्षवेधक, परंतु टिचभर अंगणात आपल्या कवितांना स्थान मिळणं शक्यच नाही, या जाणिवेतून मराठीमध्ये लघुपत्रिकांतून जे जे कवी लिहू लागले, त्यामध्ये चंद्रकांत खोत हे तेव्हा आघाडीवरचं नाव होतं. ते साठोत्तरीच्या पहिल्या धारेतील एक लक्षणीय कवी होते.
खोत यांचा चौरस आकाराचा ‘मíतक’ हा पहिलाच काव्यसंग्रह. त्याचं नाव, ते ब्लर्ब अशा अनेक कारणांमुळे तेव्हा तो भलताच गाजला होता. त्यातील कवितांची जातकुळी तर वेगळी होतीच, परंतु ‘कवी तो होता कसा आननी?’ अशी जी वाचकांना उत्कंठा असते ती विचारात घेता, ग्रेस ह्यांच्यासारखा एखाद् दुसरा अपवाद वगळता खोत यांच्याएवढा रंगीबेरंगी कवी मराठीत क्वचितच झाला असेल. खोत यांना ज्या कुणी पाहिलं आहे त्यांना ते पांढऱ्या रंगात आठवणंच शक्य नाही. आणि लघुअनियतकालिकं ऐन भरात असण्याच्या त्या काळात ‘मíतक’मुळे साहित्यप्रेमींच्या कौतुकाचा व कुतूहलाचा विषय झालेले खोत तेव्हा तर लाल, पिवळा, निळा, हिरवा अशा भडक रंगांचे कपडे घालत. त्यांच्या डोक्यावर तुऱ्यासारखी एक उंच कॅप असे. डोळ्यांत सुरमा उठून दिसे. आणि त्यांचा रंग मुळातच इतका गोरा गुलाबट होता, की त्यांनी काही रंगोटी केली आहे की काय, असा संशय पाहणाऱ्याला यावा. त्यातही आपली कांती अशी तुकतुकीत, लुसलुशीत राहण्यासाठी खोत झोपताना गालांवर सायीचा लेप लावतात- म्हणजे हल्लीच्या भाषेत फेशियल करतात- अशा आख्यायिका तेव्हा कविताप्रेमींमध्ये चवीने चघळल्या जात. खोत हे मराठी साहित्यातील ‘आख्यायिका’ ठरण्याचे पाळण्यातील पाय ‘मíतक’ या त्यांच्या पहिल्या संग्रहाच्या ब्लर्बवरच उमटलेले होते. आणि खोतांच्या वाटय़ाला आलेलं जगणं असं होतं की, आख्यायिका होण्याचा तरुणपणी घेतलेला वसा अगदी मरेपर्यंत त्यांना सोडून गेला नाही.
खोत आयुष्यभर राहिले ते सात रस्ता येथील मॉडर्न मिल कंपाऊंड या गिरणी कामगारांच्या वस्तीत. जेथे काही काळ हाकेच्या अंतरावर अमर शेख यांच्या घरात नामदेव ढसाळ आणि मल्लिका अमर शेख यांचादेखील संसार होता. खोतांचे जन्मदाते हे निरक्षर असल्याने त्यांच्याकडे लेखनाचा तर सोडूनच द्या, पण वाचनाचा वारसादेखील पिढीजात नव्हता. त्यांची पाटी तशी कोरी होती. पण त्यांचं रूपडं जे होतं ते आसपासच्या मुलांमध्ये नक्कीच चिमखडं असावं; ज्यातून त्यांना आपलं वेगळंपण जाणवलं असावं. काहींच्या म्हणण्याप्रमाणे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जात असत, जिथे त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली. तर ते जे काही नमित्तिक कारण असेल ते असो, पण खोत यांची अभिव्यक्ती एकुणातच ‘हटके’ स्वरूपाची होती. जिची प्रचीती ‘मíतक’पाठोपाठ आलेल्या ‘उभयान्वयी अव्यय’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीतून आली.
त्याअगोदर मामा वरेरकरांच्या ‘धावता धोटा’सारख्या एखाद् दुसऱ्या कादंबरीतून कापड गिरणीतील वातावरण भले जरी आलं असलं, तरी खोतांच्या या पहिल्याच कादंबरीमध्ये त्यातील बकालपणा, कुचंबणेमुळे होणारे अभावित, परंतु करुण विनोद हे जास्त ठळकपणे आले होते- ज्यात लंगिक उल्लेख, शिवीगाळ, तथाकथित अपशब्द येणं हे अपरिहार्यच होतं. त्यामुळे खोतांच्या नावावर लंगिक लिखाणाचा बट्टा नाहक लागला. एका अर्थी पाहिलं तर ते रोखठोक लिखाण होतं. यादृष्टीने विचार करता जयंत पवार, जी. के. ऐनापुरे यांनी मराठी साहित्यात गिरणगाव आणून जे महत्त्वाचं ऐतिहासिक काम केलं आहे, त्यांचे पूर्वसुरी म्हणून खोत यांचं नाव घेणं सयुक्तिक दिसेल. त्यांच्या नंतरच्या कादंबऱ्यांमध्येदेखील गिरणगाव येतच राहिलं. पण तेव्हाचं वातावरण तशा प्रकारच्या साहित्याला पुरेशा गंभीरपणे घेणारं नव्हतं आणि खोतांची शैलीदेखील काहीशी वरवरची होती. तो कदाचित त्यांच्यातील ‘मालवणी’ दृष्टीचा परिणाम असावा. साहजिकच त्यामध्ये वातावरणातील ताणेबाणे, आंतरप्रवाह, दाहकता खोलवर टिपण्याची तीक्ष्णता नव्हती. या कादंबऱ्यांनंतर मला आठवतं त्यानुसार ‘अपभ्रंश’ हा त्यांचा आणखी एक कवितासंग्रह आला, ज्याची तितकीशी दखल घेतली गेली नाही.
खोत हे लघुनियतकालिकांच्या चळवळीशी निगडित जरी असले, तरी तसे एकांडेच होते. ‘कळप’ करून राहणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. त्यामुळे ते हळूहळू बारगळत गेले. मला आठवतं त्यानुसार तेव्हा कवी म्हणून प्रतिमा असलेल्या कुणीही कादंबरी तर सोडूनच द्या, गद्यामध्येदेखील फारशी लेखणी चालवली नव्हती; जे खोतांनी केलं होतं. त्यामुळेदेखील ते वायले ठरले असावेत. नंतर खोतांना झटका आला तो स्वत:चं लघुअनियतकालिक काढायचा. आणि त्यांनी वर्षांकाठी ‘अ ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’ नावाचे पाच अंक काढण्याची भूमका उठवली. पण हे अंक बहुधा कधीच अवतरले नाहीत. दरम्यान लघुअनियतकालिकांची चळवळ हळूहळू ओसरली आणि खोतांनीदेखील वैयक्तिक कारणास्तव ‘बीपीटी’मधील आपली नोकरी सोडली. त्यांनी मग लघुनियतकालिकाचे पाच अंक काढण्याऐवजी त्यांचे विलिनीकरण करून ‘अबकडइ’ हा दिवाळी अंक सुरू केला. त्यासाठी ते वर्षभर उस्तवारी करू लागले. अंकाचा उत्तम दर्जा आणि खोतांची वाचकप्रियता यामुळे हा अंक सुरुवातीपासूनच गाजला. ‘अभिरुची’ हे जसं आद्य ‘अनियतकालिक’ म्हणता येऊ शकेल तसाच ‘अबकडइ’ हा लघुनियतकालिकांचा ‘पहिला व्यावसायिक दिवाळी अंक’ म्हणता येईल. खोतांच्या अविवाहित आणि निव्र्यसनी जीवनात त्यांना या अंकातून पोटापाण्यापुरती कमाई होऊ लागली. खोतांनी हे संपादकत्व तब्बल २१ वष्रे इमानेइतबारे मनोभावे पार पाडलं.
अशा या गुणी आणि देखण्या अविवाहित लेखकाच्या आयुष्यात चाळिशीच्या आसपासच्या वयात पद्मा चव्हाण ही ‘मादक सौंदर्याचा अॅटमबॉम्ब’ म्हणून नावारूपाला आलेली नटी आली आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांचं बिनसणं हे कोर्टकचेऱ्यांपर्यंत गेलं आणि काही वर्षांनंतर पद्माबाईंचं अपघाती निधन झालं. या काळात खोत ‘अबकडइ’ काढत राहिले. त्यांनी चित्रपटांसाठी गाणीदेखील लिहिली. पण त्यांचं लिखाण जवळपास संपून गेलं. त्यानंतर खोत पुन्हा लिहू लागले ते थेट ‘िबब प्रतििबब’सारख्या आध्यात्मिक विषयावरच्या कादंबऱ्या. ज्यांची दखल त्यांचे पूर्वापार वाचक घेणं शक्य नव्हतं. नंतर खोत थेट अध्यात्माकडेच वळले. त्यांचे एक कुणीतरी आध्यात्मिक गुरूदेखील होते. खोतांनी नंतरच्या काळात अनेक कादंबऱ्या लिहिल्या. पण त्यांच्याकडे त्यांचे पूर्वीचे वाचक वळले नाहीत. आध्यात्मिक वाचन करणाऱ्या वाचकांनीदेखील त्यांची फारशी दखल घेतली नसावी. अन्यथा शेवटची दहा वष्रे जवळपास निराश्रिताचं जीवन जगायची वेळ त्यांच्यावर आली नसती.
खोतांची आणि माझी जानपहचान ही काहीशी चमत्कारिक होती. म्हणजे असं की, मी जेव्हा नुकताच साहित्यामध्ये रमू लागलो होतो, तेव्हा समर्थनगर, मजासवाडी येथील आमच्या बठय़ा चाळीतील अरुणकाका जोशी हे शेजारी चंद्रकांत खोतांचे ऑफिसातील सहकारी होते. ते त्यांच्या सुरस कथा अत्यंत कौतुकाने सांगत. त्यामुळेच ‘मíतक’ मी अधिकच जिव्हाळ्याने वाचलं. त्यानंतर आलेल्या ‘उभयान्वयी अव्यय’ या कादंबरीचे फॉर्मदेखील मला नित्यनेमाने वाचायला मिळू लागले ते असेच योगायोगाने. म्हणजे असं, की ती कादंबरी जिथे छापली जात होती त्या प्रेसमध्ये कामाला असलेल्या मधुभाऊ (जो स्वत:चं नाव मंदुभाऊ असं उच्चारायचा; जे मला खूपच आवडायचं.) या एका अर्धशिक्षित मित्रामुळे- जोदेखील माझा चाळकरी होता. त्याने मुळात ते फॉर्म वाचायला आणले ते ‘माशी गुळावर बसते आणि गुवावरही बसते’ किंवा ‘आमच्या घरी कधी कधी एवढी गर्दी होते ना की मग आमचे बाबा आमच्या आईवरच झोपतात’ अशी अत्रंगी वाक्यं वाचून. या फॉर्मचं आम्ही मुलं तेव्हा सामूहिक वाचन करत असू. कारण त्याआधी आम्ही असं काही वाचलंच नव्हतं.
खोत माझ्या हाती साहित्यविषयक आवडीतून लागला नव्हता, तर शेजारधर्मातून अवतरला होता. त्यांच्याबरोबर माझी यथास्थित उठबस जरी नव्हती तरी प्रसंगपरत्वे गाठीभेटी होतच राहिल्या.
अगदी अलीकडची भेट आठवते ती सुमारे दोन वर्षांपूर्वी मौलाना आझाद रोडवरच्या एका मुसलमानी हॉटेलच्या पायरीवर झालेली. आम्ही त्या गप्पांमध्ये दोन वेळा चहा प्यायलो. पण त्यांनी मला खिशाला हात लावू दिला नाही. त्यांच्या मनात लिखाणाचे अनेक संकल्प होते, ते त्यांनी अत्यंत उत्साहाने बोलून दाखवले- ज्यातील एक आत्मचरित्र लिहिण्याचा होता. तेदेखील आटोपशीर नव्हे, तर ५०० पानी २१ खंड असं विक्रमी! ज्याचं नावदेखील त्यांनी मला ‘करून करून भागलो, देवपूजेला लागलो’ असं लांबलचक असणार असल्याचं सांगितलं होतं. शिवाय त्यांच्या डोक्यात आणखी एक महाकाव्य होतंच. आणि त्यासाठी आपण १०० वष्रे जगू, अशी उमेद वयाच्या ७३ व्या वर्षीदेखील त्यांच्या ठायी होती. मागच्या आठवडय़ातच कळलं, की ते आपला शब्द काही पाळू शकले नाहीत. परंतु तरी काय झालं? ‘एक साठोत्तरी रंगीबेरंगी आख्यायिका’ स्वरूपात खोत त्यांची शंभरी होईपर्यंत मराठी वाचकमानसात अस्तित्वात राहतील अशी सोय त्यांनी सुमारे ३५ पुस्तकं लिहून नक्कीच करून ठेवली आहे.