प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

राजकीय व्यंगचित्रकाराच्या दृष्टीने जेवढी राजकीय परिस्थिती अस्थिर, तेवढय़ा त्याला कल्पना सुचण्याचं प्रमाण जास्त असतं! म्हणजे कमकुवत, विक्षिप्त, हेकेखोर किंवा भ्रष्टाचारी  नेतृत्व, पक्षातील भांडणं, हेवेदावे, स्पर्धा, स्वत:च्याच सरकारवर जाहीर टीका, खासगीत निंदानालस्ती यातून हे सरकार अस्थिर आहे हे हळूहळू स्पष्ट होत असतं. आणि राजकीय व्यंगचित्र काढण्यासाठी ही एक नांगरून ठेवलेली सुपीक जमीन ठरत असते- ज्यातून व्यंगचित्रकार दैनंदिन व्यंगचित्रांचं भरपूर पीक काढू शकतो.

“बंडखोरी नव्हे हा तर उठाव,” ब्रिजभूषण पाझारे २४ तासांनंतर अवतरले अन्…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
loksatta readers feedback
लोकमानस: विकासापेक्षा भावनांचे राजकारण सोपे
Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
eknath shinde MLA
Riots During Elections : “निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव”, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा!

आणीबाणीनंतरच्या जनता पक्षाच्या सरकारचा कालखंड हा यादृष्टीने अत्यंत आदर्श (!) म्हणता येईल. जगजीवनराम, जॉर्ज फर्नाडिस, चरण सिंह, वाजपेयी, राजनारायण, मधु लिमये, बहुगुणा, अडवाणी, चंद्रशेखर इत्यादी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे, वेगवेगळ्या संस्कारांचे, विचारधारेचे, वयोगटाचे नेते आणि या साऱ्यांचं नेतृत्व होतं मोरारजी देसाई यांच्याकडे! साहजिकच जनता पक्षाचं सरकार आलं आणि ते आपोआपच गेलं, हे नैसर्गिकच म्हणावं लागेल.

अपेक्षाभंगाच्या या कालखंडात देशातले अनेक दिग्गज राजकीय व्यंगचित्रकार मोठय़ा आवेशात रोज एकापाठोपाठ एक घणाघाती टीका करणारी हास्यस्फोटक व्यंगचित्रं वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठय़ा आकारात काढत होते. जनता पक्षातल्या आपापसातल्या लाथाळ्या, भांडणे, कुरबुरी यांनी वर्तमानपत्राचं पहिलं पान आणि संपादकीय पान भरून जायचं. सामान्य मतदाराने प्रथमच लावलेलं ते बिगरकाँग्रेसी सरकारचं रोपटं काही केल्या जीव धरत नव्हतं. अपेक्षाभंग, संताप, निराशा, उद्विग्नता यामुळे मतदार  हताश झाला होता. अशा वेळी त्याच्यासमोर ही राजकीय व्यंगचित्रं यायची आणि तो कटू सत्य कळल्याप्रमाणे विषादाने हसायचा!

अबू अब्राहम हे त्या काळातील राजकीय व्यंगचित्रकारांमधलं एक मोठं नाव. आपलं मत निर्भीडपणे रेखाटणारा भाष्यकार! जनता पक्षाच्या या दीड- दोन वर्षांच्या कालखंडावरील त्यांचे ‘अरायव्हल अ‍ॅण्ड डिपार्चर’ या नावाचं पुस्तक आहे. (विकास पब्लिशिंग हाऊस) म्हणजे जनता पक्षवाले आले आणि गेलेसुद्धा! छोटी-मोठी अशी शंभर-सव्वाशे कार्टून्स त्यात आहेत. काही लेखही आहेत. मूळचे केरळचे असलेले अबू हे सुरुवातीला लंडनमध्ये राजकीय व्यंगचित्रं काढत होते. तिथे त्यांचं चांगलं नाव होतं. भारतीय वाचकांच्या सुदैवाने ते भारतात आले आणि त्यांच्या शैलीचा आपल्याला परिचय झाला.

अबू यांची शैली एकदम अनोखी आहे. साधी वाटणारी रेखाटने ते करतात. ब्रश न वापरता किंचित जाड पेनाने चित्रं काढतात. चित्रांत फारसे तपशील भरत नाहीत. मजकूरसुद्धा रनिंग लिपीत हाताने लिहितात. हे सगळं म्हणजे आपल्या इकडच्या लोकप्रिय व्यंगचित्रकारांच्या शैलीपेक्षा एकदम वेगळं आणि विपरीत! पण अबू यांची खरी ताकद होती ती त्यांच्या कॉमेंटमध्ये. त्यांच्याइतकं मर्मभेदी, जहाल, हास्यस्फोटक आणि परखड भाष्य क्वचितच कुणी इतक्या सातत्याने केलं असेल. ‘प्रायव्हेट वू’ हे त्यांच्या पॉकेट कार्टूनचं सदर. त्यातसुद्धा दोनच पात्रं. एक जाडा, बुटका, तर दुसरा उंच, किडकिडीत. दोघेही चश्मा, जाकीट, टोपी घालायचे. एक जण धोतर, दुसरा पॅन्ट घालायचा. चेहऱ्यावर भाव जवळपास नाहीतच. एक प्रकारचा निर्विकारपणा! पण सगळी ताकद कॉमेंटमध्ये असायची. त्याचे काही नमुने बघणं अत्यावश्यकच आहे. ही सर्व व्यंगचित्रं १९७७ ते ८० यादरम्यानची आहेत. त्यामुळे या भाष्यांना त्या काळाचा संदर्भ आहे.

एका चित्रात ‘विरोधी पक्ष बळकट पाहिजे’ असं म्हणणाऱ्याला ‘त्यासाठी आधी सत्तारूढ पक्ष बळकट हवा’ असं उत्तर दुसरा देतोय!

जनता पक्षातल्या भांडणांवरचं त्यांचं पॉकेट कार्टून अप्रतिम आहे. जनता पक्षात ऐक्य राहावं म्हणून सुरू असलेल्या चर्चेचे पाच वेगवेगळे वृत्तांत उद्या कळतील, अशी खास  टिप्पणी त्यांच्या चित्रातील एकजण करतोय.

सरकार १५,००० टन रबर आयात करणार अशी बातमी आहे. त्यावरची त्यांची टिप्पणी आहे- ‘अर्थव्यवस्था बाऊन्स व्हावी म्हणून ते काहीही करतील.’

पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा दृष्टिकोन हा सर्वसाधारणपणे आधुनिक तंत्रज्ञानाविषयी संशय व्यक्त करणारा होता. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांविषयी ते फार आग्रही नव्हते. इतकंच नव्हे तर उदासीनच होते. त्यावरच्या टिप्पणीमध्ये अबू यांची ही दोन पात्रं म्हणताहेत- ‘म्हणजे सर्वसाधारणपणे जे मोरारजीभाईंच्या उपयोगाचं नाही ते देशासाठीही उपयोगाचं नाही!’

पंतप्रधान मंत्रिमंडळाची लवकरच पुनर्रचना करणार, ही बातमी आल्यावर अबूंचं कॅरेक्टर म्हणतंय, ‘‘मंत्रिमंडळच बहुधा पंतप्रधानांची पुनर्रचना करणार असं दिसतंय!’’ जनता पक्षातल्या बेदिलीवरचं इतकं  स्पष्ट आणि हास्यस्फोटक भाष्य दुसरं कोणतं असू शकतं?

जयप्रकाश नारायण यांचं निधन झाल्यावर त्यांच्या पॉकेट कार्टूनमधल्या दोन्ही व्यक्तिरेखा रडत आहेत, पण त्यांचे चेहरे मगरीचे आहेत (नक्राश्रू). या चित्रात त्यावेळच्या राजकीय नेत्यांना शेवटी शेवटी जयप्रकाश यांच्याविषयी काय वाटत होतं ते सगळं आलं आहे.

त्यावेळच्या सगळ्या राजकीय परिस्थितीत प्रत्येकाचे अहंगंड, सत्ताभिलाषा, कटकारस्थान, वायफळ घोषणा, भांडणं, वादविवाद, संशय आणि शेवटी पक्षात फूट हे अगदी परमोच्च पातळीवर पोहोचलं होतं. हे सगळं वातावरण अबू यांनी पशू-पक्षी, पुराणकथा, रूपककथा वगैरेंच्या आधाराने वाचकांसमोर मोठय़ा व्यंगचित्रांतून मांडलं. चरणसिंह- राजनारायण ही त्या काळातील (एक प्रकारे गुरू-शिष्य) गाजलेली जोडी. पण अखेरीस उपद्व्यापी राजनारायण हे चरणसिंह यांनाही जड होऊ लागले. तेव्हा व्यंगचित्रातील राम (चरणसिंह) हनुमानाला (राजनारायण) वैतागून विचारतो, ‘‘तू स्वत:ला समजतोस तरी कोण?’’ हनुमान म्हणतो, ‘‘अर्थातच राम!’’ या चित्रात राजनारायण यांना शेपूट काढायला अबू कचरत नाहीत.

इंदिरा गांधी यांनी अचानकपणे उत्तरेतून (रायबरेली ) दक्षिणेकडे (चिकमंगळूर) जाऊन लोकसभेची पोटनिवडणूक लढायचं ठरवून खळबळ माजवली. त्यावरचं त्यांचं चित्र खुसखुशीत भाष्य करणारं आहे.

‘गोहत्या’ हा विषय त्याकाळीही खूप गाजत होता. त्यातच एकदा बातमी आली की, देशाच्या एका भागात काही लोकांचं भीषण हत्याकांड झालंय. त्याचा निषेध म्हणून अबू यांच्या चित्रातील गाय उपोषणाला बसते!

मोरारजी देसाई हे अत्यंत हेकट, वस्तुस्थिती नाकारणारे आणि अहंगंड असणारे पंतप्रधान होते. सरकार संकटात आहे हे स्पष्ट दिसत असतानाही मोरारजी देसाई ते नाकारत आहेत, असं अबू यांचं चित्र अत्यंत प्रभावी आहे.

अबू यांनी लिखाणही भरपूर केलंय. अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी नियमित साप्ताहिक स्तंभ  लिहिले आहेत. नर्मविनोदी आणि उपहासपूर्ण अशी त्यांची शैली होती. ‘‘येत्या सोमवारी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यातील ही काही महत्त्वाची प्रश्नोत्तरं..’’ असं म्हणून त्यांनी एक धमाल लेख लिहिला आहे. मोरारजी देसाई कसे होते हे समजून घ्यायचं असेल तर अबू यांची त्यांच्यावरची व्यंगचित्रं बघितली तरी पुरेसे आहे.

निवडणुका जाहीर झाल्यावर सर्व राजकीय पक्ष इतर नवे साथीदार शोधण्याची मोहीम हाती घेतात, हे सर्वश्रुत आहेच. यावर त्यांनी ‘एक झाड आणि अनेक पक्षी’ असं चित्र काढलं.  वेगवेगळ्या पक्ष्यांना त्यांनी राजकीय चेहरे दिले आहेत. उदाहरणार्थ, राजनारायण- घुबड, चरणसिंह- बगळा वगैरे वगैरे. याला अबू ‘मेटिंग सीझन’ असं म्हणतात. हे भारतीय लोकशाहीवर सर्वकालीन भाष्य करणारं चित्र आहे असं म्हणायला हवं.